स्वराज्याची मुहूर्तमेढ:- तोरणा/प्रचंडगड

Submitted by राजेश्री on 22 June, 2018 - 00:21

Screenshot_2018-06-22-22-40-31-006_com.android.browser.pngतोरणा
कळसुबाई शिखराच्या चढाई नंतर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले एक एक करीत बघण्याचे योजले तेंव्हा सर्वप्रथम निवडला तो किल्ले तोरणा.वयाच्या १६ व्या वर्षी मासाहेब जिजाऊ नी मनात फुलवलेली अस्मितेची ज्योत,केलेल्या स्वाभिमानाच्या संस्कारातुन शिवाजी महाराजांच स्वराज्याच्या दिशेने पडलेलं पाहिलं पाऊल म्हणजे तोरणा. पुण्यासारख्या परिसरात रहात असताना पुण्याच्या पश्चिमेकडील असलेल्या उंचच उंच डोंगररांगा राजांना आवाहन करू लागल्या .राजांनी सम विचारांचे पुष्कळ स्नेही सोबती जोडले .स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडण्यास शिवाजी महाराजांना हा प्रदेश सोयीस्कर वाटला .सवंगड्याना सोबत घेऊन राजे दऱ्याखोऱ्यात फिरू लागले . रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली गेली. आणि पहिला किल्ला स्वराज्यात आला तो तोरणा . गडावर तोरण जातीची भरपूर झाडी असल्याने त्याचे नाव तोरणा पडले . परंतु शिवाजी महाराजांनी त्याच्या विस्ताराला आणि,रौद्रतेला साजेसे प्रचंडगड असे नाव ठेवले.शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी हा एक अतिशय बळकट किंवा अभेद्द गड होय . त्यांनी ठेवलेलं प्रचंडगड हे नाव कसे साजेसे आहे याची प्रचिती किल्ल्यावर चढताना आणि फिरतानाही येते.
यावेळी तोरणा सर करायला निघालेलो आम्ही तीन शिलेदार होतो. मी ,निर्मला आणि आमची पुण्यात राहणारी मैत्रीण वैशाली.आदल्यादिवशी पुण्यात राहून सकाळी ७ वाजता स्वारगेट गाठलं .खूप वेळ बस नाही म्हटल्यावर वडाप नी कात्रज मग पुन्हा कात्रज वरून नसरापूर आणि तिथून वेल्हे गाव अस मजल दलमजल करीत तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो तेंव्हा सकाळचे १०.३० वाजले होते . ऊन मी म्हणत होते .ऑक्टोम्बर महिना असल्याने उन्हाच्या झळानी अक्षरशः अंग भाजून निघत होत. आणि त्या तोरण्याच्या पायथ्याशी आम्हा तिघींशिवाय कुणी चिटपाखरू ही दिसत न्हवतं. पडलेल्या पायवाटेवरून गडाकडे मार्गक्रमन करू लागलो . थोड्या अंतरावर पुढे दोन वाटा होत्या उजवीकडची वाट गडाच्या बाहेर निघेल अस वाटलं आणि आम्ही डाव्या वाटेने पुढे चालत राहिलो साधारण अर्धा की. मी . चालल्यावर आम्हाला वाट चुकल्याचे लक्ष्यात आलेच शिवाय आम्ही गडाच्या पश्चिमेला चढाच्या ठिकाणी अडकलो आता एक तर सरपटत खाली उतरून पुन्हा मूळ वाटेवर परत जायचं किंवा हा चढ चढून वर जायच हा पर्याय होता . आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने चढावरून वर जायचं अस ठरवत पुढे जाऊ लागलो . तरी तिथे उंच वाढलेल्या गवतामुळे तो उतार म्हणावा तितका त्रीव्र वाटत न्हवता बुडत्याला काडीचा आधार या म्हणी प्रमाणे गवताच्या काड्या मुठीत पकडून आम्ही तो अवघड चढ spidarman प्रमाणे चढत पार केला आणि गडावर चढायच्या मुख्य वाटेवर दाखल झालो. आणि मग लक्ष्यात आलं की वाट चुकल्याने चढाच्या मार्गे येऊन आम्ही गडाचा खूप मोठा पल्ला पार केला आहे.
आता आम्हाला गडावर चढणारे आणि पायउतार होणारे इतर गिर्यारोहक दिसू लागले त्यामुळे वाट चुकण्याचा आता काही धोका न्हवता अर्धा पाऊण तास नागमोडी वाटा पार करीत असताना अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. निर्मला माझ्या व वैशालीच्या खूप पुढे होती.वैशाली पहिल्यांदाच गड चढाई करीत असल्याने ती खूप दमलेली होती आपण न थांबता अविरत चालत राहू अस समजावत आम्ही धापा टाकत का होईना पुढे पुढे जात होतो.
शेवटच्या अवघड टप्प्यावर अजस्त्र असे कातळ होते त्या बाजूला लावलेले लोखंडी रेलिंग उखडले असल्याने त्याचा काही फायदा न्हवता वैशाली तो चढ अगदी सहज खारुताई सारखी सरसर चढून गेली . हात आणि पाय ठेवायला खाचा नसल्याने वरती सरकायला मला हात किंवा पायात जोर देता न आल्याने मी अक्षरशः त्या अभेद्य कातळाला लटकून राहिले होते .धड वरही जाता येत न्हवते आणि खालीही .मी आधारासाठी वैशालीला हाका मारून दमले. मनाचा हिय्या करून असेल नसेल तेवढी सर्व ताकद एकवटून हातावर जोर देऊन कातळ पार केले. आणि नकळतच स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाली. या दोन तासांच्या चढाईत गढाच्या रौद्रतेची जाणीव झाली. वरून खाली बघितलं कि आपण हा चढ चढून आल्याचं पटत न्हवतं .... खुद को कर इतना बुलंद या शेर मधील आता इतक्या उंचीवर आल्यावर गधे अब नीचे उतरेगा कैसे या ओळीची आठवण झाली .
आता गडावरची एक एक ठिकाण दृष्टीस पडू लागली सुरवातीला बिनीचा दरवाजा लागतो . त्या पुढे काळ्या दगडात घडवलेला मजबूत असा कोठी दरवाजा लागतो. त्या शेजारी शिवाजी महाराजांनी बांधलेलं तोरणजाईच मंदिर आहे तिथल्या थोडीशी पडझड झालेल्या बुरुजावर चढलं कि वेल्ह्यापासून ते गड चढलेली पूर्ण वाट दिसते. आजूबाजूचा परिसर न्याहाळताना निसर्गकवींच्या कविता आठवू लागतात.तसंच पुढे मार्गक्रमण करीत आम्ही गढाच्या मुख्य मेंगाई देवीच्या मंदिराजवळ आलो . त्या मंदिरात मेंगाई,हनुमान यांच्या मुर्त्या आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे . आम्ही गेलो तेंव्हा जवळपास ५० च्या वर परदेशी पर्यटक त्या मंदिरात भाकरी,पिठलं,भात याचा आस्वाद घेत होते. त्यांच्या बरोबर अंध असणारी आपल्या भारतातील मुले होते . मी कुतूहलाने विचारले तर ते कोणत्या तरी N G O मार्फत आले होते.मला त्या अजस्त्र कातळाची आठवण झाली त्यावरून या अंध मुलांना कसं आणल असेल याचं आश्चर्य वाटलं.
जवळपास हवेशीर जागा बघून आमच्या मम्मीने आदल्या दिवशी दिलेली चटणी,भाकरी,कांदा याची शिदोरी आम्ही तिघीनी पण अगदी आवडीने खाल्ली . मला घोड्यावरच चणे खाऊन भूक भागवणाऱ्या आणि घोड्यावरच क्षणभर झोप घेणाऱ्या संताजी आणि धनाजीं ची आठवण झाली. आम्हीही जेवून क्षणभर विश्रांती घेऊन गडाचा तो प्रचंड विस्तार बघण्यासाठी रवाना झालो.
मंदिरापासून पूर्वेकडे चालत गेल्यावर भेल बुरुजावर पोहोचलो त्या बुरुजावरून झुंझार माचीचे दृश्य फारच सुंदर दिसते. पश्चिमेला बुधला माचीचा सुळका दिसतो . तिथे आम्ही खूप सारे फोटो काढले. खरतर तिथलं रौद्र सौंदर्य कॅमेऱ्याच्या कक्षेत बसतच नाही .या ठिकाणी फोटो साठी उभारल्यावर माझ्यापासून अगदी इंच भर अंतरावर असलेल्या दरीची जाणीव निर्मालाने अक्षरशः ओरडून करून दिली आणि मी खाली बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली.खरंच निर्मालाच लक्ष्य नसतं तर माझा दरीत तोल गेला असता.ते आठवलं तरी अजून अंगावर काटा येतो.
जवळपास 3 वाजून गेले होते त्या मुळे आता इतर ठिकाणे बघून अंधार पडायच्या आत खाली उतरु उतार त्त्रीव्र आहे अस मी निर्मालाला सांगत होते. तो पर्यंत तिने काही मुलांना झुंझार माचीकडे जाताना बघितलं व आपण तिथे जाऊन येऊया अस ती म्हणाली. मी कशाला अस विचारलं तर म्हणाली मुख्य ठिकाणच बघायचं नाही तर गडावर येऊन काय उपयोग अस बोलता बोलताच तिथे लावलेल्या लोखंडी शिडीवरून ती झुंझार माची साठी रवाना झाली . त्या लोखंडी शिडीवरून उतरणे म्हणजे दरीतच अधांतरी उतारण्याजोग होत आणि एवढ धाडस करायला नको असं माझं एक समजूतदार मन सांगत होत. तोपर्यंत निर्मला अगदी फुलपाखरासारखं अलगद खाली उतरून निम्म्या अंतरावर पोहचली सुद्धा. वैशाली मला म्हणाली सुद्धा राजश्री खूपच धोक्याचं आहे ते निदान तू तरी जाऊ नकोस.मी हताश पणे उभी होते आणि माझ्या मनात झुंझार हा शब्द उमटला आणि मी खाली दरीकडे न बघता लोखंडी शिडी उतरले सुद्धा ,तिथून पुढे गेल्यावर लक्ष्यात आलं खरा कस तर हा काळाभोर दगडाचा अजस्त्र कातळ उतारण्यामध्ये आहे . पाय ठेवायला एकही खाचं नसणारा हा कातळ एक सलग होता . निर्मला दुरून माझ्यावर लक्ष्य ठेऊन होती. मी तिला विचारलं तू कशी गेलीस खाली,मी कस येऊ सांग ,तर म्हणाली माझ्या अंदाजाने आले तुला येता येणार नसेल तर माग फिर तिचंही बरोबरच होत कारण हाताचा आधार आणि पायाच गणित चुकलं कि साक्ष्यात यमदेव तिथे रेडा घेऊन हजर. पण तरीही (या तरीही ला काहीच संदर्भ न्हवता तरीही) तो कातळ मी उतरले, मनात भीती आणि आनंद पहिल्यांदा एकत्र कधी नांदला असेल तर तर झुंजार माचीचा अवघड टप्पा पार केल्या क्षणी , झपाझप पायऱ्या चढून झुंझार माची वरील झेंडा जेंव्हा हाती आला तेंव्हा तो क्षण काही वाटण्या न वाटण्याच्या पार पोहचला होता.निर्मला म्हणाली,मला माहित होत तू येणार .आणि आलीस . आम्ही ते अनमोल क्षण फोटो मध्ये टिपून घेतले आणि पुन्हा त्या कातळाशी वर चढण्याची झुंज द्यायला भिडलो. रणरागिणी निर्मला खाली आली तशी वरही कातळावर तिची ती एकटी चढली. नेपोलियन बोनापार्ट जरी त्याच्या dictionary मध्ये अश्यक्य हा शब्द नाही म्हणत असला तरी तो अजस्त्र कातळ वर चढून जाण्याची श्यक्यता मला शून्य वाटत होती. वरून निर्मला तू हात दे मी वर ओढते तुला अस म्हणत असली तरी माझ्या शरीराचा ७०% तरी भार तोलायला हवा होता. कातळावर बुटाच्या आतून अंगठा व बोटे याचा भार देऊन मी निम्मा कातळ पार केला एका हाताने तो दगड घट्ट धरून दुसरा हात निर्मला कडे सोपवला अन तिने क्षणातंच मला सुळकन वर ओढल तो कातळ पार झाला हे मला पटतच न्हवतं. या भीतीच्या क्षणावर मात करीत आम्ही ते क्षण फोटो द्वारे टिपून घेतले.सरसर लोखंडी सळीवरून वर आलो .त्या क्षणी मी जमिनीवर अंग झोकून दिले ...अन मनात विचार आला आपण हे करू शकलो ...झुंझारपणे.... मी निर्मलाच्या अतीव झुंझार पणाला हि दाद दिली. पण इथून पुढे असलं खूळ धाडस सुरक्षेची सर्व साधने असल्यावर करण्याचा हि पण केला.
बुधला माची साठी पुन्हा येऊ म्हणत गडावरून पायउतार झालो. तोरणा किल्ल्याबद्दल जेम्स डग्लस या इंग्रजाने म्हंटले आहे," सिंहगडास जर सिंहाची गुहा म्हंटले तर तोरण्यास गरुडाचे घरटे म्हंटले पाहिजे" त्या घरट्यापर्यंत आम्ही तीन शिलेदार झुंझार पाने पोहचलो होतो.
जवळपास ७ वाजले फोन ला नेटवर्क आल्यावर लगेच मम्मी चा फोन .तिला किल्ला सर करून खाली आल्याचे सांगताना आनंदाचे भरते आले होते . मला म्हणाली काय मग राजे किल्ला सर केला तर पुढच्या हालचाली काय? मी तिला म्हणाले आता निर्मला ठाण्यात जाऊन ठाणेदारी करेल मी उद्या कोल्हापूरला जाऊन अंमलदारी करेन. यायला लागलेय इस्लामपूरला . आणि पुन्हा एकदा त्या प्रचंडगडाला नजरेत सामावून घेत.स्वराज्यात दाखल झालेल्या पहिल्या शिलेदाराला वाकून नमस्कार केला आणि शिवरायांची पायधूळ कपाळी लावत जड अंतःकरणाने त्याचा निरोप घेतला ते पुन्हा भेटण्यासाठीच.
।जय जिजाऊ।जय शिवराय।Screenshot_2018-06-22-22-40-00-930_com.android.browser.pngScreenshot_2018-06-22-22-40-00-930_com.android.browser.pngScreenshot_2018-06-22-22-39-49-773_com.android.browser.pngScreenshot_2018-06-22-22-40-16-545_com.android.browser.pngScreenshot_2018-06-22-22-40-06-025_com.android.browser.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users