गाजर-बीटची चटणी

Submitted by पद्म on 25 June, 2018 - 04:14

हाय ऑल!
आज पहिल्यांदा पाककृती लिहीतोय, जर जमली नसेल तरी चांगली जमली असं म्हणा......
ते काय आहे, एक तर शनिवारची सुट्टी आणि वरून पाऊस; मग असंच काहीतरी करायला सुचतं. पण ही चटणी मी बनवली नाहीये....... कळेलंच पुढे!

फक्त रेस्पी सांगितली तर मजा नाही येणार; म्हणून आधीपासून सांगतो. सहन करा..!
आज मोन्याला (एक रूमपार्टनर) दुपारी अचानक भूक लागली, तशी रोजच दुपारी लागते म्हणा, आजही भूक लागली; म्हणून तो अचानक रूममध्ये भुकू लागला... (भूक लागली तर असंच करतात हे! हे म्हणजे माझे रुमपार्टनर्स.) आणि त्याने किचनमध्ये पाहिलं तर फक्त गाजर आणि बीट, तेही मी माझ्या सॅलड साठी आणलेले होते, पण आता त्याची बुरी नजर त्यांच्यावर पडली. आणि माझी नजर त्याच्यावर पडली, "हे भगवान बचाओ मेरे गाजर बीट को!" अश्या मी देवाकडे धावा करू लागलो, तो हसून फक्त इतकंच म्हणाला, "आलीया भोगासी असावे सादर". (तोपण सध्या मतलबी झालाय! पाहून घेईल त्यालाही...) ओह विषयांतर होतंय का? तर कुठे होतो मी?????? हां! किचनमध्ये फक्त गाजर आणि बीट होते.

मग तो बिचारा भुकत भुकत माझ्याकडे आला, आणि माझा हात चाटू लागला.....( खरंच नाही हो चाटला! ती एका शिकाऊ कवीची कल्पना आहे, विसरा त्याला!). मला म्हणाला "परेश, तुझ्या गाजर बीटचं ज्यूस बनवू का?"
आता मी काय सांगणार? एकतर दिलदारपणाची इमेजपण जपायची होती...... मग मीपण एक डायलॉग मारला, "क्यूं नहीं यार, तेरे लिये तो जान हाजिर है...." (ईथे बीट द्यायची इच्छा होत नव्हती, जीव काय घं* देईल मी...) असो! पण माझ्या या डायलॉगने संपूर्ण फ्लॅट गहिवरला आणि मुंबईत त्यांचे (त्यांचे म्हणजे समस्त रूमपार्टनर्सचे) अश्रू संततधार होऊन बरसू लागले.......(परत शिकाऊ कवीची कल्पना!)
पण त्याला विचारलं, "ईतकीच भूक लागली, तर कापून खा ना! ज्यूस कशाला बनवत बसतो?" (नाही नाही! गैरसमज नसावा. त्याची काळजी नव्हती, मिक्सरचे भांडे मलाच धुवावे लागतील म्हणून.... )
मग भाऊ म्हणाले, "ते काय आहे ना, मला गाजर आणि बीटची चव नाही आवडत." (नहींssssssss ये सुनने से पहले मायबोलीसे मेरा अकाउंट डिलीट क्यूं नहीं हुवा??)
मी मनातल्या मनात म्हणालो, "अबे, तुझं ज्यूस आंब्याच्या चवीचं असेल काय?" (नाही, जर माझं काही चुकत असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा.....)
मी पुढे काही बोलायच्या आतंच भाऊ धागामालक असल्यासारखे किचनमध्ये घुसले.... (ओह सॉरी सॉरी! धागामालक नाही गाजर आणि बीटचे मालक. मायबोलीचा परिणाम! दुसरं काय...) आणि बिचार्या गाजर बीटला कापून, नंतर मिक्सरमध्ये फिरवून, त्यानंतर गाळणीने गाळून ज्यूस तैयार करू लागले. (तो ज्यूस तर ईतकं वेगाने बनवत होता जसं त्याचं अंधेरी स्टेशनच्या बाहेर ज्यूसचं दुकान असावं. मला तर बसल्या बसल्या त्याचं स्टेशनबाहेर ज्यूस विकतानाचं चित्र दिसू लागलं. तो जोरजोरात ओरडत होता, "आओ मलिक! भेल पुरी, पाणी पुरी, सेव पुरी.....". ओह, असं तर चाट वाले ओरडतात.....असो!) आणि मोजून १० मिनिटात ज्यूस तैयार.......!

अरेच्या! पुन्हा एकदा विषयांतर, चटणी ऐवजी ज्यूस बनवलं. (असं माझं मत नाहीये, असं तुम्हाला वाटत असेल! जर डोकं ठिकाणावर ठेवून वाचत असाल तर....! पण वर सांगितलंय ना, सहन करा म्हणून? मग आता चटणी बनेपर्यंत सहन करत रहा!)

मग मोन्या एका ग्लासात ज्यूस घेऊन आला, आणत ज्यूसंच होता, पण भाऊंचा आविर्भाव हातात सोमरस असल्यासारखा होता. मग देवराज थाटात सिंहासनावर विराजमान झाले आणि सोमरस पिण्यास तैयार झाले. (एहसान फरामोश कुठला! अर्ध्या ग्लासासाठी तर विचारायचं मला... शेवटी खरा धागामालक तर मी होतो ना! पण त्याला नसून अ‍ॅडमीन असण्याचा भाव आला होता..... असो!) मोठ्या गर्वाने स्वनिर्मीत सोमरसाचा एक घोट इंद्राच्या जिह्वेला स्पर्शून पोटात गेला.....बस्स! पुढच्याच क्षणी इंद्राला स्वर्गातून हाकलून नरकात यातना भोगायला पाठवलं होतं, म्हणजे मोन्याचा चेहरा तश्या इंद्रासारखा झाला होता. (माझ्यातल्या कवीच्या कल्पना समजून घेत चला....)
राजे ताडकन आपल्या सिंहासनावरून ऊठले आणि माझ्याकडे बघून म्हणाले, "अरे याची चव तर बीटसारखीच आहे..." (The joke of the day for our room! no more explanations.....) क्षणभर तर खरे ईंद्रदेवपण पाऊस बंद करून या बेण्याकडे पाहत होते..... (असा कवीला भास होतोय, परत परत नका हो सांगायला लाऊ हे!)
आता मोन्याचा सच्चा यार गोम्या त्याला मदतीसाठी पुढे झाला, "त्यात ना थोडं मध टाक चांगलं लागेल!" (क्षणभरासाठी मलाही गोम्याचा अभिमान वाटला, ईथे कोणी वेळेवर पाणी देत नाही, हा मध द्यायला निघाला होता... पण हा अभिमान क्षणभरच वाटला.... कळेलंच!)
आता जयला कळलं की विरू मध मागणार, त्याआधीच जय म्हणाला, "पण माझं मध संपलंय. परेशकडे आहे हवं असेल तर....." (माझ्याकडे कायकाय आहे, हे मलाही माहिती नसतं. यांना कसं कळतं, देव जाणे!)
मी पक्का निश्चय केला, आता जर याने मध मागीतलं तर मी मुळीच देणार नाही. एक तर सर्दी खोकला झाल्यावर सितोपलादी चूर्णात (हे काय आहे माहिती नसेल, तर तात्काळ दुर्लक्ष करा) मिसळायला उरलं नाही, तर मलाच प्रॉब्लेम!
पण त्याने मध मला न विचारता हुंगून काढलं. आणि न विचारता तो राक्षस ज्यूसात मध टाकून पिऊनही गेला... "ईस २ चम्मच मध की किमत तुम क्या जानो मोन्याभाऊ....", असं काहीसं मी बोलणार होतो, पण जाऊंदे. (तीच दिलदारपणाची इमेज!)

बोर होत असेल ना, वाचून? तरी वाचत रहा.... थांबू नका! माझे बाबा म्हणायचे, "थांबला तो संपला......", स्वामी विवेकानंदही म्हणालेत, ".......
आणि चटणी बनेपर्यंत थांबू नका!" असो!

आणि शेवटी व्हायचं तेच झालं. राजे मिक्सरचं भांडं तसंच सोडून काहीतरी कामानिमित्त निघून गेले, आणि भांडे धुण्याची जबाबदारी पुन्हा माझ्यावर आली. (हे तर आधीच माहिती होतं म्हणा, त्यात नविन काय!)
शेवटी मीही आळस झटकून किचनमध्ये गेलो, तर मोन्याने गाळणीतला गाजर बीटचा लगदाही (लगदाच म्हणतात का?) फेकला नव्हता. माझे बाबा म्हणायचे तुझ्यापेक्षा आळशी माणूस पाहिला नाही म्हणून, आता मी बाबांची आणि मोन्याची भेट कधी होईल याचा विचार करू लागलो.... ओह! परत विषयांतर होतंय.
तर मी तो लगदा फेकणार ईतक्यात माझ्या परमात्म्याने मला हाक मारली, "अबे पर्‍या, याचं काहीतरी बनव ना खायला!". (मी मघाशी म्हटलो ना, हा सध्या मतलबी झालाय! खायला लगेच पुढे, पण बनवायला मलाच लागणार.)
तो लगदा आधीच चटणीसारखा दिसत होता, म्हणून त्यापासून चटणी बनवायचं फायनल केलं. तसा मला स्वयंपाक येत नाही, पण करायला काय हरकत आहे, नाही का? शेवटी मेकॅनिकल ईंजिनियरने ऑल राऊंडर असायला हवं...... पण नुस्तं प्रोजेक्ट हातात घेऊन चालत नाही, त्यावर कामही करावं लागतं. मोन्याने माझा वापर केला होता, आणि मला गोम्या रिकामा दिसत होता. फसला बिचारा! (तो फसला की मी फसलो कळत नव्हतं, कारण गोम्याने कधी पाणीही उकळलं नव्हतं, चटणी काय.......................... असो!)
मी गोम्याला किचनमध्ये बोलावलं आणि गॅसवर भांडं ठेवायला सांगितलं, गोम्या खूप आज्ञाकारक! लगेच त्याने गॅसवर कढई ठेवली. (नशिब त्याला हे तरी माहिती होतं की, चटणी कढईत बनते!) मी गोम्यावर खूश झालो, तसा गोम्यालाही आत्मविश्वास येत होता, लग्गेच त्याने तुपाचा डबा हातात घेतला. (हे पाहून मला त्याची लायकी कळली. मी गारूड्याला सिंहाची शिकार करायला सांगत होतो.)
मी म्हणालो, "अबे चटणी तुपात नाही तेलात बनवतात (तसं काही लोक बनवतही असतील म्हणा, पण मी त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला गोळ्या मारत होतो. ते म्हणतात ना, "वासरात लंगडी गाय शहाणी!")
बिचारा मग तोंड लहान करून कढईत तेल टाकू लागला. "बस बस बस!", तेल खूपच जास्त दिसत होतं, म्हणून त्याला थांबवलं.
तितक्यात गण्यापण किचनमध्ये आला. गण्याला आम्ही कूक ऑफ द मिलेनियम म्हणतो, पण तरी मी त्याला चटणी बनवताना बोलावलं नव्हतं, नाहीतर माझी चटणी त्याने त्याच्या नावाने खपवली असती. तसाही आता तो न बोलवता आलाच होता आणि माझा मुडही गेला होता. तरी प्रोजेक्ट माझा होता म्हणून मी माघार घेतली नव्हती... ओह, लेट्स फोकस ऑन चटणी!
मग थोड्या वेळात तेल गरम झालं (माझ्या मते आमच्या रुमवर सुर्यफुलाचं तेल असतं, म्हणून आम्ही घेतलेलं तेल सुर्यफुलाचंच असेल अशी अपेक्षा..) मी लगेच पूर्ण लगदा तेलात टाकणार तोच गण्याने मला थांबवलं. (त्याची दादागिरी सुरू झाली.) त्याने तुच्छतेने माझ्याकडे पाहिलं ("मुझे ऐसी नजर से देखा, ऊस जालीम ने......." असं काहीतरी गाणं मला आठवलं). त्या नजरेचा अर्थ होता, "सिंह आलाय, सर्व माकडांनी बाहेर निघा!" (पण काहीही झालं तरी या धाग्याचा धागाकर्ता मीच व्हायचं ठरवलं होतं, म्हणून मी 'जाण्याची नोंद' घेतली नाही. बिचारा गोम्या मात्र केंव्हाच 'लॉग आऊट' झाला होता.) मग त्याने आधी थोडी राई तेलात टाकली. पण तेल खूपच गरम झालं होतं (माझ्या तळपायाची आग तेलात गेली होती वाट्तं...) राई तड्तड्तड करत फुटायला लागली, मला वाटलं राई एकटी ईतकी ऊष्णता सहन करू शकणार नाही; (थर्मल ईंजिनियर जागा झाला होता.....) म्हणून घाईघाईत एक डबा उघडला आणि त्यातून २-३ चमचे भरून तेलात टाकले..... बिचार्या राईला सोबती मिळाला होता. (ते काय आहे, गृपमध्ये बोलणे बसले तर जास्त त्रास नाही होत, हा कॉलेजचा अनुभव! म्हणून मी राईसाठी गॄप तैयार केला.)
गण्या बिचारा "थांब थांब..." म्हणून ओरडत होता, पण माझ्या प्रोजेक्टचे हक्क मी कोणालाच देणार नव्हतो. (तो कॉर्पोरेटचे नियम माझ्यावर लादू पाहत होता, पण आम्ही कॉलेजवालेही काही कमी नाहीत हे त्याला मी दाखवून दिलं.)
नंतर आम्हाला कळलं की तो राईला दिलेला जोडीदार धन्या होता. (म्हणजे मी २-३ चमचे धने टाकले होते.)
मग आम्ही राई आणि धनूवर प्रेमाने त्या लगद्याचा वर्षाव केला. (जणू गण्याच्या राईचं मझ्या धनूशी लग्न होत होतं. पण मुलाकडची बाजू माझीच, हे विसरू नका!)
तेवढ्यात गण्या ओरडला, "सरोटा दे."
"?"
"उलथनी दे."
"??"
"कलथनी दे."
"???"
"कलथा दे."
"????"
शेवटी गण्याने त्याला लागत असलेलं उपकरण स्वतःच घेतलं. (वाचकांना कळलंच असेल, त्याला काय पाहिजे होतं! मला त्याने ते हातात घेतल्यावर कळलं.)
मी म्हटलो, "oh, Spatula!" गण्या आता बोलू शकत नव्हता. (ते म्हणतात ना, "सहन होत नाही आणि सांगताही येत नाही." अशी परिस्थिती त्याची झाली होती.
मग थोडा वेळ परतून झाल्यावर मला कळलं की तेल तर फार कमीये. (लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त लोक जेऊन गेले होते वाटतं!) म्हणून मी परत तेल टाकलं ते पण गायब! मग तिसर्यांदा शेवटचं तेल टाकलं, (नंतर आलेल्या पाहुण्यांना ऊपाशी परत पाठवायचं ठरलं. या कवीच्या कल्पना आहेत, विसरलात काय?) मग गण्या परतत राहिला काही वेळ.
नंतर आम्हाला आठवलं की त्यात मिरची पावडर तर टाकलीच नाहीये, बीटचा लाल रंग पाहून विसरलो होतो. मग मी माझ्या खानदेशी अंदाजाने (म्हणजे थोडी जास्तच) मिरची पावडर टाकली. आणि कुठूनतरी हळद पडली, पाहिलं तर गोम्या मध्येच ऊगवला होता, आणि वधूवरांना आशिर्वाद हळदीच्या रूपात देत होता. (त्याला हळद टाकतात हे कसं माहित, असं तुम्हालाही वाटलं का? आम्हाला तर वाटलं होतं. नंतर कळलं, त्याने डिस्कवरी चॅनलवर हळद अनेक रोगांवर औषध आहे अशी डॉक्युमेंटरी पाहिली होती...... अच्छा! म्हणजे हळद औषध म्हणून टाकली होती तर..... असो!)
तेवढ्यात गण्याला गरम मसाला टाकायची इच्छा झाली, तो मसाला शोधू लागला..... गोम्याला एका डब्यावर मसाला लिहिलेलं दिसलं आणि दिला त्याने टाकून न विचारता. (हे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे, न बनवता स्वतःला प्रोजेक्ट मॅनेजर समजायला लागतात..... पण ते नाहीयेत असंही त्यांना योग्य रितीने दाखवून दिलं जातं.... तसं गण्यानेही त्याला दाखवून दिलं. कसं ते नका विचारू.......) बिच्चारा गोम्या! पुन्हा परत गेला.
नंतर कळलं की तो मसाला गरम मसाला नव्हता, पावभाजी मसाला होता. (एका हिशोबाने चांगलंच झालं म्हणा! कारण आता चटणीवर केवळ गण्याचा अधिकार ऊरला नव्हता. आणि पावभाजी मसाल्याची चव तर अप्रतिम लागत होती.)
थोडा वेळ ते मिश्रण गण्याने परतलं, आणि प्रोजेक्ट लाँच करण्यासाठी तैयार होता.

चटणी तर जब्बरदस्त झाली होती, पण कोणीच फोटो काढले नव्हते. म्हणून क्षमस्व..... पण चटणी नेमकी कोणी बनवली ते अजुनही कळंत नाहीये. तर कशी वाटली चटणी ते जरूर कळवा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका...... ओह, हे यू ट्युब नाहीये....... असो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गोम्यावर खूश झालो, तसा गोम्यालाही आत्मविश्वास येत होता, लग्गेच त्याने तुपाचा डबा हातात घेतला. (हे पाहून मला त्याची लायकी कळली. मी गारूड्याला सिंहाची शिकार करायला सांगत होतो.--- Lol

भारिये... Happy

Rofl Rofl Rofl

बीटगाजराचा ज्युसापासून चटणीपर्यंतचा प्रवास भारीच लिहिलाय! Lol सगळे पंचेस भारी!

सर मी तुमच्याकडे शिकवणी लावू का? Lol

धन्यवाद जुई & अक्षय! मी मीठ टाकायला विसरलोय त्यात... (त्याची पण एक स्टोरी होणार होती. घाईत टाकायला विसरलो! आणि आता modify होत नाहीये.) म्हणजे मी चटणीत टाकली होती, पण लिहायला विसरलोय...

डोंट वरी
आम्ही चटणी ताटात वाढून घेताना सोबत मिठ सुद्धा घेतलंय Wink

सॉरी अदिति! पण रेसिपी लिहिण्याची स्फुर्ती येईपर्यंत चटणी पोटात गेली होती, म्हणून फोटो नाहीत. Sad