ए सेंच्युरी इज नॉट इनफ- सौरव गांगुली

Submitted by डॉ अशोक on 20 July, 2018 - 21:14

ए सेंच्युरी इज नॉट इनफ
A Century.jpg
नुकतच सौरव गांगुलीचं "ए सेंच्युरी इज नॉट इनफ " (इंग्रजी) हे पुस्तक वाचून संपवलं. प्रसार माध्यमातून प्रकाशन समारंभ, सौरवची मुलाखत, इतर सेलेब्रीटी क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया या माध्यमातून पुस्तकाची बरीच प्रसिद्धी झाली होतीच. मी ऍमेझॉनवर ऑनलाईन खरेदी करून पुस्तक मिळवून वाचलं. पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आणि प्रस्तावनेत सौरवनं हे पुस्तक तरुणांना मर्गदर्शक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याच्या जीवनात आलेल्या उतार-चढावाला (रोलर कोस्टर) त्यानं कसं धीरानं तोंड दिलं ते वाचून जीवनात संघर्ष करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल असं त्याला वाटलं आणि ती पुस्तकामागची खरी प्रेरणा आहे असं लेखकाला सुचवायचं आहे. पुस्तक वाचल्यावर ही अपेक्षा थोड्या अंशीच पूर्ण होते. पुस्तकाच्या बहुतांश भागात सौरव जणू काही त्याच्यावर खटला भरलाय आणि आता तो बचावाला उभा आहे असा फील हे पुस्तक देतं. त्याच्या आयुष्यात (त्याच्या मते) त्याला उशीरा संधी मिळाली, त्यानंतर कारण नसतांना त्याला बाहेर काढलं जाणं आणि त्यानं कम-बॅक केला ह्या व्यतिरिक्त नॅट्वेस्ट मधील विजयानंतर त्याचं लॉर्ड्स वर शर्ट काढून भिरकावणं, ग्रेग चॅपल बरोबरचा त्याचा वाद, सुरुवातीला बारावा गडी असतांना मैदानावर जाण्यास त्यानं उशीर लावणं, स्टीव्ह वॉला टॉस साठी वाट पहायला लावणं, केकेआर चा मालक शाहरूख खानशी त्याचं झालेलं तथाकथित भांडण ही काही प्रकरणं.... ह्यातील सर्व बाबतीत त्याचा सूर आपली बाजू मांडण्याचाच दिसून येतो. ग्रेग चॅपल च्या बाबतीत तर ते एक हुकूमशहा होते, अगदी सचीन-द्रविड सुद्धा त्यांना टरकून होते, बोर्ड अध्यक्ष शरद पवार सुद्धा त्यांच्या तांत्रिक निर्णया विरुद्ध जायला धजले नाहीत इत्यादी गोष्टी पुस्तकातून ध्वनीत होतात. मात्र याची सुरुवात कुठून आणि कां झाली, ग्रेग चॅपलचं म्ह्णणं काय होतं हे कळत नाही. अगदी चौकशी झाली तिथं ग्रेग काय म्हणाला हे आपल्याला कळत नाही. बारावा गडी असतांनाच्या प्रसंगाबद्दल सांगतांनाचं सौरवचं स्पष्टीकरण तर शेंबडं पोरही स्विकारणार नाही. तो म्हणतो की मी मॅच टीव्ही वर पहाण्यात इतका रंगून गेलो होतो की मैदानात जायचंय हे माझ्या लक्षातच आलं नाही. आता बाराव्या गड्याला केवळ ड्रींक्सच्या वेळेतच नाही तर त्याव्यतिरिक्त ही अनेकदा निरोप देण्यासारखी कामं करावी लागतात. ते न करता हा गडी जर टी-व्ही पहात बसला असेल तर खरं तर त्याच्य विरूद्ध कठोर कारवाईच व्हायला हवी होती. आपल्याला फारशी माहित नसलेली दोन प्रकरणं या पुस्तकात आहेत आणि ती सौरवच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस घडली आहेत. दिलीप वेंगसरकर आणि संजय मांजरेकर या दोघांनी (वेगवेगळ्या वेळेस) त्याला बोलावून तू उर्मटासारखं वागतोस, तुझी वागणूक सुधार असं म्हटल्याचं आणि ते असं कां म्हटले ते आजतागायत आपल्याला कळालं नसल्याचं सौरव म्हणतो. हे दोघेही काही तरी असल्या शिवाय असं बोलणार नाहीत हे ही तितकंच खरं. पण काहीही कारण नसतांना ह्या दोघांनी ह्याला झापलं असेल हे पटतच नाही. सौरवला आयपील मधे एकदा पहिल्या राऊंड मधे कुणीही खरेदी केलं नाही हे त्याला खूप लागलेलं दिसतंय. मात्र आयपील मधील सगळे निर्णय “आज” वर होतात, तिथं भूतकाळातील कामगिरीचा विचार होत नाही आणि त्यामुळे ब्रायन लारा सारख्या नामवंतावर कुणी बोली लावत नाही हे सौरवसारखा तेंव्हा चाळीशीच्या जवळ पोहोचलेला माणूस लक्षात घेत नाही याचं आश्चर्य वाटल्या खेरीज रहात नाही.
इतकं सगळं लिहिल्यानंतर पुस्तकातल्या काही भावलेल्या गोष्टींबद्द्ल लिहीलं पाहिजे. सौरव चांगलं बोलतो. तो स्वत: चांगलं लिहू शकला असता, पण त्यानं गौतम भट्टाचार्य सारख्या व्यावसायिकाची मदत घेतली हे छानच झालं. त्यामुळे पुस्तकातली भाषा सोपी आणि ओघवती झालीय. काही प्रसंग माहित नसलेले त्यांचं नाविन्य आहेच. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी तिथं प्रत्यक्ष जाऊन, काही दिवस राहून तिथल्या खेळपट्ट्यांची, वातावरणाची माहिती करून घेणं. याला सौरवनं “रेकी करणं” हा शब्द वापरलाय. स्टीव्ह वॉला त्याच्या ऑस्ट्रेलिअन स्लेजिंगचा डोस दिल्याचा किस्साही असंच मुळातून वाचण्या सारखा. पहिल्या टेस्ट मधलं पहिलं शतक, तेही लॉर्डस वर ! तो प्रसंग जणू सौरव आपल्याशी गूज गोष्टी करत सांगतोय इतका छान जमलाय. टोरांटो मधे भारत-पाक दुसरी सिरीज भारतानं ४-१ अशी जिंकली. सौरव त्यात “मॅन ऑफ सिरीज” राहिलेला. त्यातला थरार पुन्हा एकदा अनुभवला. ..... आणि पाकिस्तान मधे पहिल्यांदाच जिंकलेली टेस्ट सिरीज असे बरेच अनुभव-कथन सुखद अनुभव देतात.
थोडक्यात, वाचावंच असं हे पुस्तक.
डॉ. अशोक कुलकर्णी
A Century is Not Enough
By Saurav Ganguly with Gautam Bhattachary
Jagganaut Publ, Pages 263

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
क्रिकेटमध्ये आपण सर्वात मोठा फॅन दादाचाच !

मस्त!
क्रिकेटमध्ये आपण सर्वात मोठा फॅन दादाचाच ! >>>> भास्कर, तुम्ही पुस्तके सुद्दा वाचता का? Uhoh Biggrin