गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला

गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला

Submitted by बेफ़िकीर on 23 June, 2018 - 12:32

गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला
====

जपता जपता मने.. लागते धाप मला
सोसत नाही भलेपणाचा शाप मला

एकांताशी मी सगळे शेअर करतो
तोही सांगत बसतो त्याचे व्याप मला

काहीही आठवले की हे जाणवते
उगीच आला त्यावेळी संताप मला

घरातल्यांना एक ओळ समजत नाही
तशी प्रसिद्धी मिळते वारेमाप मला

सुटका केली अपुऱ्या स्वप्नांची साऱ्या
उडवावा वाटत होता थरकाप मला

कुठे जायचे आहे हे ठरवूच कसे
कुठून आलो समजेना अद्याप मला

ह्या दुनियेच्या दंशांवरती जगलो मी
तरीच दिसला नाही कोठे साप मला

Subscribe to RSS - गझल - सोसत नाही भलेपणाचा शाप मला