काळा काळ, भगवेकरण आणि निळे स्वातंत्र्य

Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 August, 2018 - 05:54

जमीन हमारा हक है म्हणत जेव्हा "काला" (मुख्य अभिनेते नाना पाटेकर आणि रजनीकांत) चित्रपटातला काळा रावण (रजनीकांत), स्वतःला राम समजणाऱ्या हरिदादाला (नाना पाटेकर) निळ्या रंगात न्हाऊ घालतो तेव्हा एकच प्रश्न मनात येतो की हे सगळं आपल्या नजरेसमोर घडत आहे का?
सरकार आम्हाला देत आहे ते फुकट नाही असं ठणकावून सांगतानाच, संपाच्या माध्यमातून आपलं महत्व न बोलता अधोरेखित करणारा काला जेव्हा अगतिक न होता ताठ उभा राहतो तेव्हा प्रश्न पडतो, खरंच एवढा अन्याय होतो आहे का? हरिदादा अभ्यंकर, त्याचं स्वतःला राम समजणं, त्या भगव्या फौजा, जमीन हडपण्यासाठी केलेला धुडगूस, आपल्या पायाला एकदा कालाने हात लावावा म्हणून केलेला अट्टाहास बघताना मात्र एकही प्रश्न पडत नाही! सध्या माझ्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना बघता अश्या प्रवृत्ती इथं आहेत, त्या प्रवृत्ती जोपासणाऱ्या संस्था आहेत, त्यांना पाठीशी घालणारं सरकारही आहे, आणि हे सगळं निवडणुकांच्या तोंडावरच का घडत असावं असा एक बारीकसा प्रश्न देखील आहे. रणजितने प्रतीकांचा अतिशय उत्तम असा वापर केलेला आहे, संपूर्ण चित्रपट प्रत्यक्ष संवादांऐवजी प्रतिकातून जास्त बोलतो, (मनू बिल्डर, pure शब्दाचा वापर, रामायण कथा, कालाचे कपडे, कपाळावरील टिळे, बौद्ध विहाराचा वापर, लेनिन, शेवटची होळी आणि इतर बरेच) आणि म्हणून मनावर खोलवर चरा उमटवून जातो. अर्थात हा चरा फक्त डोळे उघडे ठेवून जगणाऱ्या लोकांच्याच मनावर उमटू शकतो. कालाने आपल्यापुरता जगण्याचा मार्ग निवडलेला आहे, त्याला संघर्ष नकोय, पण कोणी अरे म्हटलं तर तो कारे म्हणणार, सन्मान नकोय पण अपमान सहन करणार नाही. त्याला शिक्षणाचं महत्व पटतंय, आणि त्यावर तो अंमल देखील करतोय. संपूर्ण सिनेमात तो अगतिक कुठेही दिसत नाही, कायम लढण्याची त्याची वृत्तीच समोर येते!
आता राहिला प्रश्न हरिदादाचा, तर असे लोक आहेत आणि ते आता सिद्ध होतच आहेत, धर्माचे दलाल म्हणता येईल एकप्रकारे पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे गुलाम, आपण तेवढं उच्च आणि इतर लोक तुच्छ अशी विकृत मानसिकता जपणारे हेच लोक दाभोळकरांसारख्या निष्पाप माणसाचा जीव घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत, आज या मनुवादी सत्तेत प्रश्न विचारणे देखील गुन्हा आहे हाच मुद्दा झरीनाचे पात्र समजावून सांगते. अर्थात इथे जनरलायझेशन टाळले पाहिजे, पण वारंवार लहानसहान प्रसंगातून सामोरा येणारा चेहरा मात्र हाच आहे. मायबोली सारख्या जागतिक व्यासपीठावर अनेक सुशिक्षित आहेत ज्यांना या व्यवस्था मान्य नाहीत, ते हे समज सांभाळत नाहीत,पण म्हणून हे होतच नाही असे म्हणणे असेल तर हात टेकण्याशिवाय पर्याय उरत नाही!
शेवट जरी निळ्या रंगाने झालेला असला तरी सर्वसमावेशक असलेला तो काळा रंग माझ्या मनावर भरून राहिलेला आहे आता, आणि तो तसाच रहावा अशी माझी इच्छा आहे!
*अजिंक्यराव पाटील

Group content visibility: 
Use group defaults

सम्पूर्ण धागा वाचून कळेल अशी अपेक्षा होती, असो.. आता पहिल्याच वाक्यात संदर्भ स्पष्ट केलेला आहे. सुचनेसाठी धन्यवाद.

धन्यवाद. अशा नावाचा कुठला चित्रपट आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे कळले नाही.