बाप

Submitted by एस.जी. on 18 August, 2018 - 22:53

शेतक-याच्या जीवनावर आधारीत ही कविता

*बाप*

बाप राबतो राबतो
बाप कष्टतो खपतो
तरी कर्जाचा बोजा
त्याच्या डोईवरी वाढतो .

दरवेळी नवा डावं
स्वप्नांचा नवा गावं
दरवेळी तेच व्हावं
स्वप्न विखरोनी जावं

याहिवर्षी तेच झालं
पीक करपोनी गेलं
दुष्काळात स्वप्न त्याचं
हरपुनी गेलं

असा दुष्काळ पाहुनी
बाप खचला मनातूनी
हसे आम्हाकडं पाहुनी
पण रडतो गं आतूनी

बाप नाही गं घरात
बाप नाही गं दारात
हाती घेऊनी च-हाट
बाप गेला गं रागात

कुठे गेला कुणा ठावे
आता कोणाला पुसावे
त्याच्या जावूनी मागुती
घरा घेऊनच यावे.

शोधले मी गाव सारे
शोधले रानमाळ
बाबा बाबा ऐसी
घातली मी साद
बाप तरी दिसेना
मनात काहूर
डोळ्यात दाटला
आसवांचा पूर

दूर त्या शेतामध्ये
उभे एकुलते झाड
झाडावरी त्या बाप
फेकतो च-हाट
दिसताक्षणी मी गेले गं धावत
गळ्यात घातले हे चिमुकले हात

आसवांनी त्याला अंघोळ घालून
बोलले त्याला असं खडसावून
"शपथ घे तू असं करणार नाही
सोडून आम्हा मुळी जाणार नाही"

बापही गहिवरला
खूप खूप रडला
बोट माझं पकडून
घराकडं आला

एस.जी. गुळवे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults