“पर्थी”ची वाट! भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो

Submitted by kulu on 21 August, 2018 - 23:28

भाग १ https://www.maayboli.com/node/67051
भाग २ मुरो कट्टा https://www.maayboli.com/node/67131

किंग्ज पार्क फिरून आल्यानंतर आमच्या तिघांचे मिळून एकूण ६ पाय त्या रात्री........... वा र ले! फारच आवडायचे मला ते, पण खूप वापरल्यामुळे अकालीच गेले! मार्को आणि कोर्नेलीया तसे माझ्यापेक्षा थेरडे आहेत आणि त्यांनी माझ्यापेक्षा जास्त ठिकाणे बघितल्यामुळे मला त्यांच्या पायांचं फार काही वाटत नव्हतं, पण माझे दोन पाय मला खूपच प्रिय होते! एखादा जरी असता तरी दुसर्‍या दिवशी लंगडत कुठेतरी गेलो असतो फिरायला पण तीही सोय उरली नाही आणि पर्थ च्या तापलेल्या जमिनीवरून सरपटत फिरायला जायचे धैर्य माझ्यात नव्हते म्हणून पुढचा दिवस काहीही न करता नुसता बसून घालवला! मार्को आणि कोर्नी दोघांनाही फिरायला आवडतं पण दोघेही मोस्टली फिरले ते संशोधनासाठी samples गोळा करायला... तीनदा अंटार्क्टिका, दोनदा आर्क्टिक, आईसलंड, ग्रीनलंड, हवाई चा ज्वालामुखी अश्या अनेक एक्झॉटीक ठिकाणी दोघेही जाऊन आले होते, तिथल्या आठवणी , वर्णने सांगून दिवसभर मला जळवायचं काम दोघांनी मन लावून पूर्ण केलं! पण मीही त्यांना तिथल्या इथे उत्तर दिलं म्हटलं “ते आईसलंड मधले तलाव काय सांगता, आमचा कळंबा बघितला काय? आणि कात्यायनीची टेकडी? आणि आमच्या संध्यामठात जाऊन sample घेतलंय काय तुम्ही? काय तर आर्क्टिक आणि हवाई च सांगत्यात मला!” पण मी हे मनातल्या मनात सांगितल्याने त्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया कळू शकल्या नाहीत! तर sampling विषयी चर्चा करताना मार्को म्हटला कि आपण लेक क्लिफ्टन ला जायला पाहिजे कारण तिथे थ्रोम्बोलाईट्स आहेत! थ्रोम्बोलाईट्स म्हटल्यावर मी एकदम खूषच! वेस्टर्न ऑस्ट्रेलियात ज्या सहजतेने थ्रोम्बोलाईट्स पहायला मिळतात तसे जगात कुठेच नाहीत त्यामुळे ही संधी मी नक्कीच दवडणार नव्हतो. देवाच्या कृपेने दुसर्‍या दिवशी आमच्या तिघांचे निवर्तलेले पाय पुन्हा जिवंत झाले आणि आणि आम्ही ते आम्हा तिघांच्या तश्रीफांसह लगेच बमव मध्ये ठेवले क्लिफ्टन साठी रवाना झालो!

लेक क्लिफ्टन पर्थ च्या दक्षिणेला दिडेक तासावर आहेत, एकदम कोल्हापूर कर्‍हाड अंतर! वेस्टर्न ऑस्ट्रेलियात जो प्रवास होतो तो सगळा समुद्रकाठानेच होतो! क्विनाना फ्रीवे पकडला कि तो सरळ खाली जातो (कुठे ते मला माहित नाही, मला चांभारचौकश्या करायची सवय नाही) त्यावर वाटेत कुठेतरी क्लिफ्टन येत! ज्या लोकांनी परवाच्या दिवशी किंग्ज पार्क ला गर्दी केली होती ती सगळी मांदियाळी आज लगेच फ्रीवे वर येऊन पडली होती त्यामुळे फ्रीवे वर फ्री वे नव्हताच! शेवटी मार्को वैतागला आणि फ्री वे सोडून आम्ही रॉकिंगहम रोड धरला जो खरंच फ्री होता. हा रोड रॉकिंगहम ला जातो (झालं समाधान? उगाच हा रोड कुठे जातो न तो रोड कुठे जातो याच्या चौकश्या!) आणि पुढी कडेकडेने क्लिफ्टन ला! रॉकिंगहम च्या आधी क्विनाना बीच लागतो जो खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं त्यामुळे आमची बमव तिथे जाऊन थांबली! क्विनाना म्हणजे पर्थ ची कागल एमआयडीसी. इंडस्ट्रीयल असूनही सुंदर सबर्ब आहे हा. क्विनाना च नाव क्विनाना कस पडलं याची एकदम रोचक (दिवाळीअंक स्पेशल शब्द!) कथा मला तिथल्या बीच वर लावलेल्या फलकावरून समजली! तर गोष्ट सुरु होते इंग्लंड मध्ये जिथे १८९२ साली एस एस दारीअस नावाची आगबोट तयार होत होती. कलकत्ता ते पर्थ यामधल्या सगळ्या समुद्रावरून दारीअस सामान आणि माणसे आणि माणसांचे सामान अशा तिघांची ने-आण करत होती , १९१२ साली ही बोट स्टेट शिपिंग सर्विस ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (SSS) ने विकत घेतली आणि तिचं नाव ठेवलं “क्विनाना” म्हणजे अबोरीजनल भाषेत अर्थ होतो “नवयौवना”! ही नवयौवना ऑस्ट्रेलियात किंबर्ले ते पर्थ अशी गाईम्हशी आणि माणसे इकडून तिकडे नेत बसायची. पण हि नवयौवना अकालीच वृद्धत्व आल्यासारखे वागू लागली; कधी साठवणीतल्या कोळश्याला आग लागून तिच्या पोटात जळजळ व्हायची तर कधी नांगर टाकताना खडकाला धडकून तिचं कंबरडं मोडायचं. पण १९२० च्या नाताळ ला ती अगदी च आजारी पडली, शार्क बे वरून लाकडे आणत असताना तिच्या पाटात आगडोंब उसळला, जितक्या वेळा विझवली तितक्या वेळा पुन्हा नव्याने आग लागत होती, आणि याच वेळी तिच्यात ३०० टन कोळसा साठवलेला होता!!! तशीच आगीसहित तिला कसंबसं कर्नावन ला पर्थ च्या उत्तरेला नेलं आणि तिथल्या जेट्टीत ती आर्धी बुडवण्यात आली आणि एक मोठा स्फोट टळला!! पुढे तिला SSS ने मोडीत काढायचं ठरवलं पण आख्खी बोट मोडीत घ्यायला कोणीही भंगारवाला तयार होईना, मग पर्याय नाही म्हणून SSS ने बोटीला dismantle करायचे ठरवले पण एक क्षण असा आला कि तिला dismantle करणं हे तिच्या मोडीतल्या भावापेक्षा जास्त महाग होऊ लागलं! झालं, मग ते बोटीचं उरलेलं धूड गार्डन आयलंड वर शिप करण्यात आलं, पण शांत बसेल ती क्विनाना कसली, एके दिवशी भरतीत वाहून ती रॉकिंगहम च्या खाली एका बीचवर येऊन पहुडली! आणि ती जिथे रुतून बसली ती तिथेच! तर या क्विनाना वरून या बीचला क्विनाना बीच असं नाव पडलं आणि त्या गावाला क्विनाना! आज क्विनाना चाळीसेक हजार वस्तीचं सुंदर गाव आहे. हेवा वाटावा असा सुंदर समुद्राकाठ आहे आणि औद्योगिकरणाने आणलेली भरभराट ही आहे. एका नवयौवनेने आपलं यौवन दुसरीला देऊन तिला नवयौवना केलं! '

बीचवर क्विनाना अगदीच रुतली तेव्हा तिच्यात सिमेंट ओतून तिची जेट्टी करण्यात आली छोटी! आम्ही तिघे तिच्यावर जाऊन उभे राहिलो. हा जो रेतीने भरलेला भाग दिसतोय ती क्विनाना, टोकाला पुढे तिचा गंजलेला तुरा अजून दिसतोय!1.jpg

बीचवर एक सुंदर जेट्टी वेगळी आहेच! समुद्राने सुंदर रंग धारण केला होता. हिरवट निळा सुंदर, सोनसळी दिवस मोकळ आकाश आणि पसरलेला असा समुद्र! मजानू लाईफ!
2.jpg

आणि हे आमचे ऑस्ट्रेलियातले मायबाप!
4.jpg

आणि हा मी!
5.jpg
एव्हढं नवयौवना वगैरे नाव मिरवणाऱ्या या प्रदेशात माझ्यासारख्या राजबिंड्या कि राजबंड्या तरुणावर कोणीही नवी, जुनी, जुनाट, प्राचीन अशी कसल्याच प्रकारची यौवना फिदा झाली नाही हे क्विनाना चे दुर्दैव!

पुढचा स्टॉप म्हणजे लेक क्लिफ्टन चे थ्रोम्बोलाईट्स. थ्रोम्बोलाईट्स ही एक भारी गोष्ट आहे, खूप खूप जुनी! पृथ्वीवर जे पहिले organized जीव अस्तित्वात आले त्यातला हा एक. प्रकाशसंश्लेषण करणारे शेवाळासारखे सारखे सूक्ष्मजीव ज्याला सयानोबाक्टेरिया म्हणतात ते एकत्र येतात आणि एखाद्या छोट्या वाळूच्या कणाभोवती कॉलनी सुरु करतात, त्यांनी स्रवलेल्या चिकट आवरणामध्ये बाकीच्या अशाच प्रकारच्या पेशी चिकटत जातात, वाळूचे कण आणि मृतपेशींचा ढीग वाढत जातो आणि त्याचा मोठा गोळा तयार होतो ज्यात पृष्ठभागावर जिवंत पेशी प्रकाशरावांच्या मदतीने रेशनची साखर साठवत जातात! पृथ्वीवर प्राणवायू पहिल्यांदा या जीवांनी तयार केला! पृथ्वीचं पूर्ण वातावरण यांनी बदलून टाकलं म्हणजे किती भरमसाठ प्रमाणात thrombolites एके काळी असतील? हे क्लिफ्टन चे थ्रोम्बोलाईट्स तसे फार प्रसिद्ध नाहीत त्यामुळे इथे गर्दी नसते.

ते बघता यावे म्हणून इथे लाकडी फळ्यांची अशी वाट केलेली आहे!
6.jpg

त्या फळ्यांवरून दिसणारं हे लेक क्लिफ्टन!
7.jpg

समुद्राला लागून असणारे हे लेक क्लिफ्टन उन्हाळ्यात समुद्रापासून वेगळं होतं आणि त्यातले थ्रोम्बोलाईट्स उघडे पडतात. हे बघून मला अप्प्यांची आठवण झाली!
8.jpg

भारी वाटत होत बघताना, यांचे पूर्वज होते म्हणून आज सुखनैव इथे नांदत आहोत, या एवढ्याशा छोट्या गोळ्यांनी पृथ्वीच्या गोळ्याला बाकीच्या ग्रहांपासून वेगळं केलं! मी या अशा बाबतीत जरा इमोशनल होतो उगाच, नमस्कार केला मी थ्रोम्बोलाईट्स ना, का ते मला माहित नाही अजूनही!
9.jpg

क्लिफ्टन चा हा परिसर नेचर रिझर्व आहे, बाहेर सुंदर पार्क आहे, पर्थ च्या गरमीचा तिथे मागमूस नव्हता उलट हलकाच गारवा होता. तिथेच आम्ही एका बेंच वर बसलो. दुपारचे दोन वाजले होते आणि प्रचंड भूक लागली होती! कोर्नाक्का ने sandwiches आणि पास्ता डब्यातून भरून आणला होता तो गट्टम केला! एक तासभर आम्ही तिथे बसून होतो. थ्रोम्बोलाईट्स वर चर्चा करत. थ्रोम्बोलाईट्स मधून DNA घेऊन त्यात active असणारे सगळे सूक्ष्मजीव आणि त्यांचे विषाणू शोधायचे असा एक प्रोजेक्ट त्याच्या डोक्यात होता. प्रत्येक सीझन मध्ये त्या जीवाणुंच्या संख्येत आणि विविधतेत बदल होतो का हे सुद्धा बघायचं होतं, तर ड्रिलिंग वगैरे कसं करता येईल याविषयी आम्ही बराच वेळ बोलत होतो!
चार च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. जे बघायला आलो होतो ते बघून झाल होत त्यामुळे वाटेत कुठे काही दिसलं तर थांबू असा प्लान होता! तर येताना वार्नब्रो बीच अशी पाटी दिसली आणि बमव तिकडे वळली!
10_0.jpg

रॉकिंगहम आणि manduraa च्या मध्ये दोन बे आहेत त्यातला हा एक छोटा पण जास्त वळणदार असा बे! वेस्टर्न ऑस्ट्रेलिया च सगळ्यात भारी वैशिष्ट्य काय असेल तर सुंदर समुद्रकिनारा. सगळ्या ऑस्ट्रेलियात असे किनारे आहेत पण बाकीच्या राज्यात त्या किनाऱ्यांच भलतंच टुरिस्टीकरण झाल आहे, म्हणजे त्यात गैर काही नाही पण किनाऱ्यावर उंच इमारती बघण्यापेक्षा अमर्याद रेती आणि त्यावरचं खुरट्या झुडपांचं रान मला जास्त प्रिय आहे आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ते भरभरून देतं, इथला प्रत्येक बीच तेवढाच सुंदर आणि वेगळा आहे, निळा समुद्र आणि निळं आकाश मिळून मनाला एका अमर्याद निळाईचं दान देतात!
काठावर असलेले हे सुंदर रेतीचे डोंगर दालीच्या सर्ररिअ‍ॅलिस्टिक पेन्टिंगची आठवण करुन देत होते!
11.jpg

आणि समुद्र मग त्या रेतीला असा भेटायला येतो, सगळा नजारा भलताच स्वप्नवत वाटत होता, कुठेतरी जागेपणी आणि झोपेच्या सीमेवर पाहिलेल एखाद अतिवास्तव वाटावं असं सुन्दर स्वप्न!
12.jpg

दुर कुठेतरी शिडाची एक नाव घरी परतत होती आणि समुद्राला त्रिमितीय बनवत होती! नेमक काय पुण्य केलं म्हणुन असे भरजरी दिवस मला जाता जाता दिल्यासारखे दैवाने दिले काय माहित!
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे!!! –कुसुमाग्रज!
13.jpg

क्रमशः...

Group content visibility: 
Use group defaults

चनस, मंदार, पराग आणि वत्सला खुप खुप धन्यवाद! Happy

तुझं graduation कधी आहे? त्यावेळी आपण एक अखिल ऑस्ट्रेलिया मायबोलीकर हल्ली मुक्काम इतरत्र असं एक सम्मेलन करू यात का?>>>>>> झक्कास आयडिआ आहे अग, नक्कीच करुया, मी मार्च मध्ये सबमिट करतोय थेसिस!

खूप छान लेख. असे वाचा यला आपण माबो वर येतो. सर्व फोटो. ती कुसुमाग्रजाम्ची कविता, शैली फार सुखद व छान आहे. ते नमस्काराचं मला भावलं एकदम. मी पण तशीच आहे आम च्या घरामागे रिकामे प्लॉट आहेत तिथे सध्या पावसानुरूप जंगल झालं आहे. ते बघून मला नेहमी वाट्तं फॉर वन्स धिस लँड इज बीइन्ग अ‍ॅज इट शुड बी. नाहीतर आहेतच टॉवर्स. आधीचे दोन भाग आरामात वाचीन.

सर्वांचे खुप खुप आभार! Happy

खूप छान लेख. असे वाचा यला आपण माबो वर येतो>>>> धन्यवाद अमा, लिहिल्याचे सार्थक झाले Happy

मस्त शैली आहे तुझी! एकदम दिलखुलास. फोटो पाहून डोळे निवले. तीनही लेख एकत्र वाचले, आता चौथाही वाचते.

Pages