वो जब याद आए...

Submitted by nimita on 12 August, 2018 - 06:34

हैदराबाद मधल्या मराठी समुदायातल्या काही साहित्यप्रेमी रसिकांनी इथे एक 'साहित्य कट्टा' सुरू केला आहे. महिन्यातून एकदा सगळे साहित्य प्रेमी या कट्ट्यावर भेटतात आणि नावाजलेल्या तसेच स्वलिखित साहित्य निर्मितीचा आस्वाद घेतात. प्रत्येक महिन्याचा एक विषय ठरतो आणि त्याला अनुसरून साहित्याचं वाचन आणि त्यावर चर्चा होते.

माझ्यासारख्या नवशिक्या , 'so called लेखिके' साठी तर ही पर्वणीच असते. (म्हणजे मी जे लिहिते ते 'लेखन' या सदरात येतं .. असं कट्ट्यावरच्या दिग्गजांचं मत आहे..म्हणून मी स्वतःला 'so called लेखिका' म्हणते.)

तर या महिन्याचा विषय आहे 'मी'.... हो! या वेळी स्वतः बद्दल आणि स्वतः वर लिहायचं आहे. प्रथमदर्शनी विषय जितका सोपा वाटतो तितकाच तो अवघड आहे - हे लिहायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं.

कारण माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात इतक्या लोकांचा हातभार आहे की आता वाटतंय, माझ्या स्वभावात, वागण्या बोलण्यात... एकूणच माझ्या संपूर्ण अस्तित्वात 'मी' नक्की कुठे आहे आणि माझ्यातलं 'मी' पण हे नक्की माझंच आहे का ?

या सगळ्या विचारमंथनातून एक गोष्ट मला प्रकर्षानी जाणवली.. आणि ती म्हणजे- माझ्या या 'मी' पणात माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. आज तिच्याबद्दल विचार करताना कितीतरी जुन्या आठवणी , प्रसंग डोळ्यासमोरून सरकत जातायत.. एखाद्या मूव्ही च्या फ्लॅशबॅक सारखे !त्या सगळ्या धावणाऱ्या द्रुश्यांना शब्दांत बांधून ठेवायचा प्रयत्न करणार आहे मी आज.....

लहान असल्यापासून आम्ही चौघंही भावंडं बाबांपेक्षा आई शी भावनिक रित्या जास्त जवळ होतो. कदाचित बाबांची फिरतीची नोकरी किंवा त्यांचा रागीट स्वभाव (किंवा दोन्ही) याला कारणीभूत असू शकतो.

कदाचित आई चा जात्याच प्रेमळ आणि शांत स्वभाव ही असेल..…

पण आमच्यासाठी आई म्हणजे' One stop shop' होती... आमच्या भावनिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक... या आणि अशा सगळ्या सगळ्या गरजा तिच्याकडे गेल्यावर पूर्ण व्हायच्या.

माझ्या इतर भावंडांबद्दल मी नक्की नाही सांगू शकत पण माझ्यासाठी माझी आई हीच माझी 'बेस्ट फ्रेंड' होती. मी तिला सगळं काही सांगायची ... सगळं म्हणजे अगदी स...ग...ळं !

आणि हे जेव्हा मी माझ्या मुलींना सांगते तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्या मते,' आईला सगळं कसं सांगता येईल?'

पण खरंच मी तिला सगळं सांगायची. म्हणजे अगदी शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थिनी पासून ते मधल्या सुट्टीत आठ मैत्रीणींनी वाटून झालेल्या एका पेरू पर्यंत... सगळं! आणि ती पण माझी सगळी बडबड शांतपणे ऐकून घ्यायची, अगदी लक्ष देऊन....जणू काही त्यावेळी तिच्यासाठी जगातलं सगळ्यात महत्त्वाचं काम असायचं ते!

माझ्याही (आणि कदाचित तिच्याही) नकळत ती मला शिकवत होती... Total commitment म्हणजे काय ते! 'एखादं काम हातात घेतलं की ते नीट, मन लावून करावं' हे बाळकडू तिच्याकडून मिळालं.

आपण आपलं काम नेहेमी चोख करावं. समोरच्या माणसाला हा विश्वास असला पाहिजे की 'हिला काम सोपवलंय ना, आता परत चेक करायची गरज नाही!'

हा इतका महत्वाचा संदेश तिनी तिच्या रोजच्या कामातून, वागण्यातून दिला होता आम्हांला....

आमचे मोठे काका अगदी नित्य नियमानी नवचंडी, शतचंडी चे यज्ञ करायचे. ते सगळे यज्ञ आमच्या बंगल्याच्या गच्चीवर व्हायचे. आमच्या काकूला धुराचा त्रास व्हायचा त्यामुळे तिची इच्छा असूनही तिला यज्ञाच्या मुख्य कामांत हातभार लावणं शक्य नसायचं. तरीही ती तिच्याकडून शक्य होईल ती मदत करायला तयार असायची आणि करायचीही.

पण बाकी सगळी कामं आमची आई single handedly मॅनेज करायची ... म्हणजे अगदी स्वैपाकाचा शिधा भरण्यापासून ते आलेल्या प्रत्येक सवाष्णीची ओटी भरण्यापर्यंत ! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे - हे सगळं ती हसतमुखानी करायची. कधी कपाळावर आठी नाही की तोंडातून कुरकुरीचा एक शब्द नाही.

पण मी आईला नेहेमी असंच बघत आल्यामुळे की काय, मला वाटायचं,' हीच खरी पद्धत आहे काम करण्याची'. तिनी न बोलता, तिच्या कृतीतून मला शिकवलं होतं ते!

पण एकदा आमच्या तारामामी आजींना कोणाशीतरी बोलताना मी ऐकलं (चोरून नाही बरं का!.... कारण चोरून ऐकणं हे चुकीचं आहे -असं आई म्हणायची नेहेमी)..त्या म्हणत होत्या,"मंदा ला एखादं काम सांगावं आणि निश्चिन्त व्हावं! अगदी हसत हसत पूर्ण करते सगळी कामं!" आईचं ते कौतुक ऐकून मला इतकं मस्त वाटलं होतं!

मी आईला कधीच रिकामी बसलेली नाही बघितली. सतत काही न काही करत असायची ती. तसं पाहता आम्हां सगळ्यांचं करण्यातच तिचा अर्धा दिवस निघून जात असेल. सकाळच्या चहापासून आमच्या सगळ्यांच्या डब्यांसाठी भाजी आणि पोळ्या करण्यातच तिची सकाळ संपून जायची. आम्ही सगळे आपापल्या कामांसाठी बाहेर गेल्यावर ती घरी काय काय करायची याचा थोडा फार अंदाज यायचा..कधी शिलाई मशीन वर एखादा बेतून ठेवलेला फ्रॉक किंवा कुर्ता दिसायचा.. कधी एखाद्या स्वेटर ची नवीन वीण तिच्या 'स्त्री सखी' या डायरी मधे लिहिलेली दिसायची. कधी घरात शिरल्या शिरल्या भाजलेल्या बेसनाचा खमंग वास यायचा आणि 'उद्या डब्यात लाडू मिळणार' या विचारानी मनात लाडू फुटायचे. एका रात्री छायागीत बघायला टीव्ही समोर सगळे गोळा झालो.. बघतो तर काय..टीव्ही वरचं नेहेमीचं कापडी कव्हर गायब होतं आणि त्याजागी एक नवं कोरं, भरतकाम केलेलं कव्हर झळकत होतं.. आम्ही आईला विचारलं,"हे कधी केलंस?" त्यावर ती फक्त हसली आणि स्वैपाकघरात निघून गेली.

तिच्याकडे इतकी सुंदर सुंदर डिझाइन्स होती भरतकामाची. मोती टाका तिला सगळ्यात जास्त आवडत असावा.. म्हणजे माझा असा अंदाज आहे, कारण जेव्हा आमच्या दिदी चं लग्न ठरलं तेव्हा तिच्या रुखवतात ठेवण्यासाठी आईनी एक डबल बेडशीट आणि दोन अभ्रे यांवर फक्त मोती टाक्यानी खूप सुंदर भरतकाम केलं होतं.

त्याचबरोबर तिनी विनिताताई आणि माझ्यासाठी पण कापड आणून ठेवलं होतं... आमच्या रुखवताची तयारी म्हणून! तिची ही इच्छा अपूर्ण राहिली पण तिनी माझ्यासाठी म्हणून आणलेलं कापड मात्र मी लग्नानंतर माझ्याबरोबर घेऊन आले. संपूर्ण बेडशीट तर नाही जमलं मला पण त्या कापडातून ट्रे कव्हर, टेबल क्लॉथ या आणि अशा छोट्या छोट्या वस्तू बनवल्या मी...तिची आठवण म्हणून!

या सगळ्या कलाकुसरीच्या कामांबरोबरच तिला संगीताची पण खूप आवड होती. 'माझा आवाज चांगला असता तर मी नक्की गाणं शिकले असते" असं म्हणताना तिच्या बोलण्यातून कधीकधी खंत जाणवायची. पण मग आई ती कसर गाणी 'ऐकून' पूर्ण करायची. सकाळी स्वैपाकघरात काम करताना एकीकडे रेडिओ चालू असायचा. कामाच्या नादात एकीकडे गाणी गुणगुणत स्वतःतच मग्न असणाऱ्या तिला बघताना किती छान वाटायचं. तिची ही सवय मला पण आहे. मीदेखील काम करत असताना एकीकडे रेडिओ वर गाणी ऐकत असते.

आई म्हणायची,"तानसेन नसले तरी काय झालं, कानसेन तर होऊच शकते की नाही!" आपल्याकडे जे नाही त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद मानायला शिकले मी तिच्याकडून.

माझा चुलत भाऊ संजीव शाळेत असल्यापासून शास्त्रीय संगीत शिकायचा. त्याला जर कधी एखाद्या स्पर्धेत गायचं असेल तर तो आवर्जून आईला सांगायचा, तिच्या बरोबर डिसकस करून 'कुठलं गाणं म्हणायचं' ते ठरवायचा. आईला त्याचं आणि त्याच्या सुरेल गाण्याचं खूप कौतुक होतं. त्यांचं दोघांचं नातं स्पेशल होतं. जर कधी माझ्या काकांनी संजीव ला शिक्षा केली तर तो 'काकू, काकू' म्हणून तिला हाका मारायचा. आणि थोड्या वेळानंतर आई पण न राहवून शेजारी काकांकडे जाऊन त्याला आमच्या घरी घेऊन यायची. आता गमतीत विचार केला तर कधी कधी वाटतं की काकांचं आणि आईचं संगनमत असावं यात!

अभिनयाची पण खूप हौस होती तिला....वेगवेगळ्या नाटकांमधे तिनी काम केलं होतं. FTII मधे जाऊन एकदा ऑडिशन पण देऊन आली होती ती.. त्याचं पुढे काय झालं ते नाही लक्षात, पण 'तिनी ऑडिशन दिलं' या नुसत्या विचारानीच माझी कॉलर ताठ झाली होती.माझ्या मित्र मैत्रिणींसमोर खूप भाव खाल्ला होता मी!

आई आणि काकू दोघी दुपारच्या वेळात व्हायोलिन शिकायला पण जायच्या. आणि एवढी सगळी धावपळ करूनही कधी तिला दमून बसलेलं नाही पाहिलं कोणी! कधी कधी वाटायचं की आईच्या दिवसात चोवीस नाही अठ्ठेचाळीस तास आहेत. तिची Time management खूपच जबरदस्त होती.

उन्हाळ्याच्या दिवसांत ती पापड्या, कुरडया, सांडगे, वगैरे वाळीव पदार्थांची उत्सवार करायची. एका वेळी दहा दहा किलो बटाटे शिजवून, त्यांचा कीस घालायची ती.. आम्ही लहान होतो तेव्हा कधी लक्षात ही नाही आली तिची ही दगदग...पण साधारण आठवी नववीत असताना हळूहळू जाणीव व्हायला लागली की पडद्यामागे देखील आई खूप काही करत असते... आणि तेही अगदी silent mode मधे! मग आपणहून च तिला मदत करायला सुरुवात केली.... आणि एकीकडे आयुष्याचे, रोजच्या जीवनाचे धडेही गिरवत गेले.

माझ्या बऱ्याच मैत्रिणींना (आणि काही मित्रांना सुदधा) स्वैपाक वगैरे करता यायचा, पण मला त्यातलं फारसं ज्ञान नव्हतं. त्यामुळे कधीकधी मी आईला म्हणायची की मला पण स्वैपाक शिकव. त्यावर तिचं ठरलेलं उत्तर असायचं," पुढे आयुष्यभर हेच करायचंय. आत्ता बाकी सगळं शिकून घ्या..तुमचे छंद जोपासा, extra curricular activities मधे भाग घ्या. हे सगळं पण स्वैपाका इतकंच महत्वाचं आहे." तिचे हे विचार किती योग्य होते ते आता पटतं.

आणि ती नुसती बोलून नाही थांबायची, स्वतः सगळं आचरणात आणायची. आमच्या बाबांच्या मदतीनी तिनी स्कूटर शिकून घेतली. तिच्या माहेरी आणि सासरी स्कूटर चालवणारी ती पहिलीच स्त्री असावी. तिच्या माहेरी सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटायचं.

माझ्या एका मावशीची मंगळागौरीची पूजा बघायला एक foreigner स्त्री येणार होती. ती आपल्या कडच्या रूढी आणि परंपरा यांच्यावर रिसर्च करत होती. तर त्यावेळी आमच्या काकूआजींनी मुद्दाम माझ्या आईला थोडं आधी बोलावून घेतलं होतं....त्या विदेशी स्त्री च्या प्रश्नांना इंग्लिश मधून उत्तरं देण्यासाठी.. त्या दिवशी आईला त्या बाईशी बोलताना बघून मला तिचा इतका अभिमान वाटला होता! जे तिथल्या इतरांना जमणार नव्हतं ते माझ्या आईला जमत होतं. दोन तीन दिवसांनंतर ती रिसर्चर आमच्या घरी पण आली होती- आईशी गप्पा मारायला! त्या दोघींचं झालेलं बोलणं मला आठवत नाहीये.. पण 'एक विदेशी आंटी माझ्या आईची मैत्रीण आहे' ही कल्पनाच खूप भारी होती.

आमच्या बाबांची फिरतीची नोकरी असल्यामुळे बऱ्याचवेळा आमच्या परीक्षा, पालक सभा, बक्षीस समारंभ असे महत्वाचे इव्हेंट्स आईनी एकटीनी अटेंड केले होते. इतकंच नाही तर आमची दुखणी खुपणी, आजारपणं सुद्धा तिनी एकटीनी निभावून नेली. मला कावीळ झाली तेव्हाचं माझं पथ्य पाणी, बाबांचं अल्सर चं ऑपरेशन झालं होतं तेव्हा घर, हॉस्पिटल आणि बाबा अश्या तीन आघाड्या समर्थपणे सांभाळणारी आमची आई .. तिच्या मनाचा कणखरपणा आणि खंबीरपणा याचं सगळ्यांनाच कौतुक वाटायचं. पण बिकट परिस्थितीतही न डगमगणाऱ्या आईचं मन तेवढंच हळवं होतं. राज कपूर च्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर खोलीच्या कोपऱ्यात उभी राहून पदरानी स्वतःचे डोळे पुसणारी आई बघितलीये मी.

आमच्या मित्र मैत्रिणींवर पण खूप माया असायची तिची. महिन्यातल्या एका रविवारी आमच्याकडे चिकन बनायचं. तेव्हा आठवणीनी माझ्या एका मित्राला ती घरी जेवायला बोलवायची.. कारण त्याला चिकन आवडतं हे तिला माहीत होतं.

माझ्या एका खास मैत्रिणीच्या लव्ह स्टोरी मधे थोडा ट्विस्ट होता. तिच्या घरच्यांचा तिच्या लग्नाला विरोध होता. मी जेव्हा हे सगळं आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली,"बिचारी! पण तिला म्हणावं, काही काळजी करू नको. आपण करू तिचं कन्यादान. सोन्याचे दागिने घालायला नाही जमणार कदाचित, पण मोत्याचे तर नक्कीच घेऊ शकतो!" तिचं हे उत्स्फूर्त बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. किती स्वच्छ मन होतं तिचं... आपल्याकडे जे आहे त्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्याला द्यावं.. अडी अडचणीच्या वेळी आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहावं..किती मौल्यवान शिकवण दिली तिनी मला तिच्या त्या एका वाक्यातून!ती नेहेमी म्हणायची," आधी दुसऱ्याला द्यावं, आणि दुसऱ्याला नेहेमी चांगलं द्यावं!"

स्वैपाकघरात ती पुरणपोळ्या करत असताना तिच्या जवळ उभं राहून हक्कानी स्वतःसाठी गरमागरम पुरणपोळीचा हट्ट करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आणि त्यांचा हा हट्ट पुरवत त्यांचे लाड करणारी माझी आई '- हे दृश्य बघताना कधी कधी मला शंका यायची की - ही माझी आई आहे का माझ्या मैत्रिणीची ?

आईला मीच काय पण कोणीच कधी आवाज चढवून ओरडताना ऐकलं नाही. आम्ही चौघं भावंडं जेव्हाही भांडायचो....(हो, आपलं दुमत जाहीर करायला दुसरा मार्ग नसायचा, कारण आमच्याकडे एक नियम होता.. कितीही राग आला तरी कोणी कोणाच्या अंगाला हात नाही लावायचा... त्यामुळे मारहाण हा ऑप्शन च नव्हता...)तेव्हा आई तिथे येऊन म्हणायची,"नका रे असे भांडू. खूप त्रास होतो मला तुम्हांला भांडताना बघून!"

तिचं हे एकच वाक्य पुरेसं असायचं आम्हाला गप्प करायला. म्हणतात ना 'सौ सुनार की और एक लुहार की।'

आई नेहेमी म्हणायची," आत्ता एकत्र आहात तर भांडताय. उद्या चार दिशांना चौघं जाल , मग कळेल एकमेकांची किंमत!"

त्यावेळी रागाच्या भरात वाटायचं," कधी येईल तो सोनेरी दिवस!" पण आता आईच्या म्हणण्याचा खरा अर्थ कळतोय.

आईचं अजून एक वाक्य वारंवार आठवतं. ती म्हणायची," सोडून द्यायला शिका." प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाचं वागणं आपल्याला पटेलच असं नाही. पण म्हणून एखाद्याबद्दल मनात अढी धरून बसू नये.. पटलं तर घ्यावं-आत्मसात करावं. नाही पटलं तर सोडून द्यावं.

मी पण पूर्ण प्रयत्न करत असते 'सोडून द्यायचा'..कधी जमतं, कधी नाही जमत! पण प्रत्येक वेळी आईचा चेहेरा मात्र येतो डोळ्यांसमोर.

तिचं अजून एक तत्व होतं..."त्यांचं त्यांच्याकडे"...ती म्हणायची,"समोरच्या माणसाचं वागणं, बोलणं आपल्याला नाही पटलं तरी आपण नेहेमी योग्य वागायचं. त्यांचं त्यांच्याकडे!" तिच्या या विचारामुळेच असेल कदाचित पण मी तरी तिला कधीच कुणाची उणीदुणी काढताना, कोणाबद्दल गॉसिप करताना नाही ऐकलं.

मला स्वतःच्या हातांनी वस्तू बनवून लोकांना गिफ्ट करायला आवडतं.याचं देखील श्रेय पूर्णपणे माझ्या आईला जातं. शाळेत असताना एकदा आम्हांला 'पक्षी' या विषयावर एक प्रोजेक्ट करायचं होतं.. त्यात वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्रं चिकटवून त्यांची सगळी माहिती लिहायची होती. माझ्या एका मैत्रिणीला तिच्या आईनी पक्ष्यांची चित्रं असलेला चार्ट आणून दिला होता. मी जेव्हा हे आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली," विकत आणून काय कोणीही करेल! पण स्वतः केलेलं काम त्याच्या वेगळेपणामुळे नेहेमीच लोकांच्या लक्षात राहातं. मला तरी वाटतं तू वर्तमानपत्रं, मासिकं वगैरे मधून ही चित्रं कापून वापर."

केवळ आई म्हणाली म्हणून,मी माझ्या मनाविरुद्ध स्वतः शोधून सगळी चित्रं जमवली आणि प्रोजेक्ट पूर्ण केलं. आणि खरंच सगळ्या प्रोजेक्ट्स मधून माझं प्रोजेक्ट 'उत्कृष्ट' म्हणून निवडलं गेलं.मी घेतलेल्या मेहेनातीचं सगळ्यांसमोर कौतुक करण्यात आलं. त्या दिवसानंतर माझ्या आई वरचा माझा विश्वास शतपटी नी वाढला.

आईची अजून एक खासियत होती आणि ती म्हणजे कोणाच्याही मदतीला कायम तयार असायची ती.आमच्या घरी कायम लोकांची ये-जा असायची. कितीतरी वेळा आमच्या ओळखीचे, नात्यातले लोक दीर्घ काळासाठी आमच्या घरी राहिलेले आंहेत.
बाबा एकदा कामानिमित्त दिल्लीला गेले असताना त्यांची श्री. चौधरी नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली… त्यांच्या मुलाचा , विवेक चा एक पाय काही कारणामुळे amputate करावा लागला होता आणि त्याला artificial ‘Jaipur foot’ बसवून घेण्यासाठी पुण्याच्या Artificial Limb Centre मधे यावं लागणार होतं. हे कळताक्षणी बाबांनी त्यांना सांगितलं की,” तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त पुण्याला या. बाकी सगळं आम्ही बघतो.” आणि खरंच जेव्हा जेव्हा चौधरी काका आणि विवेक पुण्याला यायचे तेव्हा आमच्याच घरी राहायचे.. आणि प्रत्येक वेळी किमान ८-१० दिवस तरी मुक्काम असायचाच त्यांचा.. कारण प्रत्येक वेळी विवेकच्या पायाचं माप घेऊन त्याहिशोबानी नवीन जयपूर फूट तयार करायला तेवढे दिवस लागायचेच. आणि विवेक चं वाढतं वय असल्यामुळे दर ५-६ महिन्यांनी त्याला नवीन पाय बनवून घ्यायला लागायचा. आई प्रत्येक वेळी त्या दोघांचं आदरातिथ्य करायची. विवेकचं पथ्य पाणी , त्याच्या औषधांच्या वेळा, त्याची फिजिओथेरपी..सगळं काही ती सांभाळायची..अगदी स्वतःचा मुलगा असल्यासारखं!
असेच बाबा जेव्हा ऑफिस च्या कामासाठी कौलालंपूर ला गेले होते तेव्हा तिथे त्यांना हेडगे काका भेटले होते. काही महिन्यानंतर बाबांना त्यांचं पत्र आलं. ते सहपरिवार पुण्यात शिफ्ट होणार होते, कायमचे.
त्यांची घराची सोय होईपर्यंत एखादं भाड्याचं घर बघा असं त्यांनी बाबांना सांगितलं तेव्हा बाबांनी त्यांना सरळ आमच्याघरीच राहायला बोलावलं. जवळजवळ दोन महिने हेडगे काका काकू आणि त्यांच्या दोघी मुली आमच्या घरी राहिले होते. आई नी अगदी मनापासून त्यांची सरबराई केली होती. त्यांच्यासाठी घर शोधणं, त्यांच्या मुलींच्या ऍडमिशन सगळ्यात आईनी त्या काकूंना मदत केली होती.
कधी कधी वाटतं, कोण करतं इतकं परक्या लोकांसाठी? पण हेच तर स्पेशल होतं आमच्या आईचं! एखाद्याला मदतीची गरज आहे हे कळलं की मग पुढचा मागचा विचार न करता त्याला सर्वतोपरी मदत करायची ती!
बाबांची एक मावशी होती. तिनी पाठवलेल्या फक्त एका पत्रावर बाबा तिला आमच्या घरी घेऊन आले…. कायमची राहायला! आणि आमच्याा आईनी पण अगदी सख्ख्या सासू सारखीच तिचीही सेवा केली.

अशावेळी आईची होणारी ओढाताण बघून वाटायचं," बाबांचं हे अतिथीप्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण त्यामुळे आईची दमछाक होते त्याचं काय! तिला न विचारता परस्पर सगळ्या जगाला आमंत्रण देतात!" पण आता विचार करताना जाणवतं की बाबांना खात्री असावी आईबद्दल, त्यांच्या प्रत्येक निर्णयात ती त्यांना साथ देईल असा विश्वास असावा त्यांना ...

आईची श्रीरामा वर असीम श्रद्धा होती. तिच्या माहेरी सगळे ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत. ती मनोमन श्रीरामाची आराधना करायची. पण मी कधीच तिला तिच्या भक्तीचं अवडंबर करताना नाही बघितलं. देवाचं नाव घेण्यासाठी तासंतास देवासमोर हात जोडून बसायची किंवा उपास-तापास करायची गरज नसते...'एकीकडे आपली कर्तव्य पार पाडत असताना मनोमन देवाचा धावा केला तरी तो त्यांच्यापर्यंत पोचतो' हा विश्वास होता तिचा. तिची भक्ती, तिची श्रद्धा तिनी स्वतः पुरतीच ठेवली होती. ती बऱ्याच वेळा रामनामाच्या जपाचा संकल्प सोडायची- अर्थातच त्याचा गाजावाजा न करता!

ती कधी आणि कुठे जप करायची ते समजायचं ही नाही. पण मग अचानक एके दिवशी कॅलेंडर वर त्या तारखेला केलेल्या जपाची नोंद आढळायची. आणि मग पुढचे काही दिवस कधी दोन हजार तर कधी पाच हजार असे आकडे दिसायचे कॅलेंडर वर. तिला विचारलं तर काही न बोलता फक्त छानसं हसायची...

अशा अजूनही किती किती आठवणी आहेत आईच्या ..पदोपदी डोकावत असतात मनात, पण आज शब्दांत उतरवायला सुरुवात केली तर कुठे लपून बसल्याहेत काय माहीत!

पण प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याची १९ तारीख जशीजशी जवळ यायला लागते तश्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या व्हायला लागतात. आज २९ वर्षांनंतरही आईच्या 'नसण्याची' जाणीव तीव्र होत जाते. ही आठवणींची गाडी प्रत्येक स्टेशनवर थांबत थांबत शेवटी माझ्या मनातल्या तिच्या शेवटच्या आठवणीवर येऊन थांबते. ज्या दिवशी ती आम्हांला सोडून तिच्या श्रीरामा कडे गेली त्या दिवसाचा तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण, तिनी म्हटलेलं प्रत्येक वाक्य...सगळं काही आठवतं, डोळ्यांसमोर दिसतं. जणू काही त्या खोलीत तेव्हा कोणीतरी CCTV कॅमेरा लावून त्यावर सगळं रेकॉर्ड केलं असावं.

खूप मानसिक त्रास व्हायचा मला त्या सगळ्या गोष्टींचा....आणि मला तसं बघून माझ्या आसपासच्या लोकांनाही! पण आता माझी विचार करायची पद्धत मी थोडी बदलायचं ठरवलं आहे..आणि याला कारण ठरली सृष्टी.. माझी मुलगी!

ती सध्या शिक्षणासाठी परगावी होस्टेल मधे राहाते.तशी ती रुळली आहे आता नवीन जागेत, पण कधीतरी अचानक तिचा फोन येतो आणि रडवेल्या आवाजात म्हणते ,'आई, तुझी खूप आठवण येतीये'

त्यावेळी तिची समजूत काढताना मी तिला सांगते," अगं, माझी आठवण येतीये ही चांगलीच गोष्ट आहे ना! म्हणजे मी तुला आवडते हे सिद्ध होतं! ..... त्यामुळे आता यापुढे माझी आठवण आली की रडायचं नाही.. उलट 'माझी आई किती छान आहे' असा विचार करून खुश व्हायचं."

मी तिला जे सांगते ते स्वतः आचरणात आणायची वेळ आली आहे. आता या पुढे जेव्हा जेव्हा मला माझ्या आईची आठवण येईल, तेव्हा प्रत्येक वेळी 'माझी आई किती छान आहे' हा विचार मला एक आंतरिक समाधान देऊन जाईल! तिचा शांत, हसरा चेहेरा डोळ्यासमोर आला की माझ्याही चेहेऱ्यावर हसू उमटेल!

एक जुनं हिंदी गाणं आहे ना..

वो जब याद आए, बहुत याद आए...

त्यातल्या दोन ओळी आठवतायत आत्ता ...

मगर रोते रोते हंसी आ रही है,

खयालॉ में आकर वो जब मुस्कुराए.....

वो जब याद आए....

बहुत याद आए ............

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nimita खूपचं छान उतरवलंय. पहिले काही पॅरा वाचून तर मीच माझ्या आईबद्दल लिहिलंय असं वाटलं. आता आईपासून खूप लांब राहते आहे, आईची खूप आठवण येते... आई खूप हौशी, खंबीर आणी सगळ्या परिस्थिती ना धीराने सामोरे जाणारी आहे... आपले व्यक्तिमत्व घडवण्यात आईचा खरंच खूप मोठा वाटा असतो.....

आई ही अशीच असते .... आठवण मनात कायम दरवळत ठेवणारी !
मीही आठवणींनी व्याकूळ न होता , प्रयत्नपूर्वक आईच्या आनंददायी आणि हसर्या आठवणी नजरेसमोर ठेवतो. आणि स्वतः आनंदी होतो.

nimita tai khup sunder lihilay ho, mazi aai pan ashich aahe.

छान