गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला

Submitted by बेफ़िकीर on 23 June, 2018 - 12:32

गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला
====

जपता जपता मने.. लागते धाप मला
सोसत नाही भलेपणाचा शाप मला

एकांताशी मी सगळे शेअर करतो
तोही सांगत बसतो त्याचे व्याप मला

काहीही आठवले की हे जाणवते
उगीच आला त्यावेळी संताप मला

घरातल्यांना एक ओळ समजत नाही
तशी प्रसिद्धी मिळते वारेमाप मला

सुटका केली अपुऱ्या स्वप्नांची साऱ्या
उडवावा वाटत होता थरकाप मला

कुठे जायचे आहे हे ठरवूच कसे
कुठून आलो समजेना अद्याप मला

ह्या दुनियेच्या दंशांवरती जगलो मी
तरीच दिसला नाही कोठे साप मला

मी, मी झालो, इतर कुणी नाही झालो
ह्याचाही वाटावा पश्चात्ताप मला?

तुझे काय ते बघ बाई, मी काय म्हणू?
गझला तर सुचतातच आपोआप मला

अनेकदा हे मनात येते जगताना
केव्हा मिळेल मरण्याचा उ:शाप मला

कुणी मनाने सुंदर असले तर कळवा
करायचे आहे एखादे पाप मला

बाजूला झिंगाट लागलेले होते
ऐकवता आला नाही आलाप मला

कसल्या जगात जगण्याचे बंधन आहे
कसे बनावे समजेना अश्राप मला

'बेफिकीर' होऊन गाजतो जगात.. पण..
घरी लायकी दाखवतो हा बाप मला

====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users