ती आणि मी (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 13 June, 2018 - 09:17

मी तिला समजावलं नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही. अगदी 'तुला तुझा राग अजिबात आवरता येत नाही' असं म्हणणारे माझे मित्रसुध्दा. अर्थात ते ह्यावेळी इथे नाहियेत म्हणा. आणि त्यांना हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

आधी मी तिला प्रेमाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. मग तिने माझं ऐकलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे मी तिला स्पष्टपणे सांगितलं. त्याचाही काही उपयोग झाला नाही. तिचा हेका कायम. तेव्हा मात्र माझा नाईलाज झाला. मी इथेतिथे बघू लागलो. कोपर्यात छत्री दिसली. मी ती उचलली आणि......

मुसळधार पावसात घराबाहेर पडलो. माझ्या लाडक्या लेकीसाठी तिचं फेव्हरेट चॉकलेट आणायला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे.

पण तुझ्यासारख्या चांगलं लिहू शकणार्‍या माणसाने अशा लिमीटेड शब्दांच्या भानगडीत का पडावे ?

सर्वांचे मनापासून आभार!

माधव, कथा सुचली म्हणून म्हटलं हाही प्रकार ट्राय करून बघायला काय हरकत आहे. एव्हढ्या कमी शब्दांत लिहायचं म्हणजे वेगळं आव्हान आहे. नाही जमलं तर इथे लोक सांगतीलच. मग नाही लिहायचं परत. हाकानाका Happy

Lol आवडली.

मीपण काहीतरी सिरियस घडण्याच्या अपेक्षेत होते.

आवडली.....
पण....
आजकाल हे खूप वेळेला होते आहे (जवळपास प्रत्येक शतशब्दकथेच्या वेळी). आधी रहस्यकथेची वातावरणनिर्मिती करायची.... आणि मग.....फुस्स्स्SS
Imo, exaggeration

आणि वातावरणनिर्मितीमध्ये अशी वाक्ये का?

आणि त्यांना हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल>>>>का?

मग तिने माझं ऐकलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे मी तिला स्पष्टपणे सांगितलं>>>>काय परिणाम?? वगैरे.

मुद्दा एवढाच आहे की इतर रहस्यकथा वाचतानाचा दृष्टिकोनही बदलतो. शतशब्दकथांचे fad आले आहे म्हणून उगाच शतशब्दकथा लिहू नका. (Generalized statement, not for specific id)
Astronaut vinay यांच्या शतशब्दकथांसारख्या कथा खूपच चांगल्या असतात.

>>आणि त्यांना हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

मित्रांपैकी कोणी हजर नाही. आणि त्यांना नंतर सांगून त्याचं महत्त्व काय?

>>मग तिने माझं ऐकलं नाही तर....

लहान मुलांना पालक आपलं ऐकलं नाही तर काय होईल भीती घालतात तशी भीती....उदा. हडळ्/बागुलबुवा/जखीण वगैरे

मी मायबोलीवर फारशी येत नाही. त्यामुळे शतशब्दकथांचं फॅड वगैरे आलंय हे मला माहित नव्हतं. आणि तशीही मी कुठलंही फॅड फॉलो करणार्यातली नाही. कल्पना सुचली. त्याची पूर्ण कथा करता येण्याएव्हढा जीव नव्हता म्हणून शतशब्दकथा लिहिली इतकंच. हे तुम्ही जनरल स्टेटमेन्ट केलंही असेल पण माझ्या आयडीच्या कथेवरच्या प्रतिसादात टाकलंयत म्हणून हे उत्तर.

सर्वांचे मनापासून आभार! Happy