बालनाटिका : मोबाईल नंतर वाचा. . .

Submitted by चंबू on 27 August, 2018 - 01:43

मोबाईल नंतर वाचा. . .
______________________________________________________________________________________________________________________
(पुस्तक नंतर वाचा" च्या धर्तीवर आजच्या काळाला अनुसरुन "मोबाईल नंतर वाचा/खेळा" अशी एक नाटिका दोन वर्षापुर्वी बसवली होती. सर्व बालकलाकार परदेशीस्थित असल्याने साधी सोपी वाक्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नाटिकेसाठी लागणारी ऑडिओ क्लिप्स, उद्घोषणा, पार्श्वसंगीत मी स्वतःच दिले होते. यातील गाण्यात देखिल "मोबाइल नंतर खेळा" असा बदल करुन घेतला होता)
_______________________________________________________________________________________________________________________
गट अ : श्रीजा, भूमी, श्वेता, प्रांजल
गट ब : नील, ईशान, ईशा,अर्णव, देवेन

(पडदा उघडतो.. डाव्या बाजूस प्रकाश. पार्श्वसंगीताच्या जोडीला मुलांचा प्रवेश (गट अ+ देवेन). गोंधळ , किलबिलाटात मुले मुली येतात , काही मुले हातातील दप्तर फेकतात आणि सर्वांची पळापळी पकडापकडी आणि नंतर आंधळी कोशिंबीर चालू होते.
देवेनच्या डोक्यावरुन खांद्यापर्यन्त मोठे काळे कापड आहे तो कुणाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. उद्घोषणा सुरू होते. देवेन स्टेजच्या मध्याकडे सरकतो. सर्व जण स्टॅचू होतात.

"मित्रानो हा होता तुम्ही आम्ही अनुभवलेला, साधारण २००० सालापूर्वीचा काळ, जेव्हा आपल्याभोवती मोबाईलचा विळखा पडला नव्हता. बरोबर खेळण्यासाठी आजूबाजूला बख्खळ मित्रमंडळी असायची. संध्याकाळ झाली की गल्लीत एकच गलका व्हायचा. चकारी, आट्यापाट्या, लगोऱ्या, विटीदांडू, लपाछपी, चोर-पोलीस, डब्बा एक्सप्रेस .. .. { गट अ डाव्या विंगेतून तसाच दंगा करीत आत जातात देवेन तसाच स्तब्ध }
पण.. आता काळ बदलला, मनोरंजनाची साधनेही बदलली. तुमची आमची सारी जीवन पद्धती बदलली. आखाड्यातले शटटू विरले अन वातानुकूलित जिम मधे शांत इन्स्ट्रूमेंटल्स आले. मातीतले खेळ हद्दपार होऊन त्याची जागा मोबाईल, आयपॅड, कॉम्पुटर गेम्स ने घेतली. बघतोयेस ना, खेळण्यासाठी मित्र शोधणं हे आता काही वाटतं तेवढं सोपं राहिलं नाहीये."

डाव्या बाजूस हळूहळू अंधार. उजवीकडे हळूहळू प्रकाश. उजव्या विंगेतून निट्नेटकी मुले येतात. देवेनचे शोधणे चालू. घड्याळाच्या टिक टिक सारखे पार्श्वसंगीत. शांतपणे हातातील दप्तर ठेवतात, त्यातून मोबाईल काढतात अन एक एक जागा धरून मोबाईलमधे डोके खुपसून बसतात. प्रत्येकाची बसण्याची पद्धत विचित्र वाटावी अशी. ...
देवेन आपल्या हाताला कोणी लागतेय का म्हणून पुढे सरकतो आणि एका मुलाला धडकतो..)

नील : अरे ए ss ... तुला दिसत नाही का.. माझ्या हातात मोबाईल आहे ते..?
देवेन : (डोक्यावरचे कापड काढून) मला कसे दिसणार? मी तर आंधळी कोशिंबीर खेळतोय.. तू पण चल, पकडापकडी खेळू ...
नील : ए हट .. मी टेम्पल रन खेळतोय. माझ्या बाबांनी सांगितलेय की माझं घर झाडून होईपर्यंत तू देवासारखा गुपचूप हा मोबाइल खेळ ...
देवेन: देवासारखा ...?? मोबाईल खेळ! (डोक्याला हात लावतो )

देवेन : ए 'ईशान'.. चल सायकल खेळू..
ईशान: नाही रे बाबा .. पप्पांचे कुकिंग संपायच्या आता मला हा अँग्री बर्ड फिनिश करायचाय . . नंतर परत तेच घेऊन बसणार आहेत .
देवेन: (भांड्यात पळी हलवायचा हावभाव करत ) तुझे पप्पा ... अन कुकिंग..???

देवेन: ईशा काय करतेय? चल.. झोका खेळू बागेत
ईशा: पळ रे.. मी खूप बिझी आहे, आईने आताच तासाभरापूर्वी कुणाला फोन लावलाय .. तिचे बोलणे संपायच्या आत मला माझा हा कॅन्डी क्रश फिनिश करायचाय ..! परत ती मला हात लावू देत नाही.
देवेन: (चिंताग्रस्त चेहेऱ्याने) आताच ... तासाभरापूर्वी ... ??

देवेन : ' अर्णव ' .. ( ' अर्णव ' गेम मध्ये मग्न . त्याला काहीच ऐकू येत नाही .. )
देवेन : (त्याच्या खांद्याला धरून ) अरे ' अर्णव ' ..फुटबॉल खेळायचा का ?
अर्णव: (मानेनेच नाही म्हणत परत मो. मधे)
देवेन: चल ना ...
अर्णव: माझी मम्मी ना आज खूप सिरिअस आहे.. I mean टीव्ही वर कोणतीतरी सिरीयल पाहते आहे .. तो पर्यंत मला निन्जा टर्टल खेळू दे. .. डोन्ट डिस्टर्ब..

देवेन निराश होऊन येरझाऱ्या मारतो. अचानक युक्ती सुचल्याचे दाखवतो ..
देवेन : (नील कडे जाऊन, भीती दाखवण्याच्या अविर्भाव करत)
टेम्पल रन टेम्पल रन
पोलिसांची मोठी गन
पळून पळून पळशील किती
पोलिसांची खाशील गोळी (नील घाबरतो, मोबाइल बंद करतो)

(ईशान कडे जातो)
अँग्री बर्ड अँग्री बर्ड
चोच मारेल SWOOPING BIRD (ईशान घाबरतो, मोबाइल बंद करतो)

(ईशा कडे जातो )
कॅन्डी क्रश कॅन्डी क्रश
हाताच्या बोटाला Brush
शेंडीचे तर paint Brush (ईशा घाबरते, मोबाइल बंद करते)

(अर्णव कडे जातो)
निन्जा टर्टल निन्जा टर्टल
पाय सरकला सर सर सर
कपडे फाटले टर टर टर
चल उठ आता भर भर भर (अर्णव घाबरतो,मोबाइल बंद करतो)

अर्णव, ईशा, ईशान, नील एकसुरात : बापरे मग आता काय करायचे ?
देवेन : (विचार करत ) सोप्प आहे .. ठेवा ते मोबाईल खाली..
सर्वजण पटपट मोबाईल खाली टाकतात.

(पार्श्वसंगीत चालू होते. डाव्या बाजूस पण प्रकाश पसरतो. देवेन खांद्यावरचे काळे कापड एकाच्या डोक्यावर टाकतो, सर्वजण पळत सुटतात. झोंबी झोंबी ओरडू लागतात. सुरवातीला डाव्या विंगेतून आत गेलेला गट अ परत नाचत बाहेर येतात 'मोबाईल नंतर खेळा आता पळा नाचा खेळा नाचा" या गाण्यावर नृत्य करू लागतात. गट ब त्यांच्या मागे दंगा मस्ती करतायेत.
'मी बाई फुलराणी' या कडव्याला 'गट अ ' फुले ओच्यात गोळा करत आहेत. ' ब गट' त्यांच्याकडे पाहून एकमेकांच्या कानात कुजबुजतात. कुणीतरी हळूच पुढे होऊन कुणा एका मुलीच्या ओच्यातली फुले सांडून टाकतात, गट अ रागावतो अन गट ब ला पकडायला धावतो. दंगा करीत सारे जण विंगेतून आत जातात. प्रकाश मंद होऊ लागतो. शांत स्वरात उद्घोषणा {पर्यायी} होते.. )

"सहृदय पालकांनो, मुलांनी मोबाईल खेळावा, न खेळावा, किती खेळावा हा एक अनुत्तरित प्रश्न. पण त्यांना खेळण्याच्या वयात सवंगडी मिळवून देणे नक्कीच आपल्याला शक्य आहे. कसे ते ज्याने त्याने स्वतः ठरावायचेय."

__पडदा __

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users