आमचे प्राणी जीवन

Submitted by mi_anu on 7 August, 2018 - 12:11

"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.
"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.

तितक्यात आतून एक पॉंडस पावडरीचा वास पदर फलकारत आला.
"सांभाळून रे बाबांनो.परवा त्या ए5 मधल्या बाईंनी खाली पूजेची फुलं घेताना झाडावर काळं कुट्ट लांबडं पाहिलं.अगदी हातापासून वीतभर अंतरावर.हे असं मोठं होतं आणि फूस फूस करत उडी मारून दुसऱ्या झाडावर गेलं.आता खूपच झालीत सोसायटीत लांबडी."
"लांबडं?"
"म्हणजे जनावर रे.सरपटणारं."
"ओह, साप म्हणायचंय का तुला?"
"घेतलं का शेवटी ते अभद्र नाव?नाव घेतलं तर लांबडं आपल्या मागे घरात येतं.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"हे असं म्हणून सापाला कसं कळेल?तो मराठी आहे का?आणि त्याला माहित आहे का आपलं दुसरं नाव लांबडं आहे ते?"
"परत तेच.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"तू घाबरू नको गं.त्या काकूंना जाड चष्मा आहे.नंबर वाढला असेल.काळी साप सुरळी मोठी होऊन दिसली असेल."
"करा चेष्टा.हे असे अनुभव प्रत्यक्ष आल्याशिवाय कळायचं नाही तुम्हाला."
परत एकदा सापाचं नाव येण्याआधीच साडी पदर फलकारत आणि चप्पल वाजवत फूस फूस वाला मोठा भुजंग पाहिलेल्या काकूंबरोबर फिरायला गेली.

"काहीही फेकतात काकू.असा या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारा सुपरमॅन साप इतका जवळ येईपर्यंत दिसला नाही होय त्यांना?"
"असेल खरं.आपल्याला काय माहित?मी डिस्कव्हरी वर पाहिलंय.काळे साप नेहमी विषारी असतात.न्यूरो टॉक्सिन सोडतात.आणि विषारी साप ओळखायचं मुख्य चिन्ह म्हणजे त्यांच्या डोक्याच्या बाहुल्या टोकदार असतात, आणि बिन विषारी सापांच्या गोल."
(स्वागत: अरे देवा!!काही काळ हे चॅनल दिसणं बंद करावं.कसलं म्हणून नव्या माहितीचं इम्प्रेशन मारता येत नाही हिच्यावर.)
"म्हणजे साप चावायला आला की आधी "सापा सापा थांब थांब चेहरा वळव, मला तुझ्या डोळ्यात बघूदे" म्हणून डोळ्यात बघून बाहुल्या गोल असल्या तरच चावायला गो द्यायचा का त्याला?"
"एक मेली उपयोगी माहिती द्यायला गेले तर त्यात हजार खोड्या काढायच्या.सवयच आहे तुमच्या घराला आनुवंशिक."
(विषय घातक वळणावर जायला लागला.या वळणावर गेलेल्या गाडया उतारावर भरधाव वेगाने जाउन 'आज स्वयंपाक नाही' या दगडावर आपटतात याची कल्पना असल्याने सरड्यापासून वाचलेली पार्टी जीवाच्या आकांताने विषय बदलायचे चान्स शोधू लागली.)

"त्या मांजराने बाहेर शी करून ठेवलीय.आता ती अजून एका मांजराला घेऊन येते.हळूहळू आपल्या गॅलरीची सार्वजनिक मांजरहागणदारी होणार असं दिसतंय."
"मी काल दालचिनी आणि मिरी पावडर मिक्स करून ठेवली होती आणि पसरली होती.म्हणजे तिला एकदा शी ला बसल्यावर बुडाला जबरदस्त झोम्बलं की परत येणार नाही.उद्या मिरची पूड पण मिसळते."
"मांजर नेहमी जमिनीला बुड टेकूनच शी करेल हे बेसिक ऍझंप्शन चुकतंय असं वाटत नाही का?आणि पावडरीच्या लेयर कडे तोंड करून शी केली म्हणजे सगळंच गणित चुकलं."
"तू सोल्युशन दे.असलेल्या सोल्युशन मध्ये चुका काढू नकोस."
"ठीक आहे.तू पहाटे 4 पासून लक्ष ठेव. मांजर आली की चटकन गॅलरीचं कुलूप काढायचं, पटकन बाहेर जायचं आणि तिच्या कंबरेत मोठी कचकून लाथ घालायची."
"मी काय म्हणते, तुला गेले बरेच दिवस ब्राह्मप्रहरी उठून जॉगिंग ला जायचं होतं ना?तूच का नाही लक्ष ठेवुन पेकाटात लाथ घालत?"

"बरं ते जाऊदे.अजून एक आयडिया.मांजरीच्या नेहमीच्या शी ला उभं राहायच्या जागेवर थोडे लांब लांब 10 वेट सेन्सर लोडसेल लावायचे.त्यातल्या एखाद्यावर तिने पाय दिला की सेन्सर ऑपरेट होईल.मग एक स्विच ऑन होईल.मग वरती एक पाण्याची भरलेली बादली असेल ती तिच्या अंगावर रिकामी होईल."
"अरे महान माणसा, इतकी हाय फाय सेन्सर असेंम्बली आपण बनवून जागेवर लावेपर्यंत त्या मांजरीला 5 पिल्लं होऊन ती आईपार्जित शौचालयाचा वापर करायला लागतील.टॉम अँड जेरी बघणं कमी कर जरा."

"पेस्ट कंट्रोल करायलाच पाहीजेय."
"पेस्ट कंट्रोल ने शी करणारी मांजरं आणि साप कसे जातील?"
"परवा पाल होती बाथरूम मध्ये.मी मेले असते हार्ट ऍटॅक ने.त्या जवळच्या पेस्ट कंट्रोल वाल्याला फोन केला तर म्हणे आम्ही फक्त मुंग्या आणि झुरळं कव्हर करतो.पाली आणि कोळी आम्ही घेत नाही.मूर्ख माणूस.घरावर पाटी लावू का, पाली आणि कोळ्याना प्रवेश बंद म्हणून?"
"ती आता तुझ्या मागे भिंतीवर आहे ती तीच असेल.तशीच होती का दिसायला?"
(इथे एक मोठी किंकाळी आणि पळापळ होऊन एक पार्टी डायनिंग टेबल च्या खुर्चीवर चढते.)
"हाड, हाड.तिला पळव रे.हे बघ असं डिस्टर्ब न करता जायचं आणि हळूच मॉरटीन मारायचं.मग ती बेशुद्ध झाली की केर भरण्यात घेऊन अलगद बाहेर नेऊन टाकायचं."
"हाड?ती कुत्रा नाहीये.मी अजिबात पळवणार नाही.तू 'पाल मारणारा नवरा पाहिजे' असं लग्नाच्या अपेक्षांमध्ये लिहिलं नव्हतं.स्पेक्स क्लिअर हवीत.रोल्स रिस्पॉन्सीबलिटी क्लिअर हव्यात."
"अरे ती बघ तुझ्या नव्या वूडलॅन्ड च्या खोक्याकडे चाललीय."
(आता सरड्यापासून वाचलेली पार्टी किंकाळी फोडून पळापळ करते.)
"मी मॉरटीन आणतो.तू तोवर काठी वाजवून तिला दाराच्या दिशेला ढकल.मध्ये मध्ये कांची नारद राजाचा जप कर.आई म्हणाली त्याने धीर येतो."
"मला जमणार नाही.ती माझ्या अंगावर येईल.तू काठी वाजव, मग मी मॉरटीन देते ते मार.मग ती मेलीय कन्फर्म केलं की मी प्रेत उचलून बाहेर टाकेन."
आपल्या बद्दल चाललेलं इतकं अफाट प्लॅनिंग बघून पाल स्वतःच गहिवरून खिडकीतून बाहेर गेली.

तितक्यात दार धडाधड वाजवून छोटे पाय आणि खरचटलेले हात घरात येतात.
"आई मला जिंजर ने पंज्याने स्क्रॅच केलं."
"बापरे, आधी डेटॉल लावू.केवढं खोल ओरबाडलंय.तू त्या जिंजर पाशी कडमडायला गेलीस कशाला?तुला मी कालच सांगीतलं होतं कुत्री मांजरं त्यांच्या खूप जवळ गेलं की चिडतात."
"अगं मला लक्षात होतं.मी आधी जिंजर चा चेहरा वळवून नीट पाहिला.तो चेहरा शांत दिसत होता म्हणून तिला उचललं तर तिने जोरात शांत फेसनेच पंजा मारला."
"तुझ्या नानाने केलं होतं मांजरीचं फेस रिडींग.चला आता रेबीज इंजेक्शन घ्यायला.आणि 5 डोस पूर्ण झाले की मग पाहिजे तितक्या मांजरी कुत्रे उचलत बस."

-आमच्या घरातल्या सर्व 0,2,4,6 पायवाल्या प्राण्यांना समर्पित.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol

बाकी 2 आणि 4 पायांच्या चालणाऱ्या प्राण्यांबद्दल आमच्या घरी पण स्टोर्या आहेत, वेळ मिळाला की लिहीन

अहो मी_अनु, काय लावलय हे! Lol
पाल स्वतःच गहिवरून खिडकीतून बाहेर गेली.>>बिच्चारी Lol
आज झोपेत हसणार मी बहूतेक.

धम्माल!
रच्याकने कायशी कुठेशी आच्यालाच त वाचलं की लेख दिडपानाचा बडवला व्हता म्हून... त्यो शोदून अ‍ॅडा की यात.

पदर फलकवणारा पाँड्स... Biggrin

Biggrin भारीये...

लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव.
>>>
Biggrin असली फिसकन हसले मी इथे भरल्या मिटिंग मधे Rofl

मस्त लेख!

निरु , तुमचा टारझन कसला गोड आहे!

मांजरहागणदारी >>>> Biggrin

"अगं मला लक्षात होतं.मी आधी जिंजर चा चेहरा वळवून नीट पाहिला.तो चेहरा शांत दिसत होता म्हणून तिला उचललं तर तिने जोरात शांत फेसनेच पंजा मारला.">>>>>>>>> एकदम हुश्शार! Biggrin

मांजरहागणदारी>> Biggrin
भारी लिहिलंय! धमाल Lol
निरुदा टारझन कसला गोड आहे!

खुप हसले. मस्त लिहीलय.

बाहेरचे साप, खेकडे पळवण्यासाठी आम्ही फोरेट हे औषध टाकते कंपाउंडला.

Pages