काला रे... सैंय्या काला रे...

Submitted by मुग्धमानसी on 25 July, 2018 - 03:49

काला रे... सैंय्या काला रे...
तन काला रे... मन काला रे...
काली जबां की काली गारी..
काले दिन की काली शामें
सैंय्या करते जी कोल बजारी....

जे जे काही वाईट आहे, चुकीचं आहे, अनैतिक, असंस्कृत, घाण वगैरे वगैरे आहे... ते त्याज्य आहे. जे जे काही नकारात्मक आहे त्याचा त्याग करावा. ज्या ज्या कारणांनी, कृतींनी, विचारांनी, आचारांनी, संगतीनी, उच्चारांनी आपण नकारात्मकतेकडे झुकतो त्या सगळ्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण सदैव सकारात्मक आचार विचारांनी वेढलेलं असावं. सकारात्मक लोकांच्या संगतीत रहावं.... हे सगळं आपल्या सगळ्यांच्याच कानांवर हजारदा वारंवार वेगवेगळ्या माध्यमांतून पडत राहून फार गुळगुळीत झालेलं आहे. ’सकारात्मकता’ किंवा possitivity ही एक फॅशन झालीये. आपल्या चहूबाजूंनी सगळ्या माध्यमांतून आपल्यावर ही सकारात्मकता नेम धरून फेकली जातेय. ही अशी ओढून ताणून आणलेली सकारात्मकता नैसर्गिक नाही... साहजिक नाही... हा विचार कुणी करत नाही... कारण हाही एक नकारात्मक विचारच झाला नै का?

एका motivational speaker चे भाषण ऐकून आल्यावर मी प्रचंड नैराश्यात गेले होते. माझ्यासोबतचे सगळे प्रचंड भारावलेले, उर्जेने ओसंडून वाहत होते. मी गप्प होते. अशी अजून काही भाषणे ऐकली आणि लक्षात आलं की no one can motivate a person who has accepted his/ her depression as his/ her stregnth! हे मला नीट उलगडून मांडता आलं नाही कधीच. नकारात्मकता ही काही वस्तू नाही जी उपभोगता यावी किंवा त्यागता यावी. ती आपल्या अंगभूत आहे. आपल्या जगण्याची ती पार्श्वभूमी आहे. तो पाया आहे. तो canvas आहे. ते काळे कुट्ट अंतराळ आहे ज्यात रंगांची निर्मिती करणारे लाखो सूर्य निव्वळ छोटे तारे बनून अधांतरी तरंगत असतात.

समस्या अशी आहे की आपल्याला वाटतं आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला वाटतं की साधे सुधे दोन गट आहेत ज्यात आपण आपले असणे नसणे विभागू शकतो आणि मग त्यातल्या एका गटाची निवड केली की जगण्याचे सगळे प्रश्न मिटून जातील. हे काही एवढं सोपं असतं का? नसतं हेही माहीतच असतं आपल्यापैकी प्रत्येकाला.... पण सोप्याचा हव्यास आपल्याला जास्त विचार करण्यापासून अगदी सहज रोखतो. आपल्याला सगळं असं सोपं करून सांगणारं कुणी भेटलं की मग कामच झालं. वाईट काय? चांगलं काय? सकारात्मक काय? नकारात्मक काय? त्यांनी आखून दिलेले दोन रेडीमेड गट पाहून पाठ केले की मिटला प्रश्न! आपण कशाला कष्ट घ्यायचे?

हे सकारात्मक- नकारात्मक असं नसतं काही. ज्याला वाईट म्हटलं जातं त्याचा त्याग करणं शक्य नाही. त्यागाच्या नावाखाली ते नाकारलं जातं फक्त! त्याचा अस्वीकार केला जातो. We just disown it! Because nothing else we can do with it. आणि हा एका वेगळ्याच विचित्र पातळीवरचा मनोविकार आहे.

काळं! या सगळ्या वाईटाला, नकारात्मकतेला वगैरे वेचून वेचून एकत्र ठेवून त्या ढिगार्‍याला एखादा रंग द्या असं सांगितलं तर मनात साहजिकच येईल तो काळा! पण या काळ्याइतकं आजवर कुणीही आपल्याला व्यापूनही उरलेलं नाही.
आपण काळेच असतो. आपली दैवते काळी असतात. आपले आदर्श काळे असतात. आपले अत्यंत प्रामाणिक विचार सुद्धा काळेच असतात. आपलं मन, आपलं तन, आपली भाषा सारं खरोखर काळं असतं! आपल्याला उर्जा पुरवणारे दिवस आणि अंत:स्थ अस्वस्थ करणार्‍या कातरवेळा काळ्या असतात. आणि हे सारं आपल्याला फक्त अमान्य करायचं असतं! बाजारातलं उत्कृष्ठ Fairness cream वापरायचं फक्त! तेवढं केलं की आयुष्य एकदम सेटल! कित्ती सोप्पं... हो की नै?

पण ना... फक्त सुरुवात होते. या काळ्यानं या सगळ्या विचारांची फक्त सुरुवात होते. ’रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वं माय...’ अश्या एखाद्याच कवितेनं हा काळा मनात ठाण मांडून बसतो. काळ्या रात्रीला भिऊन आपल्या लेकीला (गोपिकेला) एकटीला पाण्याला जाऊ न देणारी माय तिच्या सोबतीला तिच्या रक्षणासाठी जो गडी देते... तोही काळाच (श्रीकृष्ण)!
काळा तारण किंवा मारण करत नाही. तो रक्षण करत नाही आणि घातही करत नाही. तो फक्त असतो! आणि त्याचा पूर्ण स्वीकार केल्याशिवाय त्यात सामावलेल्या रंगांची अनुभूती घेता येत नाही हे आणि हेच एकमेव सत्य आहे!

हे सगळं पुन्हा एकदा अगदी स्पष्ट आणि कुठल्याही संदिग्धतेशिवाय सांगणारं आणखिन एक काव्य सामोरं आलं! ’गॅग्ज ऑफ वासेपूर-२’ मधलं ’काला रे.. सैय्या काला रे...’ हे गाणं! माझ्या मनातलं सारं काळं हे असं अस्खलित सामोरं आणणारं आजवर असं काही भेटलेलं नव्हतं. हा सगळा चित्रपटच काळ्यानं माखलेला आहे. एक भव्य प्रचंड व्यापक काळा. माझा काळा. तुमचाही काळा. तुम्ही कदाचित अमान्य केलेला काळा.
आपण नक्की कश्याच्या प्रेमात पडतो हे मान्य करण्याचं धाडस असतं आपल्यात? ’प्रेम’...! गुलाबी वगैरे च्याही आधी भक्क काळं असतं हे! हे असं समजू शकतं का आपल्याला? ”एखाद्याला तो जसा आहे तसा स्वीकारणं - म्हणजे प्रेम!" - हे असं काहीतरी ऐकलंय ना? जसा तो/ती आहे तसा/तशी!!! त्याच्यातली negativity.... नकारात्मकता... काळं! शुभ्र काळं! सैंया काला रे.....

या काळ्याशार दिवसांचं, त्यांच्या काळ्याभोर प्रहरांचं आणि त्याहूनही भक्क काळ्या आपल्या कर्मांचं अपल्यालाच ज्ञान होणं यापरता कुठला साक्षात्कार असेल असं मला वाटत नाही! कोळशाचा व्यापार! काळाशार! आपली कृती, कर्म, क्रिया.
पिया करते जी कोल (coal) बजारी....!!!

हे काळं आपल्याला गिळंकृत करेल अश्या भितीपायी आपण मिणमिणत्या दिव्यांना शरण जातो. दिवे ही शक्ती आहेत... पण ते शाश्वत नाहीत. अंधार शाश्वत आहे! पण तो तर शत्रू आहे... नै का? तो आपलं असणं गिळंकृत करतो. आपलं घर.. अंगण... आपली मालमत्ता! आपली मालमत्ता.... आपल्या जगण्याला एक दृश्य आकार देणारी! असा आकार जो उजेडाचा अर्थ असतो पण काळ्याशार अंधारात तो निव्वळ व्यर्थ असतो!

सैंया करते जी कोल बजारी.....

काली मिट्टी कुत्ता काला
काला बिल्कूल सुरमे वाला
काला कौवा हौव्वा काला
काला बादल घिरने वाला
काला मोती गिरने वाला
काला झंडा डंडा काला
काला बटुवा पैसा काला
काली आंखो जैसा काला
काली अग्नी...
काली गर्मी सुरज काला
काला बीघा और गज काला
काला हाथी हाथी काला काला....

काळं आहे की नाही सारं? ज्यातून आपण उगवलो ती वासना.... जो आपलं रक्षण करतो तो मोह!
भुकेच्या अतृप्त संतापात आपल्या पोटात ओरडणारे, लोभाच्या क्षणांची ओढ लावून आपल्या दारी केकाटणारे आणि पुन्हा न गवसणार्‍या वाटेवर पुढे गेलेल्यांना चोचभर घासाची माया दाखवणारे सारे कावळेच! काळेभोर!
आपल्या मनातली भितीची सारी भुतं काळी! दाटून येणारं मळभ काळं! दु:खात, संतापात, भावनेच्या कुठल्याही टोकाच्या अनुभूतीत डोळ्यांतून कोसळणारा थेंबही काळाच! आपल्या सार्‍या श्रद्धा काळ्या. त्यांना तोलून धरलेल्या आपल्या समजूतीही काळ्या!!!
काळंशार सारं! काजळासारखं!

दिवा आहे. असतो.
तो अंधाराला दूर सारतो. तो जागा निर्माण करतो. स्वत:साठी!
तो अंधाराला नष्ट करत नाही. अंधार मोठ्या मनानं त्याला स्वत:तली थोडी जागा देतो.
त्या उजेडाच्या उबदार सावलीत आपण आपला अर्थ शोधतो. तो अर्थ बर्‍याचदा ’अर्था’त अर्थात पैश्यांत सापडतो. गुंठ्यांत आणि एकरांत मोजता येतो. त्या पैशाला आणि मालमत्तेलाही आपण रंग देतो. जो उजेडात सापडला तो पांढरा.... जो अंधारात कमावला तो काळा.... किंवा उलट?
अंधारात चाचपावं असा तो काळाशार हत्ती! हताशपणे निव्वळ स्पर्शाच्या अनुभूतीनं आपल्याला हवं ते गवसल्याच्या भासात आनंदून जावं... किंवा होरपळून संपून जावं! Choice is still yours???

बैरी कोल कोल
छीने होल सेल तोल
रंग पानी और पिचकारी....

थोडं पाणी आहे. त्यात मिसळलेले काही रंग. आणि त्या पिचकारीच्या जोरावर आपण आपलं आयुष्य रंगित करायला जातो!
पण काळाकुट्ट अंधार खरा आणि मूळ आहे रे...... तुझ्या सगळ्या रंगांतून तो प्रकाश हिरावून घेतो. होल सेल तोल!!!

या काळ्याला टाळायचं नाही. त्याला नाकारून कुणी पूर्ण होत नाही. तो रंगांचा अभाव नाही... तो रंगांचा एकत्र प्रभाव आहे! आपल्या अंतरातल्या उजेडाचा तो बाप आहे!

- मुग्धमानसी.

गाणं ऐकण्यासाठी: https://youtu.be/1fR8u4VAcis

ता.क. - ’गॅंग्ज ऑफ वासेपूर’ या संपूर्ण चित्रपटाबद्दलच लिहिण्यासारखं फार आहे. फार म्हणजे प्रचंड! पण तेवढं काही सद्ध्या शक्य नाही. हे एक गाणं मात्र असं आहे ज्यावर लिहिल्यावाचून राहवलं नाही. गीतकार वरूण ग्रोवर ने जे शब्द लिहीले आहेत त्याला तोड नाहीच. पण त्याहूनही स्नेहा खानविलकरचं संगीत आणि तिचा आवाज! संपूर्ण गाणं एका धीरगंभीर खुसफुसत्या आवाजात कुणी कुणालातरी एखादे महत्त्वाचं गुपित सांगत असल्यासारखं गायलं गेलेलं वाटतं. त्यामुळे आपणही नकळत कान देऊन ऐकतो सारं. हा अनुभव लिहावासा वाटला म्हणून हे सारं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

+१

छान आहे विश्लेषण..
मला गँग्ज ऑफ वासेपूरचं म्युझिक आवडतच.. बरेचदा ऐकत असते हि गाणी..

वाह, जबरदस्त ! सुरेख लेखन !

<< दिवा आहे. असतो.
तो अंधाराला दूर सारतो. तो जागा निर्माण करतो. स्वत:साठी!
तो अंधाराला नष्ट करत नाही. अंधार मोठ्या मनानं त्याला स्वत:तली थोडी जागा देतो.
त्या उजेडाच्या उबदार सावलीत आपण आपला अर्थ शोधतो. तो अर्थ बर्‍याचदा ’अर्था’त अर्थात पैश्यांत सापडतो. गुंठ्यांत आणि एकरांत मोजता येतो. त्या पैशाला आणि मालमत्तेलाही आपण रंग देतो. जो उजेडात सापडला तो पांढरा.... जो अंधारात कमावला तो काळा.... किंवा उलट?
अंधारात चाचपावं असा तो काळाशार हत्ती! हताशपणे निव्वळ स्पर्शाच्या अनुभूतीनं आपल्याला हवं ते गवसल्याच्या भासात आनंदून जावं... किंवा होरपळून संपून जावं! >>

क्लासिकच !

लेख खूपच आवडला. आपल्या सगळ्यांमधेच असलेल्या काळ्या प्रवृत्तीचं उत्तम विश्लेषण.

"त्या उजेडाच्या उबदार सावलीत "
ही उपमा खुप आवडली.
उत्तम लेख!
फक्त एकच की काळा रंग हा सर्व रंगांचा अभाव असतो आता त्याला
उलट प्रकारे प्रोजेक्ट करण ही सकारात्मकता होइल. Happy

लेख खूपच आवडला. +१११
’गॅंग्ज ऑफ वासेपूर’ या संपूर्ण चित्रपटाबद्दल पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. प्लिज वेळ काढुन लिहाच.....

पण त्याहूनही स्नेहा खानविलकरचं संगीत आणि तिचा आवाज! >>> +१
मुग्धमानसी नेहमीप्रमाणे सुरेख लिहल आहे.

अत्त्युत्तम!! अद्भुत!!!---+१००

----या काळ्याला टाळायचं नाही. त्याला नाकारून कुणी पूर्ण होत नाही. तो रंगांचा अभाव नाही... तो रंगांचा एकत्र प्रभाव आहे! आपल्या अंतरातल्या उजेडाचा तो बाप आहे!---- खासच!
----------------
मग शाश्वत काय आहे? अंधार की उजेड?
अंधार अस काही नसतच...जिथे उजेड नाही ते म्हणजे अंधार. राक्षस नसतोच जगात, जिथे देव नाहीये तिथे राक्षस आहे. मग देव तर चराचारात असतो. जो तिथे च असतो तोच देव का?
उजेड आला की तितकुसा अंधार आक्रसतो म्हणजे तेच नां... आहे तो काळा शाश्वत अंधार. गर्भ, गहिरा, शांत.
------
काय काय विचार येतयेत..मनाचा गुंता..
हे आपल्या लिखाणाने झालय मुग्धमानसि!
प्रणाम_/\_