सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)

Submitted by रसप on 3 July, 2018 - 01:54

लिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे.

संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.
पण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात ?
कारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे! ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे!

'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल.
अर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.

121860.jpg

मात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.'
वाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे.

'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे.

प्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.

अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा !

थोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही.
असं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/07/movie-review-sanju.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही.<<<
कसं येणार? इतके गुन्हे असताना तो निश्षाप दाखवणं विनोदी झालं असतं आणि हिराणी संजय-भक्त असल्याने, संजय गुन्हेगारच होता हे ठळकपणे दाखवणे कठिण , त्यामुळे मधली पळवाट काढली. चीत भी मेरी, पट भी मेरी. शेवटी अट्टल व्यावसायिक पणाचे लक्षण आहे हे.

फायनली धागा आला
कधीपासून वाट बघत होते.
एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.>>> ++111

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.>>+१,००,००१

Perfect review Ranjit. +1 for each word. I was really impressed with Paresh Rawal's acting. I was not expecting that.

एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
mhaNje Ranbir chhan waaTalaa asach mhanayach aahe na?
to nit waatala asel tar movie baghayacha wichar aahe

रणजित, उत्तम परिक्षण. मी पण तुझ्या धाग्याची वाट पहात होते.
अनेक जण या चित्रपटाबद्दल (वाईट) लिहायला टपलेत असं वाटलं होतं , पण आता बर्‍याच जणांकडून चांगलं ऐकायला मिळतं आहे या चित्रपटाबद्दल. तु पण एकदम समतोल लिहिलं आहेस. बघण्याचा विचार करीन.
खरंतर संजू सारख्या माणसावर चित्रपट बनवणं आणि तो प्रदर्शित करणं फार मोठं धाडसाचं काम आहे.
(उलट सुलट प्रतिक्रिया येणार हे गृहित धरून)
चित्रपटाच्या टिम चं अभिनंदन.

थिएटरला सिनेमा बघणार नाहीये,
टिव्हीवर लागला तर पाहिन कदाचित! रणबीर अजिबात आवडत नाही

नो कमेण्ट्स >> हे पण लिहून दाखवाव वाटलं Biggrin

हलके घ्या Light 1

त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा>>>
तुम्ही खरच भोळे आहात कि आव आणलाय तसा...

>>ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे.

ओह! मग उरलं काय...?

थोड्क्यात हिरानी साहेबांनी (पुन्हा एकदा) सर्व वैयक्तीक व वयावसायिक समीकरणे व्यवस्थित संभाळून एक चांगली चित्र निर्मिती केलेली दिसते.. पण मग नाव संजू कशाला दिलं? थोडक्यात अणबीर च्या अभिनया साठी पहाणे योग्य ठरेल.

असो. बाकी मिडीया वर या निमित्ताने अनेक मेसेजेस फिरत आहेतच.. गदिमांच्या कवितेपासून ते संस्कार रक्षकांच्या अपिल पर्यंत!

मी खर्‍या संजुच्या जीवनातली स्थित्यंतरे प्रत्यक्ष वाचलेली बघितलेली आहेत. आईचा मृत्यू रॉकीची गाणी तेव्हाच ऐकले ली. आ देखे जरा अजूनही आव डते खूपच. क्या यही प्यार है. पण छान आहे टीना अगदी बाहुली दिसत असे पण जेव्हा बातों बातों में मध्ये आली तेव्हा जास्त आव् डली. पुढे जाउन कोर्ट केसेस, अजून एक लग्न जे व्हॅलेंटाइन्स डेला झाले होते. ती त्याला जेल मध्ये डबा घेउन जात असे वगैरे. स्टारड स्ट नामे मासीक लायब्ररीतून घेउन हे सर्व वाचत असू.
रिचा शर्मा चा कॅन्सर, त्रिशला चा जन्म पुढे मान्यता अतोनत दारू पिणे,

पण हा मॅनली पणे तुरुंगात जाउन भोगुन आला शिक्षा. व आता बारकी मुले आहेत ते सूख त्याला मिलते आहे ते बघून छान वाट्ते . मुले ही छान आहेत. मान्यता फार सुरेख दिसते. संजूचे रिअल लाइफ फार नाट्यमय आहे चित्रपटापेक्षा.
रणबीर साठी आयॅम हॅपी. ही नीडेड अ हिट व काम चांगले केले आहे तर फिल्मफेअर घट्ट.

बॉलिवूडचे बच्चे फार मोठी रेंज एक्स्प्लो अर करत नाहीत. त्याच त्याच भूमिका करतात. रिच गाय. राज राहुल खन्ना कपूर. व्हिलन सक्सेना इत्यादि. रजनी कांत सारखे व्हिलेजर शेतकरी असे रोल केले तर जास्त चॅलेंजिंग वाटेल.

मला काय वाट्ते संजू वर चित्रपटात काम केले रणबीरने रणबीरच्यावर चित्रपट येइल त्यात ह्रितिकचा मुलगा काम करेल. ह्रितिकच्या वर चित्रपट येइल त्यात वरूण धवन चा मुलगा काम करेल. अशी साखळी चालतच राहू शकते.

त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा>>>
तुम्ही खरच भोळे आहात कि आव आणलाय तसा...

+१११
बघितला चित्रपट . ग्लोरिफिकेशनच आहे केलेले . आवडला नाही

असं म्हणतात की, "Your eyes see what your mind knows".
मला ग्लोरिफिकेशन वाटलं नाही, म्हणजे ते नव्हतंच असं नाही आणि अनेकांना ते ग्लोरिफिकेशन वाटलं म्हणजे ते आहेच असंही नाही.
"हर एक का अपना अपना वर्जन है 'सच' का !" - (सलमान हबीब - जिंनामिदो)

रणबीर रणबीर नाहीचे... तो संजू च आहे मुव्ही मध्ये.....विशेषतः टाडा च्या वेळी त्याने केस वाढवलेले त्या लुक मध्ये तर मस्त

मला नाही आवडला हा चित्रपट.. एक रणबीर चा अभिनय सोडला तर बाकी काहीच विशेष नाही..
रणबीर कपूर..जबरदस्त..एकदम.!
आता तर लेटेस्ट गाणं पाहिलं युट्य्ब वर.. बाबा बोलता हे के बस हो गया..! Lol

कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने

http://hindi.news24online.com/news/sanju-vikky-poster-61734d12

https://m.dailyhunt.in/news/india/hindi/live+news-epaper-livnews/sanju+m...

पहायचे पहायचे म्हणत अखेर काल पाहिला हा चित्रपट. खूप आवडला. संजय दत्तचे चाहते असाल अथवा तिरस्कार करणारे असाल. कोणतीही मते, परीक्षण किंवा चर्चा वगैरेचा फार विचार न करता बिनधास्त पहा हा चित्रपट. काहीही नकारात्मक असे या चित्रपटात नाही. उलट अंतर्मुख करायला नक्की भाग पाडेल. ड्रग्सचे परिणाम किती भयंकर असतात, वयाच्या ठराविक टप्प्यात संगत किती महत्वाची असते हे दिग्दर्शकाने अतिशय परिणामकारक दाखवले आहे. त्याचबरोबर नंतरच्या काळात त्याच्या हातून घडलेल्या अक्षम्य चुका, त्यातही माध्यमांच्या उथळपणामुळे झालेली अधिकच बदनामी, जवळच्या मित्राने सुद्धा सोडलेली साथ, आपली बाजू कोणीही ऐकून घेत नाही याचे शल्य आणि ज्यांचा एकमेव आधार होता त्या वडिलांचा अचानक मृत्यू. अशा स्थितीत आतून खंबीर असणे हे पणाला लागते. एका चित्रपटात संजय दत्तचाच एक डायलॉग आहे. प्रेमभंग का काय झाल्यानंतर लगेच आत्महत्या करायला निघालेल्या एका मुलाला उद्देश्यून तो बोलतो, "ये आजकलके छोकरे एक पैसे का जिगर नहीं". 'संजू' मध्ये हा 'जिगर' दिग्दर्शकाने प्रभावीपणे दाखवलाय.

फक्त एकच गोष्ट, काही संवाद आणि भाषा स्ट्रॉंग आहे. काही ठिकाणी अतीच. मुलांना (पंधरा वर्षाखालील) घेऊन पाहण्यासारखा हा चित्रपट नाही. माझ्या शेजारी एक दाम्पत्य आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते. त्याच्या प्रश्नांना उत्तर देता देता दोघांच्या नाकी नऊ आले. मध्यंतर नंतर ते तिघेही निघून गेले.

काही दिवसांपूर्वी पाहून आली.. अजिब्बात नाही आवडला..
रणबीर आणि विकी कौशल बघण्यालायक होते बस.. बाकी परेश रावलपन नाही आवडला मला यात..