लग्नाचा क्लास

Submitted by मंगला मराठे on 25 June, 2018 - 03:32

लग्नाचा क्लास मंगला मराठे
लग्न करायचं आहे करा. कुणीही कुणाशीही करा. लग्न ही एकच गोष्ट अशी आहे की त्याला कुठलीही एलीजीबिलीटी नाही. कायद्याने वयाची अट घातली आहे तेव्हढीच. ( तीही किती पाळली जाते ते होणाऱ्या बालविवाहांच्या आकडेवारीवरून दिसतच) बाकी लग्नाचे वय झाले की लग्न करायला मोकळे. सांसारिक जबाबदाऱ्या पेलण्याची कुवत, नातेसंबंध सांभाळण्याची क्षमता आहे की नाही हे बघण्याची गरज नसते. फार फार तर पोटापुरते तरी पैसा मिळतो की नाही ते बघावं. बाकी सगळ आपोआप होतं. अहो म्हणतात ना, पाण्यात पडलं की पोहता येतं. आपली सगळी भिस्त या एका वाचनावर असते. चांगल पोहता आल नाही तरी गटांगळ्या तर खात राहाल. पण आपण हे विसरतो की पोहता येत नसेल तर माणूस बुडतो. पट्टीचा पोहणारा सुद्धा पाण्याचा अंदाज घेतो आणि मगच उडी मारतो.
लग्न म्हणजे ‘मनोमिलन’ ‘लग्नाने फक्त एक स्त्री आणि एक पुरुषच नाही तर दोन कुटुंब जोडली जातात.’ असे सुविचार आपण ऐकतो, वाचतो. पण ही वाक्य आपल्याकडे फक्त सुविचारापुरतीच राहतात. प्रत्यक्षात लग्न जमवताना यातल्या कशाचाच फारसा विचार केला जात नाही. बहुतेक लग्न वरवर दिसणाऱ्या निकषांवरच ठरतात. ज्यांचे सूर नशिबाने जुळतात किंवा ज्यांना समोर असेल ते हसत हसत स्वीकारता येते त्यांचे संसार ठीक होतात. ज्यांना ते जमत नाहीत त्यांचे संसार बेसुरे होतात किंवा त्यांचा घटस्फोट होतो. आजच्या वाढत्या घटस्फोटांमागे लग्न ठरविण्याची ही पद्धत हे एक मोठे कारण आहे.
पूर्वी पत्रिका जुळली, मानपान पटले की लग्न पक्क. मुलांच्या पसंती ना पसंती चा प्रश्नच नव्हता. नंतर मुलामुलींच्या पसंतीला थोडे थोडे महत्व येऊ लागले. त्यातही पालकांच्या सगळ्या चाळण्या लागल्या की मग दिसायला आवडते/तो की नाही इतपतच. फारतर अर्धाएक तास एकमेकांशी बोलून निर्णय घेऊन टाकायचा. आज जी मुलं उपवर आहेत त्याच्या पालकांपैकी बहुतेकांची लग्न अशीच ठरली आहेत. आता शहरी शिक्षित समाजात तरी ही पद्धत जवळ जवळ मोडीत निघाली आहे. आता या वर्गात मुलांची पसंती ही सर्वात महत्वाची. आणि तीच अवघड गोष्ट वाटू लागली आहे. आधुनिक जीवनशैली, व्यक्तिवाद आणि पारंपारिक गोष्टी याचा गोंधळ प्रत्येकाच्या मनात आहे. सगळच हवंसं वाटतं आणि त्यामुळे काहीच आवडत नाही असं होतंय. फक्त मुलांच्याच नाही पालकांच्या मनातही हा गोंधळ आहे.
मुलाचे पालक आपण नक्की काय भूमिका घ्यावी या विचारात असतात. आपला वरपक्ष आहे याचे अप्रूप असते. पण आता काळ बदललाय हे सुद्धा वाटत असते. मुलीच्या पालकांना आपला वधुपक्ष आहे ही जाणीव सुटत नाही पण लग्नानंतरही आपल्या मुलीच्या आयुष्यात काहीही बदल होऊ नये. आपल्या लेकीने आपले बोट कधीच सोडू नये असेही त्यांना वाटते.
मुलींना डॅशिंग मुलगा हवा पण तो आपल्यावरपण हुकुमत गाजवेल का अशी शंका येते. एकत्र कुटुंबाचे मोहक चित्र भुरळ घालते. पण सूर जुळले नाहीत तर काय होईल अशी भीती वाटते. पदव्या पगार हे काही सहजीवनाचे निकष नाहीत हेही पटत आणि नंतर इगो प्रॉब्लेम होईल याची भीतीही वाटते.
मुलांना स्मार्ट कर्तबगार उच्च शिक्षित पगारदार गुहकुत्यदक्ष बाहेर आधुनिक घरात पारंपरिक – नातलगांना खुश ठेवणारी अशी मुलगी मिळावी असे वाटते. त्यामुळे काही मुली त्यांना काकूबाई वाटतात, काही माजोऱ्या वाटतात.
शिवाय मोठ्या शहरात जागेचा प्रश्न आहे, प्रवासाचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हा एक मोठा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. आधुनिक संसाधने , माध्यम यांच्यासह आधुनिक जीवनशैली जगात आहे. दुसऱ्या बाजूला मनावर पारंपारिक संस्कार झालेले आहेत. दोन्ही संस्कृती त्यांना खुणावत आहेत. अनेकदा मुलांना स्वत:ला नेमके काय हवे आहे? काय भावते आहे तेच माहित नसते आपण निवडीसाठी जे निकष ठरवले आहेत त्याची दुसरी बाजू आपल्याला झेपणार आहे का?याचाही विचार करावा लागतो. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू बघताना दुसरी आपोआप आपल्या हाताला टेकलेली असते. ती झटकून टाकता येत नाही. खरे तर ही दुसरी बाजू अनेकदा लक्षातच आलेली नसते.
लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी या सर्व दृष्टीने विचार करण्याचे तंत्र आणि मंत्र मुलांना मिळायला हवे. सांसारिक जबाबदाऱ्या, नात्यांची केमिस्ट्री याची ओळख व्हायला हवी. ज्यामुळे मुले त्यांच्या अपेक्षा, निकष आणि त्यांची प्राथमिकता ठरवू शकतील. लग्न हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय असतो. त्या बाबतीत केवळ नशिबावर हवाला टाकून अंधारात उडी टाकणे नक्कीच बरोबर नाही. लग्न हे जिगसॅा पझल सारखे आहे. एकमेकांशेजारी सहज जुळले जाईल असे तुकडे सेजारी ठेवले तर चित्र सलग नितळ दिसते तसे तसे स्वत:ला ओळखून अनुरूप व्यक्तीची निवड केली की सहजीवन निकोप होते. त्यासाठी प्रत्येकाला विवाहपूर्व मार्गदर्शन मिळायला हवे. विवाहपूर्व मार्गदर्शन हे आजही लोकांना फॅड वाटते. पण निवडीचे योग्य निकष ठरविण्यासाठी, लग्नानंतरचे नातेसंबध समजून घेण्यासाठी ते औपचरिक शिक्षणा इतकेच महत्वाचे आहे. नव्हे शिक्षणाच्या अधिकारासारखा तो प्रत्येक तरुण तरुणीचा आणि तिच्या पालकांचा अधिकार आहे. आजच्या क्लासच्या भाषेत सांगायचे तर लग्नाच्या क्लासला सुद्धा प्रत्येकाने जायला हवे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users