हिरव्या (भाग २)

Submitted by कल्पेशकुमार on 15 July, 2018 - 01:31

५ वर्षापूर्वी

आसपास आढळून येणाऱ्या सर्व पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून त्यांच्या उंच उंच झाडांवरील घरटी हुड़कुन त्यातील अंडी गोळा करण्यात किसन्याचा हात अक्ख्या मेर्वीत कोण धरु शकला नसता. अंगाने थोराड पण नुकतंच मिसरुड फुटलेले हे पोर अनेक करतबी दाखवण्यात माहिर होते. अनेकजणांचा असाही एक समज होता की किसन्याची नजर भूल पाडते, समोरच्या जनावराला नुसत्या इशाऱ्यावर वश करते. जेव्हा गेल्या महिन्यात पुनमेच्या रातीला शंकऱ्याच्या खोपट्यात घुसलेल्या बिबट्याला ह्याने कसल्याही हत्याराशिवाय हुसकावत जंगलाकडं धाडलं तेव्हापासून किसन्याचं वशीकरण म्हणजे नुसत्या भाकड़कथा नसाव्यात ह्याची सर्वाना खात्री पटली. निरनिराळ्या छोट्या प्राण्यांसाठीच्या फासक्या बनवण्यात महादुच्या ह्या थोरल्या पोराने जणु महारथ प्राप्त केलं होतं.

त्याकामासाठी लागणाऱ्या ठराविक सामग्रीसाठी जंगल तुडवत असताना म्हसोबाच्या डोंगरापलीकडल्या निलाईच्या घळीत आज एक अफलातून चीज त्याला दिसली. एका अंगाला जरा निमुळत्या होत गेलेल्या काठीसारखा वाटणाऱ्या त्या दांडक्यातून मुठीकडे जरा आपटता शरीराची नस अन् नस हादरवून सोडणारा आणि हाडं पार खिळखिळी करून टाकणारा जोरदार झटका बसत होता. तीर कमठा अन् भाले बर्चीच्या संगतीत लहानपण घालवलेल्या किसन्याला त्याच्या आजाची एक ठासनीची बंदूक तेवढी वापरायची माहिती होती आणि बंदुकीच्या दारुसाठी शहरी भागात फिरत असताना त्याने दुकानातून अनेक प्रकारच्या भारी भारी बंदुकासुद्धा पाहिलेल्या होत्या. मात्र आता समोर पडलेले हत्यार काही औरच आहे ह्याची त्याला खात्री पटली तरी ते शिकारीला कितपत उपयोगी पडेल ह्याबाबत त्याच्या मनात जरा शंकाच होती. म्हणून त्याने परत एकदा ती काठी झाडून पाहिली तर यावेळी कसलाच झटका जाणवला नाही. अश्या दगाबाज हत्यारांचा काय उपयोग म्हणून रागाने त्याने ती काठी समोरच्या झाडाच्या ढोलीत फेकून दिली. खरं तर त्याला उत्सुकता होती की हिला ना बंदुकीसारखा चाप दिसत, ना काडतुस भरायची काही जागा; तरी हिच्या वाराने समोरचा गारद होईल एवढी ताकत त्या झटक्याने मिळत होती. पण कशी ? हे मात्र त्याच्या समजण्यापलीकडे होते. जे काय असेल ते नंतर सवडीने बघू ह्या बेताने ती दुसऱ्या कोणाच्या नजरेत येवू नये म्हणून किसन्याने तिला ढोलीत लपवले होते.

आजच्या दिवसाचे काम संध्याकाळच्या आत निपटणे त्याला जास्त महत्वाचे होते. त्या कामासाठी हवे असलेले पाथरीचे दगड ह्या निलाईच्या घळीत मुबलक असतात म्हणून आज तो मुद्दाम एवढ्या लांब आला होता. रानातल्या सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावर गेल्या दोन रात्री त्याने एक वेगळीच हालचाल अंधुकशी पाहिली होती. आजवर असला प्राणी कधी पाहिलेला नसल्याने त्याला त्याचा आवाज काढता येणे शक्य नव्हते अन् म्हणूनच काहीही झालं तरी त्याला ते जनावर जित्ते पकडायचे होते. आणि त्यासाठी किसन्याला एक ख़ास फासकी बनवायाची होती जी पाण्यात सुद्धा नीट काम करु शकेल. त्याच्या आयुष्यातला हां वेगळाच अनुभव होता, कारण अर्धवट पाण्यातल्या फासकीसाठी कशी जोडणी करावी हे आतापर्यन्त त्याच्या वाडीत कोणी केलेच नव्हते अन् त्याची गरजही कधी लागली नव्हती. म्हणूनच उत्तमातली सामग्री गोळा करत त्याचा नवीन प्रयोग पूरा पाडण्यासाठी सकाळपासून जंग जंग पछाड़त तो इथवर आलेला.

समोरचं आंबट गोड फळांनी लगडलेलं झाड़ त्याला आधी भूक भागवण्यासाठी खुणावत होतं. तरी त्याकडे दुर्लक्ष करून किसन्याने कमरेवर खोचलेले दुधारी पाते काढत समोरच्या गुहेत उडी घेतली.

क्रमशः

― कल्पेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users