मा. ल. क. - ७

Submitted by शाली on 31 July, 2018 - 02:28

मा.ल.क. - ६

नगराच्या उगवतीच्या बाजुला सावकारपुत्राचा प्रशस्त असा चौसोपी वाडा होता. वाडा पहाताच त्याच्या सांपत्तीक स्थितिचा, कलादृष्टीचा, रसीकतेचा अंदाज सहज बांधता यायचा. वाड्यासमोरच्या गजशाळेत दोन हत्ती झुलत असायचे. गजशाळेच्या शेजारीच असलेल्या पागेत नामांकीत जातीचे दमदार अश्व चंदी चघळताना दिसायचे. वाड्याच्या परिसरात प्रवेश केल्यावर एक हलकासा सुगंध दरवळत असल्याचे जाणवायचे. सावकारपुत्राने वाड्याचा गिलावा करताना मातीत कस्तुरी मिसळली होती म्हणे. वाड्याच्या आतिल भागात ‘घोट्यापर्यंत पाय रुतावेत’ असे पर्शीयन गालीचे अंथरले होते. छतावर परदेशी व्यापाऱ्यांकडुन खरेदी केलेली अत्यंत नवलाईची अशी प्रचंड काचेची झुंबरे टांगलेली होती. वाड्यातील सर्व नोकरांना अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त पगार होता. सावकारपुत्राची नुकतीच लग्न झालेली, अतिशय सुंदर पत्नी या सर्वांवर लक्ष ठेवून होती. राजाकडून ‘पालखीचा’ सन्मान मिळालेला होता. सावकारी फक्त नावालाच होती. पिढ्यान् पिढ्या जमवलेली संपत्तीची मोजदाद करणे अशक्य होते. त्यामुळे सावकारीच्या नावाखाली सावकारपुत्र गरीब, गरजु लोकांना मदत करत असे. इतकी संपत्ती असुन सावकारपुत्राला त्याचा ना दंभ होता ना मद. अत्यंत पापभीरु असलेल्या सावकारपुत्राच्या दारातुन कुणीही याचक कधी रिक्त हस्ते माघारी गेला नव्हता. अंगणात रोज शेरभर साखर पडे मुंग्यासाठी. तितकेच धान्य पक्षांसाठी छतावर पडे. रोज किमान शंभर माणसांचा स्वयंपाक रांधला जायचा वाड्यावर आणि नगरातील गरीबांपर्यंत पोहचता व्हायचा. आपल्या हातुन कधीही पापकर्म होउ नये यासाठी सावकारपुत्र नेहमी दक्ष असे.

आज संपुर्ण वाडा विशेष सजवला होता. दर्शनी भाग वेगवेगळ्या फुलांनी शृंगारला होता. दिंडी दरवाजाऐवजी आज वाड्याचे मुख्य द्वार पुर्ण ऊघडे होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला सनई-चौघडे वाजत होते. दारावर सोनेरी पानांचे तोरण शोभत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर कनौजी अत्तर शिंपडले जात होते. मुदपाकातुन पक्वान्नाचा सुरेख दरवळ येत होता. सावकारपुत्राला आज पुत्ररत्न प्राप्त झाले होते. पुत्रजन्माचा सोहळा वाड्याबरोबर सगळ्या नगरात साजरा होत होता. आज विशेष भिक्षा मिळेल हे ओळखून अनेक याचकांची वाड्यावर गर्दी होत होती. सावकारपुत्रही मुठी मुठीने मोती, मोहरा, मुद्रा उधळीत होता. आज त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. दिवस डोक्यावर येता येता वाड्यात नगरातील प्रतिष्ठीतांच्या पंगती बसायला सुरवात झाली. तसेच वाड्याच्या प्रांगणातही नगरवासीयांच्या पंगती बसल्या. मुक्तहस्ताने सुग्रास अन्नाचे वाटप सुरु झाले. वाड्यातील आणि बाहेरील पंगतींवर लक्ष देता देता सावकारपुत्राची आणि इतर नोकरवर्गाची तारांबळ उडाली. दिवसभरात किती पाने ऊठली त्याची मोजदादच नव्हती. दिवस मावळला तरी वाड्याचा दरवाजा बंद नव्हता झाला. अजुनही तुरळक माणसे येत होतीच. उरली सुरली कामे नोकरावर सोपवून सावकारपुत्र जरा चंदनाच्या झोपाळ्यावर विसावला होता. अतिव आनंदाने त्याला किंचीत ग्लानी आल्यासारखे झाले होते. नोकरांनी कार्यक्रम संपला असं समजुन सर्व आवरायला घेतले होते. समया, झुंबरे प्रकाशीत करायला सुरवात झाली होती. वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करता करता सावकारपुत्राच्या कानावर साद आली “भिक्षां देही” त्याने बाजूलाच असलेली छोटीशी रेशमी थैली उचलली. मोत्यांनी भरली आणि नोकराकरवी पाठवून दिली. आता त्याच्यात ऊठण्याचेही त्राण राहीले नव्हते.
इतक्यात थैली घेवून गेलेला नोकर माघारी आला आणि हात जोडून म्हणाला “महाराज, दारावर साधूमहाराज आले आहेत. पण ते कोरड्या शिध्याव्यतिरीक्त काहीही घ्यायला तयार नाहीत.”
इतक्या निर्मोही साधूला स्वतःच्या हाताने भिक्षा घालावी असा विचार करुन सावकारपुत्राने कोरडा शिधा मागवला आणि स्वतः दरवाज्याकडे वळाला. साधूला पहाताच सावकारपुत्राला खुप समाधान वाटले. तरुण वय, काळीभोर दाढी, तेजस्वी डोळे, चेहऱ्यावर प्रभा असावी अशी कांती. एका हातात झोळी तर दुसऱ्या हातात योगदंड. एकुनच प्रसन्न करणारे व्यक्तीमत्व होते साधूचे. सावकारपुत्राने शिधा असलेले तबक पुढे केले. साधुनेही आपली झोळी पसरली आणि मंद स्मित करत सावकारपुत्राकडे पाहीले. पण क्षणभरातच साधूच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित मावळले. गंभीर होत त्याने आपली झोळी मागे घेतली. सावकारपुत्रालाही आश्चर्य वाटले. साधूने झोळी परत खांद्यावर अडकवली आणि भिक्षा न स्विकारताच सावकारपुत्राकडे पाठ करुन तो चालू लागला. रिक्त हाताने जाणारा याचक पाहून सावकारपुत्र गोंधळला. जाणाऱ्या साधूच्या मागे धावत त्याने साधूचा रस्ता अडवला. हात जोडून त्याने भिक्षा न स्विकारण्याचे कारण विचारले.
साधू थोडा विचारमग्न होत म्हणाला “मला स्पष्ट दिसत नाही तुझे भविष्य बाळ, पण तुझ्या हातुन ब्रह्महत्या होणार आहे हे नक्की. आणि कोणत्याही प्रकारे हे पातक तुला टाळता येणार नाही. परिणामी मी तुझ्या हातुन भिक्षा स्विकारु शकत नाही.”
हे ऐकताच सावकारपुत्राच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याचे भान हरपल्यासारखे झाले. साधू कधी निघुन गेला हेही त्याला समजले नाही. सुन्न होवून तो वाड्यावर परतला. मुंगीलाही रोज साखर भरवणारे आपण, आणि आपल्या हातुन ब्रह्महत्या होणार हे समल्यावर त्याचे चित्त अस्वस्थ झाले. रात्रभर त्याला झोपही लागली नाही. हे काय होवू घातलेय आपल्या सुखी आयुष्यात तेच त्याला समजेना. यावर त्याला काही उपाय सापडेना. आत्महत्येचाही विचार त्याच्या मनात येवून गेला. पण ब्रह्महत्येइतके मोठे नसले तरी आत्महत्या हेही पातकच. शेवटी पत्नीबरोबर चर्चा करुन सावकारपुत्राने निर्णय घेतला. तरुण वयातच वानप्रस्थ स्विकारायचा. अत्यंत जड अंतःकरणाने पत्नीनेही परवानगी दिली. दुसरा पर्यायच नव्हता. पुढील दोन दिवसात त्याने आपल्या सर्व संपत्तीची व्यवस्था लावली. पत्नीला सर्व समजावून सांगीतले. चार दिवसांच्या आपल्या मुलाला एकदा कुशीत घेतले. सर्व नोकरांचा, नगरवासीयांचा निरोप घेतला. आणि एका शुभ मुहुर्तावर त्याने आपला वाडा, संपत्ती, नातेवाईक सगळं काही सोडून वनाचा रस्ता धरला.

वानप्रस्थ स्विकारण्यामागे फक्त ‘ब्रह्महत्या टाळणे’ एवढाच हेतू होता त्याचा. संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुर्ण करुन, पितृऋण, समाजऋण फेडून, जपजाप्य, तप-साधना करने वगैरे उदात्त हेतुने त्याने वानप्रस्थ स्विकारलाच नव्हता. त्यामुळे सावकारपुत्राचे मन सदैव अस्वस्थ राही. पत्नीची, मुलाची आठवण त्याला शांतता मिळू देत नसे. त्याने नदिच्या काठी थोडी जागा साफ करुन तेथे लहानशी झोपडी बांधली. आहारासाठी जंगलातली कंदमुळे, फळे उपलब्ध होती. परांच्या मऊ गादीवर झोपणारा सावकारपुत्र आता दर्भावर झोपत होता. चंदनाच्या चौरंगावर बसुन सोन्याच्या ताटात जेवणारा तो, आता रानकेळींच्या पानावर जेवत होता. सदैव मानसांच्या गराड्यात असणाऱ्या सावकारपुत्राला आता मात्र मनुष्य दिसणेही मुश्कील होते. त्याला सोबत होती ती फक्त जंगली श्वापदांची. दिवसांमागुन दिवस जात होते. सावकारपुत्र आता जंगलात रमला जरी नसला तरी ते आयुष्य त्याच्या बरेचसे सवयीये झाले होते. अंगावरची वस्त्रे कधीच फाटली होती. त्यांची जागा आता वल्कलांनी घेतली होती. दाढी वाढली होती. केसांच्या जटा झाल्या होत्या. आहारात फक्त फळे, कंदमुळे आणि वनगाईंचे दुध असल्याने शरीर मात्र पिळदार आणि काटक बनले होते. जंगलात अन्नाच्या शोधात भटकताना दिवस पुरत नसे. श्वापदांच्या भितिने हातात दणकट, वजनदार काठी असे. दिवस सरले, महिने गेले, वर्षे उलटली. सावकारपुत्राचा दिनक्रम मात्र बदलला नाही. आता तो उतारवयाकडे झुकला होता. दिवसभर त्याचे विचारचक्र फिरत असत. आताआताशी त्याला ‘घेतलेल्या निर्णयाचा’ पश्चाताप व्हायला लागला होता. आपण पाप-पुन्याच्या नादात आयुष्य व्यर्थ घालवले असे त्याला वाटू लागले होते. काय ब्रह्महत्या व्हायची होती हातुन ती झाली असती पण तोवर आपण, आपली संपत्ती कितीतरी लोकांचे आयुष्य सावरुन गेली असती याची त्याला नव्याने जाणीव व्हायला लागली होती. एका यःकश्चीत साधूची भविष्यवानी ऐकून आपण समाजऋणाकडे पाठ फिरवली, स्वार्थी वागलो याचे त्याला अतोनात वाईट वाटे. त्याला त्या साधूचा चेहरा आठवे आणि त्याच्या जीवाची रागाने तगमग होई. एक उमेदीचे आयुष्य आपण मुर्खपणाने वायाला घालवले या विचाराने त्याला आजकाल झोप येत नसे. नेहमी प्रमाणे आजही सावकारपुत्र पहाटे ऊठला. नदिवर जावून स्नान वगैरे ऊरकून तो येतानाच काही फळे, कंदमुळे घेवून झोपडीकडे परतला. हातातली काठी दाराला टेकवून त्याने केळीची दोन पाने खाली अंथरली. त्यावर जमा केलेली फळे व्यवस्थीत मांडून तो जेवायला बसणार इतक्यात त्याच्या कानावर इतक्या वर्षांनी मानवी आवाजातली साद पडली. “भिक्षां देही!” पंचवीस वर्षांपुर्वी हीच साद, याच आवाजातली साद आपण ऐकली होती आणि आयुष्याची वाट लावून घेतली होती हे त्याला आठवले. पण मुळ स्वभावानुसार त्याने काही फळे उचलली आणि भिक्षा घालण्याकरता तो झोपडीच्या दारात आला. समोरच्या साधूला पाहून मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तेच ओळखीचे तेजस्वी डोळे, तोच कांतीमान चेहरा. दाढी मात्र आता पांढरी झाली होती. त्या साधूला पुन्हा आपल्या दारावर पहाताच सावकारपुत्राचा संताप अनावर झाला. त्याच्या हातातली फळे खाली पडली. डोळ्यात संताप उतरला. दाराला टेकवलेली मजबुत काठी हातात घेत तो ओरडला “अरे मुर्खा, तुझ्यामुळे माझ्या पत्नीची, मुलाची आणि माझी ताटातुट झाली. अगणीत संपत्ती असुनही मी निर्धनाचे आयुष्य जगलो. का केलेस असे?” असे म्हणत त्याने सगळा जीव एकवटून समोरच्या साधूच्या मस्तकावर काठीने प्रहार केला. क्षणात साधू खाली कोसळला. अतीशय रागाने त्या ब्राह्मण साधूच्या निष्प्राण देहाकडे पहात सावकारपुत्राने आपल्या नगराच्या दिशेने धाव घेतली.

मा.ल.क.-८
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख कथा... उत्कृष्ट लिखाण... पण वाईट वाटले एका सत्कर्मी माणसाचे आयुष्य फुकट जवूनही जे व्ह्यायचे तेच झाले. Sad

साधू हा या कथेतला खलनायक आहे. शब्दामागे अर्थ धावत येण्याची क्षमता त्याच्या शब्दात आहे. नाहीतर अशा सदवर्तनी - परोपकारी सावकारपुत्राला अशी ब्रह्महत्या करण्याची बुद्धी होण्याचे दुसरे कुठलेच कारण नाही. या विघ्नसंतोषी व्रुत्तीला चांगली अनुरूप शिक्षा मिळाली.

कथा आवडली. मी वरती म्हटल्याप्रमाणे ऑस्कर वाईल्ड्ची 'Lord Arthur savile's crime' ही कथाही अशीच आहे. त्यात एक भविष्यवेत्ता लॉर्ड आर्थरला तुझ्या हातून एक खून होणार आहे असं सांगतो. पापभीरू, प्रामाणिक लॉर्ड आर्थर सुखी संसाराची आणि भविष्याची स्वप्ने बघत असतो तो पूर्ण हादरून जातो. हे भविष्य तर खोटे होणार नाही मग तो आपल्या दूरच्या जराजर्जर, मरणासन्न आत्येला विष देऊन तिचा खून करायचा ठरवतो. तिचं शरीर निकामी झालं असतं आणि ती कोणत्याही क्षणी जाणार असते त्यामुळे तिला पटकन मृत्यु आला तर तिची यातनेतून सुटका होईल आणि आपल्याही हातून एक खून झाल्यासारखं होईल असा त्याचा विचार असतो पण शेवटी वेगळंच काही घडतं. जमल्यास मूळ कथा जरूर वाचा.

मस्त.

ही कथाही आठवली त्यावरून : राजपुत्राच्या मृत्यूला वाघ कारणीभूत ठरेल हे भाकित ऐकून राजा त्याला जन्मापासूनच सुरक्षित स्थानबद्धतेत ठेवतो. त्याला बंद दाराआडच सगळी माहिती मिळावी म्हणून अनेक ग्रंथ, तसबिरी इत्यादिंनी घर भरून टाकतो. एक दिवस या बंधनांना कंटाळलेला राजपुत्र चिडून वाघाची तसबीर मुठीने प्रहार करून फोडतो, आणि त्याची काच लागून पुढे ती जखम चिघळल्यामुळे मरतो.

आणखी एक ऐकली होती : यम काही कारणाने वैकुंठात श्रीविष्णूंना भेटायला येतो. महाद्वाराजवळच्या एका कोनाड्यात एक कबुतर बसलेलं असतं, त्याच्याकडे लक्ष जाताच यम थबकतो आणि स्वतःशीच आश्चर्य करीत पुढे आपल्या कामाला जातो. कबुतराची भीतीने गाळण उडते. ते पाहून गरूड त्याला दूर मलयपर्वतावर सोडून यायची तयारी दाखवतो. संध्याकाळी यम मलयपर्वतावर कबुतराला न्यायला येतो आणि म्हणतो 'मला याचंच आश्चर्य वाटलं होतं की तुझा मृत्यू आज संध्याकाळी मलयपर्वतावर निहित असताना तू सकाळी वैकुंठात कसा काय दिसलास?!

एक आणखी कथा अशीच आहे की एका राजपुत्राला कळतं की त्याचा मृत्यु सापसदृश जीवाकडून होणारेय म्हणुन तो फळांचा साठा घेउन स्वतःला दारं खिडक्या लावुन एका रूम मधे बंद करुन ठेवतो आणि एका सफरचंदातुन एक आळी निघते आणि ती विषारी आळी पोटात जाउन राजपुत्र मरतो

एका कथेत चारपाच कथा वाचायला मिळाल्या. छान वाटलं.

@ चीकू, पण शेवटी वेगळंच काही घडतं.  >>> काय ते लिहा की! उत्सुकता वाटतेय.

सगळ्यांचेच आभार!

एका कथेत चारपाच कथा वाचायला मिळाल्या. छान वाटलं.>>>मलाही. हेतुही तोच आहे या कथा लिहिण्यामागे.

@ चीकू, पण शेवटी वेगळंच काही घडतं. >>> काय ते लिहा की! उत्सुकता वाटतेय.>>> +१११

छान गोष्ट !!
मराठी चित्रपट विधिलिखित याच थिमवर होता.

हो मराठी चित्रपट विधिलिखित हा ऑस्कर वाईल्डच्या कथेवरूनच घेतलेला होता.
चित्रपटात (आणि मूळ कथेत) नायक आपल्या हातून खून होणार तो आहेच पण तो निदान कोणाच्या लक्षात येणार नाही, त्याने कोणावर आकाश कोसळणार नाही अशा पध्दतीने करायचा दोन-तीन वेळा अपयशी प्रयत्न करतो. मरणासन्न नातेवाईकाला सुलभ मृत्यू यायला विष देतो, तो मरतो तेव्हा नायकाला हायसे वाटते पण नंतर समजते की तो नैसर्गिक् रित्याच मृत्यु पावला होता आणि नायकाने पाठवलेले विषमिश्रित औषध तसेच होते. नंतरचे एक-दोन प्रयत्नही असेच फसतात. नायक निराशेच्या गर्तेत जातो, त्याचं लग्न ठरलेलं असतं पण खुन्याचा शिक्का बसू शकणार्‍या व्यक्तीशी प्रेयसीने लग्न करावं हे त्याला पटत नाही आणि तो लग्न मोडतो. तिचं दुसरीकडे लग्न ठरतं. नायकाची जीवनावरची लालसा उडते आणि तो आत्महत्या करायचं ठरवतो. आत्महत्या करण्यासाठी नदीच्या पुलावर जात असताना कर्मधर्मसंयोगाने तिथे तोच भविष्यवेत्ता दिसतो आणि त्याला आपल्या परिस्थितीला जबाबदार धरून, त्याच्यावरचा राग अनावर होऊन नायक त्यालाच पाण्यात ढकलून देतो. अशा प्रकारे त्याच्या हातून खून होतो आणि भविष्यवेत्त्याने वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरते.

> साधू हा या कथेतला खलनायक आहे. शब्दामागे अर्थ धावत येण्याची क्षमता त्याच्या शब्दात आहे. नाहीतर अशा सदवर्तनी - परोपकारी सावकारपुत्राला अशी ब्रह्महत्या करण्याची बुद्धी होण्याचे दुसरे कुठलेच कारण नाही. या विघ्नसंतोषी व्रुत्तीला चांगली अनुरूप शिक्षा मिळाली. >
+१