हजारो बेटांचा देश... फिनलँड..भाग ३ (अ) स्टॉकहोम क्रुज ट्रिप

Submitted by निर्झरा on 11 July, 2018 - 07:17

https://www.maayboli.com/node/66689 भाग १
https://www.maayboli.com/node/66721 भाग २
क्रुज ट्रिप करायच खुप दिवसांपासुनच स्वप्न होत. भारतात असताना माहिती मिळवल्यानंतर हे काही परवडणारे नाही असे कळाले. मग हा विषय असाच स्वप्न म्हणून सोडून दिला. जेव्हा फिनलँड मधे आलो तेव्हा आम्ही रहात असलेल्या घराच्या खिडकीतून जरा लांबवर समुद्र दिसतो असे कळाले. सहज काम करत असताना त्या खिडकीतून बाहेर लक्ष गेले आणि एक मोठे जहाज त्या पाण्यावरून जाताना दिसले. मग मला काम करताना सारख बाहेर बघायचा नादच लागला. दिवसभरात किती जहाजा, बोटी या पाण्यावरून जातात हे बघत बसायच. कदाचित माझ हे जहाज प्रेम बघता आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवर्‍याने मला जहाज सहलीची अनोखी भेट दिली.
हेलसिंकी ते स्टॉकहोम असा येताना आणि जाताना दोन रात्रींचा प्रवास या जहाजावरून करायचे ठरले. त्या प्रमाणे वाईकिंगलाईन या कंपनीच्या जहाजाचे बुकिंग केले.
Cruse.JPG
हे जहाज दहा मजली होते. पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर रहाण्यासाठी केबिन होत्या. तिसरा मजला हा चारचाकी गाड्यांसाठी राखिव होता. पुन्हा चवथा, पाचवा, सहावा मजला राहण्यासाठी होता. मग सातव्या मजल्यावर रेस्टॉरंट आणी वेळ घालवण्यासाठी लहान मोठ्यांसाठी ईलेक्ट्रोनिक खेळणी होती. आठव्या, नववा आणि दहाव्या मजल्यावर डेक होता. जिथून खुले आकाश आणी समुद्राचे निळेशार स्वच्छ पाणि दिसत होते. हिवाळ्यात मात्र हे पाणि पांढरेशुभ्र असते.
जायचा दिवस उजाडला. सामानाची बांधाबांध करून आम्ही हेलसिंकी बंदरावर पोहोचलो. पहिलीच वेळ असल्याने वेळेत जाउन बसावे म्हणून आम्ही एक तासअगोदरच जाउन बसलो. चेकईन सुरू झालेले होते. आम्ही बोर्डींगपास घेऊन आमच्या गेट जवळ जाऊन बसलो. बोर्डिंगपास म्हणजे एटीएम कार्डाप्रमाणे ईलेक्ट्रॉनिक पट्टी असलेली प्रत्येकाच्या नावची कार्ड मिळतात. जर तुम्ही जेवण, नाष्टा आधिच बुक करून ठेवल असेल तर त्याचेही असेच कार्ड मिळतात. तुमच्या नावाचे कार्डच तुमची रुम की असते. या वरच तुमचा रुम नंबर असतो. जहाज सुटायची वेळ जवळ येत होती. अजुनही आत सोडण्याचे गेट उघडले गेले न्हवते. दिल्या वेळेच्या पंधरा मिनिटे उशीरा सोडण्यात आले. आम्ही जाहाजेच्या दिशेने चालू लागलो. गर्दी बरीच होती. आम्ही आत प्रवेश केला. आमची रुम शोधत त्यापाशी पोहोचलो. दरवाजा उघडला, तस समोर चार बंक बेड असलेली आणी त्यातच बाथरूमची सोय असलेली छोटीशी केबिन नजरेस पडली. आम्ही खिडकी असलेली केबिन मुद्दाम घेतली होती. सामान खोलीत टाकून आम्ही जरा वेळ तिथच बसलो. संध्याकाळचे सहा ते सकाळचे दहा असा वेळ आम्हाला ईथे घालवायचा होता.
Khidaki.JPG
मग जरा जहाजेवर फिरण्यास बाहेर पडलो. सुरूवातीला कूठून कुठे फिरतो आहोत हे लवकर कळतच न्हवते. मजल्यांवर जाण्यासाठी छोटे छोटे जिने आणी लिफ्टची सोय होती. ही सोय तीन चार ठिकाणी केलेली होती. सर्वात पहिले आम्ही सनडेक वर गेलो. (जहाजेच्या फोटोतिल दिसणारा झेंड्याकडील भाग.)

वरजाण्यासाठी असलेले जिने.
Stairs.JPG
सन्डेक हा भाग जहाजेच्या मागील बाजूस होता. ईथे काही टेबल खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. मोकळ्या आकाशाखाली खाण्या-पिण्याचा आनंद ईथे बसून अथवा कठड्याला टेकून उभे राहून तुम्ही घेऊ शकता. पावसाळी हवा असल्याने ईथे थंडगार वारा सुटला होता. आम्ही ईथेच असताना जहाजेने बंदर सोडले. तिथे उभे राहून मागे जाणारे बंदर बघताना भारी वाटत होते.

बंदर सोडताना दिसणारे हेलसिंकी..
Helsinki Bander.JPG
जहाजेच्याखालून भोवर्‍यासारखे फिरणारे पाणि पाहिले की गरगरायला व्हायचे. आता हवा जरा जास्तच गार लागू लागल्याने आम्ही परत आत आलो. लहान मुलांची खेळण्यासाठीची ठेवलेली खेळणी खेळण्यात मुलगा रमून गेला. आता त्याला कुठेही यायचे नसल्याने आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि कॅप्टनच्या डेकवर जाऊ लागलो (जहाजेचा सर्वात पुढील भाग). गार वारा अजुनही झोंबत होता. आम्ही जिना चढून वर जाऊ लागलो, तस हवेचा जोर वाढू लागला. जिना संपवून आम्ही एक पाऊल पुढे टाकले तोच प्रचंड वार्‍याच्या वेगानी आम्ही मागे ढकललो जाऊ लागलो. नवरा कसाबसा रेलिंगजवळ पोहोचला. पण मला काही केल्या जाता येईना. आमच्याप्रमाणे ईथे आजून चार जणी आनंद घ्यायला आल्या होत्या, त्याही एक दोन पाऊल पुढे जाउन परत मागे आल्या. गार वारा कानांना सपासप मारत होता. शेवटी मी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठोकाणी टायटानिक मधिल रोज आणि जॅक सारखा फोटो काढायचा राहून गेला. मग मनात विचार तरळून गेला की हे जॅक आणि रोज ईतके निवांत उभे राहून कसे काय पोज करू शकले असतील?
आम्ही पुन्हा मुलगा खेळत होता तिथे आलो. त्याचे खेळणे अजुनही चालूच होते. आमची जेवणाची दिलेली वेळ जवळ आली. आम्ही जेवण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आत पदार्थ मांडून ठेवलेले होते. ईथे देखिल आम्ही खिडकीजवळचे टेबल आधिच घेऊन ठेवलेले होते.
Table.JPG
मांडून ठेवलेले पदार्थ बघता आपल्याला उपाशी रहावे लागणार याची कल्पना आली. तिथल्या कर्मच्यार्‍याशी बोलले असता मेनू कार्ड मधुनही आम्ही जेवण मागवू शकत होते. लहान मुलांसाठी वेगळे कार्ड होते. मग त्यातून काही मागवता येते का ते पाहू लागलो. पण ईथेही निराशाच झाली. शाकाहारी म्हणवता येईल असा कुठलाच पदार्थ येथे न्हवता. त्यातल्या त्यात मुलाला फ्रेंच फ्राईज आणि चिकन हा त्याचा आवडता मेनू मिळाला. मग आम्ही फ्रेंच फ्राईज मागवू असे ठरवले. तिथल्या कर्मचार्‍याला तसे सांगीतले, पण मुलांच्या पदार्थातुन आम्ही काहीही मागवू शकत नाही असे सांगीतले. शेवटी बाकीचे पदार्थ सोडून आम्ही सरळ गोडवर आलो. तिथ छान छान केक, कुकिज ठेवलेल्या होत्या. त्यातच गोड मानून घेतले. अर्धउपाशी पोटी आम्ही तिथुन बाहेर पडलो. एव्हाना रात्रीचे नऊ वाजून गेले होते. रात्री दिड वाजता डिस्को चालू होणार होता. त्याला जायचे ठरवले होते. पण मला अचानक मळमळीचा त्रास सुरु झाला. आता हे नक्की कशान झाल हे सांगण अवघड आहे. जहाज लागल्यामुळ...., तिथल्या जेवणामुळ, की डेकवर लागलेल्या वार्‍याच्या सपक्यार्‍यामुळ, की तिथल प्यायलेल टॅप वॉटर... काहिच कळेना... मी मात्र झोपायच ठरवल. तस सगळ पोट रिकाम करून मी झोपून घेतल. नवरा आणि मुलगा थोडावेळ जहाजेवर फिरून आले. मला काही केल्या बर वाटेना.
जहाजेवर असणारे लक्षवेधी झुंबर.....
Zumbar.JPG
सकाळी जाग आली ती एका निवेदनाच्या आवाजाने. खर तर भाषा काहीच कळत न्हवती. मी खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिले. जहाज थांबलेले दिसले. पहाटेचे चारच वाजले होते, ईतक्यात कसे पोहोचलो असा मनात विचार असतानाच नवर्‍याला पण जाग आली. मग आठवले की वाटेत एक थांबा जहाज घेणार होते तेथेच ते थांबले होते. पुढच्या दहा मिनिटांतच जहाज पुन्हा प्रवासाला लागले. रात्रीच्या झोपेनंतर जरा बरे वाटत होते. सकाळी साडेसात वाजता नाष्ट्याची वेळ दिली होती. आता पुन्हा काही झोप येईना, म्हणुन खिडकीतून बाहेर बघत बसलो. सहा वाजत आले तसे आवरून नाष्त्याला जायच ठरवल. मुलाला अजुन ऊठवल न्हवत. सगळ आवरून झाल की त्याला उठवायच अस ठरवल. मग त्याला हाक मारली तर हा काही ऊठायच नाव घेईना. अजुन नाष्ट्याला जायला तसा वेळ होता. म्हणून परत एक चक्कर मारुन येऊ अस ठरवल. बाहेर चांगलाच गारठा होता. जहाजेच्या आत कडेने बसायला जागा केली होती. तिथ थोडावेळ बसलो. हळू हळू गर्दी वाढत होती. नाष्टा मिळणार होता तिथे लोक रांग लावून ऊभे राहू लागले. आता मुलाला ऊठवून आणण्यासाठी आम्ही पुन्हा खोलित गेलो. अजुनही त्याच उठायच मनात न्हवत, मग जरा आवाज चढवल्यावर उठून कसबस आवरल. या सगळ्यात पाऊणतास गेला. पुन्हा वर नाष्ट्याच्या जागी आलो तर अजुनही दार उघडले न्हवते.
ईथे मला आठवण झाली ती पुण्याची.... जर एखाद्या नाट्यप्रयोगाच्या वेळी आतप्रवेश देण्यास दार उघडायला उशीर केला तर लगेच आरडा ओरड सुरू करून त्या लोखंडी दाराला जोर जोरात हलवले जाते आणि नाईलाजाने ते दार उघडावे लागते. पण ईथे सगळे शांत होते. मलाच जाऊन दाराला धक्का द्यावे असे वाटत होते.

शेवटी एकदाचे दार उघडले. आत मधे सगळे रांगेनेच जात होते. शे - दिडशे लोक असावित. ईथे कॉर्नफ्लेक्स, ज्युस, ब्रेड- बटर असे पदार्थ खाण्यास मिळाल्याने आनंद झाला. पोटभर नाष्टा करून आम्ही पुन्हा सनडेक वर गेलो. आता जरा सुर्य वर आल्याने गारवा कमी झाला होता. बाहेर स्टॉकहोम जवळ आल्याच्या खुणा दिसु लागल्या.
Stockholm.jpg
उशीरा जहाज निघुनही बरोबर दहा वाजता आम्ही स्टॉकहोमला पोहोचलो. जहाजेला निरोप देऊन आम्ही बाहेर पडलो. घरी आखणी केल्याप्रमाणे उतरल्यावर जवळच असणारी दोन ठिकाण बघत बघत पायी हॉटेलवर जायच अस ठरल होत. परंतू माझी रात्री बिघडलेली तब्येत बघता आधी हॉटेलवर जाऊन सामान ठेवून मग बाहेर पडुयात असे ऐन वेळी ठरवले. बसने हॉटेल जवळ उतरलो. खर तर चेकईनची वेळ दुपारी दिली होती. पण आम्ही आधी रूम देता आली तर जमवा अशी विनवणी केलेली होती. आम्ही आत जाताच रुम तयार असल्याचे कळले. मग सामान तिथ टाकून थोड फ्रेश होऊन आम्ही फिरण्यास बाहेर पडलो.
ईथे फिरण्यासाठी आम्ही वाईकिंगलाईनद्वारेच हॉटेल बुकिंग, स्टॉकहोम पास आणि कुठेही चढा कुठेही ऊतरा या बसचे तिकिट सर्व काही घेऊन ठेवले होते. आम्ही या बसच्या थांब्यावर आलो. दर दहा मिनिटांनी ही बस सुटते. पुर्वी आपल्याकडे होत्या तश्या डबल डेकर अश्या या बस असतात. वरील बाजूचे छत सरकते असून पाऊस आला की ते बंद केले जाते, ईतर वेळी मात्र ते ऊघडेच असते.
Bus.JPG
बस मधे चढताच एक खोक हेडफोननी भरून ठेवलेल असत. त्यातील एक घेउन आपल्याला हव्या त्या जागेवर ( जर ती रिकामी असेल तर) जाऊन बसायच. प्रत्येक सीट जवळ हे हेडफोन लावण्यास जागा दिलेली असते. तसेच पंधरा भाषांमधे तुम्ही सांगितली जाणारी माहीती- ईतिहास ऐकू शकता. तुम्हाला कुठली भाषा हवी आहे त्याप्रमाणे त्या भाषेचा नंबर दाबून तुमची भाषा निवडू शकता. एकूण एकोणीस थांबे घेत एक तासाची फेरी ही बस मारून आणते. यात तुम्हाला जिथे उतरायचे असेल तिथे तुम्ही उतरू शकता. ते ठिकाण पाहून झाल की परत मागाहून येणार्‍या बसमधे तुम्ही चढू शकता.

सुरूवातीलाच आम्हाला रॉयल पॅलेस मधे होणारा रोजचा 'गार्ड्चेंज' हा सेरेमनी बघायला मिळाला.
Gard.jpg
रोज दुपारी या पॅलेसबाहेर तैनात असलेला गार्ड बदलला जातो. त्या वेळी पॅलेसला एक फेरी अश्या लामाजाम्या सकट मारली जाते. तिथुन आमची बस पुढे जाऊ लागली. आम्हाला ईतक्यात तरी उतरायचे न्हवते. त्या मुळे बस मधे बसूनच आम्ही ईतर ठिकाण बघत होतो. बस मधून दिसणारे स्टॉकहोम.
Stockhome.jpg
ईथे बघण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. किमान तीन दिवस स्टॉकहोम बघण्यासठी हवेत. आम्ही फक्त दिड दिवस तिथ असल्याने जास्त फिरता आले नाही. त्यात दुसर्‍या दिवशी पाऊस होता. म्हणून आम्ही त्या दिवशी बंदिस्त असणारी ठिकाण पहाण्याच ठरवल. पहिल्या दिवशी आम्ही स्कानसेन संग्रहालय बघितले. या बद्दल सांगायचे झाले तर , जुनं काळातिल स्टॉकहोम तिथ पहायला मिळत. हे संग्रहालय मोकळ्या आकाशाखाली उभ केल गेल आहे. ईथ काच कारखाना, शेतीसाठी लागणारी अवजारे बनवण्याचा कारखाना अस पहायल मिळत. तुम्हाला ईथुन खरेदीही करता येते. थोडावेळ फेरफटका मारून आम्ही निघालो. कारण पुर्ण बघायला तीन तास गेले असते. आमच्या कडे वेळ कमी होता.
स्कानसेन संग्रहालयातील काही फोटो
Skansen Garden.jpg
जुन्या पद्धतीच्या एका खेळाचा आनंद घेताना मुलगा..
Skansen Game.jpg
तिथुन आम्ही गेले मनोरंजन नगरी मधे. जिथे हृदयाचे ठोके चुकवणारी अती उंचावर नेणारी खेळणी होती. मला यात बसायची भिती वाटत असल्याने मी केवळ बघ्याची भुमिका घेतली. ईथे आमचा बराच छान वेळ गेला. संध्याकाळ झाल्याने आणि पावसाला सुरुवात झाल्याने आम्ही परत हॉटेलवर जाण्याचे ठरवले. आता प्रश्न होता तो रात्रीच्या जेवणाचा....हॉटेलचेच रेस्टॉरंट मधे जाउन बघुयात असे ठरले. बाहेरून वास तर चांगला येत होता. हे चायनिज रेस्टॉरंट होते. आत जाउन मेनू बघितला. जरा हायस वाटल. खाण्यायोग्य पदार्थ मिळाले. पोटभर खाल्ल. दमलो असल्याने रात्री लवकर झोपी गेलो.
स्टॉकहोमचे काही फोटो. जे पायी फिरत असताना काढले आहेत.Stockh.jpgStockhom fl.JPG
कारंजे
Karanje.JPG
मला आवडलेली एक गल्ली.
Ek galli.jpg
अशा प्रकारे आमचा एक दिवस संपला होता. दुसर्‍या दिवशी आम्ही भेट दिली ती वासा संग्रहालय आणि गमला स्टान. हे पुढील भागात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही भाग मस्तच Happy

हेलसिंकी ते स्टॉकहोम असा येताना आणि जाताना दोन रात्रींचा प्रवास या जहाजावरून करायचे ठरले. त्या प्रमाणे वाईकिंगलाईन या कंपनीच्या जहाजाचे बुकिंग केले.>>>>>>आम्हीपण वाईकिंगलाईननेच गेलो होतो. Happy