मा. ल. क. - ८

Submitted by हरिहर. on 6 August, 2018 - 23:30

मा.ल.क.-७

पती पत्नी दोघांचेही आयुष्य अत्यंत शांत आणि समाधानी होते. त्यांची संपत्ती म्हणजे त्यांची ही समाधानी वृत्तीच. मालमत्तेच्या नावाने त्यांच्याकडे तसे इतर फारसे काही नव्हते. शेतात असलेले स्वतःचे पण छोटेसे घर, घरामागे गोठा, गोठ्यात चार म्हशी आणि पाच गायी. या जनावरांना पुरुन थोडासा उरेल एवढा चारा पिकवणारी शेतजमीन. पण एवढ्यावरच दोघेही अतोनात आनंदी, समाधानी होते. व्यवसाय दुधाचा असल्याने कष्ट मात्र अतोनात होते. दोघांनाही पहाटे उठावे लागे. गोठा साफ करुन जनावरांचे दुध काढावे लागे. उजाडता उजाडता तो दुधाच्या चरव्या घेवून गावाकडे जाई. सगळे दुध विकून घरी यायला त्याला दुपार होई. तोपर्यंत ती सर्व गायी-म्हशींचा चारा पाणी पाही, स्वयंपाक करी, इतर घरकाम उरके. तोवर तो घरी यई. मग एकत्र जेवण करुन दोघेही शेतात जात. शेताच्या एका तुकड्यात पोटापुरता भाजीपाला असे तर उरलेल्या भागात जनावरांचा चारा. दिवसभर पुरेल इतका चारा बाजूला काढून उरलेला चारा तो संध्याकाळी पुन्हा गावात विकन्यासाठी घेवून जाई. पैशाचे चलन गावात फारसे चालत नसे. अर्थात त्यामुळे काही अडचणही येत नसे. चारा द्यायचा आणि त्या बदल्यात मिठ, मिरची घ्यायची. दुध द्यायचे आणि त्याबदल्यात तेल, पिठ घ्यायचे. त्याच्या दुधालाही गावात मोठी मागणी असे. कारण दुध निर्भेळ असे. पण एकुणच संसाराचा वाढता पसारा पाहून दोघांनाही आहे त्यात भागवणे जरा जड जावू लागले.
शेवटी पत्नीने सुचवले “आपण दुधाचा व्यवसाय करण्यापेक्षा जर तुप, लोणी आणि दह्याचा व्यवसाय केला तर आहे त्याच दुधातुन आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल.” त्यालाही ही कल्पना पटली. योग्य वाटली. मग या नविन व्यवसायावर साधक बाधक चर्चा करुन दोघांनीही ठरवले की गावात फिरुन जसे दुध विकत होतो तसे तुप, लोणी विकण्यात काही अर्थ नाही. गावामध्ये एखादी ठरावीक जागा मिळाली तर तेथे बसुन व्यवसाय करणे सोपे होईल. दुसऱ्या दिवशी तो जागा पहाण्यासाठी तो गावामध्ये गेला. खुप फिरल्यानंतर त्याला एक जागा आवडली. मालकाची चौकशी करता त्याला समजले की त्या जागेच्या शेजारी असणारे जे जीवनावश्यक वस्तू, वाणसामानाचे जे प्रशस्त दुकान होते त्या दुकानाच्या मालकाचीच ही जागा होती. चौकशीसाठी त्याने दुकानात प्रवेश केला. दुकान चांगलेच प्रशस्त आणि सर्व प्रकारच्या मालाने अगदी गच्च भरलेले होते. धान्याची पोती व्यवस्थीत रचुन ठेवली होती. एका बाजूला कापडाचे तागे हारीने मांडले होते. तेलाचे मोठमोठे बुधले मागच्या बाजूला रांगेत ठेवले होते. कोपऱ्यात शुभ्र गाद्या आणि लोड होते. त्यावर मालक रेलून बसले होते. आगत स्वागत, नमस्कार वगैरे झाल्यावर मालकाने यायचे कारण विचारले.
याने सांगीतले “तुप, लोणी आणि दह्याचा व्यवसाय करायचा आहे. समोरची जागा जर वापरायला मिळाली तर मला फार सोयीचे होईल. आपली परवानगी हवी”
मालक प्रशस्त पण बेरकी हसत म्हणाले “का नाही! कोणी व्यवसाय करुन प्रगती करत असेल तर मला आनंदच आहे. तु उद्यापासुन तुझा व्यवसाय सुरु कर.”
त्याला फार आनंद झाला. जागेची समस्या अगदी पहिल्याच प्रयत्नात सुटली होती.
ईतक्यात मालक म्हणाले “पण माझी एक अट आहे. तू मला रोज एक शेर साखरेच्या बदल्यात एक शेर तुप द्यायला हवे.”
त्याने विचार केला, आणि आनंदाने होकार दिला.

दुसऱ्या दिवसापासुन तिने दही विरजायला सुरवात केली. लोणी कढवायला सुरवात केली. आठ दिवसात विकण्याईतके तुप साठल्यावर त्याने मोठ्या ऊत्साहाने व्यवसायाला सुरवात केली. काही दिवसातच त्याचा ऊत्तम जम बसला. त्याच्याकडे असणाऱ्या दुधाला जेवढी मागणी होती त्यापेक्षा कैक पटीने जास्त मागणी तुपाला होती. अत्यंत शुध्द, प्रमाणात कढवलेले, रवाळ, पिवळेधम्मक तुप. लोणीही पांढरे शुभ्र आणि निर्भेळ. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाजवी दर. पती-पत्नींची आवक वाढली. घरात आता सुबत्ता दिसू लागली. गोठ्यात जनावरे वाढवण्याचा विचार सुरु झाला. या सगळ्यात पहाता पहाता वर्ष उलटून गेले. या वर्षभरात मालकाचा एक नोकर रोज संध्याकाळी या गवळ्याकडे येई, एक शेर साखर देई आणि त्याबदल्यात शेरभर तुप घेवून जाई. मालकही खुष होता. ईतके सुंदर तुप त्याला रोजच्या रोज मिळे. आजही मालकाने दुकान बंद करायच्या अगोदर नोकराकडे एक शेर साखर देवून तुप आणायला पाठवले आणि दुकान आवरायला घेतले. नोकरही काही मिनिटातच तुप घेवून आला. तुप मालकाकडे देत नोकर दुकान बंद करायच्या कामाला लागला. मालक समोरची तागडी साफ करत होता. त्याच्या मनात काय आले कुणास ठावूक. त्याने समोरचा तुपाचा डबा वजनकाट्यावर ठेवला. पहातो तर तुप एक शेराला दोन छटाक कमी भरले. मालकाने परत परत वजन करुन पाहीले. पण प्रत्येक वेळी वजन शेराला दोन छटाक कमीच भरे. मालक फार चिडला. त्रागा करत रागाने ओरडतच तो समोरच्या गवळ्याकडे गेला. त्याच्यासमोर तुपाचा डबा आदळून त्याने गवळ्याला यथेच्छ शिव्या घातल्या. रोज ‘दोन छटाक कमी’ या हिशोबाने वर्षभरात गवळ्याने त्याला किती तुपाला फसवले याचा हिशोब तो मांडू लागला. तेवढे तुप तू आत्ताच्या आत्ता मला दे असा हट्टच त्याने लावून धरला. गवळी आवाक झाला. त्याला काही समजेना. आजवर त्याच्या प्रामाणिकपणावर कोणी शंका घेतली नव्हती. त्याच्या व्यवसायाचा पायाच ‘सचोटी’ हा होता. पण मालकाला सांगणार कोण?
तो नम्रपणे हात जोडून म्हणाला “मालक, मी गरीब माणूस. माझ्याकडे सगळी मापटे, चिपटे, कोळवे, निळवे अशीच लहान वजने आहेत. शेराचे वजन नाही माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही जी एक शेर वजनाची साखर मला द्यायचा तिच तागडीत टाकून मी तुम्हाला एक शेर तुप वजन करुन द्यायचो मालक.”

(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! तुमची रंगवून रंगवून सांगण्याची शैली छान आहे.+!११११११११११
आधी ऐकली होती, पण तुमच्या शैलीत परत वाचताना मजा आली!+१११११११११११११११११११११

khupch chhan

मस्त!आवडली गोष्ट.
तुमची रंगवून रंगवून सांगण्याची शैली छान आहे+१११११
जशास तसे किंवा शेराला सव्वाशेर भेटतोच+१११११

छानच Happy

"तुम्ही जी एक शेर वजनाची साखर मला द्यायचा तिच तागडीत टाकून मी तुम्हाला एक शेर तुप वजन करुन द्यायचो...." १११११+++

Pages