आमचे बाबा

Submitted by nimita on 13 June, 2018 - 20:10

आज १२ जून. सतरा वर्षांपूर्वी याच दिवशी आमचे बाबा आम्हांला कायमचे सोडून गेले. आज इतक्या वर्षांनंतर अचानक बाबांबद्दल लिहावंसं वाटतंय!
मी कॉलेजमधे असताना कधी कधी बाबा उगीच आमची काळजी करायचे ना तेव्हा मी त्यांना सांगायची,” कशाला एवढं टेन्शन घेता बाबा? बी पी वाढेल तुमचं.” तेव्हा ते म्हणायचे ,” जब तुम बाप बनोगी तब पता चलेगा।” त्यावर मी चेष्टेत उत्तर द्यायची,” फिर तो मुझे कभी पता नहीं चलेगा, क्यूँकी मैं तो माँ बनूँगी।”
पण त्यांचे ते शब्द आजही आठवतात मला… especially जेव्हा मला माझ्या मुलींबद्दल काळजी वाटते तेव्हा! वाटतं, आत्ता बाबा असते तर म्हणले असते,” देखा…. मैने सही कहा था ना।” आणि मग त्यांचं ते नेहेमीचं वाक्य तेवढ्याच ठसक्यात म्हणाले असते..” साला, बाप को सीखाता है।”
अशा वेळी नेहेमी मला ‘छोटी सी बात’ सिनेमा मधलं ते गाणं आठवतं…
ना जाने क्यूँ, होता है ये जिंदगी के साथ
अचानक ये मन किसी के जाने के बाद
करे फिर उसकी याद
छोटी छोटी सी बात….
आज बाबांबद्दलच्या अश्याच छोट्या छोट्या आठवणी मनात गोळा होतायत. त्याच सगळ्या एकत्र लिहून ठेवायचा हा प्रयत्न!
माझ्या आठवणींच्या जगात बाबांबद्दलच्या पहिल्या आठवणी येतात त्या मी खूप म्हणजे खूप च लहान असताना आम्ही कोचिन मधे होतो तेव्हाच्या. १९७२-७३ च्या आसपास (नक्की साल माहीत नाही) बाबांची बदली कोचिन ला झाली होती, तेव्हा मी ४-५ वर्षांची असेन.. कारण मी तिथे जवळच्याच माँटेसरी स्कूल मधे जात होते. ती शाळा, तिथला तो वर्ग, मागच्याच बाजूला असणारं प्रिन्सिपॉल मॅडम चं घर … हे सगळं माझ्या लक्षात आहे… खैर, ते सगळं नंतर कधी तरी सांगीन, पण सांगायचा मुद्दा हा की तेव्हाचे बाबा मला आठवतायत.
तेव्हा कोचिन मधल्या लोकांना मराठीच काय पण हिंदी भाषा ही फारशी येत नसल्यामुळे तिथे इंग्लिश मधेच बोलावं लागायचं. आणि त्या वेळी आमच्या आईला इंग्लिश भाषेची एवढी सवय नव्हती.. त्या मुळे पहिल्या दिवशी जेव्हा बाबा ऑफिसला जायला निघाले तेव्हा ते आईला म्हणाले होते,” जर तुला कोणी माझ्याबद्दल विचारलं, तर माझा उल्लेख करताना ‘they’ नाही म्हणायचं… ‘he’ म्हणायचं! नाहीतर मराठी मधे नवऱ्याला ‘ते’ म्हणतात तसं चुकून इंग्लिश मधे ‘they’ म्हणशील. “ त्या वेळी मी जवळ च खेळत होते, त्यामुळे त्यांचं बोलणं मी ऐकलं होतं. अर्थातच, त्या वेळी मला काहीच कळलं नव्हतं, पण माझ्या डोक्यातल्या फाइल्स मधे कुठेतरी ते वाक्य नोंदलं गेलं होतं..त्यामुळे जेव्हा शाळेत असताना मी पहिल्यांदा ‘He...She….it….They ‘ शिकले होते तेव्हा डोक्यात कुठेतरी कोचिनच्या आठवणींची घंटा वाजली. त्या दिवशी घरी आल्यावर मी आईला त्या बद्दल विचारलं तेव्हा तिनी पण confirm केलं.
कोचिन मधलाच अजून एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. तेव्हा माझ्याकडे एक मोठी प्लास्टिक ची बाहुली होती, आणि अर्थातच मी तिची ‘आई ‘ होते.. त्यामुळे माझी आई माझी जशी काळजी घ्यायची अगदी तस्संच सगळं मी माझ्या बाहुलीसाठी करायची. एका दुपारी मी कॉटवर माझ्या बाहुलीला झोपवत होते.. मी ‘आई’ असल्यामुळे साहजिकच तिला भिंतीच्या बाजूला ठेऊन मी कॉटवर बाहेरच्या बाजूला झोपले. बाहुलीला झोपवता झोपवता मलाच झोप लागली आणि झोपेत असताना मी कॉटवरून खाली पडले. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून बाबा पळत आले आणि मला उचलून घेतलं. घटनास्थळाची पाहणी केल्यावर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला असावा. कारण मला कुशीत घेत ते म्हणाले,” अरेच्या, या बाहुलीला झोपवताना आमची बाहुली पडली की खाली!”
बाबांचं ते वाक्य ऐकलं आणि - “ मी बाबांची बाहुली आहे” - या नुसत्या विचारानीच मला इतकं छान वाटलं… एकदम स्पेशल फीलिंग होती ती! आणि म्हणूनच बहुतेक आज पर्यंत माझ्या लक्षात आहे तो प्रसंग.
कोचिन हुन आम्ही परत पुण्याला आलो. आम्ही जेव्हा दीप बंगल्या जवळच्या आमच्या घरात राहायला आलो तेव्हा आम्ही सगळी भावंडं मॉडर्न हायस्कूल मधे शिकत होतो. आमची शाळा दुपारी ११ वाजता सुरू व्हायची. बाबा मात्र रोज सकाळी आठ वाजता ऑफिसला जायचे. तेव्हा आमच्या घरी वेगळा exclusive ब्रेकफास्ट करायची पद्धत नव्हती. बाबा ऑफिसला आणि आम्ही शाळेत जायच्या आधी भाजी पोळी खाऊन आणि डबा घेऊन जायचो. बाबांचा एक ठरलेला नियम होता, रोज सकाळी आम्हां चौघा भावंडांना ते आपल्या पोळी भाजीतला एक एक घास खायला द्यायचे. आणि आश्चर्य म्हणजे त्या घासाला जी चव असायची ती आमच्या डब्यातल्या पोळी भाजीला कधीच नसायची.
बाबांची सकाळची आठ ची वेळ अजून एका कारणासाठी लक्षात आहे… जर आम्ही कोणी बाबांकडे कधी एखादी फर्माईश केली आणि जर त्यावर बाबा म्हणाले,” होssss ,.. आणू या ना…...उद्या सक्काळी आठ वाजता !!!!” तर आम्हांला लगेच कळायचं की आपली ही फर्माईश अजिबात पूर्ण होणार नाहीये.
कारण रोज सकाळी आठ वाजता ते घरातून गेलेले असायचे. अजूनही त्यांची ती strategy आठवली की हसू येतं.
पण प्रत्येक बाबतीत असं नसायचं बरं का! आम्ही अभ्यासात किंवा अन्य क्षेत्रात यश मिळवल्यावर बाबा लग्गेच कोपऱ्यावरच्या मिठाईवाल्याकडून पेढे आणायचे आणि कॉलनी मधे सगळ्यांना वाटायचे. मला अजूनही लक्षात आहे, मला चौथी आणि सातवीची scholarship मिळाली होती तेव्हा दोन्ही वेळेला बाबांनी कॉलनीत आणि त्याच बरोबर त्यांच्या ऑफिस मधे पण पेढे वाटले होते.
मी सातवीत असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिली आले होते. ही बातमी कळल्यावर बाबांना झालेला आनंद, त्यांनी मला जवळ घेऊन केलेले माझे लाड मी कधीच नाही विसरू शकणार. त्याच संध्याकाळी ते मला फोटो स्टुडिओ मधे घेऊन गेले आणि वर्तमानपत्रात छापण्यासाठी म्हणून माझा फोटो काढून घेतला. तसेच पुढे जाऊन आम्ही सगळ्यांना देण्यासाठी म्हणून खास ‘चितळे’ चे पेढे आणले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा मला त्यांच्या ऑफिसमधे घेऊन गेले आणि आम्ही सगळ्या स्टाफ ला पेढे वाटले.
फोटो वरून आठवलं… अधून मधून आमच्या कडे पूर्ण फॅमिलीचे फोटो शूट्स व्हायचे….. Courtesy...आमचे बाबा ! आदल्या दिवशी बाबा announce करायचे की ‘उद्या फोटो काढायचेत, सगळ्यांनी वेळेत तयार रहा.’
मग आक्खी सकाळ फोटो शूट सुरू असायचा. कधी गच्चीत, तर कधी बागेतल्या एखाद्या झाडाखाली! आणि props पण असायचे… बाबांनी काढलेलं एखादं पेंटिंग, किंवा मग फुलं पानं. त्यांच्या मॉडेल्स मधे आमच्या जोडीला माझी चुलत भावंडं तर असायचीच पण आमचा कुत्रा ‘लौकिक’ देखील असायचा. त्यावेळी या सगळ्याचं फारसं महत्त्व नव्हतं वाटलं, पण आता जेव्हा जेव्हा ते सगळे photos बघते तेव्हा वाटतं,’ खरंच, तेव्हा बाबांनी ही सगळी धडपड केली म्हणून आजही त्या सगळ्या आठवणी जपता येतायत.
बाबांना चांगले रुचकर पदार्थ खायला तर आवडायचेच पण त्याही पेक्षा स्वतः स्वैपाकघरात घुसून वेगवेगळे प्रयोग करायची फार हौस होती त्यांना! त्यांची नोकरी ही फिरतीची असल्यामुळे महिन्यातले बरेच दिवस ते बाहेर गावी असायचे. पण जेव्हा घरी असायचे तेव्हा एखाद्या रविवारी सकाळी उठल्यावर आईला म्हणायचे,” आज तुम्हाला सुट्टी.. कोणीही नाही यायचं स्वैपाकघरात. आज मी करणार सगळा स्वैपाक!”
त्यांची ही दवंडी ऐकून आम्हांला मात्र धडकी भरायची. कारण बाबांचा स्वैपाक हा कधीच ‘नॉर्मल’ नसायचा. त्या दिवसापूरतं आमचं किचन म्हणजे एक प्रयोगशाळा असायची. कारण त्यांचा menu जरी ठरलेला असला तरी त्यात कोणकोणते ingredients पडतील त्याचा काही भरवसा नसायचा. बाबा ते सगळं ‘on the spot’ ठरवायचे. आणि त्यांचा स्वैपाक पूर्ण होईपर्यंत आम्हाला कोणालाही तिथे जवळपास ही फिरकायची परवानगी नसायची.
पण आमच्यासाठी सगळ्यात मोठं आणि कठिण काम असायचं ते म्हणजे..…. प्रत्येक पदार्थाची चव घेऊन त्यातले ingredients ओळखायचे. हे काम वाटतं तेवढं सोपं नव्हतं, कारण बाबा कशातही काहीही घालायचे.. म्हणजे उदाहरणार्थ… पालकच्या भाजीत चकलीचा उरलेला चुरा, किंवा आमटीत लिंबाच्या लोणच्याचा खार..एकदा तर त्यांनी केळ्याच्या शिकरणीत पेढे कुस्करून घातले होते.. पण तशी चविष्ट शिकरण मी आजपर्यंत नाही खाल्ली.
हीच तर खासियत होती बाबांची. त्यांचे हे चित्र-विचित्र प्रयोग नेहेमीच यशस्वी व्हायचे.
कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर जर तिथे एखादा नवीन पदार्थ चाखला तर लगेच ते त्याची रेसिपी विचारून घ्यायचे आणि मग घरी आल्यावर आईला सांगायचे. कोळंबो, कैरीचं तक्कू (किंवा टक्कू), पालकची पच्चडी एवढंच काय पण चिकन सुद्धा असंच शिकली आमची आई.
बाबा जेव्हा गावाला जाताना तासभर आधी तयार होऊन बसायचे, तेव्हा विचारलं तर म्हणायचे,” उगीच रेंगाळत नाही बसू.” पण पत्ते किंवा बुद्धिबळ खेळताना मात्र हा नियम त्यांना लागू नसायचा.. त्यांच्याबरोबर हे खेळ खेळणं म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या पेशन्स ची परीक्षा असायची. स्वतःची चाल खेळताना पाच पाच मिनिटं विचार करत बसायचे.. आणि अर्थातच त्यांच्या दृष्टींनी ते ‘रेंगाळत बसणं’ नसायचं….. विचारपूर्वक खेळ असायचा तो! मग स्वतःच्या स्पष्टीकरणावर स्वतः च हसायचे.
आम्ही जर कधी त्यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगायला म्हटलं तर ते लगेच विषय बदलायचे. एकदा जेव्हा आम्ही हट्टच धरला तेव्हा म्हणाले, “नको रे ते सगळं … खूप त्रास होतो आठवलं की!”
पण आमच्या आजीकडून, मोठ्या आणि छोट्या काकांकडून आम्हांला जेवढं कळलं त्यावरून एक लक्षात आलं… त्यांचं सगळ्यांचं बालपण खूप कष्टाचं होतं. त्यांच्या वडिलांच्या (आमच्या आजोबांच्या) अकाली मृत्यू मुळे त्यांच्या परिवाराला खूप struggle करायला लागलं होतं.
सदाशिव पेठेतल्या त्यांच्या घरापासून बाबा engineering कॉलेज पर्यंत चालत जायचे. तारेची वेगवेगळ्या आकाराची फुलं आणि इतर कलाकृती तयार करून अलका टॉकीज च्या चौकात उभं राहून विकायचे. त्या सगळ्याच भावंडांनी आणि आमच्या आजीनीही खूप हालअपेष्टा सहन केल्या होत्या. त्या बद्दल नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो.
या अशा बिकट परिस्थितीतून वर येऊन त्यांनी सगळ्यांनी स्वतःची अशी एक ओळळ निर्माण केली, याचा मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो.
आमच्या बाबांचा पिंडच मुळी कलाकाराचा.. मग ते खडू वरचं कोरीवकाम असो, किंवा थर्माकोल मधून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू असो! पण त्यांचं खरं प्रेम होतं चित्रकलेवर… आणि त्यातही portrait painting मधे त्यांचा हातखंडा होता. त्यांनी पेंट केलेली वेगवेगळ्या अभिनेत्रींची portraits आज इतक्या वर्षांनंटरही तितकीच बोलकी आहेत.. मीना कुमारी, वैजयंती माला, राखी, रेखा, वहिदा रेहमान, नर्गिस…किती किती नावं घेऊ…
आणि हे सगळं कुठल्याही formal training शिवाय बरं का! एकलव्य सारखं… खरं तर एकलव्य समोर त्याचे गुरू होते.. त्यांचं बघून शिकला तो. पण बाबांच्या बाबतीत समोर कोणीच नव्हतं.. He was a born artist .
१९६१ साली जेव्हा पानशेत धरण फुटलं तेव्हा आमच्या आजीच्या सदाशिव पेठेतल्या घरातही पाणी शिरलं होतं. अचानक आलेल्या त्या पाण्याच्या लोंढ्यात बाबांची काही चित्रं देखील पूर्णपणे भिजली होती. पाण्यावर तरंगत वाहत जाणारी चित्रं कशीबशी पुन्हा हस्तगत करताना बाबांना किती धडपड करायला लागली होती ते एकदा बोलता बोलता सांगितलं होतं त्यांनी, आणि ते चित्र ही दाखवलं होतं आम्हांला. त्या कागदावरचे पाण्याचे डाग सगळं काही सांगून गेले!
बाबांची creativity फक्त एवढ्यापुरातीच सीमित नव्हती.. आमच्या घरच्या गणपतीला दर वर्षी नवीन मखर असायचा. आणि फक्त आमच्या घरचाच नाही तर मॉडेल कॉलनी च्या गणपती मंडळाचा गणपती सुदधा दर वर्षी बाबांच्या कलाकृतींनीच सजायचा! आणि तेही दर वेळी नवीन देखावा… कधी मोरांची जोडी तर कधी रथ…. थर्माकोल च्या शीट मधे अगदी नाजूक डिझाइन कोरून अप्रतिम रचना करायचे बाबा!
पण हे सगळं ते केवळ हौसेपोटी करायचे. त्यांच्या कलाकृतींच्या मोबदल्यात त्यांनी कधीच कोणाकडूनही पैसे नाही घेतले.
बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं आईनी. प्रदर्शन बघायला आलेल्यांपैकी कितीतरी लोक त्यांची चित्रं विकत घ्यायला तयार होते, पण बाबा त्यांची कला विकायला तयार नव्हते. ते म्हणायचे,” माझी कला अशी विकाऊ नाहीये. माझं प्रत्येक पेंटिंग माझ्यासाठी खास आहे. मी त्याची किंमत नाही लावू शकत.”
आमच्या कितीतरी नातेवाईकांना आणि बाबांच्या मित्रांना आवडलेली चित्रं बाबांनी तशीच देऊन टाकलेली मी बघितलं आहे. He just gifted those paintings to them… without a second thought.
त्यांनी स्वामी विवेकानंदांचं एक life size पोर्ट्रेट बनवलं होतं. त्यांच्या एका मित्राला ते आवडलं. त्यांनी तसं बोलून दाखवलं तर बाबांनी दुसऱ्या क्षणाला ते पोर्ट्रेट त्यांना देऊन टाकलं.. just like that!
त्या काकांनी बाबांना पैसे घेण्याचा खूप आग्रह केला पण बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.
बाबांना जेवढं त्यांच्या चित्रांबद्दल प्रेम होतं तेवढंच आम्हांला ही वाटायचं कारण प्रत्येक वेळी चित्र काढताना बाबा आमच्या कडूनही feedback घ्यायचे. रंगसंगती, बॅकग्राऊंड वगैरे बद्दल आमचा सल्ला विचारायचे.. त्यामुळे आमचं पण एक भावनिक नातं असायचं त्या चित्रांशी!
रंगांबरोबरच शब्दांशीही किती सहज खेळायचे ते! ‘मोहे भूल गये सावरिया’ या गाण्याच्या चालीवर त्यांनी एक मस्त गाणं तयार केलं होतं…. ‘मोहे भूख लगी सावरिया.....’
आमच्या बागेत एकदा त्यांनी एक फणसाची आठळी पुरली होती. रोज तिला पाणी घालायचे. त्यांना खात्री होती की त्या आठळीतून नक्की फणसाचं झाड येणार.
आणि एका सकाळी खरंच एक छोटंसं नाजूक तांबडं पान मातीतून बाहेर डोकावलं.. ते बघून बाबांना इतका आनंद झाला होता! ‘मेरे फणस को तांबडा पान आया.. मेरे फणस को तांबडा पान आया….’ असं उत्स्फूर्त गाणं म्हणत अक्षरशः घरभर नाचले होते त्या दिवशी ते…
बाबांची अजून एक खासियत होती आणि ती म्हणजे कोणाच्याही मदतीला कायम तयार असायचे ते.. at times he used to go out of his ways to help others. आणि यात आमच्या आईनी पण त्यांना तितकीच साथ दिली. In fact, काही वेळा तर ती बाबांच्याही एक पाऊल पुढे असायची.
बाबा एकदा कामानिमित्त दिल्लीला गेले असताना त्यांची श्री. चौधरी नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली… त्यांच्या मुलाचा , विवेक चा एक पाय काही कारणामुळे amputate करावा लागला होता आणि त्याला artificial ‘Jaipur foot’ बसवून घेण्यासाठी पुण्याच्या Artificial Limb Centre मधे यावं लागणार होतं. हे कळताक्षणी बाबांनी त्यांना सांगितलं की,” तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त पुण्याला या. बाकी सगळं मी बघतो.” आणि खरंच जेव्हा जेव्हा चौधरी काका आणि विवेक पुण्याला यायचे तेव्हा आमच्याच घरी राहायचे.. आणि प्रत्येक वेळी किमान ८-१० दिवस तरी मुक्काम असायचाच त्यांचा.. कारण प्रत्येक वेळी विवेकच्या पायाचं माप घेऊन त्याहिशोबानी नवीन जयपूर फूट तयार करायला तेवढे दिवस लागायचेच. आणि विवेक चं वाढतं वय असल्यामुळे दर ५-६ महिन्यांनी त्याला नवीन पाय बनवून घ्यायला लागायचा. पण जेव्हा जेव्हा ते दोघं आमच्या घरी यायचे तेव्हा आमच्यातलेच एक होऊन जायचे. विवेक बाहेर जाऊन मैदानी खेळ नाही खेळू शकायचा त्यामुळे मग तो असेपर्यंत आम्ही सगळेच त्याच्या बरोबर घरी थांबायचो. मग पत्ते, कॅरम, बुद्धिबळ हे आणि असे खेळ रंगायचे.
असेच बाबा जेव्हा ऑफिस च्या कामासाठी कौलालंपूर ला गेले होते तेव्हा तिथे त्यांना हेडगे काका भेटले होते. काही महिन्यानंतर बाबांना त्यांचं पत्र आलं. ते सहपरिवार पुण्यात शिफ्ट होणार होते, कायमचे.
त्यांची घराची सोय होईपर्यंत एखादं भाड्याचं घर बघा असं त्यांनी बाबांना सांगितलं तेव्हा बाबांनी त्यांना सरळ आमच्याघरीच राहायला बोलावलं. जवळजवळ दोन महिने हेडगे काका काकू आणि त्यांच्या दोघी मुली आमच्या घरी राहिले होते. आई नी पण अगदी मनापासून त्यांची सरबराई केली होती. त्यांच्यासाठी घर शोधणं, त्यांच्या मुलींच्या ऍडमिशन सगळ्यात आईनी त्या काकूंना मदत केली होती.
कधी कधी वाटतं, कोण करतं इतकं परक्या लोकांसाठी? पण हेच तर स्पेशल होतं आमच्या आई बाबांचं! एखाद्याला आपलं मानलं की मग पुढचा मागचा विचार न करता त्याला सर्वतोपरी मदत करायचे दोघंही !
बाबांची एक मावशी होती. तिनी पाठवलेल्या फक्त एका पत्रावर बाबा तिला आमच्या घरी घेऊन आले…. कायमची राहायला! आणि आमच्याा आईनी पण अगदी सख्ख्या सासू सारखीच तिचीही सेवा केली.
यासारखी अजून बरीच उदाहरणं आहेत… वाडेकर काका, किर्लोस्करवाडी च्या कबुरे काकांचा नोकरी शोधायला पुण्यात आलेला मुलगा सूर्यकांत… काय काय आणि किती सांगू!
पण आम्हां भावंडाना देखील या सगळ्यात कधीच काही गैर किंवा वावगं नाही वाटलं. कदाचित पहिल्यापासून आम्ही आई बाबांना असंच वागताना बघत होतो म्हणूनही असेल.
जर एखाद्याला मदतीची गरज आहे असं कळलं तर आपण जमेल तशी मदत करायची हे अध्याहृत च होतं.
एका वर्षी दिवाळीच्या दिवसांत आई बाबा मामा कडून रात्री उशिरा घरी परत आले. तेव्हा त्यांनी बघितलं की आमच्या कॉलनी च्या वॉचमन चा मुलगा बाहेर ग्राउंड वर पडलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यातून शोधून शोधून न फुटलेले फटाके गोळा करत होता. घरात आल्यावर आई नी आम्हांला चौघांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा आम्हांला खूप वाईट वाटलं. त्या वर्षांपासून आमच्या साठी आणलेल्या फटाक्यांचे आम्ही पाच भाग करायचो… चार आम्हां चार भावंडांचे आणि पाचवा भाग वॉचमन च्या मुलांचा..
पण आमचे आई बाबा एवढ्या वरच थांबले नाही.. त्यांनी वॉचमन च्या एक मुलाच्या-ज्ञानोबाच्या शिक्षणाचा सगळा खर्च करायचं ठरवलं. दर वर्षी आमच्या नव्या वह्या-पुस्तकां बरोबरच आम्ही ज्ञानोबाच्या पुस्तकांना पण कव्हर घालायचो आणि मग च त्याला द्यायचो.
And thanks to our parents and their upbringing, हे सगळं आमच्यासाठी खूपच नॉर्मल होतं.
बाबांनी कधीच आम्हांला नवीन गोष्टी शिकायला मनाई केली नाही. In fact, त्यांनी स्वतः आईला स्कूटर चालवायला शिकवली होती. आई आणि माझी मोठी बहीण नाटकांत काम करायच्या.. त्यासाठी ही बाबांनी कधीच आक्षेप नाही घेतला. आईचं व्हायोलिन आणि माझं सरोद वादन या बद्दल लोकांना आवर्जून सांगायचे बाबा. माझं दहावी पास झाल्याचं बक्षीस म्हणून त्यांनी मला सरोद घेऊन दिलं होतं.
आमच्या दिदीच्या लग्नासाठी त्यांनी खास सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या अक्षता बनवल्या होत्या… आमच्या पिढीतलं आणि आमच्या घरातलं पहिलं लग्न होतं ना ते! सुवर्णाक्षता उधळल्या होत्या आमच्या अंगणात त्या दिवशी!
माझ्या धाकट्या भावाच्या लग्नात तर बाबांनी आमच्यातर्फे आलेल्या पाहुण्यांचा खर्च ही दिला होता त्यांच्या व्याह्यांना… त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला तेव्हा बाबा त्यांना म्हणाले,” अहो, तुमच्या मुली सारखंच माझ्या मुलाचं पण लग्न आहे ना.. मग खर्च पण दोघांनी मिळून करूया!”
माझ्या लग्नाची वेळ आली तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की ‘ मला डिफेन्स मधल्या मुलाशीच लग्न करायचं आहे.’ सुरुवातीला त्यांचा माझ्या या निर्णयाला विरोध होता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मला समजवायचा, माझ्या या निर्णयापासून मला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला. पण मी देखील त्यांचीच मुलगी होते….या बाबतीत माझा निर्णय पक्का होता. आणि एका फिल्मी डायलॉग मधे म्हटलंय ना..’अगर तुम किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी क़ायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है।’ तसंच काहीसं झालं असावं माझ्या बाबतीत….. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला.
मुख्य म्हणजे बाबा सुद्धा खूप खुश झाले होते. आधी मला विरोध करणारे बाबा आता स्वतः सगळ्यांना अगदी अभिमानानी सांगत होते,” आमचे जावई सैन्यात अधिकारी आहेत बरं का!”
माझ्या लग्नानंतर जिथे जिथे आमची बदली व्हायची तिथे बाबा येऊन गेले. म्हणायचे,” स्वतःच्या डोळ्यांनी तुझा संसार बघितला की बरं वाटतं.”
पण एका नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसाच आमच्या बाबांचा स्वभाव होता… जितके प्रेमळ तितकेच strict…तापट ! खरं सांगायचं तर आम्ही बाबांना घाबरूनच असायचो. आमची आई म्हणजे आमच्या मधला buffer होती. आणि तीच बाबांना व्यवस्थित handle करू शकायची.
पण १९८९ साली अचानकपणे आई आम्हांला सोडून गेली...कायमची! आणि आई बरोबरच बाबांच्या व्यक्तिमतातलं काहीतरी महत्वाचं निघून गेलं.
पण त्यानंतर ते शेवटपर्यंत स्वतःच्याच दुःखात गुरफटून राहिले… आईच्या वियोगाच्या दुःखात!
त्यांनी त्या कोषातून बाहेर पडावं म्हणून मी तिथे असे पर्यंत माझ्याकडून खूप प्रयत्न केले.. पण ते अजूनच अंतर्मुख होत गेले. या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होतच होता.
त्यांच्या शेवटच्या आजारपणात -जुन २००१ मधे त्यांना प्रयाग हॉस्पिटलमधे ऍडमिट केलं होतं… ज्या खोलीत त्यांना ठेवलं होतं त्या खोलीत समोर भिंतीवर पु. ल. देशपांडेंचा फोटो लावला होता. तो फ़ोटो बघता क्षणी बाबा म्हणाले,” अरे बापरे! पु.लं ना याच खोलीत ठेवलं होतं वाटतं!!”
एक वर्षांपूर्वी म्हणजे १२ जून २००० ला पु.लं नी तिथे शेवटचा श्वास घेतला होता आणि काय दुःखद योगायोग आहे बघा … आमचे बाबा त्याच हॉस्पिटल मधे १२ जून २००१ ला हे जग सोडून गेले… बरोब्बर एक वर्षानंतर….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sunder lekh, kiti chhan lihila aahet tumhi tumachya baba n baddal. Happy manala bhidla agadi:) mala pan asa chhan lihita aala asta tar Happy

अशी माणस होती , आहेत आणि असतिल म्हणूनच माणूसकी जिवन्त आहे __________/\____________

खूप छान आठवणी सान्गितल्यात

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपन्थ