फरसाणाची भाजी

Submitted by योकु on 21 August, 2018 - 11:44
farasanachi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून...
- दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण
- दोन टोमॅटो
- दोन कांदे
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- जिरे
- चिमटीभर साखर
- कोथिंबीर वरून घ्यायला

क्रमवार पाककृती: 

साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय.

लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा.
यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं. यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं आणि त्याचा कच्चटपणा जाईतो अजून एखादमिनिट परतावं.
नंतर हातानीच जरा कुस्करून फरसाण यात घालावं आणि भाजी छान हलवून घ्यावी. फारच कोरडं वाटत असेल तर जरासा पाण्याचा शिपका देऊन एक दणदणीत वाफ आणावी.
चव पाहावी आधी आणि गरज पडली तरच मीठ आणि टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अ‍ॅडजस्ट करावं. वर कोथींबीर घालून गरमगरम भाजी, पोळी, फुलके यांसोबत खावी.

FB1.jpgFB2.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- तिखट, मीठ आणि साखर घालतांना जरा जपून. फरसाणात या तीनही गोष्टी असतातच.
- हवे असतील तर यात थोडे फ्रोजन मटार, मके थॉ करून घालता येतील
- ताज्या फरसाणाचीही अशी भाजी जमेल आणि त्यात कुरकुरीत पणा हवा असेल तर राखता येईल
- ही भाजी जरा चढ्या चवीचीच सुरेख लागेल सो त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा
- भाकरी, पोळी ऐवजी या भाजीकरता फुलका जास्त चांगला लागतो

माहितीचा स्रोत: 
कुठल्यातरी युट्यूब चॅनल वर पाहीलेली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे (रतलामी) शेवेची भाजी ह्या फॉर्म मध्ये असायची शॉर्टकट म्हणून (पोळ्या नाही आहेत/घरी भाजी नाही आहे/ करायचा कंटाळा आहे म्हणून ). कांदे, टोमॅटो हे julienne (उभे काप) फॉर्म मध्ये असायचे.
मग अशी भाजी करून ती गरमेगरम असताना ब्रेड बरोबर खाणं व्हायचं. मजा यायची.
केल्या केल्या लगेच खाणं महत्त्वाचं. करून ठेवून मग नंतर कशी लागेल कोणास ठाऊक.

भारी! Happy

ज्यातत्यात साखरेची चिमूट घालणं बंद कर बघू! Proud

सॉलिड आहे.

मी करते अशी. नुसत्या भावनगरी गाठयांची पण करते. कधी कधी त्या गाठयांच्या भाजीचे तळलेले मोदक करते, आलं लसूण मिरची ठेचा छान लागतो यात किंवा तुकडेही मस्त लागतात, मोदक खाताना. गाठी मात्र थोड्या कुरकुरीत रहायला हव्यात, पाणी अजिबात नाही घालायचं, कांदा टोमॅटो जरा शिजून कोरडं झाल्यावर गाठी मिक्स करून झाकण ठेवायचं.

लईच अवांतर लिहिलं.

वा मस्तय. पण तुला ‘लोखंडी कढई‘ ह्या ब्रँडकडून आता कमिशन मिळेलसं वाटतं आहे. >>>> ती पण सणसणीत तापणारी>>> must for every योकु रेसिपी Wink

बै, घरातल्या काही (च) नाकार्ड्यांना चिमूट साखर न घातलेली सुद्धा कळते आणि आमच्यात अस्संच करतात गिळायचं तर गिळा हे मंत्र काम करत नाहीत. [आता नाकार्डे कोण ओळखा पाहू... Wink ]

अन्जू, तुम्ही प्लीज हे ते ‘टाकू’ नका हो, घालतही चला. आणि माबोवर पाकृ टाकत चला त्या मोदकांची वगैरे.

इथून पुढे नेहमीच घालत जा नाही तर सायो तुम्हाला टाकून बोलेल Proud

शेवभाजीचं नगरी भावंड दिसतंय हे. करून बघेन, मला शेवेचे असे प्रकार आवडतात.

साखर! Angry इथून पुढे चहा किंवा गोडाचे पदार्थ करायला घेशील तेव्हाच साखरेचा डबा ओट्यावर घेत चल.

>>> आता नाकार्डे कोण ओळखा पाहू
नको, मला पुढचा जन्म सापसुरळीचा की बेडकीचा यायला नको आहे. चालू दे तुमचं Lol

अंजू, नक्की लिहा मोदकांची रेसिपी. Happy

फणसाची भाजी असे शीर्षक वाचून धागा उघडला आणि साहित्यात पहील्या क्रमांकावर दोन मुठी फरसाण वाचून भंजाळून गेले!!
पाकृ तोंपासु आहे!

दिसायला मस्त आहे. सादळलेले फरसाण असेल तर करून बघण्यात येईल, नाही तर चांगले फरसाण दोन मुठीभर तोंडात टाकण्यात येईल Lol

मस्त रेसिपी.
आमच्यात पण अस्सच करतात. Biggrin तिखट पदार्थात साखर आणि गोड पदार्थात दाणाभर मीठ हवंच.

>> तिखट पदार्थात साखर आणि गोड पदार्थात दाणाभर मीठ हवंच
अर्थात. अहो असं काय करता, तिखट पदार्थात गूळ/साखर आणि गोडात मीठ घातल्याने त्या त्या रिस्पेक्टिव्ह चवी खुलतात ना? Lol

त्या त्या रिस्पेक्टिव्ह चवी खुलतात ना? << नाहीतर खरच जरा बेचवच लगते भाजी..
फोटो मस्त आहे. आम्ही नेहमी शेव ची भाजी करतो अशी. फरसाण चीही करुन बघणार..

राणकपूर ( राजस्थान) येथे जेवायला बसलो. गट्टे का साग अर्ध्या पंगतीत संपलं. लगेच फरसाण घालून ही शेवभाजी झटपट करून वाढली. थोडी पातळ ठेवतात.
( अचानक कितीही बसेसभरून पर्यटक येतात जेवण्याच्या वेळी.)
रात्री( म्हणजे संध्याकाळी सहाच्या अगोदरच्या जेवणाला) तिथे राहिलेले मोजकेच लोक असतात.

भारी आहे पाकृ .
योकू खऱ्या अर्थाने संसारी झालास रे Wink

फणसाची भाजी असे शीर्षक वाचून धागा उघडला आणि साहित्यात पहील्या क्रमांकावर दोन मुठी फरसाण वाचून भंजाळून गेले!!+१११
मस्त पाकृ Happy

फणसाची भाजी असे शीर्षक वाचून धागा उघडला आणि साहित्यात पहील्या क्रमांकावर दोन मुठी फरसाण वाचून भंजाळून गेले!!+१११
मस्त पाकृ Happy >>>>> सेम पिन्च

मी पण फणसाची भाजीच बघायला आलेले. Lol
हे मस्तंय. रस्सा शेवभाजीची चुलत बहीण.
आणि साखर मलाही लागतेच हो. एकदम झणझणीत भाजी केली तरी चिमूटभर साखरेशिवाय खरी चव येत नाही.

Pages