सिनेमा रिव्ह्यू - फर्जंद- अभिमानाचा पराक्रम

Submitted by अजय चव्हाण on 15 June, 2018 - 01:56

फर्जंद - अभिमानाचा पराक्रम

"इतिहासाची व्याख्या काय?" असा प्रश्न कुणी जर मला आधी विचारला असता तर मी शाळेत शिकवलेलं " भुतकाळात घडून गेलेल्या घटनेच्या क्रमाला इतिहास असं म्हणतात" अस सरळधोपट उत्तर दिलं असतं पण माझं सरळधोपट उत्तर "फर्जंद" पाहून आल्यानंतर थोडसं बदलेलं आहे कारण हा चित्रपट आपल्याला इतिहासाची नवी व्याख्या शिकवतो. इतिहास म्हणजे काय तर घडलेल्या नुसत्या घटना नाहीयेत तर इतिहास म्हणजे आपली संस्कृती,आपली वृती,संघर्ष आणि पराक्रमाची केलेली कसोटी,शौर्य आणि बुद्धीची शिकवणी आणि अजुन बरचं काही ते इथे शब्दात मांडता येणार नाही तर आपण वळूया फर्जंदच्या गोष्टीकडे..

महाराजांच्या राज्यभिषेकाला अवघं वर्ष बाकी आहे..संपूर्ण रायगडावर त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे..सगळीकडे चैतन्याचं,उत्सहाचं वातावरण आहे.. आपला राजा आता खर्या अर्थाने सिंहासानाचा राजा होणार ह्या कल्पनेनच सगळी प्रजा खुश आहे पण कुठेतरी अजुनही महाराजांना काळजी आहे आपल्या स्वराज्याची आणि आपल्यावर जीव ओवाळून टाकणार्या जनतेची आणि ह्याच काळजीने राजे थोडे व्यथित झाले आहेत आणि काळजीचं निराकरण फक्त एकच आणि ते म्हणजे पन्हाळागड जिंकणे..

पश्चिमेकडचा "पन्हाळा" हा महत्वाचा किल्ला मागच्या मोहीमेत ताब्यात घेण्यास अयशस्वी झाले होते आणि तो किल्ला आता आदिलशहाच्या ताब्यात आहे त्यामुळे आदिलशहाचे अत्याचार तिथल्या रयतेला सोसावे लागत आहे आणि वरून दक्षिणेचा द्वार म्हणून ओळखला जाणार हा किल्ला भौगालिकदृष्ट्याही खुपच महत्वाचा आहे कारण ह्याच भागातून दक्षिणेतले खासकरून विजापूरात तळ ठोकलेले काही मुघल व आदिलशहा मिळून कधीही स्वराज्यावर चढाई करू शकत होते परत पश्मिमेकडून अपहरण केलेल्या मराठ्यांच्या बायका कोकणात ह्याच पन्हाळामार्गे तिथल्या मुघल सरदारांना गुलाम म्हणून विकल्या जात असतं..रयतेचे अत्याचार थांबवणे व स्वराजांचे रक्षण ह्या दोन सहेतूने हा किल्ला जिंकण्याचा महाराजांचा मनसूबा आहे...

महाराजांचा हाच मनसूबा ओळखून महाराजांचा लाडका एकच ढाण्या वाघ कोंडाजी फर्जंद (अंकित मोहन) 3000,5000 नव्हे तर फक्त 60 मावळ्यांना सोबतीने कुठल्याही परिस्थितीत पन्हाळा जिंकवून देण्याचा विडा उचलतात मग मोहीमेची आखणी होती,आखणीप्रमाणे महाराजांचे खास गुप्तहेर बहर्जी नाईक (प्रसाद ओक) व त्यांचे साथीदार कामाला लागतात इकडे कोंडाजी फर्जंद आपली फौज तयार करायला लागतात..

इकडे बेशक खानला(समीर धर्माधिकारी) हमला होणार हा सुगावा आधीच लागलेला असतो आणि तो आदिलशहाला सतर्क व मदत करायला पन्हाळगडावर त्याची सोबत करतो व काही खास सरदारांची फौज देखिल तो विजापूरहून मागवून घेतो.

मराठ्यांच्या तुलनेत कित्येक पट असलेल्या मुघलांच्या फौजेला फक्त 60 मावळ्यासह कोंडाजी फर्जंद कशी झुंज देतात, झुंज देण्यासाठी फौज कशी तयार करतात,बहर्जी नाईक नेमकी कोणती कामगिरी करतात,इतर आणखी कुठले साथीदार त्यांना साथ देतात ही मोहीम कशी फत्तेह होते हे सर्व पडद्यावर पाहायला जास्त मजा येईल..

बाकी अंकित मोहनने कमाल केलीय अगदी.. त्याच कौतुक करावं तितकं थोडचं आहे..त्याचं दिसणं, त्याची पिळदार शरीरयष्टी,त्याचा रूबाब आणि मुख्य म्हणजे कुठलेच डायलाॅग (तेही प्राचीन मराठीतले) बोलताना त्याच अमराठीपण जाणवतं नाही...उच्चारावर खुप मेहनत घेतलेली आहे हे प्रकर्षाने जाणवतं...

अभिनयासंदर्भात बोलायचं झालं तर कुणाला डाव माप देताच येणार नाही.चित्रपटातल्या एकूण एक कलाकाराने वरचढ अभिनय केला आहे मग ते शिवाजीराजे साकारलेला चिन्मय मांडलेकर असो,बहर्जी नाईक साकारलेला प्रसाद ओक,बेशक खान साकारलेला समीर धर्माधिकारी असो वा केसरबाईच्या छोटेखानी रोलमध्ये असलेली मृण्मयी देशपांडे असो किंवा तानाजी मालुसरे साकारलेला गणेश यादव सगळ्यांनीच खुप ताकदीने आपआपली पात्रे साकारली आहे फक्त जिजाऊंचा रोल म्हणावा तितका मृणाल कुलकर्णी प्रभावित करू शकल्या नाहीत..

दिग्पाल लांजेकर कुठेच दिग्ददर्शनात नवखे असे वाटतचं नाही,प्रत्येक फ्रेम,वेगवेगळे अॅगेल्स अगदी व्यवस्थित व काळजीपूर्वक घेण्यात ते यशस्वी झालेत..वेशभुषाकार व मेकअप कलाकरांनी खुपच छान कामे केली आहेत त्यांचही कौतुक कराव तितकं कमीच आहे स्पेशली चिन्मयला शिवाजी महाराजाच्या रूपात घडवणं हे सोप्प काम नाहीये व कधी नव्हतचं..

संगीताच्या बाबतीत बोलायच झालं तर पार्श्वसंगीत सिनेमाला चपखल शोभलेलं आहे आणि "शिवबा मल्हारी" गाणं उत्तम जमलेलं आहे फक्त "तुम्ही येताना केला इशारा" ह्या लावणीत फारसा दम नाही बाकी एकदा हे गाणं ऐकण्यासारखं आहे..

मुख्य पात्रे :

जिजाबाई : मृणाल कुलकर्णी
शिवाजी महाराज : चिन्मय मांडलेकर.
कोंडाजी फर्जंद : अंकित मोहन
बहर्जी नाईक : प्रसाद ओक
केसर : मृण्मयी देशपांडे
बेशक खान: समीर धर्माधिकारी
तानाजी मालुसरे : गणेश यादव (पाहुणा)
गुंडाजी : आस्ताद काळे (पाहुणा)

का पाहावा : ऐतिहासिक विजयाच्या सोनेरी क्षणांचे "याचि देही याचि डोळा" साक्षिदार होण्यासाठी व पुन्हा एकदा छातीवर हात ठेऊन "मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा" हे जगाला ओरडून सांगण्यासाठी...

मानांकन : ***1/2

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पाहिला.
चित्रपटात दाखवलेली पन्हाळगडाच्या युद्धाची संपूर्ण कथाच गंडली आहे.
--
पन्हाळगडाची मोहिम शिवाजीने कोंडोजी फर्जद यांना नाहितर अण्णोजी दत्तोंना दिली होती, २ महिने गडाला वेढा घालूनही व जोडीला ३-३५०० फौज असूनही गड सर होत नाही हे पाहून कोंडोजी फर्जद यांना शिवाजी महाराजांनी अण्णोजी दत्तो यांच्या मदतीला पाठवले.

मुळात पन्हाळ गडावर जाताना कोंडोजी बरोबर किती फौज होती यांचा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक कागदपत्रात नाही, मात्र चित्रपटात स्वत: महाराज कोंडोजीला विचारतात "तुला किती माणसे देऊ तीन हजार, पाच हजार ?" त्यावर कोंडोजी उत्तर देतो "फक्त साठ !". अण्णाजीं बरोबर असणार्‍या तीन-साडेतीन हजार फौजेतून ६० माणसे निवडणुन कोंडोजीनी पन्हाळ्यावर हल्ला चढवला व गडाच्या मुख्यदारातून अण्णाजींनी फौजेसहीत प्रवेश करुन किल्ला सर केला याचा कसला ही उल्लेख चित्रपटात नाही.
-----------
इतर ही इतिहासाशी फारकत घेतलेल्या अनेक गोष्टी चित्रपटात आहेत.
-----
बटबटीत रंगाचे कपडे, मराठी बाणा वगैरे टाईप डायलॉग ऐकुन बघून डोके अक्षरशः उठते. एका चांगल्या विषयाची माती केलेय.
----
तो चिन्मय मांडले कोणत्या अँगलने शिवाजी दिसतो हा संशोधनाचा विषय आहे.

पन्हाळगडाच्या मोहीमेविषयी फारशी माहीती मलाही मिळाली नाही फक्त कोंडाजी फर्जंदबदद्ल थोडीफार माहीती मिळाली आणि ती माहीती चित्रपटाच्या कथेशी थोडीबहुत मिळतीजुळती आहे..

बाकी कर्मशिअल सिनेमा पाहताना फारशा अपेक्षा ठेऊच नये मुळी..

इंजोय करा आणि घरी या...

बाकी कर्मशिअल सिनेमा पाहताना फारशा अपेक्षा ठेऊच नये मुळी..

---- छत्रपती शिवाजी महाराजांना मुजर्‍यात नोटा उधळतांना दाखवले तर चालेल का?

इंजाय करुन घरी येणार का तुकडे होऊन?

भयाण आहे हा चित्रपट, इतक्या अतिरंजित आणि अतर्क्य गोष्टी घुसडल्या आहेत की बस.....

चांगल्या विषयाची माती केली. इतकेच म्हणू शकतो. इतका बेगडी आहे की यापेक्षा भालजींचा १९५२ सालचा छत्रपती शिवाजी कैक पटीने सरस आहे.

Oh no....
येत्या रविवारचा शो बुक केला आहे.

वत्सला, बरोबर मुले असतील तर काळजी नको 10-15 वर्षाच्या मुलांसाठी फुल्ल एंटरटेनमेंट आहे.
Infact त्याचा taregt ओडिएनस तोच वयोगट असावा असे मानण्यास दाट शक्यात आहे Happy

जास्त डोके लावू नका, बाहुबली ज्या सिरिअसनेस ने पाहिलात तसाच हा पहा, हाय काय नि नाय काय

<बाकी कर्मशिअल सिनेमा पाहताना फारशा अपेक्षा ठेऊच नये मुळी..

इंजोय करा आणि घरी या...>

<"इतिहासाची व्याख्या काय?" असा प्रश्न कुणी जर मला आधी विचारला असता तर मी शाळेत शिकवलेलं " भुतकाळात घडून गेलेल्या घटनेच्या क्रमाला इतिहास असं म्हणतात" अस सरळधोपट उत्तर दिलं असतं पण माझं सरळधोपट उत्तर "फर्जंद" पाहून आल्यानंतर थोडसं बदलेलं आहे कारण हा चित्रपट आपल्याला इतिहासाची नवी व्याख्या शिकवतो. इतिहास म्हणजे काय तर घडलेल्या नुसत्या घटना नाहीयेत तर इतिहास म्हणजे आपली संस्कृती,आपली वृती,संघर्ष आणि पराक्रमाची केलेली कसोटी,शौर्य आणि बुद्धीची शिकवणी आणि अजुन बरचं काही ते इथे शब्दात मांडता येणार नाही >

ओक्के.

धन्यवाद सिम्बा!
बकेट लिस्टमध्ये या सिनेमाचा ट्रेलर बघताना मोठी लेक म्हणाली होती की हा सिनेमा बघायला आवडेल! योग्य वयोगटातील व्यक्तीला ट्रेलर ने तरी आकर्षित केले आहे! Lol