मिरवणुकांचे स्तोम

Submitted by साद on 26 June, 2018 - 11:28

प्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या, स्वयंचलित वाहनांचा अनिर्बंध वापर, अरुंद रस्ते आणि बरेचदा बंद पडलेली सिग्नल यंत्रणादि कारणांमुळे बऱ्याच शहरांत वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचे प्राथमिक नियम मोडण्याच्या भारतीय नागरिकांच्या प्रवृत्तीमुळे वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. अशा कोलमडलेल्या वाहतुकीची अजून वाट लावतात त्या निरनिराळ्या मिरवणुका.

लग्नाची वरात हा मिरवणुकांच्या इतिहासातील एक प्राचीन प्रकार म्हणावा लागेल. तेव्हाच्या ग्रामसंस्कृतीत तो योग्य होता. पण आता गजबजलेल्या आणि सुजलेल्या शहरांतून अट्टहासाने वरात काढणे हे खरे तर समंजसपणाचे लक्षण नाही. त्यातून वरातीपुढील हिडीस नृत्ये आणि बेजबाबदारपाने वाजवण्यात येणारे फटाके या गोष्टी वाहतुकीत गंभीर समस्या निर्माण करतात.

आपण कमालीचे उत्सवप्रिय आहोत. पण दिवसेंदिवस त्यांतील प्रदर्शनियता नको इतकी वाढते आहे. बऱ्याच उत्सवांचा आरंभ आणि समाप्ती मिरवणुकीने होते. काही उत्सवांच्या भव्यदिव्य आणि कित्येक तास चालणाऱ्या मिरवणुकीमुळे आपण शहरातले महत्वाचे रस्ते चक्क अडवून ठेवतो. कासवगतीने सरकणाऱ्या अशा मिरवणुकीमुले इंधनाचा नाश तर होतोच आणि प्रदूषणात प्रचंड भर पडते. पण त्याचा विचार कोण करतो? त्यात गुलालाची उधळण वगैरेबद्दल तर काय बोलणार?

निवडणुका हा तर लोकशाहीचा गाभा. त्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयोत्सव साजरा करण्यापर्यंत अनेकदा मिरवणुकांची अगदी रेलचेल असते. परंतु या शक्तीप्रदर्शनापुढे सामान्य माणसाची बोलायची काय टाप ?
विविध मिरवणुकांच्या जोडीला वाहतुकीत व्यत्यय आणणारा अजून एक प्रकार म्हणजे निरनिराळे मोर्चे. आपल्याकडे त्यांचा बिलकूल तुटवडा नाही. समाजमनातील खदखदणारा असंतोष रस्त्यावर आणण्याचा तो प्रभावी प्रकार म्हणता येईल. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वाधिक गर्दीच्या वेळांत, वाहतुकीचा प्रचंड ताण असलेल्या रस्त्यांवरूनच संबंधित शासकीय कार्यालयाकडे कूच करत असतात. त्यात शिस्तपालन अभावानेच दिसते. त्याने वाहतूक तुंबते. अशा वेळी अडथळ्यातून मार्ग काढण्याच्या चिंतेत असलेले नोकरदार आणि उद्योगमग्न नागरिक चरफडण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाहीत. गेल्या १-२ वर्षांत तर ‘महामोर्चांची’ लाट आलेली आपण पहिली.

सरतेशेवटी एक दृष्टीक्षेप अंत्ययात्रांवर. शहरांत उत्तम शववाहिन्यांची सोय उपलब्ध असताना प्रेतायात्रेचा अट्टहास कशासाठी? विशेषतः राजकीय व्यक्तींच्या बाबतीत हे अधिक दिसते. त्यातूनही ते शक्तीप्रदर्शन साधतात.

अशा अनेक मिरवणुकांपैकी बऱ्याच अनावश्यक आहेत आणि प्रबळ सामाजिक इच्छाशक्तीने त्या कमी करता येतील. त्यातील काहींचा कालानुरूप त्याग करता येईल. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहिल्याने जनजीवन विस्कळीत होणार नाही. आणीबाणीच्या प्रसंगी कुणालाही इच्छित स्थळी त्वरेने पोचता येईल.

वाहतुकीची कोंडी न करण्याचे फायदे आपणा सर्वांनाच मिळतील, हे खरे तर पटण्यासारखे आहे. तरीसुद्धा काही विधायक कृती करण्याबाबत समाजात कमालीची अनास्था दिसते. लोकशाहीचे स्वातंत्र्य उपभोगताना आपण शिस्तीला मात्र मूठमाती देत असतो.
x x x

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users