वांग-पावटा एक भन्नाट युती

Submitted by राजेश्री on 18 July, 2018 - 13:11

माझे खाद्यप्रयोग (६)

वांग-पावटा एक भन्नाट युती

युती करायची तर ती दोघांना सोयीस्कर अशी असली पाहिजे. एकाच अस्तित्व झाकोळायच आणि दुसऱ्याने उठावदार व्ह्यायच याला युती नाही म्हणता येणार.युती म्हणजे दोघांनाही समसमान न्याय.दोघांच्या अंगभूत गुणांना समान वाव.एकमेकांच्या अस्तित्वाचा एकमेकांना फायदा होणं म्हणजे युती.एकमेकांबरोबर राहताना एकमेकांचे पाय ओढण म्हणजे काही युती नाहीच.एकमेकांना पाठिंबा देत दोघांचीही प्रगती घडवून आणणे म्हणजे युती.मी इथे स्पष्ट करते की मी राजकारणाबद्दल नाही बोलत आहे.युती फक्त राजकारणातच होते अस थोडीच आहे युती तर दोन भाज्यांमध्येही होतेच.या युती इतक्या मजबूत असतात की kkhh मध्ये शाहरुख कसं अंजली म्हंटल्यावर शर्मा म्हणतो तस वांग असं म्हंटल की सारे पावटा अस म्हणत असतात.
वांग आपल्याबरोबर बटाट्याला कुठेही घेऊन जायला तयार असेल पण वांग्यात पावट्याला जेवढं वेटेज मिळत तेवढं वेटेज बटाट्याला नाहीच मिळत कारण बटाट्याचे स्वतःचेही एक वेटेज असतच.आणि हो सारखा बटाटा खाऊन आपलं वेटेज वाढत असत ते वेगळंच.बटाट्याचा विषय निघाला आहे तर सांगते,बटाटा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे आपण त्याचा विषय नकोच काढायला.आपण वांग पावट्याबद्दल बोलत होतो.
नुसते वांग आणि नुसता पावटा दोहोंचीही आमटी भारीच लागते. आमिर खानचा कसा एकट्याच्या जीवावर पिक्चर चालतो.आणि सलमान च्याही तसंच एकंदरीत हे प्रकरण आहे.पण वांग पावटा एकत्रित आले तर क्या बात है.वांग खरेदी करण्यापासून आपण आज या प्रकरणात लक्ष घालणार आहोत.देशी वांगी असतील तर ती चविष्ट असतात.आमच्या कृष्णाकाठाची वांगी गाभ्याने मऊ आणि गोडच असतात.वांगी काटेरी असतील तरीही ती चविष्ट असण्याची शक्यता बळावते.आमच्या इकडे काळ्या रंगाची वांगी सहसा नसतातच.आमच्याकडे गडद वांगी कलरची पण वांगी नसतात.फेन्ट वांगी कलर आणि मध्ये पांढरे पट्टे अशी,क्वचितसा हिरव्या पणाकडे झुकलेला रंग.वांग्याची आमटी आणि मसाले वांगी करायची असतील तर ती उभट आकाराची आणि जास्त कोवळी ही नाही आणि जुनं ही नाही अशीच खरेदी करावीत.मात्र वांग्याचे भरीत करायचे असेल तर मग ते जून,बी असलेले चालते. पावटा घेतानाही शेंगेवरून पावटा जास्त कोवळा की जुन आहे ते कळत.चविष्ट पावटा कोणता ही ओळखायची आहे एक खूण ती म्हणजे आतील पावट्याचे दाणे काटाला पांढरे असतात.मला पावटा सोलताना आमच्या शाळेत असलेला चिवटे या आडनावाचा मुलगा हमखास आठवतो,मी त्याला चिवट्या-पावट्या अस चिडवायचे चौथीत असताना.असो
तर वांग पावटा निवडणे ही झाली प्रयोगाची पूर्वतयारी.आता आपण प्रत्यक्षात कृती करूयात.वांगी स्वच्छ धूऊन घ्या.वांगी करताना डोळ्या पाणी दाटायचा काहीच प्रश्न नाहीये कारण वांग्यात कांदा घालत नसतात.वांगी चिरून आणि पावटा सोलून घेतला की ,गॅसवर पातेले ठेऊन त्यामध्ये तेल तापत ठेवायचे.गॅस मंदच हवा.तेल तापले का बघायला वांग्याचा छोटा तुकडा तेलात टाकायचा चर्र असा आवाज आला की तेल तापले असे समजायचे.मग एकामागोमाग एक सगळे काप तेलात सोडायचे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग त्यामध्ये पावटा टाकून वांग पावटा एकत्र हलवून भाजून घायचा.त्यावर किंचित हळद टाकली तरी चालेल भाजताना.आता मीठ,चटणी आणि शेंगदाण्याचे कूट घालून ते सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी शिजायला ओतायचे.आणि झाकण टाकून वांग पावटा शिजण्याची वाट बघायची.
या दोहोंचीही चव एकत्र मिसळून आमटी किंवा भाजीला एक वेगळीच स्वादिष्ट अशी चव येते.वांग पावटा भाकरी बरोबर खाण्यात सुख आहे तर चपाती बरोबर खाण्यात आनंद.वांग पावटा आणि भात पण भारीच लागतो.कोणतेही जास्तीचे व्याप करायला न लागता वांग पावटा लगेच तयार होत असतो.पावसाळ्याच्या दिवसात वात असलेले पेशंट टाळतात बहुदा वांगी खाणं पण वांगे पावटा हिवाळा या ऋतूत मस्तच लागतो.वांग पावटा माझी तर फारफार फेव्हरिट डिश आहे.पदार्थाची मूळ चव बिघडू न देता त्यांची मूळ चव जाणवावी म्हणून कमीत कमी मसाल्यात वांग पावटा ही डिश तयार होते.मस्त लागते.तर मग तुम्हीही करून पहा... मस्त खा..स्वस्थ्य रहा... आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०७/२०१८IMG_20180717_080854.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावटा म्हणजे वालाच्या शेंगा का?
वांग्याची आणि वालाची अशी भाजी आम्ही करतो पण वेगवेगळी. एकत्र पण छानच लागेल.
फोटो मस्त...

वांगं पावटा हे एक अफलातून समीकरण आहे कारण याच्याशी माझ्या खूप सुरेख आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हा प्रकार मी (कळू लागल्यास) पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या वडिलांच्या हातचा. ते कांदा थोडा मोठा मोठा कापून आणि टोमॅटो पण तसाच घालून करतात. अलिकडे नाही खाल्ला त्यांच्या हातचा, पण ती चव इतर कुणिही कितीही भारी केला तरी ती जाणवली नाही.

राजेश्री, तुम्ही ललित विभागामधे रेसिप्या का लिहिता ? "नविन पाककृती" हा ऑप्शन वापरून लिहाल का नेस्क्ट टाइम? तिथला फॉर्मॅट पाककृतीला साजेसा असतो, आणि नंतर शोधायला सोपे पडेल.

चटणी म्हणजे काय घालायचं?
यात फक्त वांगी पावटे <चटणी> आणि दाण्याचं कूट आहे ना? आणि अर्थात तेल, मीठ. का मी काही मिस केलं?

ललितात कृती नको +१

मस्त.यम यम.
एकदा नरसोबा वाडीला प्रसादाच्या जेवणात खाल्ली होती.

Wow मस्त रेसिपी....

माझ्या माहेरी ही भाजी 2 प्रकारे करतात....

1. कांदा आणि थोडे शेंगदाणे आणि खोबरं ( किंवा शेंगदाणे - खोबरं या दोघांपैकी एक ) घेऊन तेलावर भाजून त्याचं वाटण बनवायचं
2. तेलात अजून एक कांद्याची फोडणी भरपूर लसूण घालून करायची त्यात बटाटा, वांग, पावटे (वाल ) , हळद, मसाला, गरम मसाला घालून मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं
3. तेल कडेने सुटू लागलं की वाटण घालून पाणी घालायचं जरा आणि मीठ , साखर किंवा गूळ घालून शिजवायचं वाफेवर. कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा.

2 री पद्धत.

1. तेलात भरपूर लसूण आणि कांद्याची फोडणी करायची
2. त्यात जवळा, वांग, बटाटा, पावटे , मसाला घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं.
3. मीठ घालून वाफेवर शिजवायचं.

तांदळाच्या भाकरी बरोबर खाल्ल्याने स्वर्ग प्राप्ती नक्की च होते

फोटो न लेख /रेसिपी मस्स्त !!
तांदळाच्या भाकरी बरोबर खाल्ल्याने स्वर्ग प्राप्ती नक्की च होते>> नक्कीच ! काय अफलातून लागते हि युती ! मी जामच मिस करतेय Sad

Anjali ये इकडे... ठाणे साईड ला कधी आलीस तर हक्काने तुझ्या या माबो फ्रेंड च्या घरी ये

रेसिपीसह इतर वर्णन ललितमध्येच जातं ते बरोबर. विरार भागातली वांगे +घेवडा+ शेवगा ही रस्साभाजी ( चुलीवरची) अफलातून लागते.

मस्त लिहिलं आहे.

वांगे पावटा आम्ही करतो. शेंगा येतात त्यातले पावटे, एवढंच काय त्याबरोबर, शेंगातले तुरी दाणे, हरबरे ओले हे ही एकत्र वांग्या बरोबर छान लागतं. आमच्याकडे मात्र गोडा मसाला, गुळ, खोबरं, शेंगदाणे कुट घालून करतात. घरचा आमचा गोडा मसाला जरा तिखटसर खरपूस भाजलेला असतो.

Anjali ये इकडे... ठाणे साईड ला कधी आलीस तर हक्काने तुझ्या या माबो फ्रेंड च्या घरी ये>> नक्कीच _/\_ थँक्स Happy

kkhh मध्ये शाहरुख कसं अंजली म्हंटल्यावर शर्मा म्हणतो तस वांग असं म्हंटल की सारे पावटा अस म्हणत असतात.
>>.
लोल...मला इमाजिन झालं शाहरुख वांगे ...पावटा म्हणताना.

छान लिहिल आहे.
दिसायला सारखे असले तरी पावटा वेगळा आणि वाल वेगळा असतो.
पावटा जास्तच वातुळ असतो.
आमच्याकडे चवळी वांग फेमस आहे.

मी अनु खजूर आणि खारीक वेगवेगळे असतात.... लाल फळ सुकल्यानंतर खजूर बनतो... पिवळे फळ सुकल्यावर खारीक बनते...

पावटा कडकडीत वाळला की वाल बनतो ना? >>> आम्ही पावटेच म्हणतो कोकणात. कडधान्यं प्रकारात पांढरे दिसणारे वाल असतात त्यांना आम्ही पावटे म्हणतो आणि लालसर असतात त्यांना कडवे म्हणतो. काहीजण पावटे वाल, कडवे वाल म्हणतात.

ओल्या शेंगा असतात त्यांना आम्ही पावट्याच्या शेंगा म्हणतो, काहीजण वालाच्या शेंगा म्हणतात.

वाल आणि पावटा पूर्ण वेगल्या भाज्या आहेत.>>>>>> नाही. मी कुंडीत कडवे वाल लावले होते.त्याच्या शेंगा व त्यातील दाणे बाजारात मिळणार्‍या पावट्यासारखेच होते. वर अन्जूने म्हटल्याप्रमाणे आहे.

सुरेख दिसतेय प्लेटमधली भाजी... Happy

कसयं ना, वर कृतीत जो मसाला लिहिलाय त्याची ही कमालए...आणि तो घरच्या पद्धतीचा ऑथेंटीक मसाला इथे मिळणं अतीकठीणे; तस्सा मसाला बनवणं शक्य नक्कीच आहे पण बाकी अतीमहत्त्वाची कामं असतांना हे भाजभूज कोण करत बसेल? तस्मात फोटोवर समाधान मानणे...

>>>वर कृतीत जो मसाला लिहिलाय त्याची ही कमालए...आणि तो घरच्या पद्धतीचा ऑथेंटीक मसाला इथे मिळणं अतीकठीणे>>> मुळात इथे कुठे मसाला लिहिलाय??? मला फक्त चटणी आणि शेंगदाणे दिसले. म्हणजे काय घालायचं ते समजलं नाही.
भाजी करायची इच्छा आहे. परत विचारतो.. नीट काय घातलं ते प्लीज सांगा.

Pages