एटीएम

Submitted by मिलिंद महांगडे on 8 August, 2018 - 14:04

मनीष लोकल मधून उतरला . कसाबसा स्टेशन मधून बाहेर पडला . आज लोकलला भरपूर गर्दी होती , बसायला बिलकुल जागा मिळाली नाही . उभं राहून राहून पाय दुखू लागले होते .रिक्षाने जाऊया का ? हा विचार त्याच्या मनात आला आणि रिक्षा स्टँडच्या बाजूला असलेली भली मोठी रांग बघून त्याने तो झटकून टाकला. त्याचं घर स्टेशनपासून तसं काही लांब नव्हतं , रोज तो चालतच घरी जायचा , पण आज कंटाळा आल्याने त्याने रिक्षाने जायचा विचार केला होता . चला लेफ्ट - राईट करा .... मनात म्हणत तो पाय ओढत चालू लागला .
" अरे मनीष , ए मनीष .... " मागून कुणीतरी हाक मारतंय असं त्याला वाटलं . त्याने मागे वळून पाहिलं तर त्यांच्या सोसायटीतले पेडगावकर काका लगबगीने त्याच्याकडेच येत असलेले त्याला दिसले .
' ओह शीट ! घरी जाईपर्यंत आता हा म्हातारा पकवणार ! ' मनातल्या मनात विचार करेपर्यंत ते त्याच्यापर्यंत पोहोचले देखील !
" अरे , काका तुम्ही ? काय म्हणताय ? " चेहऱ्यावरचे भाव बदलत मनीषने त्यांना विचारलं .
" केव्हाचा हाक मारतोय ? लक्ष कुठे आहे तुझं ? "
" मी जरा दुसऱ्याच विचारात होतो , तुम्ही काय म्हणत होतात …? "
" जरा काम होतं .... "
" माझ्याकडे ? " मनिषला थोडं आश्चर्यच वाटलं .
" तसं काही खास नाही रे .... तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या तर हातचा मळ आहे "
" बोला ना "
" अरे , मला एटीएम मधून पैसे काढायचेत .... मी कधी काढले नाहीत . आणि शेवटी ते पैशांचं काम ! मला जरा भीतीच वाटते रे , काही चुकलं वगैरे तर पैसे जायचे ...आमच्या ऑफिसमधल्या सोनवणेचे असेच पैसे गेले .... " ते पुढे बरंच काहीतरी बडबडत राहिले असते पण मनिषला ते काही काही ऐकण्यात रस वाटत नव्हता , " एटीएम कार्ड आहे का तुमच्याकडे ? " त्याने त्यांना मध्येच थांबवत विचारलं .
" अं ... कार्ड ना .... आहे ना " म्हणत ते पाकिटाच्या आत चोरकप्प्यात ठेवलेलं एटीएम कार्ड काढू लागले .
" आणि पिन माहीत आहे का ? नाहीतर पैसे काढता येणार नाहीत " पिन माहीत नसेल तर बरं होईल , वेळ वाचेल असा एक स्वार्थी विचार मनीषच्या मनात येऊन गेला . पण काही उपयोग झाला नाही , पेडगावकर काका तयारीनिशीच आलेले होते . नाईलाजाने मनीष एटीएम शोधू लागला . पेडगावकर काकांच्या चेहऱ्यावर जत्रेला निघालेल्या लहान मुलाचा आनंद दिसत होता . एक एटीएम बंद होतं , दुसरी कडे जाऊन पाहिलं तर त्या एटीएम मधली कॅश संपली होती . मनीष वैतागला . ," काका , आज बहुतेक तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत असं दिसतंय . "
" अरे राजा , असं नको म्हणुस रे ... गरज आहे रे जराशी ... त्या आमराई रोडला मी बघितलं आहे एक एटीएम . तिकडे जाऊया .... प्लिज... ते बंद असलं तर कॅन्सल करू " पेडगावकरांनी असा चेहरा केला की मनिषला त्यांना नकार द्यावासा वाटेना . त्याने काहीही न म्हणता पावले आमराई रोडकडे वळवली . मुख्य रस्त्यापासून आतल्या एका जुन्या इमारतीमध्ये एटीएम असू शकेल याची मनिषला कल्पना नव्हती . तसं ते बरंच जुनं दिसत होतं . त्यावर ते कोणत्या बँकेचं आहे ह्याचा बोर्ड दिसत नव्हता , पण मनीषला त्याचं काही देणं घेणं नव्हतं . एकदाचे पैसे काढून दिले की , आपण मोकळे ! त्याने पेडगावकर काकांचे कार्ड एटीएम मध्ये टाकलं . काकांनी सांगितलेला पिन टाकला आणि पैसे काढले . एटीएम मधून आलेली कॅश आणि स्लिप त्यांच्या हातात दिली .
" बॅलन्स किती राहिलाय रे ? " कागदी स्लिप निरखत त्यांनी विचारलं .
" तिथे लिहिली असेल ना .... " मनीष थोड्याशा बेफिकीरीनेच म्हणाला , पण पेडगावकर काकांच्या डोळ्यांना बॅलन्स काही दिसत नव्हता . " द्या इकडे " म्हणत त्याने ती स्लिप घेतली . " हे बघा , 14,400/- रुपये बॅलन्स आहेत . दिसले ? "
" हां .... बरं , बरं ... थँक्स बरं का मनीष ... आणि हा खाली आकडा कसला रे ? खाली ठळकपणे छापलेला .... ? "
" कुठे आहे ? " म्हणत पुन्हा त्याने ती स्लिप घेतली . स्लीपच्या उजव्या कोपऱ्यात खाली 2 हा ठळक आकडा प्रिंट झाला होता . त्याचा अर्थ मनिषलाही कळेना ... त्याने थोडा विचार करून पाहिला पण व्यर्थ ! आधीच त्याला कंटाळा आला होता .
" काका , तुमचे पैसे आणि बॅलन्स बरोबर आहे ना ? जाऊद्या ना मग ... चुकून प्रिंट झालं असेल " म्हणत त्याने ती स्लिप पुन्हा पेडगावकर काकांच्या हातात दिली . " काका , मी जाऊ का , उशीर झालाय बराच "
" बरं , बरं ... जा , जा .... आणि थँक्स बरं का " काका म्हणाले . मागे न बघता मनीष तडक घरी गेला .
त्यानंतर दोनच दिवसांनी एक विचित्र बातमी मनीषच्या कानावर आली . पेडगावकर काका हे जग सोडून गेले होते .
" अगं , परवाच मला रात्री भेटले , मी त्यांना एटीएम मधून पैसे काढून दिले होते .... अगदी व्यवस्थित होते त्यावेळी . मग कसं काय झालं असेल ? " मनीष आश्चर्याने त्याच्या बायकोला , सायलीला म्हणाला .
" हो का ? तब्येत तर चांगली ठणठणीत होती .... मधेच काय झालं कुणास ठाऊक ! " तिलाही नवल वाटत होतं.
पेडगावकर काकांच्या जाण्याने सगळी सोसायटी हळहळत होती . त्यांच्या रिटायरमेंटला केवळ एक दीड वर्ष उरलं असेल . तसे स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ होते . सोसायटीच्या प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा . परवा आपण थोडे वैतागलोच त्यांच्यावर ! छे ! चांगलं नाही वागलो आपण त्यांच्यासोबत .... मनिषला राहून राहून वाईट वाटू लागलं . त्याचं कामात लक्ष लागेना . बिचारे ! पेडगावकर काका , त्यांना तर साधं एटीएम मधून पैसेही काढता येत नव्हते . आणि आपण पैसे काढून दिल्यावर त्यांना बरं वाटलं होतं . त्यांना स्लीपही नीट वाचता येत नव्हती .आपणच त्यांना बॅलन्स वाचून दाखवला . आणि ..... अचानक झटका बसावा तसं त्याला झालं . पेडगावकर काकांच्या त्या स्लिपमध्ये उजव्या बाजूला खाली 2 हा आकडा प्रिंट झाला होता , आणि दोन दिवसातच ते वारले . ह्याचा काही परस्पर संबंध असावा का ? छे ! आपण काहींच्या काही विचार करू लागलोत .... त्याने पुन्हा कामात डोकं घातलं पण त्याचं लक्षच लागेना . सारखा तो स्लीपवरचा 2 आकडा डोळ्यासमोर दिसत होता . घरी आल्यावर जेवता जेवता त्याने परवाचा घडलेला प्रसंग सायलीला सांगितला . त्यावर ती जोरजोरात हसू लागली .
" आर यु आउट ऑफ युअर माईंड ? असं कसं असू शकेल ...? "
" बिलिव्ह मी , तसंच झालं . त्या स्लीपवर 2 हा आकडा प्रिंट केला होता . मी माझ्या डोळ्यांनी पहिला , आणि नंतर दोन दिवसातच काका वारले . "
" मनीष , तुझं डोकं फिरलंय . त्या सस्पेन्स स्टोरीज जरा कमी वाचत जा .... कसलाही संबंध कुठेही जोडतोयस .... " सायली त्याला म्हणाली .
" अगं ते एटीएम मी पूर्वी कधी पाहिलंही नव्हतं . त्यांनीच मला ते दाखवलं होतं ... "
" मग काय झालं ? तुला आपल्या सिटीतली सगळी एटीएम्स माहीत आहेत का ? "
" तसं नाही गं , पण मला जरा ते एटीएम विचित्रच वाटलं "
" हल ... काहीही .... भात वाढू का ? "
" नको , अगं खरंच ! आणि त्या एटीएमवर कोणत्याच बँकेचा बोर्ड नव्हता "
" अंधारात नीट दिसलं नसेल तुला . "
" मला सांग , आमराई रोडला त्या जुन्या इमारतीत कुठून आलं एटीएम ? "
" असेल रे , आपल्याला काय माहीत ? का रे ? भाजी आवडली नाही का ? "
" नको . भूकच मेलीय माझी " मनीष तसाच ताटावरून उठला आणि गॅलरीत जाऊन खालच्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पहात बसला . त्याच्या डोक्यातून त्या विचित्र एटीएमचा विचार जाईना . नक्कीच गूढ असं काहीतरी त्या एटीएम मध्ये होतं असं त्याला आता प्रकर्षाने जाणवू लागलं . पेडगावकर काकांच्या एटीएमच्या स्लिपवर 2 हा आकडा आणि त्याचं दोनच दिवसात मरण ह्याचा काय अर्थ घ्यायचा ? त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं . कदाचित हा योगायोगही असू शकेल .... त्याचं दुसरं मन त्याला सांगू लागलं . त्याने डोक्यातून तो विचार काढून टाकला आणि मागे वळला तर गॅलरीच्या दारात सायली उभी होती .
" अजून त्याच विचारात आहेस ? चल, त्या एटीएमला जाऊ .मलाही बघायचंय काय आहे तो प्रकार " सायली म्हणाली .
" सोड , मी आत्ताच तो विचार डोक्यातून काढून टाकलाय "
" पण मला पैसे काढायचेत . खरंच ! "
" आता कुठे जाणार ? रात्रीचे 11 वाजतायत "
" चल ना , प्लिज , असंही उद्या संडे आहे . आणि आपण आईस्क्रीम पण खाऊ . मला इच्छा झालीय "
" ठीक आहे . चल " नाईलाजाने मनीष तयार झाला . दोघे आमराई रोडवरच्या जुन्या इमारतीच्या एटीएमपाशी आले . सायलीने तिची पर्स उघडली आणि एटीएम कार्ड काढलं . मशीनमध्ये टाकुन तिने एक हजार रुपये काढले . बॅलन्स दाखवणारी स्लिप बाहेर आली . मनिषने ती बघितली त्या स्लीपच्या खाली उजव्या बाजूला ठळक अक्षरात काही आकडे लिहिले होते .
" 10863 . हे बघ असंच पडवळकर काकांच्या स्लिप वर 2 हा आकडा होता . "
" म्हणजे तुला म्हणायचंय की मी आणखी 10863 दिवस जगणार आहे ? रब्बीश ! " असं म्हणून सायली गंमतीने हसू लागली .
" हसू नकोस , कदाचित असेलही तसं ... " मनीष गंभीर चेहऱ्याने म्हणाला .
" अरे मनीष , तुझ्या लक्षात येतंय का ? हा नंबर म्हणजे कदाचित स्लिप नंबर असू शकतो किंवा बँकेचा कसला तरी कोड नंबर असेल .... "
" मला नाही तसं वाटत " मनीषचा आवाज आणखी खोल गेल्यासारखा वाटला .
" मी काय म्हणते , तू तुझं कार्ड टाकून बॅलन्स चेक कर .... बघू काय येतंय ते ! " तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते .
" काय येईल असं तुला वाटतं ? " मनीषने पाकिटातून त्याचं एटीएम कार्ड काढत गंभीरपणे विचारलं .
" आय एम डॅम शुअर की माझ्या स्लिप नंबर च्या पुढचा नंबर येईल . 10864 . बघ .... आय बेट ! "
" आणि वेगळाच नंबर आला तर ? "
" तसं काही होणार नाही , आणि मी सांगितलेला नंबर आला तर तू मला आईस्क्रीम द्यायचंस " सायली म्हणाली .
होकारार्थी मान हलवत मनीषने मशीन मध्ये कार्ड सरकवलं . बॅलन्स चेक केला . काही क्षणातच बॅलन्सची स्लिप बाहेर आली . त्याने ती हातात घेऊन पाहिली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला .
" मनीष ! अरे काय झालं तुला ? " सायली किंचाळली . मनीषचं शरीर थंड पडलं होतं . तिने त्याच्या हातातली स्लिप पाहिली . त्यावर उजव्या कोपऱ्यात खाली 0 आकडा प्रिंट होऊन आला होता .

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी !!

एक टायपो झालीये
पण पहिल्यांदा "पेडगावकर" काकांना पैसे काढून दिले
मग त्यांचे "पडवळकर" झाले Happy
10863 . हे बघ असंच पडवळकर काकांच्या स्लिप वर 2 हा आकडा होता.

छान!
अशासारखीच दिनेशदांची एक कथा होती. ' आकडा' नाव होतं बहुतेक. किती दिवस आयुष्य उरलंय तो आकडा डोक्यावर दिसतो.

झकास!
डरना मना है, डरना जरुरी है चा पुढचा भाग काढणार असतील तर त्यात येऊ शकेल Lol