"करुणा" : भाग ०१ (लग्न)

Submitted by दिपक. on 29 July, 2018 - 14:17

| दि. ११ फेब्रुवारी २०११ |
| स्थळ : यशवंतरावांच घर |

सुप्रसिद्ध लेखक व साहित्यकार यशवंतराव देशमुख आणि त्यांची पत्नी करुणा यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतरावांचे बालपणीचे मित्र दिगंबर, करुणाची धाकटी बहीण चंदा व इतर नातेवाईक व मित्रमंडळी यशवंतरावांच्या घरी जमले आहेत. यशवंतराव हॉलमधेच सजवलेल्या एका छोट्या स्टेजवर उभे राहून बोलत आहेत व सर्व मंडळी अगदी लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत आहे.)

"नमस्कार मंडळी! तुम्ही सर्व आज इथे आलात. त्याबद्दल मी तुमचे खरंच अगदी मनापासून आभार मानतो. नाहीतर कोण येतं ओ, एका ७५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला!. ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का. पण तरीही तुम्ही माझं आमंत्रण स्वीकारलंत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

हा समारंभ असा मोठ्याने साजरा करायचा निर्णय आमच्या करुणाबाईंचा आहे बरं का.. डेकोरेशन सुद्धा अगदी त्यांच्या मनाप्रमाणेच त्यांनी करुन घेतलं आहे. बरं आता तुमचा जास्त वेळ न घेता, मी मुद्याचं बोलायला सुरुवात करतो.

आज आमच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. आमच्या म्हणजे, माझ्या आणि करुणाच्या.
खरंतर ही पन्नास वर्षे करुणेसोबत कशी उलटली याचा पत्ता सुद्धा लागला नाही. काहीलोक म्हणतात.. की, वयानुसार माणूस जसा बदलतो तश्याच त्याच्या सवयी आणि त्याच्या अवडी निवडीही बदलतात. पण माझी करुणा,

बोलता बोलता यशवंतरावांचं लक्ष त्यांची पत्नी करुणाकडे गेलं. करुणाबाई तोंडाला पदर लावून एखाद्या नव्या नवरीप्रमाने लाजत त्यांचं बोलणं ऐकत होत्या. करुणाबाईकडे पाहून यशवतरावांनी काही क्षणासाठी आपल्या ओठांवर स्मितहास्य आणलं. आणि परत ते आपल्या बोलण्याकडे वळले.

पण माझी करुणा तशी नाही. गेल्या पन्नास वर्षात मी तिच्यासाठी काय काय केलं, जर याचा हिशोब केला तर कळेल. की खरंतर मी तिच्यासाठी काहीच केलं नाहीये. आणि तिने?..

तिने माझ्यासाठी इतकं केलंय की, जर मला त्याची परतफेड करावी लागली. तर अशे सात जन्म घेऊन सुद्धा मी ती पूर्ण करू शकणार नाही.

मी २२–२३ वर्षाचा असेन. जेंव्हा मी करुणेला पहिल्यांदा पाहिलं.. त्याकाळी मधुबालाचा "मुघल–ए–आझम्" नावाचा सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळा–कॉलेजातली प्रत्येक मुलगी स्वताला जणू "अनारकली" समजू लागली होती. जिकडे बघावं तिकडे मुली मधुबालाच्या "प्यार किया तो डरना क्या" या गाण्यामध्ये असणारा चुडीदार आणि पैंजण घालून मिरवत होत्या.

आणि तश्यात एक दिवस मी आणि माझा मित्र दिगंबर एका मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो.
आणि तिथेच मी करुणेला पहिल्यांदा पाहिलं. सुंदर गुलाबी चुडीदार घातलेली करुणा एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. आणि तिच्या केसातील तो गुलाब!.. वाह.. त्याने तर तिच्या सौंदर्याला आणखीनच भर आली होती.. कितीतरी वेळ मी तिला तसाच बघत राहिलो होतो. मीच काय, करुणेचं सौदर्य पाहून कोणताही पुरुषाचं एकदा तरी तिच्या मोहात पडल्यावाचून राहणं शक्यच नव्हतं.

मला काहि केल्या करुणेच्या जवळ जायचं होतं. दुसऱ्यादिवशी मी लगेच माझ्या कामाला लागलो. लग्नात आलेल्या माझ्या ओळखीच्या सगळ्या मित्र मैत्रिणीकडून चौकशी केली आणि तिचं नाव आणि पत्ता मिळविला. आणि काही दिवसांतच आमची खूप चांगली ओळख झाली. इतकी की तिला कॉलेजला सोडायला आणि परत आणायला मी तिच्यासोबत जाऊ लागलो. करुणे सोबत वेळ कधी जायचा याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मी तिच्या प्रेमात पडलो होतो.
करुणाही मला आता खूप चांगल्याने ओळखू लागली होती. मी तिला माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं. अन् तिनेही स्वताबद्दल काहीच लपवलं नव्हतं.

मी बोलायला लागलो की करुणा एका अधाशाप्रमाने माझ्याकडे बघत राहायची. हळू हळू तीचंही माझ्यावर प्रेम जडू लागलं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती असं नव्हतं. सगळं काही माहीत असूनही मी गप्प होतो. अन् एक दिवस करुणेनेच पुढाकार घेतला. मी नेहमीप्रमाणे तिच्या घराजवळील बागेत तिची वाट बघत बसलो होतो थोड्याच वेळात करुणा तिथे आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली –

"आपण अजून किती दिवस अस लपून भेटायचं यश?.."
"अगं करुणा, मलाही तुझं म्हणणं पटतंय. पण तुला तर माहीतच आहे परिस्थिती काय आहे ते.."
"होय रे.. पण मी फक्त तुला एकदा त्यांच्याशी भेटायला सांगतेय.. आणि तसंही जर त्यांना बाहेरून आपल्याबद्दल कळालं तर परिस्थिती आणखीनच बिघडेल.."
"अगं पण.."
"अरे तू घाबरु नकोस.. माझे बाबा खूप चांगले आहेत.. आणि मीही असेन की तिथे.."
"अगं ते ठीक आहे.. पण त्यांनी माझ्या व्यवसायाबद्दल विचारलं तर..?"
"जे खरं आहे ते सांगून टाक.."
"खरं सांगितल्यावर ते मला जावई म्हणून स्वीकारतील..?"
"ते बघू पुढच्या पुढे.. आधीच खूप टेन्शन आहे. त्यात आणखी भर नको.. आता मी सांगते तसं कर.."
"हा.."
"आज मी घरी जाऊन तुझ्याबद्दल बाबांना सांगते.. तू उद्या त्यांना भेटायला येणार आहेस हेही सांगते.. फक्त तू न चुकता उद्या संध्याकाळी माझ्या घरी ये म्हणजे झालं.."
"ह्म्म्म.."

मी घरी येणार या विचाराने करुणा खूप आनंदात होती. सांगितल्या प्रमाणे करुणेने तिच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनी मला घरी बोलावलं. सगळं काही इतक्या वेगाने घडत होतं की पुढे काय होईल याचा विचार करून मी खूप घाबरलो होतो. करुणेच्या घरी तिचे बाबा जणू माझीच वाट बघत बसले होते. मी आत गेलो. करुणा त्यांच्या शेजारी बसली होती. मला बघून ती लगेच उभी राहिली.

"या.. या.. देशमुख साहेब, बसा.. पार्वती
तीन कप चहा पाठवून दे.."
थोड्याच वेळात एक बाई चहा घेऊन आली. ती बहुतेक करुणाची आई असावी. मला बघून करुणेचे बाबा काही जास्त खुश नव्हते हे माझ्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही. ताटातील चहाचा कप उचलत ते म्हणाले –

"आमची करुणा फार कौतुक असते तुमचं.. तिच्याकडून फार ऐकलंय तुमच्या बद्दल.. पण माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट तिने मला सांगण्यात टाळाटाळ केली. मग मीही म्हटलं सरळ तुम्हालाच विचारलेलं बरं.."
"हो काका.. विचारा ना.."
"तुमच्या व्यवसायाबद्दल करुणा मला काहीच बोलली नाही.. तुम्ही कोणता व्यवसाय करता हे जर मला कळलं तर माझीही खात्री होईल.."
मला ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं. माझ्याकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. आपला होणारा जावई बेरोजगार आहे असं जेव्हां बाबांना कळेल तेव्हां त्यांची जी प्रतिक्रिया असेल याचा विचार करून मी आधीच खूप घाबरलो होतो. पण ती वेळ घाबरण्याची नव्हती. करुणा फक्त माझ्यासाठी इतकं मोठं पाऊल उचलायला तयार झाली होती. काही केल्या मी तिला निराश करू शकत नव्हतो. मी एक मोठा श्वास घेतला.. आणि एका दमात करुणेच्या बाबांना सगळं सांगून टाकलं..

"बाबा, मी सध्या बेरोजगार आहे.. पण याचा अर्थ असा नाही की मला कधी नोकरी मिळाली नाही. ग्रॅज्युएशन नंतर माझ्या नोकरीसाठी माझ्या बाबांनी खूप खटपट केली. पण माझं मन कुठेही स्थायी होत नव्हतं.. मला कथालेखन करण्याचं वेड लागलं होतं. अजूनही आहे.. पण माझ्या बाबांना ते पटलं नाही. एम.ए. करूनही जर मुलगा बेरोजगारा प्रमाणे हिंडत असेल तर कोणत्याही बापाच्या काळजाचं पाणी होईल. तसच त्यांचही झालं.. म्हणून मी नोकरी लागल्याचा बहाना करून इथे पुण्याला आलो. पण पुण्याला येण्याचं मूळ कारण निराळंच आहे.. मी एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याच्या छपाईसाठीच मी इथे आलो आहे.. पण त्याच्या छपाई आणि जाहिरातीसाठी लागणारा खर्च सध्या मला झेपण्या पलिकडचा आहे.. इथे रुक्मिणी नगर मधे माझी एक खोली आहे जिथे मी भाड्याने राहतो. सध्या एका वृत्तपत्रात मी छोटे मोठे लेख लिहितो. आणि जे थोडेफार पैसे मिळतात त्यातून माझ्या खोलीचं भाडं व माझ्या जेवणाचा खर्च निघतो.."

माझं बोलणं ऐकून करुणेच्या बाबांनी आपल्या डोक्याला हात लावला. काहीवेळ ते माझ्याकडे त्याच मुद्रेत बघत राहिले. अन् शेवटी ते हसले आणि म्हणाले –
"आणि इतकं सगळं होऊनही तुला वाटतं की मी तुझ्यासारख्या बेरोजगार युवकाला माझी मुलगी देईन?.."
"हो बाबा.., कारण मी बेरोजगार जरी असलो ना.. तरी मी तुमच्या मुलीशी खरं प्रेम करतोय.. आणि प्रेमात किती ताकद असते ते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये.. ते एखाद्याला
घडवूही शकतं.. आणि बिघडवू ही शकतं.. आणि माझ्या आयुष्यात आणखीन बिघडण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये..

माझा प्रत्येक शब्द ते अगदी लक्ष पूर्वक ऐकत होते.. आणि जेव्हा माझं बोलून झालं.. त्यांनी करुणेकडे कौतुकास्पद नजरेनं बघितलं.. आणि ते म्हणाले –

"कुठून शोधलंस गं याला!.."

बाबांचे ते शब्द ऐकून करुणा आनंदाने अगदी कावरी बावरी झाली. तिने तिच्या बाबांना एक घट्ट मिठी घातली. आणि माझ्याकडे जेव्हां तिने प्रेमळ नजरेनं बघितलं.. तेव्हां तिच्या चेहऱ्यावरील समाधान मला स्पष्टपणे जाणवत होतं.

करुणेचं आणि माझं लग्न झालं. आणि माझं पुस्तक छापण्यासाठीही तिच्या बाबांनी मदत केली. माझं पुस्तक प्रकाशित झालं.. पण म्हणतात ना,

"सुख येताना सोबत दुःखाचीही लहर घेऊन येतं.."

To be continued...

Group content visibility: 
Public - accessible to all site users