माझे खाद्यप्रयोग (३) पळणाऱ्या शेवया

Submitted by राजेश्री on 11 July, 2018 - 10:31

माझे खाद्यप्रयोग (३)
पदार्थाचे नाव:- पळणाऱ्या शेवया

शेवया....आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी जी काही खवय्येगिरी रूढ केली आहे ती ऋतुमान,वेळ,काळ ,तब्येत या बाबींचा सर्वकष विचार करूनच केली आहे. आषाढ श्रावणापासून आपल्याकडे सणवार उत्सवाचे वारे वाहू लागते.वातावरणात एक चैतन्य पसरलेलं असत आणि मग घरोघरी पाहिले तळण, दुसरे तळण, अमक्या देवाला हा अमकाच नैवेद्य कसा आवडतो घरातले खाऊचे डबे भरून ठेवले जाते.
विषय पळणाऱ्या शेवयाच्या पाककृतींचा आहे. इतकं सती सालाच्या मागे जाऊन येण्याचे प्रयोजन हे की,आधीच्या काळी शेवया हा एक शब्द उच्चारला की बायकांच्या डोक्यात शेवयासाठी विशिष्ट गहू आणणे,भिजवून वाळविणे,दळून आणणे, वलविणे,सोजी काढणे ,शेवयासाठी कणिक मळणे, घरो घरचे शेवयासाठीचे पाट गोळा करणे,पाटांची बैठकव्यवस्था तयार करणे, दारात शेवया वाळविण्याची व्यवस्था करणे,प्रत्यक्ष घोड्यावर बसणारा आणि हाती लगाम धरणाऱ्या म्हणजेच एक व्यक्ती पाटावर बसून शेवया वळणारी आणि त्या शेवया ताटात चाळणारी व्यक्ती ठरविणे. त्या शेवया अंगणात वाळविणे, त्याचा राखणदार ठरवणे मग संध्याकाळी मोठ्या गोल डब्यात त्या शेवया साठवून ठेवणे इतके सारे व्याप असायचे.बस दो मिनिट अश्या गोष्टी दुरपर्यंत नव्हत्याच ,कष्टाशिवाय पर्याय नव्हता आणि त्या कष्टाचे फळ म्हणजे अपार अस समाधान मिळायचं.एकदा का घरात शेवया करून झाल्या की,उन्हाळा सतकार्णी लागला अस वाटायचं बायकांना.शेवया केल्या की,गुढी पाडव्याच्या नैवेद्याला या नव्याच्या शेवया करून घरात शेवया खायला सुरवात व्हायची.
शेवया करायचे प्रकारही प्रत्येकाचे वेगवेगळे.गोडाच्या ,तिखटाच्या वैगेरे, आमच्या घरात लहानपणी शेवया येळवून केल्या जायच्या.अलीकडे ज्या शेवया केल्या जातात त्या साजूक तुपात भाजून ,नुसत्या दुधात शिजवायची.मला मात्र त्या शिजवून केलेल्या शेवया फार फार आवडायच्या. शेवया शिजवून घेऊन पातेल्यावर झाकण टाकून त्यातील पाणी काढून घ्यायच आणि शाईच दूध आणि साखर घालून त्या शेवया हाताने वरपायच्या. आज हे सारं आठवलं ते म्हणजे माझे खाद्यप्रयोगाचा हा तिसरा भाग. नावावरून तुम्हाला वाटलं असेल की मी काही हटके पदार्थ बनवणार आहे तर हे प्रथम ध्यानात घ्या की पदार्थाचे नाव हटके असल्यावर तो पदार्थ हटके असेलच असे नाही.ड्रेस शिवताना झालेली चूक फॅशन च्या नावावर खपवण्याचा हा प्रकार असू शकतो. तरीही हा माझा कार्यक्रम असल्याने मी माझा पदार्थ जसा घडला तसाच तुम्हाला बनवायला शिकवणार आहे.
पळणाऱ्या शेवया बनवत असताना आपल्या पोटातील कावळे भुकेने उडत असले तरी आपण चालतच गॅस जवळ यायच.मुळात आपण फक्त शेवया करणार आहोत एवढंच लक्षात ठेवायचं.पळणाऱ्या वैगेरे काय ते नंतर समजत जाते.साहित्य म्हणाल तर शेवया,साजूक तूप, साखर लागेल.ड्राय फ्रुट मध्ये मनुके घ्या असतील तर ,काजू ,बदाम आपल्या आवडीवर घालू शकता.प्रथम शेवया साजूक तुपातून भाजून घ्या.शेवया भाजता भाजता दुसरीकडे कढई ठेऊन दूध उकळत ठेवा.त्यात वेलचीची पूड टाका दूध उकळल की त्यात शेवया सोडा,मग मनुके इतर सुका मेवा क्रमाने टाका या शेवया शिजायला जास्त वेळ लागत नाहीच.शेवया मॅगी ची मोठी बहीण असल्याने ती देखील पाच मिनिटाच्या आत तयार होते. मग पळणाऱ्या शेवया कश्या तयार होणार ,तर गडबडीत दूध जास्त झालं की शेवया दुधात आधी पोहतात आणि मग शिजवून ताटात खायला घेतल्या की ताटात इकडे तिकडे पळतात.माझ्या नेमक्या अश्याच झाल्या होत्या.
शेवया खात असताना चमच्याला मध्ये मध्ये चमचेपणा करण्याची मान्यता नका देऊ,शेवया हाताने वरपुन खाण्यात जी मजा आहे ती चमच्याने खाण्यात नाहीच.ताटात खायला शेवया काढून घेतल्या की त्यावर जाडसर दुधाच्या साईचा जाडसर थर घ्यायचा त्यावर साखर पेरणी करून पाळणाऱ्या शेवयाना पकडून गट्टम करून टाकायचं.या सारख सुख नाही..सुखी असल्याशिवाय शेवया मिळत नाहीत....तर मग मस्त खा...स्वस्थ रहा.... कारण आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१०/०७/२०१८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users