क्षण वेचताना-2

Submitted by व्यक्त अव्यक्त on 21 June, 2018 - 13:03

केसर रंगी स्तब्ध तरंगी

ती येते,
उन्हाच्या पावलांनी.
पायउतार होते.
सावल्यांच्या पायघड्या बनतात.
हळुवार झुळूक चवर ढाळते.
ती
"सांजवेळ".
ऊन निवळताना मऊसूत असं पसरत जातं साऱ्यावर. नरम उबेचा पोशाख लेऊन, नुकत्याच फुललेल्या अनवट कळीसारखं उमलून आलेलं.
सकाळी पाकळीपाकळीने पसरलेलं हे ऊन संध्याकाळी हजार स्पर्शानी माखून जाऊन अंगांगात कोमटसर मखमली झालेलं असतं. दिवसाचं असणं साजरं करता करता स्वतःचं
ऊनपण विसरलेलं.
अश्या वेळी सावल्या सारे सारे तीक्ष्ण बहाणे सोडून देत मिश्किल बनत जातात. पावलांना फुटलेलं सावलीचं झाड धावत असतं दूरवर. विसरलेल्या पाऊलखुणांचा मागोवा घेत. साऱ्या वाटाना जणू परतीची आस लागलेली.ओळखीच्या, बिनओळखीच्या गावाला निघालेल्या या वाटा परतणाऱ्या उन्हाच्या हातात हात मिळवत विभोर बनून जातात.
दिवस ओसरताना आपल्याकडे काही मागत नाही, अन दिल्याघेतल्याचा हिशोबही सांगत नाही. दिवस फक्त सोबत देतो, परत जाताना ती काढूनही नेतो. तिला फक्त तिचीच सोबत उरलेली असताना ती तिच्याशीच व्यक्त होते. दिवसभर आलेलं साचलेपण, अवघडलेपण सोडून रिती रिती होते.
विझत विझत जाताना ओथंबून येणं जसं क्षितीजाच्या स्वभावात आहे तसं तिच्या सोबतीत तिचं अनेक रंगछटांनी बहरून येणं
तिच्या स्वभावात आहे. माणसांचे स्वभाव असेच असतात नाही का, निसर्गाच्या कुठल्यातरी घटकाचा स्थायीभाव असणारे. कुणी झाड बनतं तर कुणी त्याची सावली, कुणी टेकाड बनत आकाशाला साद देत देत जगून घेतं, तर कुणी पायथ्याशी तळं बनून आकाशच खोल उराशी जपून ठेवतं . सोपे सोपे संदर्भ कोडी घालून समजावत मग संधिकाल येतो. शक्यता व कल्पनांचे पाऊलठसे जुळवत नवी स्वप्नं रेखाटायला मदत करतो.
संधिकाल अलिप्त असतो. सुखाचा कल्लोळ व्हावा असेही त्यात काही नाही, दुःखाचा आक्रोश व्हावा असाही तो क्रूर नाही. जे नेतो, मापट्यातून नेता नेता थोडं सांडत नेतो, तरी पाठी वळून पहात नाही .
मग क्षितिजाच्याही पापण्या अलगद मिटू लागतात. नेत्र कडांवर रेखलेले जर्द काजळ भोवताली पसरू लागते. प्रकाशाच्या दीपकळ्यांवरून शहारलाटा उठून विरून जातात. प्रकाश व काळोख यांच्या सीमेवर अद्भुत असं जग आकाराला येतं. त्या जगात ती अथवा मी, कुणीच कुणाचं नसतं. दोघी स्वतः चा शोध घ्यायला, दोन वेगवेगळ्या दिशांनी बाहेर पडलेल्या. दृश्यादृश्यतेच्या पलीकडचं काही वेचू पहाणाऱ्या. शब्दही धूसर होत असताना काही गूढ अचल शब्दातीत सांगणाऱ्या. असं थोडं थोडं कोड्यात कोडं असताना ग्रेस आठवतात, कातरवेळेत लपलेलं, मोठं विलक्षण असं कारुण्य आठवतं.
शब्दांनी हरवून जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
जे काही थोडे उरले आहे, ते निसटू न देण्याची , आशेच्या कडा धूसर होत असताना अज्ञाताच्या ओसरीवर दिवा लावण्याची ही वेळ. दुरून येणारा अनाहत स्वर ऐकण्यासाठी प्राण कंठाशी यावे अशी सांद्र व्याकुळता.
हुरहूर लावून जाणारी.मोकळं मोकळं करणारी. मग कुणी कवी म्हणून जातो.
मी जाता जाता तुला बोललो काही
ते असते सारे खरेच ऐसें नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ
तिनेच घेतले वदवून काहीबाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults