कॉकटेल

Submitted by अरभाट on 19 June, 2018 - 02:26

लंडनला शिकत असतानाची गोष्ट. दुपारचे कॉलेजचे तास झाले होते. हवेत नेहमीप्रमाणे गारठा होताच. आधी उष्मागतिकी (थर्मोडायनामिक्स) आणि मग लगेच आधुनिक भौतिकी (मॉडर्न फिजिक्स) असे तास सलग झाल्याने डोकी जड झाली होती आणि सर्वांनाच काहीतरी दिलासा हवा होता. हो-नाही करता करता आम्ही ७-८ जणांनी कॉलेजमधील क्रॉसलंड्स या पबकडे कूच केले. (ब्रिटनमध्ये विद्यापिठ/कॉलेजांमध्ये हॉटेले, पब इ. असतात व ते बहुतेक वेळा 'नॅशनल युनिअन ऑफ स्टुडंट्स' या ब्रिटीश विद्यार्थी संघटनेद्वारे चालवले जातात.) मी तेव्हा बिअर, वाईन इ. प्रकारांना हळूहळू सरावत होतो. अभियांत्रिकीला असताना कधीच अपेयपान केले नव्हते. इंग्लंडला बहिणीकडे बिअरचे स्टाउट, लागर, ड्राफ्ट इ. विविध प्रकार, वाईनचे विविध प्रकार चाखायला सुरूवात केली. चवींमधील विभिन्नता थोडीथोडी कळायला लागली होती. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळा मद्यपान हे झिंगण्यासाठीच करायचे असते हे मुळीच डोक्यात नव्हते. मला आस्वाद घेण्यात जास्त रस होता. त्यामुळे नवनवीन प्रकार चाखत होतो, त्या प्रकारांबद्दल थोडीफार माहिती मिळवत होतो, जेणेकरून आस्वाद घेताना आणखी मजा येईल. तर आम्ही क्रॉसलंड्समधील काउंटरपाशी गेलो आणि मी तिथे उपलब्ध असलेल्या बिअरांमधून आतापर्यंत न घेतलेली एक बिअर निवडली. माझ्याशेजारी ग्रेस होती. तिने काउंटरमागच्या माणसाला 'शँडी विथ सेव्हनप' सांगितली. मी नाव पहिल्यांदाच ऐकले, त्यामुळे उत्सुकतेने आता ही नक्की काय घेते हे बघू लागलो. बारमनने एका ग्लासात साधारण तीन चतुर्थांश बिअर आणि उर्वरित भाग सेव्हनपने भरला आणि ग्रेसच्या हाती सोपवला. लागरचा पिवळट करडा रंग सेव्हनपच्या पांढुरक्या रंगाने थोडा फिकट झाल्यासारखा वाटला. मी लगेच बारमनला एका स्ट्रॉची मागणी केली आणि टेबलपाशी आलो. टेबलपाशी आल्यावर ग्रेसची परवानगी घेऊन तिच्या ग्लासातील पेय स्ट्रॉद्वारे चाखून पाहिले. लागरच्या कडवट, मिरमिरत्या चवीला सेव्हनपच्या गोड मिरमिरत्या चवीची जोड मिळाली होती आणि लागरच्या थोड्या कडक 'पश्चातस्वादा'ला (आफ्टरटेस्ट) सेव्हनपमधील लिंबाच्या आंबटसर चवीची किनार लाभली होती. एकंदरीत मिश्रण छान ताजेतवाने करणारे वाटले आणि मी तसे ग्रेसला बोलूनही दाखवले. तिचे म्हणणे की स्वाद ताजातवाना करणारा तर असतोच पण अनेकांना बिअरचा कडवटपणा आवडत नाही. त्याला कमी करण्यासाठी कुठलेही लिंबूवर्गातील (सिट्रस) आंबटगोडसर पेय टाकले की एकूण मिळून 'पिण्यास सुसह्य बिअर' तयार होते. माझी कॉकटेलशी तोंडओळख झाली ती अशी.

कॉकटेल हा पदार्थ व त्याचबरोबर हा विशिष्ट शब्द अश्या दोन्हींच्या जन्मकथा काळाच्या पडद्याआड धूसर झाल्या आहेत. जगातील कॉकटेल कुठे निर्माण झाले हे सांगणे खरोखर अवघड आहे, कारण शेवटी कुठल्याही मद्ययुक्त दोन किंवा अधिक पेयांचे मिश्रण एवढीच कॉकटेलची व्याख्या असल्याने जगातील अनेक समाजांमध्ये, संस्कृतींमध्ये हे घडले असेल. पण कॉकटेलचा पहिला कागदोपत्री उल्लेख १४व्या शतकात आढळतो तो ब्रॅगेट या नावाने. ब्रॅगेट हे मीड व एल अश्या दोन मद्यप्रकारांचे मिश्रण होते. शेकडो विविध मद्यप्रकार व त्यांना निर्मिण्याच्या पद्धती शोधून काढण्याचे श्रेय जर युरोपिय समाजाकडे जात असेल तर आधुनिक कॉकटेल निर्माण करण्याचे व ते जगभर लोकप्रिय करण्याचे श्रेय अमेरिकनांकडे. ब्लडी मेरी, पिनाकोलाडा/पिन्याकोलाडा, लाँग आयलंड आइस टी, मार्गारिटा, सेक्स ऑन द बीच इ. अनेक 'क्लासिक' कॉकटेले निर्माण करण्यामागे आणि ती जगभर लोकप्रिय करण्यामागे प्रामुख्याने अमेरिकन बारटेंडरांचा सहभाग होता असे दिसून येते. खुद्द कॉकटेल या शब्दाची व्युत्पत्ती वादग्रस्त आहे आणि त्याबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. कॉकटेल हा शब्द सर्वप्रथम १८०३ सालच्या एका अमेरिकन शब्दसंग्रहात आढळतो. त्याचा अर्थ 'मद्य (स्पिरिट), बिटर व साखर यांचे मिश्रण' असा आढळतो. कालमानाने ही व्याख्या अधिक व्यापक होत गेली आणि आता कॉकटेलचा अर्थ 'कमीत कमी एक मद्ययुक्त पेय, इतर पेये, इतर पदार्थ यांचे एकत्रित मिश्रण' असा झाला आहे.

१९व्या शतकात कॉकटेलांनी अमेरिकेत बाळसे धरायला सुरूवात केली. शीतकरणाच्या पद्धतींमध्ये होत जाणारी प्रगती व बाजारात झालेली बर्फाची सहज उपलब्धता या दोन बाबींनी कॉकटेलांना तांत्रिकदृष्ट्या मदत केली. पण कॉकटेलांवर खरे संस्कार केले ते अमेरिकेत त्या शतकात येणार्‍या स्थलांतरितांच्या लोंढ्यांनी. १९व्या शतकात हा देशच बाळसे धरत होता. अटलांटिकच्या लाटेलाटेबरोबर स्थलांतरित, निर्वासित पूर्व किनार्‍यावर धडकत होते; पूर्वेकडून हळूहळू पश्चिमेकडे सरकत होते. देश हळूहळू वसवला जात होता, नवनवीन भूभाग अक्षरशः पादाक्रांत केला जात होता... आणि हे करणारे लोक कुठले होते? तर अमेरिकेत युरोप, आशिया, आफ्रिका या खंडांमधील विविध वंशाच्या, धर्माच्या लाखो प्रतिनिधींचे देशव्यापी संमेलनच जणू भरायला लागले होते.... आणि जेव्हा हे लोक अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याबरोबर आपापली संस्कृती घेऊन आले. त्यात अर्थातच त्यांच्या खाद्यसंस्कृतीसुद्धा अन् इथेच कॉकटेले खर्‍या अर्थाने घडायला सुरूवात झाली. आयरिश, स्कॉटिश त्यांच्याबरोबर स्कॉच घेऊन आले, इटालिअन व फ्रेंच त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या वाईन घेऊन आले. प्रत्येक समाज त्यांच्याबरोबर खास त्यांची अशी पेये घेऊन आला आणि समाज एकमेकांत मिसळू लागला तशी पेयेसुद्धा मिसळली. अर्थातच, लोक आले तसे मद्यनिर्मितीच्या प्रक्रियांचे ज्ञानसुद्धा इथे येऊन पोहोचले. पण काही वेळा असे दिसून आले की जी मद्यनिर्मितीची पद्धत मायदेशाच्या हवामानाला योग्य होती ती अमेरिकेत मात्र थोडी बदलावी लागली. शिवाय जो कच्चा माल मायदेशी सहज उपलब्ध होत असे तो अमेरिकेत मिळत नसे, तेव्हा तर मूळ मद्यच बदलावे लागले. यातून केंटकीसारख्या राज्यांत स्कॉच व्हिस्कीचे भावंड 'बर्बन' (bourbon) जन्माला आले, कॅलिफोर्नियात वाईनमळे उभे राहिले. एवढेच नव्हे, तर एतद्देशीयांच्या (अमेरिकन इंडियन) मद्यप्रेमाशी पाव्हण्यांच्या मद्यप्रेमाने जुळवून घेतले आणि मग पाव्हण्यांच्या रुचिप्रदेशात 'टकिला'ने (tequila) आपला तंबू (की टेपी?) ठोकला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॉकटेलांचे लोण पसरू लागले. त्याला मोठा हातभार लावला हॉलिवूडच्या सिनेतार्‍यांनी. चित्रपटांमध्ये, मासिक-वृत्तपत्रांमधील छायाचित्रांमध्ये मोठमोठे तारे-तारका जेव्हा कॉकटेल पिताना दिसू लागले, तसे कॉकटेलला प्रतिष्ठा लाभू लागली. खुद्द अर्नेस्ट हेमिंग्वेसारखा थोर लेखक कॉकटेलांचा मोठा चाहता होता आणि आता 'क्लासिक' मानली गेलेली काही कॉकटेले लोकप्रिय करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. बारमध्ये जाऊन कॉकटेल पिणे 'फॅशनेबल' झाले. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेत झालेल्या महामंदीच्या (ग्रेट डिप्रेशन) काळात तिथे दारूबंदी राबवली गेली. पण तरीसुद्धा कॉकटेले मागे पडली नाहीत. उलट तेव्हा मिळणार्‍या बेकायदेशीर, कमी प्रतीच्या मद्याचा गंध व चव झाकण्यासाठी अनेक बारटेंडरांनी त्या मद्यात इतर पेये, विशेषतः फळांचे रस मिसळायला सुरूवात केली आणि अनेक लोकप्रिय कॉकटेलांचा जन्म झाला. हे कॉकटेलांचे लोण युरोपातही पसरले आणि तिथून हळूहळू जगभर. आता कॉकटेले जगात सर्वत्र मिळतात. एवढेच नव्हे, अनेकांचे आवडते असे खास कॉकटेलसुद्धा असते.

स्थूलमानाने कॉकटेलांचे ३ प्रकार पडतात. हे तिन्ही प्रकार कॉकटेले कश्या प्रकारे बनवले जात आहेत यावर आधारित आहेत. पहिला प्रकार म्हणजे 'हलवून तयार केलेले अर्थात शेकन' (shaken). दुसरा म्हणजे 'ढवळून तयार केलेले अर्थात स्टर्ड' (stirred) आणि तिसरा प्रकार म्हणजे 'थर देऊन तयार केलेले अर्थात लेयर्ड' (layered).

बाँडचे चित्रपट आठवा. बाँड कुठल्यातरी बारमध्ये/हॉटेलमध्ये/कोणाच्या तरी घरी असतो आणि त्याला विचारले जाते, "काय मग, काय घेणार?" म्हणजे खरेतर या प्रश्नाच्या इंग्रजी आवृत्तीची कल्पना करा. (नाहीतर या प्रश्नाला 'चहा' एवढेच कंटाळवाणे उत्तर संभवते!) मग बाँड रूबाबात 'मार्टिनी' असे म्हणत असतानाच त्याला मध्येच तोडून एखादी तरणीबाँडीण 'शेकन, नॉट स्टर्ड' असे म्हणत त्याला (व प्रेक्षकांना) शेकवून टाकते. यातले 'शेकन' म्हणजे कसे काय करतात बुवा? तर कॉकटेले हलवून तयार करण्यासाठी बाजारात एक खास 'शेकर' मिळतो. हा पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला असतो व याचे तीन भाग असतात. खालचा स्टीलचा मोठा कप, यात पेये घालतात. या भागाला स्टीलचेच एक झाकण असते. हे झाकण दोन भागांचे असते, एक स्टीलची गाळणी व त्यावर एक छोटा स्टीलचा कप. खालच्या कपाच्या तोंडावर गाळणी बसते आणि या गाळणीवर स्टीलचा छोटा कप. अश्या प्रकारे हा शेकर पूर्ण सीलबंद होतो. उदाहरणादाखल बाँडचीच 'शेकन मार्टिनी' करण्यासाठी व्होडका व व्हर्मूथ (vermouth) अशी दोन मद्ये लागतील. व्हर्मूथ म्हणजे ड्राय (= चवीला कडूसर, या वाईनमध्ये साखरेचे प्रमाण अत्यल्प असते) व्हाईट वाईनचाच एक प्रकार असतो. ड्राय व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. यात कधीकधी जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे बाजारात अनेक ब्रॅण्ड उपलब्ध आहेत. यात 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकाच चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची. (एकत्र करायची नाही). यातही ठरलेले प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ व ५६ मिली व्होडका असे आहे. मग शेकरचा कप भरून बर्फ घ्यायचा. मग त्यात व्हर्मूथ टाकायची. पण हिचा उद्देश त्या बर्फाला 'ओले' करणे एवढाच. त्यामुळे कपावर गाळणी लावायची आणि लगेच ती व्हर्मूथ गाळून टाकायची. आता शेकरमधल्या त्या व्हर्मूथ-ओल्या बर्फात व्होडका टाकायची. मग गाळणी-झाकण लावून शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. हे हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पाहिजे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे. 'मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार! आता एक गंमत सांगतो. मार्टिनीची जी मूळ कृती आहे ती 'घुसळून तयार केलेली' म्हणजे स्टर्ड आहे. हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने अल्कोहोल जास्त उडून जाते. (बहुतेक त्यामुळेच बाँडला शेकन पाहिजे असते, कारण त्याला मद्य घेतोय असे दाखवायचे तर आहे, पण नशा कमी पाहिजे, जेणेकरून शत्रूला फसवलेही जाईल आणि त्याच्या कामात अडथळा येणार नाही.) त्यामुळे अस्सल मार्टिनीप्रेमी 'स्टर्ड' मार्टिनी घेतात. त्याची कृती वरीलप्रमाणेच, फक्त व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळायची. याचा उद्देश त्या व्होडकाला थंड करणे एवढाच. मग परत थंड ग्लासात गाळली की 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन' तयार!

एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की बनवण्याची पद्धत कॉकटेलप्रेमींसाठी किती महत्त्वाची आहे ते. ढवळून केलेली कॉकटेले अंमळ 'कडक' असतात. आपला मूड जरा जास्तच खराब असेल तर तो 'फिक्स' करायला अशी कॉकटेले उत्तम! असेच एक फिक्स करणारे कॉकटेल म्हणजे 'रम फिक्स'. अर्ध्या लिंबाचा रस, चमचाभर कोमट-गरम पाणी आणि चमचाभर साखरेचा चुरा एका 'ओल्ड फॅशन्ड (टम्ब्लर)' ग्लासात एकत्र करून ढवळायचे. (अगदी मऊसूत पावडरीसारखी पिठीसाखर वापरण्याऐवजी साखर थोडी कुटून घातलेली जास्त चांगली. अशी साखर पावडरीसारखी असली तरी थोडी खरबरीत लागते.) मग ग्लास बर्फाने भरायचा आणि साधारण ७० मिली 'लाइट रम' घालून परत ढवळायचे. शेवटी त्यात पाहिजे असल्यास लेमनचा एक पातळ काप घालायचा. हे झाले रम फिक्स. लाईट रम म्हणजे पारदर्शक असणारी रम, उदा. बकार्डी सुपिरिअर, बकार्डी सिल्व्हर. (बकार्डी रिझर्व्हा, बकार्डी गोल्ड किंवा ओल्ड मंक या नकोत.) यातील पहिल्या तीन घटकपदार्थांबरोबरच पुदिन्याची ३-४ ताजी पाने घालून ढवळले की 'रम स्मॅश' कॉकटेल तयार होईल. तसे पाहता कुठल्याही कडक पण छोट्या आणि बर्फाबरोबर तयार केलेल्या कॉकटेलला 'फिक्स' म्हणतात. फिक्स हे नेहमी 'ओल्ड फॅशन्ड' ग्लासात दिले जातात. वरील कृतीत रमऐवजी जिन वापरली तर ते 'जिन फिक्स' होईल.

काही महिन्यांपूर्वीच कुटुंबियांबरोबर बंगळूरसहल झाली. 'थँक गॉड इट्स फ्रायडे (टी.जी.आय.एफ.)' या जगप्रसिद्ध हॉटेलांची एक शाखा तिथे सुरू झाली आहे. ते पाहिल्यावर बहिणीने व मी उत्साहात येऊन 'मोठी चेन आहे, प्रसिद्ध आहे, तिथे कॉकटेले चांगली मिळतात, जेवण चांगले असते' इ. इ. हवा केल्यामुळे इतर सर्व कुटुंबियांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली आणि शेवटच्या दिवशी आम्ही तिकडे मोर्चा वळवला. तिथे गेल्यावर मी 'बी फिफ्टी टू (B 52)' नावाचे एक कॉकटेल मागवले. आता हे कॉकटेल म्हणजे 'शॉट' आहे... जसा सचिन मारतो तसा किंवा सचिन एकदा मैदानावर स्थिर झाल्यावर प्रतिस्पर्धी टीमच्या डोक्याला लागतो तसा. शॉट प्रकारची कॉकटेले नेहमी 'शॉट' ग्लासात येतात आणि हे शॉट खरोखरच सर्वार्थाने सचिनच्या शॉटसारखेच असतात. अतिशय कडक, नक्कीच 'प्रेक्षणीय', रोमांचक, पण 'केवळ क्षण, दोन क्षणात संपून जाणारे'! या बी-५२ नावाचीसुद्धा एक गंमत आहे. बी-५२ हे एक युद्धासाठीचे विमान आहे. हे आकाराने अवाढव्य असते आणि त्याचे मुख्य काम शत्रूच्या व्यूहात्मक ठिकाणांवर बॉम्बवर्षाव करणे. आता कॉकटेल असते अगदी छोटे पण बॉम्बवर्षाव मात्र तेवढाच जबरदस्त. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शॉट हे एका घोटात संपवायचे असतात, किंबहुना एका घोटात संपवता येतील इतकेच असतात ते. मागवलेली पेये येईपर्यंत ही पार्श्वभूमी सोबतच्या मंडळींना सांगून झाली होती, त्यामुळे माझ्याबरोबरच इतरसुद्धा बी-५२ची वाट बघत होते. ते आल्यावर मी आमच्या वेटरला लायटर आणायची विनंती केली. तो अनुभवी असल्याने मला काय करायचे आहे हे त्याला लगेच कळले आणि तो हसून लायटर आणायला गेला. पण ती विनंती ऐकून इकडे टेबलवर मात्र वातावरण थोडे बदलले. 'लायटर? आता लायटर कशाला? काय पेटवणार आहेस? कशाला?' हे प्रश्न एकीकडे उत्सुकता, कुतूहल ते दुसरीकडे अस्वस्थता, गोंधळ, भीती इथपर्यंतच्या भावनांनी ओथंबून विचारले गेले. तोपर्यंत लायटर आला. वेटरने एका हातात माझा ग्लास घेतला आणि दुसर्‍या हातात लायटर पेटवून त्याची ज्योत तिरकी करून माझ्या ग्लासातील पेयाच्या पृष्ठभागाला टेकवली. टेबलावर आता सन्नाटा पसरला होता. ४-५ सेकंद ज्योत तशीच ठेवल्यावर अचानक पूर्ण ग्लासाच्या कडेने फिकट निळसर ज्योत दिसू लागली. कॉकटेलने पेट घेतला होता. ते पेटते कॉकटेल त्याने माझ्यासमोर ठेवले आणि एक स्ट्रॉ पुढे केला. त्यास नम्रपणे नकार देऊन मी तो ग्लास तसाच जळत्या कॉकटेलासकट तोंडाला लावला आणि एका घोटात ते रिचवून मगच खाली ठेवला. तोपर्यंत टेबलवरील किंकाळ्या/चित्कार विरून 'या आचरटपणाला पाहून धन्य व्हावे की ह्याला फटकावून काढावे' असे काहीसे विस्फारलेले भाव मंडळींच्या चेहर्‍यावर पसरले होते. म्हणूनच म्हणतो की शॉट प्रेक्षणीय असतो.... शॉट घेताना घेणारा प्रेक्षणीय आणि घेतल्यावर त्याला/तिला बघणारेच खुद्द प्रेक्षणीय!

काय असते या थरारक बी-५२मध्ये? यात असते कल्युहा (Kaluha), बेलीज (Baileys) आणि ग्रँड मार्निए (Grand Marnier) ही तीन मद्ये. कल्युहा हे मेक्सिकोमध्ये बनवल्या जाणार्‍या एका विशिष्ट उत्पादनाचे (ब्रॅण्ड) नाव आहे. कल्युहामध्ये कॉफी असते. थोडक्यात, हे कॉफीयुक्त गोडसर कडक मद्य आहे. अश्या गोड, विशिष्ट स्वादयुक्त कडक मद्यांना 'लिक्युअर' (liqueur) म्हणतात. (अनेकजण लिक्युअर-liqueur व लिकर-liquor यांत गल्लत करतात. हे दोन्ही विभिन्न मद्यप्रकार आहेत). लिक्युअर खूप विविध स्वादांमध्ये मिळू शकतात. कॉफी, ब्लॅककरंट (क्रेम डी कॅसी - creme de cassis), पेपरमिंट (क्रेम डी मेन्थे - creme de menthe) इ. जाता जाता, क्रेम डी कॅसी ही अगाथा ख्रिस्तीच्या जगप्रसिद्ध मानसपुत्राची अर्थात हर्क्युल पॉयरोची अतिशय आवडती लिक्युअर होय. बेलीज हे आयर्लंडमधील एका विशिष्ट उत्पादनाचे नाव आहे. ही अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय 'क्रीम लिक्युअर (cream liqueur)' आहे व आयरिश व्हिस्की आणि साय/दूध (खरोखरच!) हे तिचे मुख्य घटक होत. ग्रॅंड मार्निए हीदेखिल एक लिक्युअर असून तिला संत्र्याचा स्वाद असतो. हेसुद्धा एका विशिष्ट उत्पादनाचे नाव आहे. बी-५२मध्ये ही तीन मद्ये समप्रमाणात वापरायची. पहिल्यांदा शॉट ग्लासात कल्युहा ओतायची. मग त्यावर बेलीज, पण सावकाश! हे 'थरयुक्त कॉकटेल' आहे, आपल्याला थर रचायचा आहे हे ध्यानात ठेवूनच दुसरी ओतायची. सरतेशेवटी ग्रँड मार्निए मात्र ओतण्याऐवजी चमच्यानेच टाकली तर उत्तम! असे हे त्रिस्तरीय पेय एका घुटक्यात नुसतेच घेतले तरी काहीच प्रश्न नाही, पण तुमची पार्टी थोडी रंगीन, खुमासदार करायची असेल तर 'फ्लेमिंग बी-५२'ला पर्याय नाही. एक लायटर घेऊन त्याची ज्योत तिरकी करून ती कॉकटेलच्या संपर्कात येईल अशी धरायची. सर्वात वर असलेली ग्रँड मार्निए ४-५ सेकंदांत पेट घेते, पण घाबरायचे नाही. पेट घेते म्हणजे एकदम भस्सकन् पेट घेऊन भडका वगैरे मुळीच उडत नाही, तर हे फारच शांतपणे घडते. पूर्ण ग्लासाच्या कडेने आता अगदी फिकट निळी आणि मंद ज्योत दिसू लागते. आता हे जळते पेय पिण्यासाठी आपण स्ट्रॉ वापरू शकतो, पण मी व्यक्तिशः त्याच्या विरोधात आहे, कारण उष्णतेमुळे स्ट्रॉचे प्लास्टीक वितळायला मदत होते. तेव्हा तो ग्लास सरळ तोंडाला लावायचा. तोंडाला लावायच्या आधी अनेकजण ती ज्योत विझवतात आणि मगच पितात. पण मग त्यात जळते पेय पिण्याची मजा नाही. तर सरळ ग्लास तोंडाला लावायचा. हेच मी जेव्हा नवख्यांना सांगतो तेव्हा हमखास प्रतिक्रिया 'काही काय! तोंड भाजेल ना' अशी अविश्वासाची असते. त्यात खोच अशी की कॉकटेलने पेट घेतल्यावर ते लगेच प्यायचे. तोंड भाजण्याची शक्यता वास्तविकतः गरम पेयामुळे नसून त्याहीपेक्षा जास्त गरम झालेल्या ग्लासामुळे असते. लगेच तोंडाला लावले तर पेय फार गरम नसतेच. ते जळते तोंडात घेतले की ज्योत विझतेच, कारण वस्तुतः पेटलेली गोष्ट म्हणजे पेयातील अल्कोहोल. हे अल्कोहोल त्या पेयात ४०%च्या आसपास असते, त्यामुळे त्या ज्योतीचा जीव मुळातच फार नसतो. जळते कॉकटेल तोंडात गेले की विझतेच आणि कॉकटेलचा अंगभूत 'गरमपणा' आणि आगीचा 'गरमपणा' परस्परपूरक ठरून सुखद अनुभव येतो. शिवाय, त्यानंतर प्रेक्षकांचे विस्फारित, प्रभावित चेहरे बघण्याचा बोनस वेगळाच! यात गंमत अशी होते की नवखे लोक 'तोंडाला लावू की नको, लावू की नको' याच विचारात हातात ग्लास धरून चालढकल करतात. ग्लास जेवढा वेळ हातात पेटता राहतो, तेवढाच तो गरम होत जातो आणि त्यानंतर तोंडाला लावला की त्या तापलेल्या ग्लासाचा मात्र चटका बसतो. शिवाय, एवढा वेळ पेटते राहिल्याने त्यातील अल्कोहोल कमी होऊन नंतर अपेक्षित 'मजा'सुद्धा येत नाही. पण एक मात्र ध्यानात घेणे गरजेचे आहे. नाही म्हटले तरी हा थोडा आगीशी खेळच. तेव्हा जरा जपूनच!

आतापर्यंत आपण खूपदा विशिष्ट ग्लासांचे उल्लेख पाहिले. कॉकटेलचा 'शॉट ग्लास', मार्टिनीचा 'मार्टिनी ग्लास', रम फिक्सचा 'ओल्ड फॅशन्ड किंवा टंब्लर' इ. तेव्हा हे ध्यानात घेऊ की कुठले कॉकटेल कुठल्या ग्लासात द्यायचे हेसुद्धा ठरलेले असते, त्याचेही काही नियम अथवा आडाखे असतात. ग्लासांचे सर्वसाधारणपणे ९ प्रकार असतात –
शँपेन फ्लूट (champagne flute), मार्टिनी (martini), स्निफ्टर (snifter), पिल्स्नर (pilsner), मार्गारिटा (margarita), शॉट (shot), हायबॉल किंवा कॉलिन्स (highball or collins), ओल्ड फॅशन्ड किंवा टंब्लर (old-fashioned or tumbler), मोठा वाईन ग्लास (large wine glass). यातील काहींची नावे त्यातून दिल्या जाणार्‍या पेयाचीच आहेत, जसे की शँपेन फ्लूट, मार्गारिटा, मार्टिनी, शॉट, वाईन ग्लास. कुठल्या ग्लासात कुठले पेय द्यायचे हे ठरवण्यामागे व्यवस्थित विचार आहे.

शॅंपेन फ्लूट –
Flute_Glass.png
शॅंपेन आधारित सर्व कॉकटेलांसाठी हा ग्लास वापरावा. हातात धरताना ग्लासाची ती बारीकशी मान पकडायची. ही मान चांगली लांब असल्याने तळहाताचा व वरील ग्लासाचा संबंध येत नाही व ग्लासातील पेय हाताच्या उष्णतेने गरम होणे टळते. किंबहुना, ग्लास तश्याच पद्धतीने पकडणे अपेक्षित असते. गदा पकडल्यासारखे गच्च तळहातात पकडू नये. साधारणपणे अंगठा व शेजारील दोन बोटे ग्लास पकडण्यासाठी वापरली जातात. शँपेन आधारित पेये थंडगारच उत्तम असल्यामुळे ही सोय आवश्यक ठरते. म्हणजे सावकाश जरी प्यायले तरी पेयाचे तापमान हातांच्या उष्णतेने वाढण्याची भीती नाही. एवढेच नाही, तर हा ग्लास वर थोडा निमुळता होत जातो. या विशिष्ट आकारामुळे शँपेनमधील बुडबुडे अधिक काळ पेयातच राहण्यास मदत होते. (हे बुडबुडे निघून गेले तर शँपेन 'फ्लॅट' होते, जसे थम्सप किंवा कोकाकोलामधील बुडबुडे निघून गेल्यावर होते तसेच.)

मार्टिनी –
500px-Cocktail_Glass_(Martini).png
याला 'कॉकटेल ग्लास' असेही म्हणतात, कारण कॉकटेल म्हटल्यावर बहुतेकांच्या डोळ्यांसमोर या ग्लासाची प्रतिमा येते. याची रचनासुद्धा लांब मानयुक्त आहे आणि त्यामागचे कारणसुद्धा शँपेन ग्लासाप्रमाणेच आहे.

स्निफ्टर –
Snifter_Glass_(Brandy).png
स्निफ या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ 'वास घेणे, हुंगणे' असा आहे. स्निफ्टर ग्लास मुख्यत्वे ब्रँडी व ब्रँडी आधारित कॉकटेले घेण्यासाठी वापरला जातो. ब्रँडी हे असे मद्य आहे ज्याचा रसास्वाद घेणे केवळ जिभेपुरतेच मर्यादित नसून तिथे घ्राणेंद्रियाचेसुद्धा काम आहे. ब्रँडी हुंगत पिणे अपेक्षित असते, कारण तेव्हाच तिचे खरे स्वादग्रहण होते. या ग्लासाला अतिशय बुटकी मान आहे. पकडण्याची पद्धत म्हणजे मधले बोट आणि अंगठीचे बोट यांच्यामध्ये ग्लासाची मान असेल आणि हाताच्या तळव्यात ग्लासचा फुगीर भाग स्थिरावेल. थोडक्यात, ग्लासाचा आख्खा फुगीर भाग ओंजळीत धरायचा. इथे मार्टिनी व शँपेन ग्लासाच्या बरोबर उलटे होणे अपेक्षित आहे. ग्लासातील कॉकटेलला तळव्याची उष्णता सतत मिळत राहिली पाहिजे. यामुळे पेय गरम होऊन त्यातील अल्कोहोलची, विविध स्वादांची तरल वाफ तयार होते. ग्लासाच्या अतिशय निमुळत्या आकारामुळे ही वाफ ग्लासाच्या तोंडाशी दाटून येते. ही वाफ नुसती हुंगली तरी पेय न घेतासुद्धा पेयाची एक वेगळीच तरल अनुभूती येते. असे वास घेत पेय पिणे हा केवळ जिभेचा अनुभव न राहता वासाचाही तितकाच तीव्र अनुभव होतो आणि हे दोन्ही अनुभव परस्परपूरक ठरून पेयाचा स्वाद अनेकपटींनी वाढतो. तर असा हा अनुभूतीच्या पातळ्या विस्तारून पेय आपल्याला भिडवणारा स्निफ्टर. एकतर ब्रँडी हे कडक मद्य असल्याने ते हळूहळू शांतपणेच घ्यावे लागते. शिवाय, छोटे छोटे घोट घेत प्यायल्याने पेय अधिक काळ टिकते, तेवढा जास्त काळ हाताची उष्णता मिळत राहून पेयाचा स्वाद उत्तरोत्तर वाढत राहतो.

पिल्स्नर –
Pilsner_Glass_(Standard).png
हा ग्लास अनेकांना 'बिअरचा ग्लास' म्हणून माहिती असतो आणि ती योग्यच ओळख आहे. लागर (बिअरचा सर्वात जास्त प्रचलित प्रकार) या ग्लासात दिल्या जातात. त्याव्यतिरिक्त, 'सिंगापूर स्लिंग' हे लोकप्रिय कॉकटेल व तत्सम कॉकटेले या ग्लासात दिली जातात. सिंगापूर स्लिंगची कृती पुढीलप्रमाणे - साधारण ५६ मिली जिन, अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचाभर साखरेचा चुरा (नसल्यास पिठीसाखर चालेल) एका पिल्स्नर ग्लासात एकत्र करायचे. थोडे ढवळायचे. मग क्लब सोडा टाकायचा, पण ग्लासात वर थोडी जागा राहिल असे बघायचे. आता यापुढे ढवळायचे मात्र नाही, नाहीतर सोड्यातील वायू निघून जाईल. ती उरलेली जागा चेरी ब्रॅंडीने भरायची. पण ओतताना चेरी ब्रँडी वरच्यावर तरंगेल अशी ओतायची. शेवटी लिंबाचा एक पातळ काप टाकायचा. झाले सिंगापूर स्लिंग तयार. यात पाहिजे असल्यास एक चेरीसुद्धा टाकता येईल.

मार्गारिटा –
Margarita_Glass_(Welled).png
खास मार्गारिटा हे कॉकटेल देण्यासाठी हा ग्लास वापरला जातो. मार्टिनी ग्लासात व या ग्लासातील मुख्य फरक म्हणजे याचे अतिशय रुंद तोंड. मार्गारिटामध्ये 'सॉल्टिंग' आवश्यक असते. म्हणजे ग्लासाचे तोंड पेयानेच ओले करतात आणि उपडा करून मीठात बुडवतात. ग्लासाची कडा मिठाने माखून जाते आणि अश्याच ग्लासातून मार्गारिटा दिली जाते. घोटाबरोबर थोडेथोडे मीठ येते आणि स्वाद दुणावतो. रुंद तोंडामुळे मिठाने माखणे सोपे जाते. बर्‍याच वेळा मार्गारिटासाठी मार्टिनी ग्लाससुद्धा वापरला जातो.

शॉट –
Shot_Glass_(Standard).png
हा खास 'शॉट' कॉकटेले घेण्यासाठीचा ग्लास. मूर्ती लहान पण किर्ती महान! जळती कॉकटेले यात बनवत असल्याने याच्यात उष्णता सहन करण्याची शक्ती असते. शॉट हे अतिशय कडक कॉकटेल असते. ते एकाच घोटात प्यायल्यावर एक जबरदस्त सणक अंगभर दौडत मस्तकी जाते आणि त्या सणकेत ग्लास टेबलवर सहजपणे ठेवायच्या ऐवजी आपटला जातो. तेव्हा असा ग्लास दणकट असलेलाच बरा!

हायबॉल (किंवा कॉलिन्स) –
Highball_Glass_(Tumbler).png
हा आपल्या घरगुती वापरातसुद्धा असतो. याच्यात भरपूर पेय मावत असल्याने सावकाश पिण्याची कॉकटेले यात बनवली जातात. कॉकटेलांसाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा ग्लास हाच असेल. याच ग्लासाची थोडी अधिक उंच आणि थोडी अधिक अरुंद आवृत्ती म्हणजे कॉलिन्स ग्लास.

ओल्ड फॅशन्ड (किंवा टंब्लर) –
Old_Fashioned_Glass.png
हा ग्लास अनेकांना व्हिस्कीचा ग्लास किंवा 'ऑन द रॉक्स' पेयांचा ग्लास म्हणून माहिती असतो. पारंपारिकरित्या, व्हिस्की आणि तिचे अमेरिकी भावंड, बर्बन, देण्यासाठी हा ग्लास वापरतात. त्यामुळे अनेक व्हिस्की अथवा बर्बन आधारित कॉकटेलांसाठी वापरला जातो. रुंद असल्याने बर्फाचे ३-४ मोठे खडे आरामात मावतात आणि म्हणून 'ऑन द रॉक्स' पेयांना अतिशय सोयिस्कर.

मोठा वाईन ग्लास –
Wine_Glass_(Grande).png
हा रूढार्थाने कॉकटेल ग्लास नाही. तसे पाहता हा बराचसा मार्टिनी ग्लासासारखाच, पण आकारमान जास्त असल्याने भरपूर पेय माववण्यासाठी मार्टिनीऐवजी हा वापरता येतो.

हे वाचल्यावर अर्थातच मनात प्रश्न उभा राहतो की एवढे सारे उपद्व्याप नक्की कशाला? शेवटी, नाही म्हटले तरी केवळ नशेसाठीच ना? काय फरक पडतो जर हा ग्लास वापरायच्या ऐवजी तो ग्लास वापरला तर! खरं सांगू का? फक्त नशाच जर करायची असेल तर काहीच फरक पडणार नाही. किंबहुना, फक्त नशाच पाहिजे असेल तर ग्लासाची तरी काय गरज हो? पण मग केवळ नशा हाच माणसाचा उद्देश असता तर एवढे हजारो मद्यप्रकार मानवाने निर्माण केलेच नसते. आठदहा प्रकारांत काम भागलेच असते की. एवढे हजारो प्रकार, त्यांच्या निर्मितीच्या भिन्न भिन्न पद्धती, एवढेच नव्हे, तर कुठले पेय कधी सेवन करावे, कसे करावे याचेही काही आडाखे, काही प्रथा, काही रूढी आणि काही बाबतीत तर चक्क कडक नियमच! शेवटी फक्त बेताल अन् बेसूरच व्हायचे असते तर एवढे ताल-सूरबद्ध प्रयत्न केले असते का, असा प्रश्न माझ्या मनात राहून राहून उभा राहतो. 'ब्लू क्युरसाउ' घातलेली मार्गारिटा आठवते. टकिलाचा वनस्पतीजन्य जोरकसपणा, क्युरसाउतल्या संत्र्याची गोड-किंचितकडू थाप आणि ग्लासाच्या कडेला माखलेल्या मिठाचा 'आधी देऊ की नंतर' विचारत दिलेला उगाच-आपला धक्का... आणि या तिघांनी जुगलबंदी करत जिभेवर अचानक साधलेली सम! त्याच मार्गारिटाचा तो अप्रतिम, देखणा निळा रंग बघून 'मला अगदी याच रंगाचा टॉप शोधायचाय' असे जाहीर करून कॉकटेलाचे वेगवेगळ्या कोनातून फोटो घेणारी मैत्रीण मला आठवते. 'टकिला सनराइज'मधली लाल-केशरी-शेंदरी रंगांची अवाक करणारी एकमेकांतली उधळण अन् तीसुद्धा ग्लास तिरका झाला की बदलणारी! असे वाटते की आता कुठल्याही क्षणी त्यात न्हालेले सूर्यबिंब वर येईल! त्याच सूर्याचा पारा वर गेला असताना 'पिन्याकोलाडा'मधल्या चुरा केलेल्या बर्फाला हळूच बोटाने स्पर्श करण्याची अतोनात अनावर झालेली इच्छा... ती मात्र त्यातल्या अननसाच्या साक्षीने जिभेवरच पूर्ण झाली. ब्रँडी कॉकटेलच्या स्निफ्टरला ओंजळीत अक्षरशः कुरवाळणारा आणि मधूनच ग्लास तोंडाशी नेऊन घोट न घेता ग्लासातले पाघळलेले सोने नुसताच हुंगणारा दर्दी डोळ्यांसमोर येतो. किती वेळ तो एकच ग्लास घेऊन बसला होता बरे? यावर मित्राबरोबर पैज लावली होती ती त्याच्याकडून वसूल करायची राहूनच गेली. शिकागोच्या ऑपेरा थिएटरमध्ये 'कार्मेन' बघताना मध्यंतरात बाहेर फक्त 'मिमोसा' मिळत होते. कधीकाळी आपण व्यवस्थित, इस्त्रीयुक्त 'फॉर्मल' कपडे घालून, हातात शॅंपेन फ्लूट धरून, मिमोसाचा शँपेनजन्य मिरमिरता, हलका, आंबटसर स्वाद मुखभर वागवत ऑपेरावर चर्चा करू, एवढे उच्चभ्रू स्वप्नसुद्धा कधी पडले नव्हते!

कॉकटेल नावाची ही रस-गंध-स्पर्श यांची तिपेडी किती नजाकतीने आपण विणली आहे! त्यात घिसाडघाई उपयोगाची नाही. ही तर तबियतीने आस्वादण्याची गोष्ट आहे, फक्त ढोसून झिंगण्यासाठी नव्हे. शिकागोमधल्या एका संध्याकाळची आठवण अगदी रेशीमकोषातली. २१ किंवा २२ डिसेंबरचा दिवस असेल. विषयांचे तास नसले तरी प्रयोगशाळेचे काम आणि वर्गातील प्रोजेक्टचे काम दिवसभर चालू होतेच. प्रोजेक्टमधील आम्ही २-३ सहाध्यायी दिवसभर एकत्रच होतो. संध्याकाळ झाली आणि पॉलने त्याच्या घरी चलण्याचा आग्रह सुरू केला. त्याची मोठी बहीण सेरासुद्धा घरी येणार होती. बाहेर कडक थंड आणि ख्रिसमसचे उत्सवी वातावरण होते. शेवटी आम्ही पॉलच्या पास्त्याच्या आमिषाला बळी पडलो. आम्ही पॉलच्या घरी पोहोचलो तर सेरा आधीच पोहोचून तिने 'एगनॉग (eggnog)'ची तयारी सुरू केली होती. एगनॉग हे खास हिवाळी कॉकटेल. त्याचे घटक पदार्थ पाहिले तर लगेच कळेल की हे हिवाळ्यातच पिणे शक्य आहे - यात असतात अंडी (होय, अंडी!), भरपूर आणि दाट साय, कोन्यॅक (cognac) आणि बर्बन. शिवाय पाहिजे असल्यास दूध. असे हे दणकट पेय पारंपरिक ख्रिसमसचे पेय मानले जाते. सेराचे एगनॉग आख्या घराण्यात प्रसिद्ध आहे आणि तिला त्यासाठी नातलगांकडून आग्रहाचे आमंत्रण असते, अशी माहिती पॉलने साभिमान पुरवली. ते जेव्हा समोर आले तेव्हा प्रसिद्धीच्या कारणांचा पहिला अंदाज आला. ते जवळजवळ आपल्याकडील रबडीइतके घट्ट होते आणि पिण्यासाठी सेराने प्रत्येक कपात चमचा घालून दिला होता. टेबलभोवती जमून आम्ही अविश्वासाने त्या शक्तिस्रोताकडे पाहत असतानाच सेरा आणि पॉलने घसे खाकरले आणि एकसुरात गायला सुरूवात केली, "दोऽनाऽ नोबिऽस पाऽचेम... दोऽऽनाऽऽ नोबिऽऽऽस पाऽऽऽचेम पाऽऽऽचेम..." दोना नोबिस पाचेम (dona nobis pacem), अर्थात, 'आम्हांस शांती दे'. प्रभू येशूची लॅटिन भाषेतील प्रार्थना. ख्रिसमसकाळात विविध कुटुंबियांच्या घरी जाऊन एगनॉग बनवले की ही प्रार्थना म्हणण्याचा सेराचा जुना प्रघात. बाहेर शुभ्र थंडी, बर्फाळ रस्त्यांची शांतता आणि त्या शांततेच्या पोटातूनच आल्यासारखा, प्रभूकडे शांतीची आळवणी करणारा त्या दोघा भावंडांचा एकसूर-एकतान आवाज... त्यादिवशी एगनॉग चाखण्याआधीच सारे घर उबदार झाल्यासारखे वाटले. आता कळते, की देश, वेष, भाषा, धर्म, जात, पंथ, वर्ण असल्या वरकरणी जोखडांखाली असला तरी 'चला, आपण एकत्र येऊ, एकत्र खाऊ, एकत्र पिऊ' हा आग्रह करणारा माणूस मुळात इथूनतिथून सारखाच. 'ॐ सह नाववतु, सह नौ भुनक्तु'ने सुरू झालेले आवाहन शेवटी 'दोना नोबिस पाचेम'ने संपते याचे आता आश्चर्य वाटत नाही. जेवणाच्या सुरूवातीला 'नाम घ्या श्रीहरीचे' म्हणणारे आम्ही असो वा जेवणाच्या सुरूवातीला प्रभूचे आभार मानणारी प्रार्थना म्हणणारे सेरा-पॉल असोत, कृतज्ञतेची जाणीव तीच. त्याचबरोबर आता असेही वाटते की खरेतर खाण्यापिण्यामागे 'खाणेपिणे' हाच एकमेव उद्देश नसणार. केवळ पोट भरण्यासाठी चरणारी जनावरे आणि आम्ही यात मुख्य फरक तो काय? तर जाणीवपूर्वक योजन. जिथे शक्य असेल तिथे... रसास्वादांचेसुद्धा. असे वाटते की अजाण ते सजाण आणि सजाण ते सुजाण असा आमचा आलेख असावा. उत्तम जाण हीच आमच्या हरेक कृत्याची अधिष्ठान असावी. 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' याचा अर्थ आता मला थोडा थोडा कळू लागतो.

***

वरील लेख ऑगस्ट २०११मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहेर अन्नपूर्णा विशेषांकात पूर्वप्रकाशित. हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.
सर्व चित्रे विकिमिडियावरून साभार. सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow, फक्त त्या चवींची अनुभूती घेण्यासाठी कॉकटेल पिऊन पाहवेसे वाटू लागले आहे Wink

बाकी हा काय कसे प्यावे सांगणारा हा लेख चिनुक्स च्या काय आणि कसे खावे इतकाच रंजक झाला आहे

डोंबल बॅक.. कुठलातरी बॅक गेलेला लेख इथे उचलून आणलाय लेकानी, नवीन काही लिहायला नको.. Wink

काय सर कुठे हरवले होतात इतके दिवस, आता जरा जोमाने लिहायला सुरु करा बरं... ते टवणे मास्तर पण असेच एक लेख टाकून परत गायब झालेत..

पुण्यात अशा एखाद्या शास्त्रोक्त बारची नितांत गरज आहे.
जिथे योग्य ग्लासमधून योग्य पेय योग्य तापमानात वाढले जाईल.
त्यामुळे लेख ही पहिली पायरी असेल तर उत्तम.

झकास, फारच तपशीलवार आणि रंजक माहीती. मज्जा आली यार
बी५२ वाला किस्सा तर लई भारी.

खूप नविन माहीती कळाली. अजून आता पुढे लिहा की

वॉव! काय अभ्यास! काय अभ्यास!
जबरी..
ताबडतोब उठून एखादं कॉकटेल ट्राय करावं वाटतंय. (बाहेर पाऊस पड्तो आहे तरिही)

छान माहिती,
करून पाहण्याची ( पिण्याची) इच्छा झाली Happy

वा वा, मस्त!

वाइन्स पिण्याच्या ग्लासेसचंही शास्त्रआहे. किमान व्हाइट वाइनचा ग्लास काहीसा उंच आणि अरुंद आणि रेड्ससाठी ग्लॉब्युलर इतका थंब रूलतरी सहसा पाळलेला दिसतो रेस्टॉरन्ट्समध्ये.

हिम्या, गेले ते दिन गेले..

'शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत..' असा एक प्रतिसाद तिकडे न राहवून टाकणारच होतो, तेवढ्यात हे दिसलं. ते बरंच झालं एकुणात.

अर्भाटा, अजूनही ताटलीत मीठ घेऊन, मग ग्लासाच्या कडा ओल्या करून, मग ग्लास ताटलीत उपडा करून, मग त्यात दारू भरून- अशीच पितो रे. Proud (पार्श्वभूमी: मला असं करताना बघून या महाशयांनी 'अरारारारा, पार मारलंस रे त्या पेगाला' असा कुत्सित फिदीफिदी शेरा नोंदवलेला. मी न जुमानता स्वाहा करून टाकलेला. लय बरं वाटलं.

शास्त्र झालं. आता ते आधी बियर पिऊन, मग जरा मज्जा म्हणून एक व्हिस्की घेऊन, मग आणखी टाईमपास म्हणून बारवाल्या लोकांनी चिल्ड केलेली रेड वाईन नाईलाजाने पिऊन, मग आता काय करावं म्हणून नाईलाजाने ओल्ड मंक पिऊन केलेले किस्से पण लिही. Proud कॉलिंग टण्या.

सही लिहिलेस. तो माहेरमधे आलेला कल्ट लेख हाच आहे ना? अजून लिही. दुष्परिणामांवर (माहेरच्या नव्हे) लिवलेस तरी चालेल. पण लिही. दारूच्या किश्श्यांचं नीट डॉक्युमेंटेशन झालंच पाहिजे. शुद्धीवर आलेले किंवा शुद्धीवर अस्लेले किंवा आलो असं दाखवणारे लोक ते कधीच लिहित नाहीत हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे.

ग्लासांची शास्त्रशुद्ध माहिती सुरेख आहे.
मी दारू पित नाही पण सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, मॉकटेल वगैरे विविध आकारांच्या निमुळत्या सडपातळ ग्लासेसमधून पिण्यास मजा येते. अगदी लहानपणीही आमचे वडील आणि काका पिणारे असल्याने घरी त्यांचे विविध काचेचे ग्लास असायचे. मी त्या ग्लासात लिंबूसोडा किंवा फ्रिजमधील नुसते थंडगार पाणी बर्फ टाकून प्यायचो. त्यातही मजा वाटायची कारण ते काचेचे ग्लास. खरी क्रेझ त्यांची होती Happy

वरच्या यादित सिंगल माल्टच्या टुलिप शेप्ड ग्लासचा उल्लेख राहिला हे आवर्जुन सांगावसं वाटतंय. वर निमुळता होत जाणारा टुलिप शेप सिंगल माल्टचा अरोमा पर्फेक्टली चॅनल करुन, नोझिंग आणि त्या सोनेरी द्रव्याचा लहानसा घोट जिभेवर फिरवणे, या दोन भिन्न क्रिया एकाच वेळी साध्य करण्यास मदत करतो. यात तो अरोमा श्रेष्ठ कि नुकतीच जिभेने अनुभवलेली चव श्रेष्ठ, हा न सुटणारा तेढा पुढचे प्रत्येक घोट घेताना पडत रहातो...

(त.टी.: सिंगल माल्ट म्हणजे सिंगल माल्ट स्कॉच, ती हि स्पेसाइड असेल तर उत्तम. तसं बघायला गेलं तर सिंगल माल्ट स्कॉटलंडच्या बाहेर हि बनवतात, अगदि टेक्सस मध्ये सुद्धा. पण ते म्हणजे गोव्याची फेणी राजस्थानमध्ये बनवण्यासारखं आहे... Happy )

राज, सिंगल मॉल्ट भारतात सुद्धा तयार होते (पहा: अमृत). पण हा लेख स्पेसिफिकली कॉकटेल्स विषयी असताना, सिंगल मॉल्ट चा उल्लेख इथे ‘बसणार’ नाही, असं वाटतं.

ऑस्सम लिहिलंय. जबरदस्तं मज्जा आली वाचतांना. हॅट्स ऑफ कुतुहलाला, निरिक्षणाला आणि अभ्यासाला.

लंडन बद्दल लिहिलंय हायबॉल आणि कॉलिन्स बद्दल लिहिलंय आणि मग G & T कसं राहून गेलं महाराजा?

B52 सारखीच जबरदस्तं हिस्ट्री आहेना Gin & Tonic ला. विन्स्टन चर्चिलचं वर्ल्ड वॉरच्या वेळेसचं फेमस कोट आहे
“The G & T has saved more Englishmen’s lives, and minds, than all the doctors in the Empire.”
आणि सगळ्यात ईंट्रेस्टिंग म्हणजे G & T पहिल्याने भारतात बनवली गेली. ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीच्या सैनिकांनी भारतातच मलेरियाला फाईट करणारे ड्रग म्हणून तिचा वापर चालू केला. दुसर्‍या महायुद्धात कडाक्याच्या थंडीत न्युमोनियाच्या साथी सैनिकांच्या बराकींमध्ये पसरल्या असतांना G & T ने कैक जीव वाचवले..
हा ईतिहास ब्रिटिश मित्रानेच सांगितला, मला तेव्हा G & T ची चव फार 'स्पिरिटी' वाटली तर तो म्हणे G & T बनवायला ब्रिटिश नाही तर डच बारटेंडरच पाहिजे.

तुमचा लेख वाचून कितीही छान वाटले तरी खेदाने 'Today's Maayboli does not deserve you' असे म्हणावेसे वाटते.
(अवांतराबद्दल क्षमस्व.)

ग्लासेस ची माहिती आवडली.
बाकी दारु पित नै (आणि मॉकटेल्स फक्त हपिस ने क्वार्टरली टिम बजेट पार्टी दिली तरच ऑर्डर करायची असा आयटी मधला नियम आहे Happy )
पण ही ग्लासेस ची माहिती आणि प्रत्येक ग्लास त्या आकाराचा का याची मिमांसा संग्रही ठेवणेबल आहे.

~तुमचा लेख वाचून कितीही छान वाटले तरी खेदाने 'Today's Maayboli does not deserve you' असे म्हणावेसे वाटते.
(अवांतराबद्दल क्षमस्व.)

+१११

Pages