समतेची वारी पंढरीच्या द्वारी
कटेवरी हात ठेवून युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने मजल-दरमजल अशी वाटचाल करीत आहे. 'सकळासी येथे आहे अधिकार' म्हणत वारकऱयांचा अठरापगड जातीत विखुरलेला समाज विठ्ठलभक्तीच्या उदात्त अशा स्नेहधर्माने शेकडो मैलाचे अंतर कापून चंद्रभागेच्या वाळवंटी जमा होतो. ईश्वरनिष्ठाच्या मांदीयाळीच् असे अनोखे रूप जगात कोठेही पहावयास मिळत नाही 'माझ्या जीविचि आवडी | पंढरपुरा नेइन गुढी ||' ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत आहेत. उन्हाची काहिली सरली आणि पावसाच्या सरी कोसळल्या की, वारकऱ्याला पंढरीच्या वारीचे वेध लागतात. शेगावतुन गजानन माउली, खान्देशातून मुक्ताई, देहूतून तुकोबा, आळंदीतून माऊली निघाली की, अवघा महाराष्ट्र तनाने नाही तर किमान मनाने तरी पंढरीच्या वारीमध्ये चालू लागतो. कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीची माळ, मुखात अखंड रामकृष्णहरी नामाचा जप व टाळ, मृदुंग, चिपल्याच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत, लाखो वैष्णव जणांचा हा मेळा अतिशय भक्तीने आणि शिस्तीने विठूरायाच्या भेटीकरिता मार्गक्रमण करतो.
पंढरपूरच्या या वारीचे वारकरी होण्यासाठी फार काही सायास करावे लागत नाहीत. त्यासाठी अमूकच प्रकारचे कपडे परिधान करावेत असा आग्रह नाही. कोणताही विधी नाही, अभंग गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असण्याची सक्ती नाही. गाणाऱ्याच्या मागे म्हटलं तरी पुरे. टाळ वाजवणंही फार सोपं आहे. 'वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ। त्याच्या गळा माळ, असो नसो।। कोणाचं वाईट करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांचं भलं व्हावं अशी इच्छा मनात असणारा माणूस खरा माळकरीच समजावा, असं हे मानवतेचं तत्वज्ञान, आणि वारकऱ्याचं क्वालिफिकेशनच तुकोबारायांनी सांगून ठेवलं आहे. अशा भोळ्या भाबड्या भक्ताचं गुज जाणून घेणारा वारकऱ्यांचा देवही त्यांच्यांप्रमाणेच साधाभोळा आहे. 'हा देव केवळ निर्मळ, भोळा भक्तीभाव पाहतो बरं. उंच नींच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनिया।। असं त्याच वर्णन संतांनी करून ठेवलं आहे. या देवाकडे कुठलाही भेदाभेद नाही. पंढरपूरची दारे सर्वांसाठी नेहमी उघडी असताता. जसा हा देव भेदाभेद मानत नाही तसाच त्याचा भक्तही कोणताच भेदाभेद पाळत नाही. 'यातायाती धर्म नाही विष्णुदासा।', 'येथ भक्ती प्रमाण। जाती अप्रमाण॥', 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।' असे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान उदात्त व विश्वात्मक आहे. तेथे जाती,वर्ण, धर्म, प्रांत, भाषा या क्षुद्र भेदाभेदांना कुठलेच स्थान नाही. याठिकाणी उच- निचतेच्या, श्रेष्ठ- कनिष्ठतेच्या विचारांनाही थारा नाही.पंढरीच्या लोका, नाही अभिमान।पाया पडे जन। एकमेका।।' हे संतवचन आषाढ़ी वारीतिल सामाजिक समतेच् अधिष्ठान आहे. त्यामुळेच तर आज संपूर्ण देशाच तीर्थ आणि क्षेत्र 'विठ्ठल' झालं आहे.
वारी हे व्रत आहे, वारी ही उपासना आहे तसेच वारी म्हणजे वारकरी संप्रादायाचा आचारधर्म आहे. पंढरपुरकडे वाटचाल करत असताना रस्त्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड़, गौळणी आदी माध्यमातून वारकरी आपलं आणि समाजाचं प्रबोधन करत पुढे जातात. पालखी मार्गात पार पड़नारा रिंगण सोहळा सर्वांचे लक्ष्य वेधुन घेतो. उभं आणि गोल असे या रिंगणाचे प्रकार, रिंगनाच्या मधोमध टाळकरी आणि मृदुंगवाले उभे राहतात. दिंडीतील अश्व हे रिंगण पूर्ण करतात. हा अनुपम्य सोहळा वारकरी याच डोळा याच देही अनुभवतात. जस जस पंढरपुर जवळ येवू लागत, तस तशी सर्वानाच् ओढ़ लागते ती विठूरायांच्यादर्शनाची..'पंढरपुरच्या शिवेवरी कळस देखिला आपोआप | त्यामधे माझा मायबाप..||' या धारनेने वारकरी कळसाच्या दर्शनानेही तृप्त होतात. आषाढ़ी निमित्त पंढरीत मोठी यात्रा भरते. वारकरी सांप्रदाय भक्तिमार्गाला जास्त महत्व देत असल्याने पूजा विधी यापेक्षा भजन कीर्तन आणि प्रवचनालाच जास्त महत्व दिले जाते.' चंद्रभागे स्नान तुका म्हणे हेची दान ' या संतवचनानुसार चंद्रभागा स्नानालाही एक वेगळेच महत्व आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या घरी | आणिक न करी तीर्थव्रत || असं त्याचं वर्णन संत तुकाराम महराजांनी आपल्या अभंगातून केलयं.. ईश्वरप्राप्तीसाठी कोणतीही साधना किंव्हा तप करण्याची गरज नाही, तर केवळ वारकरी होऊन पंढरपुर गेल्यानेही इश्वराची फलश्रुति मिळते असा उपदेश महाराज करतात.
चैत्र, माघी, आषाढ़ी आणि कार्तिकी अश्या चार वाऱ्या वारकऱ्यांनी कराव्यात असा संप्रादायात संकेत आहे. परंतु आषाढ़ी आणि कार्तिकिला अधिक महत्व देण्यात येते. कारण या दिवशी खुद्द परब्रह्म् परमात्मा पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो.' आषाढ़ी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुण पांडुरंग || असं भावविभोर वर्णन संत नामदेव महाराज करतात. असा हां महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजीक आणि पारमार्थिक एकात्मतेचा महाउत्सव आज लोकोस्तव झाला आहे. बदलत्या काळानुसार वारीतही अनेक बदल घडून येत आहे. मागील काही वर्षापासून वारीचं थेट प्रेक्षेपन होऊ लागल्याने वारीही डिजिटल झाली आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातील नागरिक आणि तरुणाई सुद्धा वारीत मोठ्या संख्येने सहभागी होतात. अर्थात वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. परंतु यामुळे वारीत येणार्यांची संख्या घटत नाही तर उलट ती वाढतच आहे. कारण वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक लेण आहे. सामाजिक शुद्धीकरणाची ती एक प्रक्रिया आहे. आज बदलत्या काळात सामाजिक द्वेष वाढवणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजीक समता आणि एकात्मतेच तत्वज्ञान रुजवणारा हा वारीचा सोहळा नक्कीच उल्लेखनीय म्हणावा लागेल. या वारीच्या माध्यामातून सामाजिक एकोपा असा वाढीस लागावा हीच पंढरीच्या विठुरायाचरणी प्रार्थना..!!
'हेची व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास || पंढरीचा वारकरी | वारी चूको न दे हरी ||'