बबन्याचं पडसं अन येताळाची यात्रा

Submitted by जेम्स वांड on 30 June, 2018 - 07:44

सातारा जिल्हा तसा लैच सुबक, एकदम देखना. ह्या जिल्ह्याच्या दक्षिणेकडं मात्र येगळंच नखरं चालत्याती, लोणंद फलटन मार्गे जावा नाहीतर खालून तासगाव सांगली कडून येवा, अलीकडं फलटन अन वायल्या अंगाव विटा हितच काय ती रया. फुडं सुरू होतो औंधाच्या आई यमाईचा इलाखा, गोंदवलेकर महाराजांच्या रामनामाचा इलाखा. माण, खटाव, दहिवडी, औंध, म्हसवड, असली कितीतरी नामी अन त्याहून मोप कितीतर बिट्टी बिट्टी गावं अन वाड्या इकडं पसरल्याती, त्यातल्या त्यात दहिवडी म्हसवड वगैरे जरा बरी, म्हंजी लग्नात नवरी शेजारी बसल्याल्या करवलीला उगा बोटभर हळद लागतीच तसली. तालुक्याच्या कचेऱ्या अन खुळखुळ आवाज करनाऱ्या रसवंत्यांचा उगा मधाळ वास. बाकी सगळं बोंबाबोंब, औंधाच्या डोंगराव चडून देवळाच्या मागल्या दिंडीतून भायर पडलं का समोर जो निस्ता अडमाप पसरल्याला परिसर दिसतू त्योच ह्यो आमचा लाडका माणदेश. नजर जाईल तिथवर लांबच लांब भकास माळरानं अन नजर थांबल तिथं मातूर तसलेच उघडे बोडके पर आभाळात शिरल्याले सुळके अन डोंगरं. पर मंडळी हितली मानसं लैच हिकमती, गोष्टीवेल्हाळ तरी शूर असली ही मानसे समशेरीला लैच पक्की. आज बी इकडली लै पोरं गावाभायर उगा चुनकळीचा रंग धोंड्यासनी फासून भरती केंद्र सवताच काढत्यात, सवताच खपत्यात अन मिलिटरीत जात्यात. पर समदी काय लष्करात जात नाईत. मागं उरल्याली मानसं उगा उंदीरमुत्या पाऊस, मोप ऊन अन चिक्कार बोचरी थंडी घेऊन तसल्याच बोचऱ्या जिभनं इकडं आपल्याच मस्तीत जगत्याती, शिकरचा महादेव, औंधाची यमाई पूजत्याती अन कायतर प्रताप करत असत्याती.

अश्याच आमच्या बारक्या वाडीत एक राहत असे हिंदुराव. हिंदुराव मोठा हिकमती मानुस, कदी दहिवडीच्या आटवडी बाजारात बोकडं इकावीत, तर कदीमदी फलटनला कोणाच्यातर डाळिंबाच्या बागत रोजंदारीवर जावे, कदी कोनाला तर दहिवडीच्या मामलेदार कचेरीत अडकल्यालं काम काडून देऊन चार पैकं करावं, तर कदी माळावर भिरभिरणाऱ्या मेंढरांच्या लोकरीची भरड घोंगडी, जेनं, वगैरे धनगराच्या माणसांकडून घेऊन सातारला जाऊन इकून यावं. असले सतरा उद्योग त्यो करीत असे. उरल्याल्या येळात उगा घरची म्हनून बारक्या जिमिनीच्या तुकड्यात खपत असे. एकंदरीत हिंदुराव खाऊनपिऊन सुखी मानुस. नाद म्हनावा असा कायपन छंद त्याला नव्हता. हिंदुरावाला साथ हुती कौसल्येची. अख्खी वाडी तिला कौसा मावशी म्हणीत असे. कौसा मावशी आमच्या वाडीच्या थोडं दूर असल्याल्या दुसऱ्या वाडीची पोरगी हुती.

ह्या दोघासनी सणसणीत गरगरीत गब्दूल्ल असल्यालं एक बिलंदर प्वारगं हुतं. त्याच्या त्या सणसणीतपनाला ध्यानात ठिऊन हिंदुरावच्याच कुळकजाईला दिलेल्या भैणीनं त्याचं नावं ठिवलं हुतं 'बबन'. बबन्या म्हंजी पुऱ्या वाडीचं लाडकं प्वार, अडीच पावणेतीनचं ते सणसणीत पोरगं. कदी कुटल्या म्हातारीच्या उंबऱ्यावर बसावं अन म्हातारीनं त्येला मुटभर वल्या भुईमुगाच्या श्यांगा सुलून द्याव्यात, कदी कुनाच्या घरी भाकरी अन काकवी खावी. कदी कुनी त्याला उगाच उचलून गावभर फिरवून आनावं, असलं त्ये लोभस, सणसणीत, गरगरीत असं हिंदुरावचं कार्ट हुतं.

तर असे ह्ये आमचे सुखी जीवनाचा अंगरखा घावलेलं हिंदुराव आज लैच खुशीत हुते. घरी कौसा मावशीनं खास कोंबड्याचा बेत घातला हुता, दाराम्होरं आजवर दाणे टिपून चांगल्या दीड किलोच्या झालेल्या कोंबड्याचा आज रसा हुनार हुता. मावळती अदुगरच मुलाणी येऊन नीट कोंबडं सोलून ग्येला हुता. हिंदुरावांनी ठेवनीतला सदरा लग्नात केल्याली प्यांट अन टोपीचा बेत केलता. बबनराव त्यांच्या कडंवर झुलत घुमत हुते, मदीच सुर्रर्रर्रर्र करून श्याम्बुड वढीत हुते. आज कौसा मावशीचा भाऊ प्रशांत पावना म्हनून यायचं हुतं. काळासावळा तरी तरतरीत, पावने सा फूट पन शिडशिडीत, अन बराच अबोल असनारा पश्या मिलिटरीत हुता. मेव्हना मिलिटरीत आसल्याचा हिंदुरावाला बी अभिमानच हुता. काही साल मागं पोरगेलेस पश्या जवा ट्रेनिंगला गेलतं तवा त्यो 'पश्या' हुता, पर आता मातूर लान्स नाईक प्रशांत माने गावी सुटीवर अल्ते. हिंदुरावाला पश्या घराकडं आला की लैच झ्याक पर्वणी घावत असे. येकतर गावोगावचे किस्से, पलटणीच्या कारवाया वगैरे सुरस गुष्टी जेवणं झाल्याव गावच्या पाराव बसून ऐकने अन नंतर त्या भांडवलाव पंधरा दिस मिश्या पिळीत फुकाटचा तंबाकू गिळत गावभर हिंडायचा कार्यक्रम हिंदुरावला लैच ग्वाड वाटत असे, अन दुसरं म्हंजी दारू!. एरवी हिंदुराव माळकरी नसला अन पैलवान असला तरी मनात यील तवा कोंबडं पाडनं काय त्येला जमत नसे. दारू हिंदुरावाला वर्ज्य नसली तरी त्यो कदीमदी दहिवडीला गेल्यावरच घाबरत उगा एखादच टाक ढोशीत असे. पर प्रशांत आला का मामला एकदम भारी जमत असे. हिंदुरावच्या घरी कालवा कराय ज्यादा माणसे गोळा हुत नसत. प्रशांतची आक्की म्हंजी आपली मावशी भाऊ येयाचा म्हंजी झाक कायतर वशाट करीत असे. हा कार्यक्रम अगदीच उत्तम व्हाया मुख्य कारन म्हंजी प्रशांतराव आणीत ती कॅन्टीनची विलायती दारू.

आज बी सगळी आरास नीट जमली हुती. वाडीचं सरपंच पांडूतात्या, गावातलंच पर पुन्यात नुकरी करणारं जाधवाचं मुक्या, प्रशांत अन हिंदुराव अशी चांडाळ चौकडी फिक्स असे, तशी आज बी जमून बसली हुती. हिंदुरावच्या वसरीत, तरटाच्या अथरुणावर मंडळी जमून बसली हुती, मदी यका पितळीत शेंगदानं, हिरव्या मिरच्या, मीट, उकडीवल्याली अंडी असा ऐवज हारीनं मांडून ठिवला हुता. पहिला रौण्ड संपूस्तोवर कौसा मावशीनं मस्त कोंबड्याचं सुकं म्होरं आणून ठिवलं हुतं. प्रशांतरावांचे किश्शे जोरदार सुरू हुते, बबन्या मात्र आज बाच्या आनंदात बिबं कालवल्यागत किरकिर करीत हुतं. सकाळधरून हिंदुरावबर गावभर हिंडनं, परत रोजची शिरस्त्यापरमानं असल्याली मस्ती. आदीच झाल्यालं पडसं मिळून बबन्याची किरकिर सुरू हुती. कौसा मावशी मदीच येकदा तितकी,

"प्वारगं किरकिर करतंय अन तुमी बसा फुकाटची ढोशीत, माझा मेलीचा जलमच चुली फुकन्यात जाणार" अशी धुसफूसून ग्येली, तवा बाटली उचलून हिंदुरावनं सगळ्यांना आवरतं घेतलं अन पार्टीचा रोख कोंबड्याकडं वळला, ह्या मागं हिंदुरावचा उरल्याली उगा घोटभर दारू बी पुरवून पुरवून दुसऱ्या दिशी प्यायचा मानस हुता. सगळी झाकपाक झाली तशी बबन्याकडं हिंदुराव अन प्रशांतच लक्ष ग्येलं. चोंदल्यालं नाक, नाकपुड्यात भरल्यालं हिरवं शेम्बुड अन त्रासिक त्वांड घिऊन त्ये कार्ट किरकिर किरकिर करीत हुतं. कौसा मावशी त्याच्या किरकिरीनं घायकुतीला येऊन काय करावं हे न समजून डोईला हात लावून बसली हुती.

"ऐकताय न वं, पावनं रातीचं माघार तिकडल्या वाडीला जायचं म्हणत्याती, जरा बोला की भावा सांगट".

"दम की रं प्रशांत, रातीचं आणि कश्याला कडमडायला जातूस बाबा घराकडं, हितचं झोप सकाळ उटून जा की घरला".

"नग आक्काय, उगवतीकडं येरवाळी जायचं हाय जरा बिदालला तात्या बर, उशीर झाला तर परत त्यो कालवा करल".

"बग बाबा, तुला आणि काय सांगाय, आधी ह्ये कार्ट रगात पितंय माजं, ओ जरा बगा की हे ध्यान".

हिंदुरावांनी लगोलग पोरगं उचलून घेतलं तसं आधीच डोस्क भणाणलेलं बबन्या बापाच्या तोंडाला येणाऱ्या रमच्या वासानं अजूनच भंजळलं अन जोरात बोंबलू लागलं. तशी हिंदुरावांनी प्वारगं खाली सोडून दिलं.

"अक्के, पोरग्याला आज झालंय तरी काय गे?" प्रशांत.

"काय की बाबा दिसभर हुंदडत बसतंय, गावभर हिंडतंय अन रातीच्या तंगड्या दुकाय लागल्या की असं बोंबलत बसतंय" कौसा मावशी त्रासून बोलली.

"हात पाय जरा दाब त्याचे , औषध हाय का काय घरात? जरा काय घरगुती उपाय सांगू का एक दोन" प्रशांत बोललं तवा हिंदुराव बाहेर सरपंचाबर ईडा मळत हुतं.

"सांग की , ह्यो झोपला का मला कोरभर भाकरी तरी गिळाय मिळल बाबा" आधीच पेंगुळल्याली मावशी म्हणाली.

प्रशांत थोड्या येळानं तिचा निरोप घिऊन भायर पळाला, तवा बबन्या घरात बोंबलून योट घालीत हुता, अन सवयी परमानं कौशेनं त्याला धरून बुकलला असन्याच्या शक्यतेनं हिंदुरावानं गुमान तम्बाकूच्या गुळणीसंग ध्यान लावाय सुरवात केलती. निरोप काय लगीच घ्यायचा संबंध नव्हताच. निवांत थोडा येळ तंबाकूचे बार भरणे गुळण्या धरून एकमेकांची थोबाडं पात बसने , मग भिरभिरणारे पतंग सावरत उगाच पुढली पार्टी लवकरच वगैरे वायदे मग प्रशांतला निरोप देने वगैरे संगीत कार्यक्रम आटपून हिंदुराव निवांत आत आले तंवर वाकळ अंथरून बिछाना तयार करून कौसा मावशी झोपायच्या तयारीला लागली हुती. तिने बबन्याला उचलून परसात नेलं त्याची चड्डी खाली वडून सुsssss आवाज करत बबन्याला मुतवलं. त्याचं नाक हाती धरून शिस्तीत पोरगं कळवळून जाईस्तोवर त्ये पिळलं अन त्याला घिऊन आत आली तवा हिंदुराव पेंगुळले हुते.

स्वयपाक घर अन बाहेरच्या खुली मधोमध असल्याल्या बारक्या माजघरात दोघं पहुडली, मदी बबन पडला अन पाचव्या मिनिटाला हिंदुराव पडी मारून मोकळे झाले. कौसा मावशी पन जवळपास झोपेत घसराय सुरवात झालती तवा सवयी परमानं ती कुशीवर वळली अन बबनच्या अंगाव हात ठेवला तसा तिचा हात दानकन भुईवरच आदळला. फटक्याने मावशीच्या चुड्यातली यक बांगडी कट्टकन वाडली तशी मावशी उटूनच बसली. समोरच दोगांच्या मदोमद बबन्या एकटंच हलकं हलकं हसत मजेत फतकल मारून बसलं होतं.

"आरं झोप की मुडद्या का रगात प्याय लागलाईस?" कौसा मावशी चिडून वरडली तशी बबन्यानं 'ये आय' म्हणून टाळी वाजीवली अन तडक उटून वाकळ गुधडी अन मधेच पसरल्याला सवताचा बा तुडवतच भायर धाव घितली.

"तुझ्यायला तुज्या शिंदळीच्या" म्हणत हिंदुराव उटला अन एकंदरीत मामला पाहून चाटच पडला. बबनराव मस्तीत दोन्ही हात हवेत उडवीत घरभर धावत हुते, कौसा मावशी त्याला श्या घालत हुती अन चिडली हुती, रात्रीचा कालवा करायची हुक्की आल्याल्या बबन्याला ठोकून निजवावे ह्या बेतानं स्वतःला कसाबसा सावरत त्यानं बबनला धराय हात पुढं केला तशी त्ये कार्ट.....

"आप्पाsssss, माला पकला के ह्य बगा मी तुतं हाय" म्हणत हिंदुरावाला गुंगारा देऊन थ्येट रांधवड्यातच उलथलं.

आता मात्र मावशी अन हिंदुराव लैच बिथरले,कारण हिंदुरावाची पार्टीच्या सुखापोटी आल्याली झोप फळत नवती अन मावशी दिसभर मरमर करून चिरडीला आलती. त्यात हे प्वारगं असलं काय तर कराय लागलं म्हंजी कोणती पन आईबाप कावत्यालच की.

रांधवड्यात चुलखंडाला काटकोनात असल्याल्या डबं ठिवायच्या फळीबुडी बबन्या मोकाट खिदळत जागेवरच उड्या मारत हुतं. कौसा मावशी त्याला दनकायच्या बेतानं बेफाम फुडं ग्येली तशी हिंदुराव बी आपलं इमान सावरत दून पावलं मागचं हुतं. मावशी फुल स्पीडनं पोचाय, अन ह्ये आवली कार्ट तितुन सरकाय येकच गाट पडली तशी मावशी सरळ फळीला आदाराला दिल्याल्या लाकडी डांबाला थ्येट धडकली अन सगळं डबं बदाबदा खाली आलं. त्यातलं नेमकं ढिल्या झाकनाचा ज्वारीच्या पिटाचा मोटा डबा उचकटून पडला त्यो थेट हिंदुरावच्या बोडक्यावरच. आधीच चार टाक लावल्यालं, पोटात कोंबडी खुडूक बसवल्यालं, तंबाकुची कमअस्सल झिंग अजून असल्यालं हिंदुराव डोसक्याव पडल्याल्या पांढऱ्या पिटामुळं पाक जत्रांतल्या सोंगावानी दिसाय लागलं हुतं. इकडं सुसाट सुटल्यालं बबन्या धडकलं त्ये परसदाराला. तीनचार टाक दारू ढोसून राती मुताय लागली तर सोय बरी असावी म्हणून हिंदुरावानं त्ये नुसतं लोटून घ्यातल्यालं. बबन्या बारकं असलं तरी अंगानं थोर असल्यामुळं थ्येट त्ये दून पाटांचं दार यका धडकेतच उगडून परसदारी पळालं तशी अंदारात प्वारगं शिरल्याचं पाहून हिंदुराव अन मावशी घरबीर इसरून भायर धावलं.

हिंदुरावांचं घर तसं गावाच्या मदीच हुतं अन बरोबर चौकुनी आवारात हुतं अशी त्यांच्या आळीत ४ घरं, मागल्या आळीतली चार घरं बी अशीच ह्या घरांच्या बुडाला बुड लावून, मदी फक्त यक बारकी नाली हुती, नाली म्हंजी काय बांधल्याली नाय तर गटारीचा पाट हुता साधा. हिंदुरावच्या घरामागं लगतच रामा खरातचं घर हुतं.

बबन्या सुसाट सुटलं तसं दाणादाण करत थ्येट गटारीतच उतरलं अन त्या गारेगार राडीत पालथंच पडलं. तवा गटारीतच पहुडलेलं एक डुकरांचं खिलार दचकून कुईंsssss आवाज करीत राड तुडवत विरुद्ध दिशेला पळालं. बबन पडल्यामुळं डुकरं फुटली, त्या अदुगर ह्या समद्या प्रतापाची खबर नसल्याला रामा खरातचा म्हातारा परसदारी मुताय आलता, मधुमेह जडल्यामुळं म्हातारं असंच रातीत अदमासे चार पाच येळ उटत असे. डुकरं वरडली अन पांगली तशी म्हातारा थोडा दचकला खरा पर आपला नेमापरमानं धुतर सावरत उकिडवं मुतत बसला, इकत्यात काळ्याशार राडीनं भरल्यालं बबन्या डुकराच्या हल्यावानीच दौडत आलं त्ये थ्येट उकिडवं बसल्याल्या म्हाताऱ्या म्होरंच, अदुगर हल्या समजून 'ह्याट ह्याट हुर्रर्रर्रर्र हुर्रर्रर्र' करणारं म्हातारं धावत आपल्याकडं येणारं त्ये प्रकरन पाहून पारच गळपटलं अन मागच्या मागं पाटीव पडून तंगड्या हवेतच झाडीत

"आयोव रामाय, आयोव रामाय, खोकाड आलंय बग , रामाssss" करीत आरडू लागलं तशी मागून आल्यालं हिंदुराव दुसरा झटका द्यायला फुडं दत्त.

धावून दम लागल्यालं पिटानं पांढरंफेक पडल्यालं हिंदुराव फुसफूस करत म्हाताऱ्या जवळ जाया लागलं तसं म्हातारं अजूनच केविलवानं केकाटाय लागलं, तशी म्हाताऱ्याच्या नादाला न लागता त्यो परत पोरामागं सुटला. घरातून रामा भायर धावत आलं तंवर म्हातारं लैच गलपटलं हुतं.

"नाना नाना काय झालं हो, आरं या नाना पडल्यातीssss" करत रामानं बोंब ठोकली, थोडं पानी पाजून म्हातारं ताळ्यावर आलं तशी बोलाय लागलं

"आर लकांनु गावात काय चाललंय काय नाय काय तुम्हासनी पत्या नस्तुय, मी लका असा मुतत बसल्यालो तशी म्होरं कायतर खासफसलं, मला वाटलं असल राडीतल्या डुकरांचा हल्या, पर आलं की तेचायला डूरकत थ्येट माझ्याव, दून पायाव हुतं, तेचायला असलं कायतर पुऱ्या जिनगानीत पायलं नवतं, परत आनी त्ये कमी पडलं का काय पांडुरंग जाने तिच्यायला येताळच अल्ता फुसफूसत माझ्या म्होरं अक्षी पांढरा पांढरा पालीवानी, मला कायतर बोलत आलं तशी म्या पाकच सटपटलो इकडं गेलं बगा, चव्हाण अप्पांच्या घराकडं, तुमाला सांगतु ज्वानीत अस्तू तर पाक मुंडीच मुरगळुन टाकला असता येताळ, पर आता मला काय मधुमेह हाय, डोळ्याला दिसत नाय"

आता म्हातारं परत जूनं कायतर काडून पिडणार हे पाहताच बघ्यातलं एक श्यानं वरडलं 'काट्या कोयते काडा रं भाड्यानु, बघुयातच कोनाचा येताळ हाय त्ये' एव्हाना बबन्या अन त्याच्या पाटीमागं लागल्यालं हिंदुराव पाक फुडं पोचलं हुतं, बबन्या एरवी बोदलं हुतं पर आज तिच्यायला लैच फाष्ट पळत हुतं. त्याच्यामागं घामेघुम झाल्याला हिंदुराव वैच दमसास भरावा म्हनून उभारलं तर पलीकडल्या गल्लीतून आल्याली चारपाच कलुंगी कुत्री भुकून भुकून त्याच्या मागं कालवा कराय लागली. तशी हिंदुराव दुप्पट जोरात पळालं. कुत्री कोकलताना ऐकून रामाच्या घरला गोळा झाल्याली समदी मानसं त्या दिशेनं काट्या कोयतं घिऊन सुटली, ती दोन गल्या पार करून तिसऱ्या गल्लीत पुचली तवा येताळ , हल्या काय बी सापडलं नाय पर, यदु काशीदच्या घरात कोंबडं उचलाय आल्यालं मुलाण्याचं पोरगं ममद्या मात्र पाकच सटारलं, आपन गावात करीत असल्याली कोंबड्यांची चुरी गावकऱ्यांना कळली अश्या भीतीनं ममद्यानं गोणपाट घालून जेर केलेला काशीदच्या कोंबड्याला मोकळं सोडलं तशी त्या कोंबड्यानं खच्चून बांग मारली, आता मातूर गर्भगळीत झाल्याला ममद्या धावत सुटला त्ये थ्येट गर्दीकडंच, तशी गर्दी थांबली, चेक्सची लुंगी, वर झब्बा अन घामानं लडबडलेला ममद्या पाहून काय त्ये समजल्याल्या कोळ्याच्या सागऱ्यानं ममद्याला विचारलं

'तू आणि कुटं बोंबलत हिंडत हुता रं ममद्या आयघाल्या?'

"कुटं काय, उकाडा लै व्हय लागला तशी वारं खाया सुटलोवतो तंवर तुम्ही दिसला तशी आलो की धावत".

अर्थात आत्ता पांढरा येताळ अन दून पायावर असल्याला हल्या इकतंच काय ते महत्वाचं हुतं. सागऱ्याचं ममद्याव आंबट झाल्यालं त्वांड बी कोनाला बगायचं नव्हतं. गर्दीच्या धाकानं म्हना का जीव वाचल्याच्या आनंदात आता ममद्या बी लुंगी गुडग्यापात्तर चडवून गर्दीबर धावत सुटला.

धा पाच माणसांची गर्दी कुत्र्यांचा हाकारा जोखत बेफाम धावत हुती. मानसं अंदारात कडमडत हुती, थकल्याली मानसं मदीच 'तंबाकू ब्रेक' घिऊन समाजकार्यातून सुटी घीत हुती, मागून आल्याल्या मानसांना उगा सगळं समजावत हुती, आजच्या राती वाडीला काय सुटीच नव्हती.

'जानू आपन मुंबायला जायाचं फिक्स हाय ना' थोडं फुडं रस्त्याच्या कडंला उभारून सच्या गौरेला इचारत हुता.

"ईश्श्श कायतरी बगा तुमचं सचिन" म्हणत गौरी मुरकत हुती, तंवर म्होरनं येणारं राडीतला बबन्या त्यांना दिसून फुडं जाईस्तोवर मागून हिंदुराव धावत आलं, त्याला पाहून गौरी आपन राती निजानीज झाल्याव छपून आपल्या मजनूला भेटाय आल्याचं इसरून ठणाणा बोंबलत सुटली. सच्या दातखीळ बसल्यागत जागीच थरथरत हुता, मिनिटातच गर्दी तिथं पोचली तशी गर्दीतून म्होरं आल्याला गौरीचा बा वराडला

'तू हिथं ह्या वक्ताला काय करतीयेस ग टवळे??'

तशी उलट्या हाताची डबल ठणाणा बोंब ठुकत गौरी राडाय लागली,

'नानाव, तुमी घरा बाहेर पडला तशी काळजी वाटली तुमाला अदुगर गाटायचं म्हनून मी आपली धावत भीमा मावशीच्या परसातून इकडं याय निगाली तर ह्या मवाल्यानं माजा हात धरला हो नानाsssss"

बापलेकीचा तमाशा बगाय कुनी उरलंच नव्हतं गर्दी कधीच म्होरं पळाली हुती. सच्याला दोन गुच्च्या लगावून जवा गौरीचा बा तिला झिंज्या धरून थोबाडीत हाणत घरी नेत हुता तवा गर्दीची वरात गावच्या तिकटी जवळ पोचली हुती. तिकटीच्या बरुबर मदीच भलं थोरलं वडाचं झाड त्येला पार वगैरे हुतं, पाराव राती बसून गप्पा करायचा शिरस्ता असल्याली चार पाच पोरं तिथं गप्पा छाटीत बसल्याली हुती. शेरेकराचा इक्या नेमकं भुताची गोष्टच सांगत हुता. इक्या नेमकं जवा

"अन मंग ती हडळ हिरोला पकडती....."

अश्या वाक्यावर पोचलं हुतं, नेमकं तवाच बबन्या अन त्याच्या जवळ पोचलेल्या हिंदुरावानं गप्पकन त्या कोंडाळ्याच्या मदीच उडी घितली. श्वास रोखुन मांड्या घालून, उकिडवी, उरफाटी, सुरफाटी बसल्याली प्वारं हडळीची एन्ट्री ऐकस्तोवरच एकदम असली बिलामत पुढ्यात आल्याली पाहून, पोळं फुटावं तशी पांगली. कोणी मागच्या मागं, कोणी चपला सोडून कोणी सायकल अन बॅटरी सोडून कोणी सदरा सोडून सड्यानंच भासभास पांगली. मागून धावत आल्याली माणसे पाहून काय कशाची कल्पना काय कशाशी संबंध नसल्याली पाराव थरथरत उबी दोन तीन पोरं बी थोडं सुरक्षित वाटल्यामुळं गर्दी बर पळू लागली. अंतर कमी होऊ लागलं तशी मानसं अजून चेकाळली. शेवटी गुमान धावत असल्याला बबन्या, दारूची नशा उतरून डोस्कं ठणकत असल्याला हिंदुराव दोघंही सरपंचाच्या वाड्यात शिरलं तशी उकाड्याला कट्टाळून बाहेर गोठ्याजवळ बसल्याली सरपंचाची माणसं , मंडळी वगैरे चित्कारून उटली तशी भासभास गर्दी बी वाड्यात शिरली, ती पाहून बावचळलेली गुरं दाव्याला हिसड मारून हंबरु लागली. येकच कालवा उटला, पर मदीच

"ये थांबा ये मेल्यानु" अश्या खणखणीत आरोळीने बंद बी पडला. गर्दी मागून वाट काडत अर्ध्या वाटांतून सरपंचाची मदत मागाय आल्याली कौसा मावशी पुढं यिऊन मागची वीस पंचवीस मिनिटं चालल्याला पाठशीवणीचा ख्याळ यकदाचा बंद पडला. तवा बबन्या भोकाड पसरून रडत हुता, अन दुखरं डोस्कं धरून हिंदुराव पायरीवर बसलं हुतं. शेवटी सरपंच पांडू तात्या आलं, त्ये बी हिंदुरावच्याच पार्टीत पिऊनच हुतं, तिथंच कायतर थातुरमातुर बोलून सरपंचांनी सगळ्यांना पांगवलं, एरवी बबन लै मस्तीखोर हुतं पर आज रातीचं अंदारात टिरी न फाटता इकतं कसं पळालं ह्ये कोडं मात्र उलगडत नव्हतं, रात बी लै झालती, सरपंचाच्याच आडातून पाणी शेंदून कौसा मावशीनं बबन्या खसाखसा धुतला, दोन बारड्या हिंदुराव वर बी वतल्या. सरपंचाच्या मंडळीनं केल्याला वैच चा पिऊन तिघं घराकडं निगाली तवा बबन्या कौसा मावशीच्या खांद्याव गाड झोपलं हुतं.

वाडीत झाल्याली सगळी कथा पसराय काय येळ लागणार नव्हताच. दुसऱ्या दिवशी सकाळीच बिदालला जायचा बेत रहित करून प्रशांत थ्येट हिंदुरावकडं पोचला. सगळं कसं बेताबेतानंच सुरू हुतं. चा पिऊन गपगार पडल्यालं हिंदुराव दुखरे पाय धरून गुडघ्यात मान घालून वसरीत बसलं हुतं, त्येच्या पलीकडं प्रशांत बसलं हुतं.

"दाजी, लै दुक्त्याती व्हय पाय? आना जरा चेपतो, रम हाय का कालची जरा पायाला चूळतो".

"नाईक, ती पेयाची का चोळायची हो, जाऊं द्ये हुतंय समदं नीट".

"नाय नाय तसं नाय दमा जरा तुम्ही, आक्केssss कालची उरल्याली बाटली आन वैच".

"आता आनी ही कुटली बाटली ती संपली की कालच"

मावशीच्या ह्या एका वाक्यानंच सगळा खुलासा झाला अन बॉम्ब पडल्यावानी ती तिघंही गारच पडली.

राती किरकिर करणाऱ्या बबन्याला निजवायला जवा त्रास सुरू हुता, तवा हिंदुराव सरपंच अन मुक्याबर भायर उभं हुतं इकडं प्रशांतनं अक्काला बबनच्या पडश्याव नामी इलाज सांगितला, त्यो म्हनला हुता

"अक्के, दाजींची बाटली उरल्या बग बुडाकडं थोडी, एक पाव फुलपात्र पानी उन कर त्येच्यात चार चमचं रम घाल अन प्वाराला पाजून टाक, उगवतीपात्तर पडसं म्वाकळं हुतंय, शिवाय प्वारगं राती निवांत झोपल त्ये एक हायच".

झोपेत असल्याल्या कौसा मावशीनं हे समदं पुरं इपरित ऐकलं, बाहेर हिंदुराव अन इतर तिघं तम्बाकूच्या गुळण्या धरून एकमेकांकडं टकामका पाहत बसलं हुतं.

हिकडं मात्र मावशीनं हिंदुरावांच्या कापडाच्या फडताळात ठिवलेली बाटली खसकन वडून पाव फुलपात्र दारुच भरून त्यात चार चमचं ऊन पानी घालून नाक दाबून बबन्याला पाजली . बबनरावांनी रात्री लावलेला शेवटला बारका टाक त्यानला इपरित मजा अन इतर लोकांला सजा देऊन गेलता.

तांबरल्याल्या डूळ्यानं हिंदुराव प्रशांत अन कौसा मावशीकडं आळीपाळीने बघत नुसतं राग गिळत बसल्यालं हुतं. कौसा मावशीला पुरा खुलासा झाला तवा तिनं अदुगर नवऱ्याला अन भावाला मरमर श्या घातल्या वर सज्जड दम भरला,

"पश्या, कारभारी, परत जर का असलं हे वंगाळ मुत घिऊन माझ्या उंबऱ्याव दिसलात तर चुलीतलं जळतं लाकूडच घालीन दोगांच्याबी टकुऱ्यात".

हल्ली, गावात ग्येलं का हिंदुराव एकतर सांजच्याला एकतारी घिऊन देवळात तरी उभं दिसत्यात किंवा पाराव निवांत बसल्यालं दिसत्यात, कोनी जर त्यानला दारूबिरु पिऊ वगैरे काय म्हनला तर मिठ्ठास हसत हिंदुराव गळ्यातली तुळशीमाळ काडून दावत्याती अन उसासं सोडून म्हणत्यात,

"माळ घातल्यापासनं समदं सोडलं बगा पावनं, रामकृष्ण हरी!".

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Lol
अंदाज आलाच होता सुरुवातीला की दारू पाजली असणार.
वपुंची ' वन फॉर द रोड' आठवली.

मजा आली..
चांगली आहे कथा पण तुमचा नेहमीचा ठसका नाहीये त्यात +१

मस्तच!

पण तुमचा नेहमीचा ठसका नाहीये त्यात. >>>> +१

___/\___

अत्यंत सुंदर कथा , ८ तासाच्या कामाचा थकवा घालवलात . खूप खूप हसवलत, अत्यंत छान ग्रामीण बाज . प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मी तुमची पहिलीच कथा वाचतोय . लोकांच्या कंमेंट्स वरून वाटतंय अजून फारच छान लिहता तुम्ही. मी तर आज फॅन झालो तुमचा. बाकीचे लिखाण नक्कीच वाचेन. माझ्या निवडक १० मध्ये. अगदी खुमासदार .

खूप खूप आभार प्रवीण जी, मनमोकळ्या कॉमेंटकरता विशेष आभार. आपण खरडलेलं कोणालातरी ताजेतवाने करू शकते ही भावनाच मस्त असते.

वा वा जेम्स वांड साहेब! सुरस गुष्ट सांगाय लाग्ला की ऐकत र्‍हावं अगदी! इंग्लिश शब्द नावालाच कुठेतरी सापडणारी तुमची भाषा वाचून आम्हीच स्वतःकडे टकमका पाहत राह्यलो.

आभार भास्कराचार्य,

अदुगरच तेच्यायला बोली भासंत प्रमाण भाषेचं मैंदाळ मोप कालीवलं गेलंया. तरीबी किमान आपन बोली नीट ल्ह्यावी इकती शिस्त आपन पाळतो बगा. Happy

मस्त मस्त Lol मजा आली. मला भयंकर आवडतात बोलीभाषेतल्या कथा वाचायला. तुम्ही वर्णन एकदम खुमासदार करता. त्यामुळे आणखी मजा येते.