रामानुजाचार्य - प्रस्तावना.

Submitted by दासानु दास on 18 July, 2018 - 04:26

ॐ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥

रामानुजाचार्यांबद्दल काही लिहिण्यापूर्वी, सर्वप्रथम मी माझ्या गुरूंना आणि रामानुजाचार्यांना वंदन करतो. ईतक्या थोर आचार्यांबद्दल लिहिण्याची माझी लायकी तर नाहीये, परंतू तरी त्यांच्याबद्दलचा आदर लिखानातून मांडण्याचा हा माझा नम्र प्रयत्न.
कृपया ह्या संपूर्ण मालिकेत वाचकांना काहीही उणीवा आढळल्यास, निदर्शनास आणून द्याव्यात. तात्काळ त्यांत दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन.
‌------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण सर्व जाणतो की, भगवान विष्णू किंवा कृष्ण यांना तत्त्वत: जाणून घेणे, हे मनुष्य जन्माचे परम ध्येय आहे.
असे अनेक आध्यात्मिक वर्ग किंवा संस्था आहेत ज्यांच्या मते, ‘परम भगवान हे निराकार, निर्गुण आणि निर्विशेष आहेत, आणि हेच एकमात्र सत्य आहे. हे सर्व जगत मिथ्या आहे, आणि जी काही विविधता आपण या जगात पाहतो, ती खोटी आहे किंवा मायावी आहे.’ परंतू वैष्णव सिद्धांत यापेक्षा वेगळा आहे. वैष्णव सिद्धांतानुसार आपण समजतो की, ‘परम सत्य अंतत: एक व्यक्ती आहेत ज्यांना काही लोक विष्णू किंवा कृष्ण नावाने संबोधतात. आणि जे काही निराकार आहे, ते यांच्या शरिरातून प्रकट होणारं तेज आहे. हे जग जरी शाश्वत नसले, तरी हे मिथ्या किंवा खोटं मुळीच नाहीये.’

ह्या पृथ्वीवर भगवंतांनी मनुष्याच्या ऊद्धारासाठी ४ संप्रदाय बनवले. संप्रदाय म्ह्णजे, गुरू-शिष्य परंपरा. ह्या भौतिक जगाची तुलना एका अंधकारमय विहिरीशी केली जाते. ह्या विहिरीत जराही प्रकाश किंवा पाणी नाहीये. आणि सारे बद्ध जीव ह्या विहिरीत पडलेले आहेत. ह्या विहिरीतून बाहेर पडणे म्हणजेच भगवंतांच्या धामात परत जाणे हेच आपल्या जीवणाचे परम लक्ष्य आहे. आणि हे ४ संप्रदाय, असं समजा की हे ४ दोर आहेत, जे भगवंताने जीवांच्या उद्धारासाठी विहिरीत सोडलेले आहेत. या ४ दोरांपैकी कोणताही एक दोर पकडून आपण ह्या विहिरीतून बाहेर पडु शकतो, ह्या भवसागरातून मुक्त होऊन भगवंतांच्या धामात जाऊ शकतो.

हे ४ वैष्णव संप्रदाय पुढीलप्रमाणे आहेत,

1) ब्रम्ह संप्रदाय : खरं पाहता सारे संप्रदाय भगवंतांपासून सुरू होतात, ज्ञानाचा आरंभच त्यांच्यापासून होतो, वेदांतकृद्वेदविदेव चाहं (भ.गी. १५.१५). आणि त्यांनीच त्यांच्या ४ शुद्ध भक्तांना संप्रदाय सुरू करण्यासाठी शक्ती म्हणजेच ज्ञान प्रदान केले.
ह्या ४ शुद्ध भक्तांपैकी सर्वांत पहिले आहेत, सृष्टीकर्ता ब्रम्हाजी. यांच्याच संप्रदायात नारद मुनी, व्यासदेव आणि असेच अनेक महान आचार्य होऊन गेले. आणि पुढे जाऊन मध्वाचार्य, ज्यांचं मुख्य स्थान उडुपी (कर्नाटक) येथे आहे, व्यासदेवांचे शिष्य बनले. आज उडुपीमध्ये जी परपरंपरा चालू आहे, तीला ब्रम्ह-मध्व संप्रदाय नावाने ओळखले जाते.
ह्या संप्रदायात प्रामुख्याने लक्ष्मी-नारायणाची उपासना केली जाते.

2) रूद्र संप्रदाय : हा संप्रदाय शिवजींपासून सुरू होतो, म्हणून याला रूद्र संप्रदाय नवाने ओळखले जाते. शिवजींचे आराध्य-देव आहेत, संकर्षण भगवान. आणि त्यांनीच शिवजींना दिव्य ज्ञान दिले, आणि शिवजींपासून पुढे रूद्र संप्रदायाची सुरुवात झाली.
ह्याच रूद्र संप्रदायात पुढे जाऊन प्रमुख आचार्य बनले, विष्णूस्वामी. आणि अजुन पुढे जाऊन या संप्रदायात एक आचार्य आले, ज्यांना अनेक लोक ओळखतात, वल्लभाचार्य.
ह्या संप्रदायात प्रामुख्याने नाथद्वारेच्या श्रीनाथजींची म्हणजेच गोपालजींची आराधना केली जाते. गुजरात आणि राजस्थानात ह्या राज्यांत या संप्रदायाचे अनेक भक्त पहायला मिळतात.

3) कुमार संप्रदाय : ब्रम्हाजींच्या वरिष्ठ पुत्रांमध्ये चतुष्कुमार येतात. हे दिसायला फारच लहान दिसतात, निर्वस्त्र राहतात, केवळ 5 वर्षांच्या बालकांप्रमाणे. परंतू ते वयाने खूप मोठे, विद्वान आणि साक्षात्कारी आहेत. हे सुद्धा सुरुवातीला केवळ ज्ञानी होते, परंतू भगवंताच्या कृपेने वैष्णव बनले. भगवंतांनी त्यांना ज्ञान दिले आणि त्यांच्यापासून हा तिसरा संप्रदाय, कुमार संप्रदाय सुरू झाला.
पुढे जाऊन या संप्रदायाचे प्रमुख आचार्य बनले, निंबार्काचार्य.

4) श्री संप्रदाय : ह्या संप्रदायाची सुरुवात लक्ष्मीदेवींपासून होते. स्वयं भगवान नारायणांनी लक्ष्मीदेवींना ऊपदेश दिला. लक्ष्मीदेवीसुद्धा परम वैष्णवी आहेत. अनेक वैष्णव या संप्रदायात आले. दक्षिण भारतात, प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत या संप्रदायाचे भक्त पहायला मिळतात.
१००० वर्षांपूर्वीपर्यंत या संप्रदायात अनेक महान भक्त होऊन गेले, ज्यांना अलवार म्हणून संबोधले जाते, यांपैकी एक स्त्री होती, अंडाल. त्यानंतरही अनेक महान आचार्य आले, आणि या संप्रदायाचे प्रमुख आचार्य बनले, श्री रामानुजाचार्य!

श्री रामानुजाचार्य, श्री संप्रदायाचे संप्रदाय आचार्य आहेत, परंतू ते या संप्रदायाचे पहिले आचार्य नव्हते. सारे अलवार तर रामानुजाचार्यांपूर्वीच होऊन गेले. तरीही रामानुजाचार्यांचं एक विशेष स्थान आहे. मागच्याच वर्षी (२०१७) त्यांच्या प्रकटीकरणाला १००० वर्ष पूर्ण झाले.
पुढील अनेक लेखांमध्ये रामानुजाचार्यांच्या जीवनाबद्दल, चारित्र्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
अश्या महान भक्तांचे चरित्र आपणा सर्वांना अनेक प्रकारे शिकवण देऊन जाते. ह्या मालिकेत मलाही अनेक गुण आत्मसात करता येतील अशी अपेक्षा करतो.

दासानु दास!
18 जुलै 2018, मुंबई.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढील भागाची उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद, शाली & पद्म!
लवकरच पुढील भाग सुपूर्त करण्याचा प्रयत्न करेन.......