रक्षा बंधन

Submitted by Asu on 26 August, 2018 - 11:40

रक्षा बंधन

बंधन आज कुणा न उरले
रक्षा कुणाची करावी कुणी?

आज बंधूंनो रक्षाबंधन
भावाने करावे बहिणीला वंदन
कुणाची रक्षा कुणाचे बंधन?
हजारो भावांचे पशुंचे वर्तन

हजारो बहिणींवर करती बलात्कार
त्यासाठी करावे का भावांचे सत्कार?
तीही बहीण कुण्या भावाची अभागी
मीही असेन कधी त्या जागी
बघ तिच्या डोळ्यात एकदा
तेच शरीर तीच माया
नाही का दिसत बहिणीची छाया

द्रौपदीच्या एका चिंधीसाठी
कृष्ण पुरवितो वस्रांच्या गाठी
लाज राखण्या प्रिय बहिणीची
धावून येई बघ जगजेठी

निर्लज्ज नराधम बलात्काऱ्यांनो
आठवा क्षणभर माय-बहिणीला
कुशीत ज्या तुम्ही जन्म घेतला
बदनाम करण्या तिला मातला
थोर मानवाचे वंशज तुम्ही
पशूचे वर्तन करण्या धजला!

विझविण्या वासनेच्या अंगारा
आठवा तुमच्या बहिणीचा चेहरा
करा वासना भस्मसात
बरसू द्या प्रेमाची बरसात
हेच भावा-बहिणींचे बंधन
होऊ द्या हृदयाचे एकच स्पंदन
ठेवा तत्त्व ध्यानी झगमगते
प्रेमात जग जगते वासनेत ते मरते

एक सांगतो बहिणींनो
द्या आण आज भावाला-

‘मानीन स्त्रीच्या आदराला
होईन पात्र तिच्या प्रेमाला
ना तुडवीन स्त्रीच्या स्त्रीत्वाला
ना मानीन स्त्री-पुरुष भेदाला
वंदीन स्त्रीच्या मातृत्वाला’

नका बांधू राखी त्या भावाला
ना मानी जो या पंचशीलाला
भेट राखीची हीच मला
दीर्घायुष्य मी चिंतीन तुला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(26.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults