फर्जंद: हातातले पॉपकॉर्न गळून पडेल अशी दैदिप्यमान इतिहासाची गाथा

Submitted by अतुल. on 27 June, 2018 - 01:38

हे थोडे गडबडीत लिहित आहे. कारण, लिहायचे राहिले तर कायमचेच राहून जाते असा पूर्वीचा अनुभव आहे. आणि या चित्रपटाविषयी तसे करणे योग्य होणार नाही.

कालच फर्जंद पाहिला. नेहमीचे धकाधकीचे आयुष्य जगताना आपण इतिहास आणि आपल्या आताचे जग व जगणे घडवण्यात कोणाचे किती योगदान आहे यावर आपण फारसा विचार करत नाही. इतिहास म्हटले कि आपल्याला साधारण माहिती असते. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मावळे, गड, किल्ले, युद्ध, मोगल, शाहिस्तेखान, अफजलखान. झाले. प्रत्यक्षात काय काय घटना घडलेत, किती थरार होता, काय प्रसंग ओढवले होते, किती अटीतटीचे आयुष्य होते यावर आपण फार विचार करत नाही. फर्जंद सारखे चित्रपट म्हणूनच पाहणे खूप आवश्यक आहे. मी तरी कधी फर्जंद विषयी पूर्वी वाचले ऐकले नव्हते. एक फारशी माहित नसलेली कथा डोळ्यासमोर उलगडते तेंव्हा अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा गर्वाने छाती भरून येते. अनेकदा स्फुरण चढते. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याचा गहिवरून येणारा प्रसंग, सगळे मावळे आवेशात हर हर महादेव म्हणतात ती स्फुरण चढवणारी दृश्ये, बहिर्जी नाईक ज्या पद्धतीने मोगल सरदाराचा विश्वास संपादन करतो तो काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग इत्यादी हे सगळे खरोखर थक्क करणारे आहे. आणि केवळ साठ मावळ्यांना हाताशी घेऊन अडीच हजार मोघलांशी फर्जंद नियोजनबद्ध रीतीने कसा भिडतो ते पाहून असे वाटते कि अरे यार हे सगळे इतके भारलेले होते इतके भव्य होते ते आपल्याला आधी का नाही माहित झाले? सर्वात शेवटी शिवरायांचा जो प्रवेश आहे त्याबाबत मी इथे सांगणार नाही. तुम्ही प्रत्यक्षच पहा. नव्हे पहा. केवळ आणि केवळ नतमस्तक होतो आपण.

आता चित्रीकरण आणि चित्रपटाविषयी. खूपच प्रभावी आणि परिणामकारक चित्रण आहे. चित्रपट निर्मिती काय असते ती मी जवळून पाहिली आहे. किती जणांचे प्रयत्न असतात, किती झोकून देऊन काम करावे लागते, टीमवर्क किती महत्वाचे आहे आणि मुख्य म्हणजे किती पॅशन आवश्यक असते हे सगळे पाहिले/अनुभवले आहे. त्यामुळे मी चित्रपट शक्यतो नकारात्मक कधीच घेत नाही. मराठी असेल तर नाहीच. कारण मराठी चित्रपटाना निर्मितीच्या फार मर्यादा असतात, आव्हाने असतात. (आता काही चित्रपट मात्र खूपच प्रमाणाबाहेर रद्दड असतात. इतकेही योग्य नाही. पण ते असो). या सगळ्याचा विचार केला तर फर्जंदने खूपच मोठी मजल मारली आहे. काही दृश्यांचे अतिशय प्रभावी पद्धतीने प्रेझेन्टेशन झाले आहे. वादच नाही. सुरवातीला थोडे नाटकी वाटत होते. सेट वरचा तो सिंहगड आणि त्याला दोर लावून चढण्याचा अभिनय करणारे ते मावळे हे पाहून सगळा चित्रपट असाच असणार का असे वाटून गेले. पण पुढे तसे झाले नाही. नंतर चित्रपट चांगलीच पकड घेतो. अनेक मराठी चित्रपटात का कळत नाही पण संवाद आणि संगीत अतिशय कर्कश्श असतात असा माझा अनुभव आहे. सुदैवाने फर्जंद मध्ये तसे झालेले नाही. सुरवातीला थोडे कर्कश्श झालेय पण नंतर सावरले आहे.

प्रसाद ओक यांनी साकारलेले बहिर्जीं नाईक लाजवाब. क्या बात है. मृण्मयी देशपांडे यांची केसर खूपच गोड आणि तितकीच कणखर आणि करारी. सुंदर काम केलेय. फर्जंदची पत्नी कमळी नेहा जोशी यांना तसा फार वाव नाही. पण त्या छोट्याश्या भूमिकेत ती नाजूक चणीची कमळी लक्षात राहून जातेच. जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी मला त्यांना तसे (पांढरे केस आणि म्हातारपणाचा कृत्रिम आवाज वगैरे) बघायची सवय नसल्याने फार अपील झाल्या नाहीत. शिवराय हे पात्रच असे आहे कि ते कुणीही केले तरी प्रभावीच वाटते. आजवर ज्यांनी केले त्यांचे सोने झाले. अर्थात चिन्मय मांडलेकर म्हणजे "कुणीही" असे मला म्हणायचे नाही. धारधार नाक, भेदक नजर, करारी मुद्रा हे सगळे मस्त जमून गेलंय. फार मेहनत घेऊन अशा भूमिका कराव्या लागतात. चिन्मय यांनी साकारलेले शिवराय म्हणूनच प्रभावी वाटतात. आणि स्वत: फर्जंद म्हणजे अनिकेत मोहन. अरे हा मराठी आहे? म रा ठी? आणि चक्क हॉलिवूडच्या अभिनेत्यांसारखी शरीरयष्टी वगैरे? जबराच राव. प्रवेश घेताच खावून टाकतो हा पोरगा. त्यात आणि हंडाभर दुध पितानाचा प्रसंग. शिट्ट्याऽऽऽच. जिंकलंस भावा.

तर आता उशीर झालाय मला. आवरते घेतो. पण अरे यार हेल्लो... जाऊ नका, एक मिनिट, ऐक ना.... बघा यार बघा बघा बघा... नक्की नक्की नक्की बघा. चुकवू नका हा मुव्ही राव. आजच जाऊन बघा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लेखाच्या शिर्षकाशी सहमत आहे.
इतका अचाट आणि अतर्क्य चित्रपट पाहून हातातले पॉपकॉर्न, इंटरव्हलच्या आधी कचर्‍याच्या डब्यात फेकून आम्ही सिनेमागृहाच्या बाहेर पडलो.
---

शीर्षक आवडले. सिनेमा पण आवडलाच होता ते चित्रपट कसा वाटला धाग्यावर लिहीलं आहेच.
साधारणपणे ६-१३/१४ वयोगटाच्या, ईंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना मराठ्यांचा इतिहास कळावा म्हणून अवश्य दाखवावा.

फर्जंद म्हणजे अनिकेत मोहन. अरे हा मराठी आहे? म रा ठी? आणि चक्क हॉलिवूडच्या अभिनेत्यांसारखी शरीरयष्टी वगैरे?>>>>>>>

अंकित मोहन मराठी नाही, दिल्ली चा आहे,
त्याने शब्दोच्चारावर प्रचंड मेहेनत घेतली असल्यामुळे तो दिल्लीवाला आहे हे जाणवत नाही

@समीर... शक्यतो मी मराठी चित्रपटांना जितके होईल तितके सकारात्मकच घेतो. शिवाय आपण चित्रपट पाहताना आपली मन:स्थिती, किती अपेक्षा ठेवून जातो यावर पण खूप काही असते. मी चांगले रिव्यूच ऐकले होते या चित्रपटाचे. पण चित्रपट न आवडलेले सुद्धा लोक आहेत हे मायबोलीवरच कळले. ह्म्म्म. असो. अखेर आपापली मते Happy

@चैत्रगंधा: अगदी सहमत आहे.

@सिम्बा... धन्यवाद! हो मला नंतर कळले. या चित्रपटावर अन्य धाग्यावर इतकी चर्चा झालीय माहित नव्हते. आता वाचली. आपले परीक्षण पण वाचले. पटले बरेच मुद्दे.