मज विठ्ठल दिसावा ।

Submitted by किंकर on 6 July, 2018 - 00:00

आज शुक्रवार दिनांक ६ जुलै २०१८ . आज अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्त्तीत रममाण होण्याचा पहिला दिवस. संत ज्ञानराज माउली आणि संत तुकोबा पालखी सोहळ्याचा शुभारंभ ।
'साथ चल' उपक्रमातून 'पुंडलिक भक्त्ती ' समजून घेण्याचा प्रयत्न . वृध्दाश्रमाच्या सुखसोयी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा, वृद्धाश्रमांची गरज उरणार नाही असा समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर पुंडलिक समजला असे म्हणता येईल .
'वारी ' च्या आगमनाने असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालू लागले , राजकारणात समाजकारण आणण्याचे ध्येय ठेवीत जेंव्हा सत्ताधारी या सोहळ्याकडे पाहतील तो खरा ' सोनियाचा दिनू '
विठुराया यातून तूच मार्ग दाखव !असे मनात म्हणत ,या सोहळ्याचे स्वागत करावे म्हणून विचारात असताना ,सहज सुचलेली एक रचना आपल्या समोर मांडत आहे , वारीत सहभागी होण्याचे भाग्य पांडुरंगाने लवकर द्यावे असे म्हणत, वारकऱ्यातील विठुरायाचे दर्शन घेण्याचा हा एक प्रयत्न आहे

मज विठ्ठल दिसावा ।

मागे ठेवुनी अलंकापुरी , मन धावे पंढरपुरी ।
घेता विसावा पुण्यनगरी , विठ्ठल भक्त्तीने उर भरी ।

पार होता दिवे घाट , पुढे होई सोपी वाट ।
भक्त्ती मार्गे जाता पुढे , जो तो घाली साकडे ।

दर्शनाची ओढ मनी , धाव घेई जो तो झणी ।
अश्व धावती रिंगणी ,गजर " माउली " अंगणी ।

स्नान ,आरती, गजर , दिंडी चालली सत्वर।
देहभान हरपून ,मन सेवेत तल्लीन ।

वारीचा तो जनसागर , मज भासे भवसागर ।
अंतरी त्यांच्या असावा , मज विठ्ठल दिसावा ।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults