प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving - भाग १

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 8 August, 2018 - 08:26

“हो ते तसं होणं स्वाभाविक आहे... पूर्ण आयुष्य आपण नाकाने श्वास घेण्यासाठी ट्रेन झालो आहोत. अचानक तुला कोणी सांगितलं तोंडाने श्वास घे आणि तेही पाण्याखाली तर थोडा त्रास होणारच!
हे बघ, स्कुबा डायविंग सर्वांसाठी नसतं...पण मी म्हणेन ते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करून बघावं...
आपण अजून १-२ दा ट्राय करू. नाही जमलं
तर you can always say no!”
माझा स्कुबा डायविंग ट्रेनिंग इंस्ट्रक्टर ऍशली मला सांगत होता. आम्ही जवळजवळ ५ फूट पाण्यात उभे होतो. आणि मला स्कुबा डायविंग च्या air regulator ने श्वास घ्यायला तो शिकवत होता.

“इन्सान को अपनी हर एक सांस का एहसास होता है. Like we are fully alive!”
ज्या दिवशी मी जिंदगी ना मिलेगी दोबारा
पहिल्यांदा बघितला होता त्या दिवशी ठरवलं होतं की आयुष्यात जेंव्हा कधी संधी मिळेल तेंव्हा scuba diving हा प्रकार एकदा तरी ट्राय करायचाच. ती संधी या वर्षी जुलै मध्ये मला मिळाली. आम्ही फुकेतला वार्षिक ट्रीपसाठी जाणार होतो.
“स्कुबा डायविंग करशील का?” नवरोबांचा प्रश्न. माझं फिरस्तीचं आणि नवीन गोष्टी करून पाहण्याचं वेड त्याच्यामुळेच अबाधित आहे. मी आनंदाने ढगात!!!
हो!!!
एका सेकंदाचाही विचार न करता मी उत्तर दिलं.
उत्तर दिल्यानंतर त्यानेच ऑसी डाईवर्स नावाच्या फुकेतच्या स्कुबा डाईविंग एक्सपर्टस कडे नावनोंदणी केली.

Discover scuba diving ह्या प्रकारात तुम्हाला पोहता येणं गरजेचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मी काही पट्टीची पोहणारी नाही पण पाण्यात बुडणार नाही इतकं बरं मला पोहता येतं. सगळी बुकिंग्स झाल्यावर मात्र मला आतून थोडी भीती वाटायला लागली. एकतर पाण्यात पोहण्यासाठी उतरून जवळजवळ महिना झाला होता. आणि मला एकटीलाच diving करावं लागणार होत. मुलगा लहान असल्यामुळे आमच्यापैकी एकाने त्याच्या सोबत राहावं लागणार होतं, नवरोबांनी आधीच सांगितलं होतं की मी त्याच्यासोबत राहीन.

जेंव्हा काही नवीन करतो तेंव्हा काही भलतंच झालं तर असे विचार डोक्यात आणणं हे मानवी मेंदूच वैशिष्टय आहे बहुतेक. ते कुठलेसे डॉक्टर scuba diving साठी गेल्यावर कसा त्यांचा oxygen cylinder संपला वगैरे वगैरे बातम्या आठवायला लागल्या.
मग ठरवलं, एखादी नवीन गोष्ट सुरु करतानाच असं नकारात्मक विचार करून उपयोग नाही, positive राहूया. जो होगा देखा जायेगा! कारण यासारखी काहीतरी मस्त नवीन अनुभव घेण्याची संधी काही रोजरोज मिळणार नव्हती. मग Instagram मदतीला धावून आलं, ऑसी डाईवर्सच्या profile वर जाऊन त्यांचे फोटोज पाहिले.
ते अर्थातच अप्रतिम होते. सुंदर निळंशार पाणी, त्यातले विविध समुद्री जीव आणि त्यांच्या बरोबरीने पोहणारे ते scuba divers!!!!! मी त्यांच्या जागी मला इमॅजिन करत होते. आणि या स्वप्नरंजनातच फुकेत ला येऊन पोहोचलो.
२ दिवस sightseeing झाल्यावर माझं ट्रेनिंग होत.ट्रेनिंग साठी गेल्यानंतर ऍशली बरोबर ओळख झाली. हा मूळचा ऑसी. पण इथे राहून तो स्कुबा डायविंगचं training देतो.
तर back to training...

आधी सांगितलं तसं आम्ही ५ फूट पाण्यात उभे होतो.
Scuba diving साठी तुम्हाला वेटसूट घालावा लागतो.
मग येत BCD म्हणजे buoyancy control device.
Buoyancy म्हणजे तरंगण्याची क्षमता.
BCD मुळे तुम्ही पाण्याखाली असताना neutral buoyant राहता म्हणजेच एका ठराविक खोलीवर तरंगत राहता, अगदी तळाशी जात नाही किंवा पाण्याच्या surface वर पण येत नाही.
आणि हेच BCD तुम्हाला पाण्याच्या surface वर असताना positive buoyant ठेवतं, म्हणजेच तुम्ही पाण्यात बुडत नाही.
मग oxygen cylinder. या वायूला प्राणवायू का म्हणायचं ते पाण्याखाली असताना खरंच शब्दशः कळतं.
मग एअर रेग्युलेटर- जो oxygen cylinder ला जोडलेला असतो. हा तोंडात धरून ठेवून तुम्हाला श्वासोच्छ्वास करायचा असतो.
मग weights जी तुम्हाला पाण्याखाली राहायला मदत करतात आणि फिन्स जे माशांसारखे पोहायला मदत करतात. आम्ही swimming पूल मध्ये training घेत होतो त्यामुळे मी थोडी निर्धास्त होते कारण काहीही वाटलं तर पाय जमीनीला टेकत होते आणि डोकं वर काढता येत होतं.

ऍशली ने मला पाण्याखाली रेग्युलेटर ने श्वास कसा घ्यायचा ते तर शिकवलंच पण scuba diving साठी लागणारी ३ महत्वाची कौशल्यंही शिकवली. जर पाण्याखाली असताना तुमचा रेग्युलेटर तोंडातून निघाला तर तो शोधणे हे पहिलं कौशल्य, दुसरं तो पुन्हा तोंडात बसवून आपला श्वास पूर्ववत चालू करणं हे आणि तिसरं म्हणजे जर तुमच्या डोळे आणि नाक कव्हर करणाऱ्या मास्कमध्ये पाणी गेलं तर ते बाहेर काढणं. हे सगळं शिकल्यानंतर मला त्याने आता तू उद्या diving साठी तयार आहेस असं सांगितलं.
आता फक्त एकच अडथळा होता तो म्हणजे फुकेतचा पाऊस. जुलै पासून त्यांचा पावसाळा सुरु होत असल्याने हा तसा diving साठीचा लो सिझन. ऍशली ने सांगितलं आम्ही कालची डायविंग ट्रिप खराब हवामानामुळे कॅन्सल केली होती. उद्याची ट्रिप on आहे कि नाही हे तुला आज संध्याकाळपर्यंत मेल करून सांगू. हो म्हणून मी हॉटेलवर परतले.

ट्रेनिंग नंतर माझी भीती कमी झाली होती. आता उद्या डाईव कशी होईल याचे विचार मनात सुरु झाले होते. माझ्याही नकळत माझ्या मनात देवाचा धावा सुरु झाला होता की प्लीज देवा उद्या लक्ख ऊन पडू दे आणि माझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण होऊ दे.
रात्री बॅगमध्ये लागणार सगळं सामान भरून ठेवलं. नवऱ्याने पुन्हा एकदा निवांत राहा, एन्जॅाय कर, you will be fine हे सांगितलं. मी मनाने केंव्हाच राचा याई(आमचं डाईव लोकेशन बेट) ला पोहोचले होते. राचा म्हणजे राजा आणि याई म्हणजे मोठा. थाई भाषेतले कित्येक शब्द भारतीय भाषांशी साधर्म्य साधणारे आहेत.
मला स्वप्नं पण मासे आणि पाण्याचीच पडणार असं वाटायला लागलं होत. सकाळी ७ ला माझा हॉटेलवरून पिकअप होता. विचारातच कधी झोप लागली ते कळालंच नाही.
आणि तो दिवस उजाडला, ज्याने माझं आयुष्य बदललं...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
पण इतका लहानसा भाग का केलात? लिहायचं की सविस्तर.