गोभी मसाला

Submitted by योकु on 24 August, 2018 - 11:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवर ची नेहेमीच्या पद्धतीच्या प्रकाराच्याच भाज्या शक्यतो केल्या जातात, आज मी हा एक प्रकार ट्राय केला.
जमला चवीला तो इथे देतो आहे.

- एक मध्यम गड्डा फ्लॉवर (चांगला शुभ्र रंगाचा आणि घट्टमुट्ट बांध्याचा आणि करकरीत हवा)
- दोन मध्यम टोमॅटो
- चमचा भर काजू कूट
- अर्धीवाटी मटारदाणे (मी फ्रोजन वापलेले आहेत; ताजेही चालतीलच)
- एक मध्यम मोठा बटाटा
- २ तिखट व्हेरायटीवाल्या हिरव्या मिरच्या
- बोटभर आल्याचा तुकडा
- ६/७ लसणीच्या पाकळ्या
- एक चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा पावभाजी किंवा गरम मसाला
- अर्धा चमचा हळदपूड
- दोन दणक्या चिमटीभरून कसूरी मेथी
- मीठ चवीनुसार
- तेल
- जीरे

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर चे बेताच्या आकाराचे तुरे काढून घ्यावेत
बटाटा सोलून लहान आकारात चिरून घ्यावा
टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत
मिरची अगदी बारीक चिरावी
लसूण ठेचून तर आलं किसून घ्यावं
मटार थॉ करून घ्यावे
(शॉर्ट्कट - टोमॅटो, आलं, लसूण, मिरची मिक्सरमधून पेस्ट करूनही वापरता येइल पण वैयक्तिकरित्या मला भाजीत टेक्स्चर्स आवडत असल्यानी मी चिरणे, ठेचणे, किसणे असले प्रकार करतो)
जाडसर बुडाच्या भांड्यात/कढई/पॅनमध्ये जरा सढळ तेल तापवून जिर्‍याची फोडणी करावी आणि मिरची, लसूण, आलं घालून जरा परतून घ्यावं; यांचा कचवट वास निवला की टोमॅटो आणि काजूची पावडर घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावा. (टोमॅटो, आलं, लसूण, मिरची मिक्सरमधून पेस्ट करून वापरणार असाल तर जिर्‍यावर ही पेस्टच डायरेक्ट घालावी)
यात आता पाभा/गरम मसाला आणि कसूरी मेथी सोडून बाकी सगळे जिन्न्स घालावेत आणि टोमॅटोचा मसाला सगळ्या भाजीला माखेल असं दणक्यात परतून घ्यावं. आच दणदणीतच हवी म्हणजे जरा फ्लॉवर खरपूस होईल.
एक-दोन मिनिटं झाकण घालून वाफ येऊ द्यावी आणि मग मीठ घालून गरज असेल तर(च) पाण्याचा हबका देऊन भाजी मंद आचेवर पूर्ण शिजवून घ्यावी. शेवटी पाभा/गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
गरमगरम तेलात माखलेला चविष्ट असा गोभी मसाला तयार आहे. खायला घेतांना वरून कोथिंबीर घालून सजवावं.
गरम पोळ्या, पुर्‍या इ सोबत ही भाजी सुरेख लागते, वरण-भातासोबतही साईड म्हणून उत्कृष्ट Happy

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- या भाजीला तेल जरा सढळहस्तेच घ्यावं तरच चव सुरेख साधेल
- साखरेची चव या डिश मध्ये घालायची नाही
- आलं लसूण हिरवी मिरची यांचा झणका आणि स्वाद सुरेख येतो
- शिजवतांना पाणी शक्यतो वापरू नका, तेलावरच खरपूस केलेली भाजी उत्तम लागते
- गरम मसाला / पावभाजी मसाला अगदी थोडा वापरायचाय त्याची चव जाणवेल न जाणवेल इतपतच. ओवरपावर व्हायला नको.
- आज फोटो काढायचा विसरलो, सो नेक्स्ट टैम करेल तेव्हा टाकेन फोटो

माहितीचा स्रोत: 
उगाच प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! Happy

(साखरेची चिमूट आणि सणसणीत तापलेली लोखंडी कढई नसलेली योकुची रेसिपी म्हणजे खरंतर सुवर्णाक्षरांत लिहिली जायला हवी. Proud )

अर्रे अशी भाजी आम्ही नेहमी करतो वजा काजूची पेस्ट. मी खरं तर बाsssssरीक चिरलेला कांदा पण घालते आणि कसुरी मेथी मसाला परतत असतानाच घालते. भाजी शिजत आली की वरून थोडं आणखी आलं चिरून त्या सळ्या घालायच्या.

मी आज करुन पाहिली या पद्धतीने. पण ज्येनांच्या आवड नि पथ्यानुसार थोडे बदल केलेत. म्हणजे काजू पावडर आणि मिरची वापरली नाही. त्याऐवजी मसाला एक चमचा जास्त घातला. पावभाजी मसाला नसल्याने शेवटी अर्धा-अर्धा चमचा गरम मसाला आणि चिकन मसाला घातला.
रेसिपी हिट झाली हे सांगायला नकोच. Happy

Gobhi masala.jpg

हो? Uhoh
विचार करतेय की अशी खडबडीत कशी असेल .......................
पूर्ण डिश चा फोटो टाक ना....

मी केली होती ही भाजी. पण फोटो काढायचा राहिला. छान झाली होती. मी चटणी सॅन्डविचसाठी केलेली चटणी पण ढकलली यात. ( आलं लसूण मिरचीच्या जागी. चटणीत हे सर्व होतंच. शिवाय खोबरं कोथिंबीर ) Happy मटार आणि काजूची पूड नसल्याने घातली नाही.

पूर्ण डिश चा फोटो टाक ना...>> अगं इथे रिकाम्या डिशचा फोटो टाकला तर आणि इतकं अवांतर चाललंय आपलं की योकू मारेल आपल्याला. Proud

विपू बघ.