ये है मुंबई मेरी जान...

Submitted by राजेश्री on 25 June, 2018 - 22:00

मुंबई...

एव्हाना निर्मलाच्या ऍक्टिव्हा वर मागे बसून, ही ऍक्टिव्हा नाहियेच मुळात ही तर मुंबईतील सर्वात वेगवान अशी ट्रेन आहे असं मान्य करण्याइतपत अनुभव मला प्राप्त झाल्यावर गर्दीतील ४० चा स्पीड मला प्रचंड वेळ खाऊ वाटू लागला .ट्रेन आणि निर्मलाची ऍक्टिव्हा या व्यतिरीक्त मुंबईत असलेली प्रवासाची साधने सरकारने आपल्या दप्तरी जमा करावी , आम्हाला त्याची गरज वाटत नाहीये असे विनंती पत्र मला वेळ मिळाल्यावर लिहायचेय असं मी ठरवले आहे. कुणाची बिशादच नाही आम्हाला ओव्हरटेक करण्याची पो पो असा बस चा, कर्णकर्कश असा कार चा..रात्रकिडे कधी कधी भंजाळून किरकिर पेक्षाही मोठा आवाज काढतात तसा रिक्षाचा हॉर्न असे हॉर्नचे नानाविविध प्रकार मला निर्मलाच्या गाडीवर बसल्यावरच ऐकायला मिळाले कारण या आधी मी फार फार तर सायकल ला ओव्हरटेक केलं आहे शिवाय सायकल वाल्याने रागाने ट्रिंग ट्रिंग केल्यावर त्याला किंवा त्याला घाई असेल ,सरळ अंगावर घालेल जाऊदे पुढे म्हणत मी माझी activa सरळ वीस पेक्षा कमी स्पीड ला घेऊन तो ट्रिंग ट्रिंग वाला किंवा वाली पुढे जाण्याची वाट पाहिली आहे. पण निर्मलाच्या मागे बसून बेदरकार बस ला सुद्धा जुमानायचे नसते हा धडा मी गिरवला आहे.(बघूया जमते का)
दुसरा धडा हा कि मुंबई मध्ये एकदा एका दिशेला तोंड करून चालू लागलं आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला तिसऱ्या नाही तर पहिल्या प्लॅटफॉर्म वर जायचंय तर मग लोकांच्या वाहत्या गंगेत सरळ त्याच दिशेने पुढे वाहत जाऊन एखादा रिकामा कोपरा पाहून पुन्हा वळावं लागत . तिसरा धडा हा कि इथे जो तो आपल्याच तालात असल्याने एखाद्या बद्दलची जिज्ञासा आपल्यापुरती मर्यादित असावी ,आपल्याला पडलेले काही प्रश्न मनात गिळणे जास्त सोयीस्कर आहे. नाना तर्हेची फॅशन , नाना तऱ्हेच्या जिनसा लोकल च्या डब्यात विकायला आल्यावर त्याचे औत्सुक्य लवकर आटपते घ्यायचे असते अन्यथा आपला स्टॉप मागे जातो हा महत्वाचा धडा केवळ तिथेच शिकायला मिळतो. रेल्वे च्या डब्यात जागा नसताना आपण बसलेल्या बाकड्यापुढे उभा असणारी कुणी मुलगी अथवा काकू आपल्याकडे बोट करून मानेने खुणावत असेल तर त्याचा अर्थ कुठे उतरणार हा हि धडा मला सरवानेच मिळाला या आधी मला दादागिरी करून आपल्याला आपल्या बसत्या जागेवरून हालववायचा बेत आहे असा मी अर्थ धरून मानेनेच नाही नाही उठणार नाही अश्या अर्थाची मी कित्येक वेळा मान हलवली असेल.मग उतरना किधर है या शब्दांनी भानावर येऊन मी सुटकेचा निश्वास सोडला आहे.असे खूप गावाकडे उपयोगात न येणारे सुद्धा धडे मी मुंबईत गिरवले आहेत ,शिवाय रस्त्यावर मिळणाऱ्या खूप साऱ्या वस्तू फसव्या असू शकतात हे सरवाणेच लक्षात येणारी गोष्ट असते त्या मुळे का भुललासी वरलिया रंगा म्हणत मी विंडो शॉपिंग वर जास्त भर दिला आहे.
खूप चेहेरे,खूप इमारती ,कुठे मुंबई वाटणार नाही इतकी दाट झाडी,प्रशस्त रस्ते, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स चा एरिया तर स्पेशल ट्रिप काढून पहावा असाच, ब्रिटिशकालीन भव्य टोलेजंग इमारती,अजूनही इंग्रजांळलेली नाव धारण करणाऱ्या CST जवळच्या ब्लॅलार्ड इस्टेट परिसरातील इमारती,पोस्ट ऑफिस ची इमारत स्वप्नवत असं हे भव्य बांधकाम,एकसलग दगडात बांधलेल्या या इमारती ब्रिटिशांच्या ऐषोआरामाची साक्ष देत त्यांच्या नावासहित दिमाखात उभ्या,नाही म्हंटल तर काही ठिकाणी त्या इमारतींना घातलेली सिमेंटची कुंपणे चीड आणतात.याच्या अगदी उलट असणारी काही ठिकाणे रेल्वे मधून जाताना दिसणारी,काहींचे रेल्वेच्या रूळाला लागून घराचे इवलेसे अंगण ये जा करणाऱ्या रेल्वेकडे त्रयस्थ पणे पहात राहणारे हे लोक.पहिलं की आपल्या घराबद्दल सभोवतीच्या शांत परिसराबद्दल प्रचंड प्रेम दाटून येत. लहानपणापासुन वाटत राहणार मुंबईच अप्रूप बेरजेत येत जाणाऱ्या अनुभवांनी कधी कमी झालं नाही,उलट ते वाढतच गेलं दिवसोंदिवस . दरच्या खेपेला एक नवीन पदर आपल्यासमोर उघडणारी हीं मुंबई खरंच मायानगरी आहे...मग या दरवेळच्या येरझार मधील अनुभवही वेगळाच आणि मायावी. खूप काही आहे मुंबई बद्दल लिहायचे,खूप काही आठवत नाहीये तूर्त तरी,मनात साठलेले पुन्हा कधीतरी लिहीन सवडीने, मुंबईच्या आठवांचे शब्द मनात गोठलेत वाहतील पुढे मागे कधीतरी ... तूर्त ही कविता सुचतेय...
लिहायला घेतलं कि अगोदर मनातच नाही मावत मुंबई...
उतरवायला घेतलं कागदावर कि पुरत नाही पेनातील शाई अशी ही मुंबई...
कशासाठी पोटासाठी च्या तालात रेल्वेच्या रूळावर धावते रोज मुंबई...
नव्या नव्या स्वप्नांमागे धावत रहा रोज रोज असं बजावत रहाते मुंबई...
निवांतपणा नावाला नाही मॅरेथॉन स्पर्धा रोजच आयोजित करते मुंबई...
कुठे थाटमाट , उतू जाणारी श्रीमंती तर कुठे सिमेंटच्या फुटक्या पायपांमध्येही संसार थाटते मुंबई....
रोजची येरझार...रोजचाच एक ताल वर्षभरात रोजच भरणारी आषाढी वारी मुंबई....
गल्लोगल्ली पावलोपावली बुचकळ्यात टाकते मुंबई...
कुठे तोंडाचा आ वासला तर कुठे वासाने असह्य होऊन श्वास गुदमरला अशी ती मुंबई...
माणसांच्या मुंग्या बनवून रोजच पळवत रहाते मुंबई...
रस्तोरस्ती विखुरलेल्या स्वप्नांमागे धावते रोज मुंबई....
घड्याळातील सेकंदकाट्याची सारथी ही मुंबई...
असंख्य चेहेरे अन एकच मुखवटा गर्दीचा हा एकसारखा कदमताल ही मुंबई...
कुणी स्वप्न विकतो ,कुणी स्वप्न जगतो विक्रेत्या ग्राहकांची मांदियाळी मुंबई..
का धावायचे...धावायचे का? अश्या असंख्य उलट सुलट प्रश्नांचे उत्तर नसलेली हीं मुंबई...
सारांश हाच कि......
"गड्या आपला गाव बरा"

©राजश्री ....
वेळ:- (रोजच्या वेळा सारख्याच त्यातीलच रेल्वेत जागा मिळालेली एक वेळ)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
मुंबईबद्दल तुमच्या आठवणी/भावना छानच ऊतरल्या आहेत.
शेवटची कविता वाचून 'ये है बॉम्बे मेरी जान' गाणे आठवले.

दरच्या खेपेला एक नवीन पदर आपल्यासमोर उघडणारी हीं मुंबई खरंच मायानगरी आहे >> +१११११११११११११११
सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या मुंबईनगरीच्या लेखावर एकाही मुंबईकराचा प्रतिसाद नाही? हे एक कोडेच म्हंटले पाहिजे.

मुंबई सारखाच हाडाच्या मुंबईकरावरसुद्धा लेख येऊद्या एक.

> छान लिहीलंय पण विस्कळीत वाटतोय लेख. > + १. पूर्वी याचा एक भाग लिहला होता आणि हा दुसरा पुढचा भाग आहे का?