रस्त्यावरील पुणे

Submitted by सदा_भाऊ on 24 August, 2018 - 11:00

पुण्याच्या वाहतूकीवर मी नव्यानं काही लिहावं असं काही शिल्लक नाही. पुलं पासून ते दै संध्यानंदच्या वार्ताहरा पर्यंत प्रत्येकाने पुण्यातील रस्त्यांचा व वाहतुकीचा यथेच्छ समाचार घेतलेला आहे. माझ्या पुण्य नगरीतील वास्तव्यात तीच वाहतूक माझ्या आयुष्याची अविभाज्य घटक होती. तिच्या आठवणी माझ्या शब्दातून सुटणं हा माझ्यावर अन्याय होऊ शकेल याचसाठी गुरूवर्य पुलंना सविनय अभिवादन करून हा एक छोटासा प्रयत्न.

मी पुण्यात रहात असताना चारचाकी वाहनाचा माझ्याकडून अतिप्रचंड वापर झाला. दोन किलोमीटर वर असलेले माझे कार्यालय मी चारचाकांवर आरूढ होऊनच गाठत असे. पण मला दोन किमी चे अंतर दोनशे किमी वाटावे याची योजना पुणेकर नेहमीच करून ठेवत. मला रोज घोरपडी चा बाजार आणि दोन रेल्वे फाटक ओलांडावे लागत असंत. हा प्रवास म्हणजे माझी रोजची अडथळ्याची शर्यत असे. रेल्वेफाटकांच्या सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडल्यावर रावणाने सीतेला लक्ष्मणरेषेबाहेर काढल्याचा मला रावणी आनंद होत असे. फाटक बंद असताना दुचाकीस्वाराना उजव्या, डाव्या, सरळ, तिरक्या, उभ्या, आडव्या, खाली, वर अशा सापडेल त्या दिशेला वाहन घुसवण्याची खास मुभा त्यांच्या परवान्यावर छापून दिलेली असावी. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला जमलेला हा स्नेहमेळावा हा पुण्याच्या सांस्कृतिक देवाण घेवाणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देत असतो. शाळा सुटल्यावर फाटक उघडता क्षणी बालगोपालानी ज्या आनंदाने बाहेर पडावे त्या उत्साहाने समस्त दुचाकी धारक रेल्वे फाटकातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

गाडीचा हाॅर्न हा केवळ चालक जिवंत असल्याचा पुरावा म्हणून वापरात आणलेली गोष्ट अाहे. एखाद्या वाहन चालकाने सलग तीन मिनीट हाॅर्न वाजवला नाही तर त्याला मृत घोषीत केलं जाण्याची भीती प्रत्येक पुणेकराच्या मनात असावी. लाल सिग्नल ला उभे असलेले, बंद फाटकासमोर उभे असलेले, मोकळ्या रस्त्यावर, बायकोचं शाॅपींग चालू असताना रस्त्याच्या कडेला ताटकळलेले अशा नानाविध परिस्थितीत हे लोक सतत हाॅर्न वाजवून आपण जीवंत असल्याची स्वत:ला तसेच जगाला खात्री करून देत असतात. पुण्यातील सिग्नल हे वाहनांचे नियमन करण्यासाठी नसून रस्त्यांना सुशोभीत करण्यासाठी लावलेले असतात. त्यावरील लाल, पिवळा, हिरवा रंगाचे दिवे हे निव्वळ लहान मुलांच्या करमणुकीसाठी रस्त्यावर लावले आहेत असा सर्व पुणेकरांचा समज असावा. त्या कोणत्याही रंगाच्या दिव्यामुळे आपल्या वाहनाच्या गतीमधे यत्किंचीतही बदल न करता आपले इप्सित स्थळ गाठणे अतिशय महत्वाचे असते. काही प्रामाणिक पुणेकर पिवळ्या दिव्याच्या दर्शनाने वाहनाचा वेग दुप्पट करून पळ काढतात. प्रत्येक पुणेकर हा अतिशय उद्योगी, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा देशाच्या व समाजाच्या हितासाठी खर्च झाला पाहीजे अशीच प्रत्येक पुणेकराची प्रांजळ इच्छा. या उदात्त विचारांती केली थोडीशी घाई आणि वाचवले रस्त्यावरील वाया जाणारे क्षण तर बिघडले कुठे! पुणेकरांमधे डाव्या बाजूने वाहन चालवा हा नियम फक्त वाहन परवाना प्राप्तीच्या परीक्षेपुरताच मर्यादीत असतो. वस्तुत: रस्त्याच्या नक्की कोणत्या बाजूने वाहन चालवावे हा ज्याचा त्याचा मर्जीचा किंवा सोईचा भाग असतो. रस्त्याचे विभाजन किमान चार प्रकारात केले असल्यामुळे अपुणेकरांचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे, पण सच्चा पुणेकराचा कदापी नाही. जरी इतर वाहने आणि बस मार्ग असे विभाजन सर्वश्रृत असले तरी वाहन चालवणाऱ्याच्या त्या वेळेच्या मन:स्थितीवर तसेच वाहतुकीच्या परिस्थितीवर रस्त्याची निवड ठरते. जो रस्ता अधिक सोईचा व जवळचा तो निवडण्याची मुभा फक्त खास पुणेकराना महानगरपालीकेने देऊ केलेली आहे. डावी, उजवी बाजू शोधण्यात वेळ घालवणे त्याना आवश्यक नसते.

पुण्याच्या रस्त्यावर फक्त खड्डे आणि दगड आढळू नयेत म्हणून हातगाडीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, म्हशी, कुत्री, गाढवे या सर्वाना मुक्तपणे संचार अथवा विश्रांती घेण्याची मुभा आहे. वाहन चालकाला या सर्व अडथळ्याना किंचीतही इजा न करता मार्ग काढणे अपेक्षित असते. युध्दावरून परत आलेल्या सैनिकाच्या अंगावर जशा जखमा त्याचा मान वाढवतात; तसे गाडीवर पडलेले खरके आणि पोचे तुम्ही किती पुणेकर आहात हे सिध्द करतात. एकदा माझ्या गाडीतून मी तब्बल वीस च्या वेगाने जात असता मला समोरून एक बाल गर्दभ दुडक्या चालीने माझ्या दिशेने येताना दिसले. मी पटकन गाडी थांबवली आणि त्याची वाट पहात राहीलो. ते दुडूक दुडूक करीत आले तरीपण समोरच्या गाडीला पाहून थोडा सुध्दा वेग न बदलता ते येऊन धडकले. धडकता क्षणी ते तिथंच पडले आणि कळवळले. उतरून पहावं का या विचारात मी होतो तोपर्यंत ते पुन्हा उठले आणि दिशा बदलून त्याच वेगाने निघून गेले. त्याची ती चपळता पाहून माझा पुणेकरांबद्दलचा आदर दुणावला. एकदा माझ्या ऑफीस मध्ये फ्रान्स मधून एक अतिथी आला होता. तो स्टेशन जवळ रहात होता. तिथून हडपसर पर्यंत त्याला रोज प्रवास करावा लागे. त्याच्या साठी वाहक आणि गाडीची सोय केली असली तरी त्याच्या साठी रोजचा प्रवास हा आयुष्यातील रोमांचकारी अनुभव होता. एक दिवस असाच तो येत असताना कोणत्या तरी सिग्नल ला त्याची गाडी थांबलेली असताना एक भली मोठी म्हैस त्याच्या गाडीला धडकून गेली. तो गाडीसहीत आणि मनाने पण भलताच हादरला. त्यानंतर तो बरेच दिवस वाघ धडकून गेल्या प्रमाणे सर्वाना वर्णन सांगत होता.

एकदा हडपसर च्या गर्द गर्दीत माझी गाडी ठप्प उभी असताना एका देशी मदिरेचा सुसंकृत ग्राहक नागमोडी वळणे घेत माझ्या दिशेने येऊ लागला. गाडी अडकून पडल्यामुळे त्या आदरणीय व्यक्तीचे स्वागत करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. तो विद्वान सर्पाच्या चालीने येऊन माझ्या गाडीला खेटून उभा राहीला. काचेवर टकटक करून त्याला सावध करण्याचा मी निष्फळ प्रयत्न केला. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागल्यामुळे मम पामराची हाक त्याच्या पर्यंत पोचत नव्हती. तो त्याची टाळी माझ्या गाडीच्या टपावर वाजवत होता म्हणून माझी चलबिचल वाढली होती. दरम्यान गाडीला पुढं जाण्यास थोडा मार्ग झाला. त्याच्या मार्गात अडथळा आल्याने कदाचित त्याचीपण नाराजी असेल. ती त्याच्या सुसंस्कृत भाषेतून कानावर पडत होतीच. आता याला बाजूला करून कसे पुढे जावे या विचारात असतानाच कोणीतरी सुजाण नागरीक त्या टाळीवाल्या विद्वानाला ओढून घेऊन जाऊ लागला. मी सुटकेचा निश्वास टाकून गाडी पुढं ढकलली. त्यानंतर ज्यावेळी कधी त्या रस्त्यावरून माझे जाणे होई त्यावेळी माझी नजर त्या टाळीवाल्या बाबाच्या आठवणीने गांगरून जाई. "आदरयुक्त भीती" चे हे चांगले उदाहरण असावे.

पुण्यातील श्वेतवस्त्रांकीत पोलिसांची तर वेगळीच कथा. दिवसभर रस्त्यांवर उन्हा तान्हात उभे राहून कमनिय देहयष्टी प्राप्त करतात. त्यांच्या दिमतीला एक मोठासा युवक समुदाय सदैव तत्पर असतो. नियम भंग करून पळणाऱ्या गाड्या पकडणे, चुकीच्या जागी लावलेल्या वाहनाना ताब्यात घेणे, रस्त्यावरील वाहनस्वाराना पुणेरी पध्दतीत नियमांची ओळख करून देणे .. इत्यादी महत्वपूर्ण कामांची जबाबदारी त्या युवकांवर असते. इतकेच नाही तर हे युवक वाहनस्वारांची दिशाभूल पण करतात आणि सरकारच्या अथवा श्वेतवस्त्रधारी च्या तिजोरी भरण्यास मदत करतात. एकदा पुण्यातल्या एका चौकात मी लाल दिवा पाहून थांबलो होतो. मला डावीकळे वळायचे होते पण मला दिसले की डावीकडे वळणे निषिद्ध आहे. मी उजव्या बाजूला वळण्याचा निर्णय घेतला. पण माझ्यासमोर असलेल्या दुचाकीस्वाराने बिनधास्त डावीकडे गाडी वळवली. मी थोडासा गोंधळलो आणि विचार केला की कदाचित आता डावीकडं जाण्याची परवानगी असावी. वळल्यावर साधारण पन्नास मीटर वर अनेक श्वेत वस्त्रधारी वाटच पहात होते. त्या दुचाकी स्वाराने माझ्याआधी पुढं जाऊन त्याना मी येत असल्याची वर्दी दिली होती आणि पुन्हा वळवून दुसऱ्या सावजाला पकडायला रवाना पण झाला होता. त्या दिवशी माझ्या नशिबात जी सरकारी दक्षिणा देणे लिहीले होते ती देऊन मी स्वत:ची सुटका करून घेतली.

मी पुणं सोडून साधारण बारा अधिक वर्षे लोटली. मात्र मला पुण्याबद्दल अतिशय गाढा विश्वास आहे. सरकार ने दोन चार उड्डाण पुल जरूर बांधले असतील पण त्यामुळे संस्कृती बदलणे शक्य नाही. पुर्वीचे पुणे अजूनही तसेच असणार!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते दुडूक दुडूक करीत आले तरीपण समोरच्या गाडीला पाहून थोडा सुध्दा वेग न बदलता ते येऊन धडकले. धडकता क्षणी ते तिथंच पडले आणि कळवळले. उतरून पहावं का या विचारात मी होतो तोपर्यंत ते पुन्हा उठले आणि दिशा बदलून त्याच वेगाने निघून गेले.
Rofl
त्याची ती चपळता पाहून माझा पुणेकरांबद्दलचा आदर दुणावला.
Proud

पुणेकरांच्या दृष्टीने विचार करता खालील गोष्टी ध्यानात येतात -
(बर्‍याच गोष्टी सर्वांना माहित आहेत असे त्यांना वाटते, पण ज्या प्रकारे ते पुण्यातल्या वहतुकीची चेष्टा करतात, त्यावर टीका करतात, त्या वरून वाटते की यांना शष्प समजत नाही. म्हणून एकेक मुद्दा सांगतो)

भारतात लोकसंख्या फार फार वाढलेली आहे. एव्हढ्या सगळ्यांचे पोट भरायला अनेक उद्योगधंदे निर्माण झाले.
ते करायला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे किंवा माल पोचवणे, नि तेहि वेळेवर, हे आवश्यक झाले.
त्यासाठी रस्ते बांधले इकडून तिकडे जायला,
रस्त्यावर वाहनात बसून किंवा वाहनावर बसून वेळ घालवण्यासाठी नाही.
म्हणून कुठलेहि अनैसर्गिक अडथळे, जसे माणसांनी केलेले कायदे. न मानता सतत पुढे जाऊन आपल्या मागून येणार्‍यांना रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देणे हेच सुशिक्षित नि सुसंस्कृत माणसाचे लक्षण.
नि पुणेकर सर्वात जास्त सुशिक्षित नि सुसंस्कृत आहेत हे उघड आहे (पुणेकरांच्या दृष्टीने विचार करता )

या तत्वावर पुण्यातली रहदारी चालते. नि काहीहि असले तरी तत्वाचा प्रश्न सर्वात जास्त महत्वाचा (पुणेकरांच्या दृष्टीने विचार करता ).

तुमची परिस्थिती मला माहिती नाही, पण एक माणूस फक्त २ किमी अंतरा करता ४ चाकी गाडी वापरतो आणि मग रस्त्यात किती गर्दी म्हणून रडतो याबद्दल कुठलीही सहानुभुती नाही. बाकी चालू द्या.

कुठल्या महान गावाकडून येऊन आपण हे महान मतप्रदर्शन केलेत? मुंबई का?

बाकी आजकाल पुण्यातील वाहतुकीचा सरासरी वेग तासाला तेरा किलोमीटर आहे, म्हणे जे अंतर चालूनही पार करता येते

पण हेल्मेटसक्ती मात्र फक्त दुचाकीस्वारांना करण्याचे गंभीर प्रयत्न केले जातात, चालणाऱयांना का नाही??

पण पुण्यात एका तासात तेराच किलोमीटर जायचे असल्याने हा वेग माणसे सहन करत असावीत

ह्यात पुणे ऐवजी भारतातल्या चंदीगड वगळता इतर कुठल्याही शहराचे नांव चालले असते..
मी सध्या हैदराबादेत आहे आणि इथली वाहतूक म्हणजे पुणे चंदीगड वाटावे..
मी भारतातल्या किमान ५० मोठ्या शहरात फिरलोय तेथील वाहतूक नक्कीच पुण्यापेक्षा वाईट आहे.

पण पुणे म्हणजे कुणीही येऊन टपली मारावी.

अहो पुलं देखील पुण्यात शेवटी वास्तव्य करते जाहले ह्यातच काय ते समजा..

म्हणजे सर्व भारतातले लोक हुषार आहेत, रस्ते बांधण्यामागचे खरे कारण ओळखून त्याप्रमाणे रहदारी करतात.

अमेरिकेत रस्ते बांधणे हे केवळ ते लवकर खराब व्हावे, मग दुरुस्तीसाठी भरमसाठ पैसे करदात्यांकडून घ्यावेत नि काही लोकांना (मुन्शीपल्टीचा अधिकारी नि काँट्रॅक्टर) खूप पैसे मिळावेत हा उद्देश असतो.
भारतात एव्हढ्या रहदारीत रस्ते दुरुस्त करणे शक्यच नाही - ते पैसे वाचतात. शिवाय भारतात अनेक लोक कर भरतच नाहीत किंवा पूर्ण भरत नाहीत, त्यामुळे तसेहि पैसे नसतातच.

मंडळी... जर मी पुणेकरांच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमस्व! केवळ विनोदाचा भाग समजून मला माफ कराल अशी अपेक्षा करतो. जे लिहलं त्यात गैर किंवा खोटं मुळीच नव्हतं हे सुध्दा तितकंच सत्य! या वर्णनात इतर शहरे बसू शकत नाहीत असा माझा दावा मुळीच नाही. कदचित माझा अनुभव कमी पडला असेल. जाणकार मंडळीनी दिलेल्या अभिप्राया बद्दल त्यांचे शतश: धन्यवाद! मी असेच काहीतरी कधीतरी लिखाण करीत असतो. त्यावर आपण मुक्त अभिप्राय देत रहावेत इतकीच माझी अपेक्षा.

अरे हो! अजून एक महत्वाचे! मी काही मुंबईकर नाही हं! उगाच कशाला मुंबापुरी ला बदनाम करता? Happy
मी एक मराठी माणूस इतकीच ओळख पुरेशी आहे ना.

1 ते 4 प्रवास करत चला, तेंव्हा पुणेकर घोरत पडलेले असतात.>>>> हो, आपले च्रप्स याच वेळेत येरझार्‍या घालत असतात. Biggrin

....त्यानंतर तो बरेच दिवस वाघ धडकून गेल्या प्रमाणे सर्वाना वर्णन सांगत होता. >> Lol हसणे कंट्रोलच झाले नाही

छान लिहिलंय. आवडलं.

बाल गर्दभ, देशी मंदिरचा ग्राहक यांचे किस्से आवडले. किस्से रंगवण्याची आपली हातोटी छान आहे.

त्यानंतर तो बरेच दिवस वाघ धडकून गेल्या प्रमाणे सर्वाना वर्णन सांगत होता.  >>> Lol

इतकेच नाही तर हे युवक वाहनस्वारांची दिशाभूल पण करतात आणि सरकारच्या अथवा श्वेतवस्त्रधारी च्या तिजोरी भरण्यास मदत करतात. >>> वाचून वाईट वाटले.

पुणेकरांना गणित समजत नाही.
एखाद्या ३३फुटी रस्त्यावरून तासाला जास्तीतजास्त वाहाने जाऊ शकतील ती मर्यादा या शहराने ओलांडली आहे तरी माझेच वाहन सुळकन जाईल असं का बरं वाटत राहाते?
ही आकडेवारी शिमला ओफिसला लावावी रोज( एवितेवी पुणे वेधशाळा बंदच करणार आहेत आणि दिल्लीवाले पुण्याचे हवामान सांगणार आहेत.)

पुणेकरांना गणित समजत नाही.
एखाद्या ३३फुटी रस्त्यावरून तासाला जास्तीतजास्त वाहाने जाऊ शकतील ती मर्यादा या शहराने ओलांडली आहे तरी माझेच वाहन सुळकन जाईल असं का बरं वाटत राहाते?<<<<<

Lol

६५ टक्के नागरिक आपापल्या मूळ गावी जाऊन स्थायिक झाले तर प्रश्न चुटकीसरशी सुटेल. पण त्यांना पुण्यात येऊन आपलं आयुष्य सुळ्ळकन् पुढे न्यायचं असल्यामुळे ते शक्य नाही. Wink

६५ टक्के नागरिक आपापल्या मूळ गावी जाऊन स्थायिक झाले तर प्रश्न चुटकीसरशी सुटेल. पण त्यांना पुण्यात येऊन आपलं आयुष्य सुळ्ळकन् पुढे न्यायचं असल्यामुळे ते शक्य नाही +११

आवडलं. मस्त जमलंय. << पुण्याच्या रस्त्यावर फक्त खड्डे आणि दगड आढळू नयेत म्हणून हातगाडीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, म्हशी, कुत्री, गाढवे या सर्वाना मुक्तपणे संचार अथवा विश्रांती घेण्याची मुभा आहे. >> हे तर अगदी अगदी. Lol

६५ टक्के नागरिक आपापल्या मूळ गावी जाऊन स्थायिक झाले तर प्रश्न चुटकीसरशी सुटेल. पण त्यांना पुण्यात येऊन आपलं आयुष्य सुळ्ळकन् पुढे न्यायचं असल्यामुळे ते शक्य नाही. >>>> अहो ते एस आर डी मुंबईचे आहेत, त्यामुळे बिनधास्त पुण्यावर टीका करु शकतायत. पुण्याचे काय झालेय की पुणे ही एक अप्राप्य सुंदरी आहे त्यामुळे लोक बिचारे, पुण्याबाबत टीका करतांना सहन होत नाही आणी सांगता येत नाही अशा स्थितीत असतात. Biggrin

विषयच असा निवडलाय की बोटांना पाणी सुटलंय. भारी लिहीलंय.

घोरपडी बाजार, घोरपडी गाव इथे मित्राकडे जाणं व्हायचं नेहमी. भयाण वाहतूक आहे. नंतर केशवनगर इथे कामानिमित्त जाणं होऊ लागलं. मधला टापू मिलिटरीचा आहे. ते वाटेल तेव्हां रस्ता बंद करीत. मग तारांबळ व्हायची.

हॉर्न वाजवण्याबद्दल नंतर लिहीतो.