पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66302
सप्टेंबर १९११
इंदूर
रश्मीला टाळ्यांच्या आवाजाने जाग आली. तिने पाहिले तर ख्रिस अजूनही अनेकदा पाहिलेला तोच शो तितक्याच एकाग्रतेने पाहत होता जेवढ्या एकाग्रतेने त्याने पहिल्यांदा पाहिला होता. तिला चहा प्यायची तेवढी आवड नव्हती. दुसर्या हाताला ख्रिस दिवसभर चहा ढोसत असल्याने तिने सोयीस्कररित्या आपल्या झोपेचे खापर चहावर फोडले होते. आश्चर्य म्हणजे ख्रिसच्या म्हणण्यानुसार कोणा चिनी सम्राटाने चहा प्यायल्याने तरतरी येते आणि आलेली झोप टाळता येते असे कित्येक हजार वर्षांपूर्वीच नोंदवून ठेवले होते. यानंतर तिने चहासोबत प्रयोग करून पाहिले होते. त्यावरून तिने निष्कर्ष असा काढला की ब्रू केलेल्या चहापेक्षा चहाची पाने टाकून उकळलेले दूध-पाण्याचे मिश्रण चवीला अधिक चांगले लागते. दुर्दैवाने ख्रिसला तो ब्रू केलेला चहाच अधिक आवडत असल्याने तिने चहा आणि झोप यांच्यात झोपेची निवड केली.
समोर चाललेल्या प्रयोगात तिला काडीमात्र रस नव्हता. ख्रिसच्या मते त्या सर्कशीत जे काही संशयास्पद आहे ते एक ना एक दिवस बाहेर दिसणारच! त्यांच्याकडून कधी ना कधी गलथानपणा होणारच! तोवर वाट पाहणे हा त्याचा त्यावरचा उपाय होता. गोळा केलेल्या माहितीवरून हे निश्चित होते की काहीतरी नजरेत भरेल असे संपूर्ण मुक्कामात एकदा तरी घडतेच. काय शब्द वापरला बरं त्याने? अॅट्रिशन बॅटल, हे म्हणे अॅट्रिशन बॅटल आहे.
तिला आपला ड्रेस कोणी ओढत असल्याची जाणीव झाली आणि तिची विचारशृंखला तुटली. एक किशोरवयीन मुलगा चवड्यांवर बसून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने लगेच आपल्या ओठांवर बोट ठेवून तिला सावध केले. कोणाचे लक्ष नाही हे बघून त्याने तिच्या हातात एक चिठोरे कोंबले आणि तो पापणी लवायच्या आत अंधारात दिसेनासा झाला. काय घडले याची सुसंगती लावत असताना रश्मीला आठवले की हा मुलगा तिकिट खिडकीवर बसतो. ख्रिस अजूनही एकाग्रचित्ताने प्रयोग बघण्यात दंग होता. तिने ती चिठ्ठी अंधुक प्रकाशात वाचली. त्यावर कोळशाच्या कांडीने अत्यंत घाईघाईने एकच वाक्य खरडले होते.
"सर्कशीबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आज मध्यरात्री सर्कशीच्या तळाच्या दक्षिणेस एक पडकी विहीर आहे तिथे या."
*****
"ब्रेकथ्रू!" ख्रिसच्या आवाजातून उत्साह सळसळत होता. अखेर कोणीतरी असं सापडलं होतं जे त्याला सर्कशीतल्या आतल्या गोटातली बातमी मिळवून देऊ शकणार होतं. रश्मीने सगळी हकीगत सांगितल्यानंतर त्याचे डोळ्यात नव्याने आलेली चमक जाता जात नव्हती.
"याचा अर्थ कळतो आहे ना तुला?"
"हो. रात्रीचा एक कप चहा जास्त करायचा"
*****
निर्धारित वेळी ते दोघे ठरलेल्या जागी पोहोचले. काही मिनिटे तशीच गेल्यावर ख्रिसची चुळबूळ सुरु झाली. त्याने रश्मीकडे पाहिले तर ती विहिरीला पाठ लावून डुलक्या घेत होती. वैतागून त्याने तिला उठवले. नाहीतर त्या संभाषणाच्या नोंदी कोण करणार? जवळ जवळ १५ मिनिटे गेल्यानंतर ख्रिसने परत फिरण्याचा निर्णय घेतला पण जेमतेम पाच पावले टाकली नसतील तेवढ्यात त्याला मागून आलेल्या "शुक शुक" ने थांबवले.
"अरे हाच तो मुलगा" रश्मी आणखी काही बोलणार एवढ्यात ओल्गाने तिला इशार्याने गप्प केले. तिचा आवाज त्या नीरव शांततेत आणखीनच घुमत होता.
"माफ करा, पण तुमच्या सोबत इतर कोणी नाही आणि आमच्या पाठोपाठ कोणी आलेले नाही याची खात्री करायची होती." उमा पुढे येत म्हणाली.
"मी उमा, तुम्हाला पुण्यात भेटले होते. ही ओल्गा आणि हा छोटू."
"उमाताई, इतक्या वेळा सर्कसला येऊन यांना आता आपल्या सगळ्यांची नावे तशीही माहित असणार"
"व्हेरी ट्रू. पण मग हा संवाद आपण पुण्यातच करू शकलो असतो. इथे का?"
"तेव्हा आम्हाला या सर्कशीचे केवळ दृश्य स्वरुपच माहित होते. पुण्यात तुम्ही येऊन गेल्यानंतर काही घटना अशा घडल्या की उमा आणि मला या दृश्य स्वरुपामागच्या गुपिताची झलक मिळाली. आम्ही आमच्यापरीने त्याचा पाठपुरावा करू शकतो पण एका मर्यादेपर्यंतच! जेव्हा छोटूने तुमचा उल्लेख केला आणि उमाने तुम्हाला ओळखले तेव्हा आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. तुम्हालाही इथे काहीतरी गूढ आहे याची कल्पना आहे, तेव्हा तुमच्याशी संवाद साधणे सोपे जाईल असं आम्हाला वाटले."
"गुड. रश्मी, प्रश्नांची यादी.."
"एक मिनिट! तत्पूर्वी आमची कहाणी ऐका. कदाचित तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे यातूनच मिळतील"
ओल्गाने मग तिला भद्रासोबत आलेला अनुभव, उमाने मलिकासोबत केलेला पाठलाग आणि छोटूने केलेली निरीक्षणे सांगितली.
"ओके. रश्मी नोंदी केल्यास?"
"सर्कसची सुरुवात मलिका आणि रुद्राने केली. भद्र त्यांचा पहिला सहकारी होता. ज्या दिवशी रुद्र आणि मलिकासोबत तुमची चकमक घडली त्यादिवशी भद्राने ओल्गाची काहीतरी, किंबहुना कोणालातरी, पुरायला मदत घेतली. प्रत्येक मुक्कामात एक तरुण सर्कसचा प्रत्येक शो बघतो. मलिकाने ही गोष्ट हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला."
किमान हिला नोंदी करता येतात. ख्रिसने मनोमन याची नोंद घेतली.
"आम्ही गोळा केलेल्या माहितीसोबत जर ही जोडली तर चित्र असे निर्माण होते. दर मुक्कामात एक तरुण सर्कसचा प्रत्येक शो बघतो. सर्कसच्या अखेरच्या दिवशी तो तरुण कोणाच्या तरी हातून मारला जातो. या अज्ञात खुन्याचा निश्चितच मलिका आणि रुद्रशी निकटचा संबंध आहे. भद्राच्या मदतीने प्रेताची विल्हेवाट लावली जाते. मुंबईतल्या मुक्कामात मात्र या खुन्याकडून एक चूक झाली. बर्थोल्टच्या प्रेताची तो विल्हेवाट लावू शकला नाही आणि त्याने पोलिसांचे व पर्यायाने माझे लक्ष वेधून घेतले. यानंतर एकच प्रश्न उरतो."
"तो कोणता?"
"रश्मी ते निशाण दाखव."
अंधुक प्रकाशात त्या तिघांनी ते चित्र पाहिले. ओल्गा आणि उमाने मान हलवली. हे निशाण त्या प्रथमच पाहत होत्या. तसेही याचा इतर घटनांशी काय संबंध आहे हे ख्रिसने सांगितले नव्हते. छोटूने मात्र हलकेच ते चित्र आपल्याकडे ओढले. बराच वेळ निरखून पाहिल्यानंतर तो म्हणाला
"सर मला आत्ता पक्के आठवत नाही. मी जेव्हा सर्कशीत नवीन नवीन दाखल झालेलो तेव्हा पहिले काही दिवस मला मलिकाने तिच्या तंबूत जागा दिली होती. एकदा मी तिच्या उजव्या दंडावर काहीतरी गोंदलेले पाहिले होते. जर माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर ते गोंदण आणि हे निशाण एकच आहे."
रश्मीच्या हातातून डायरी खाली पडली. तिच्या आईविषयी मलिकाला काही माहिती असेल का? ख्रिसने तिला सावरले. त्याच्यापुढे वेगळाच प्रश्न होता. लाल साडी नेसलेली ती स्त्री आणि मलिका एक आहेत का?
~*~*~*~*~*~
"हे काय वाचत आहात फणीदा?" फणींद्राची तंद्री त्या प्रश्नाने भंगली. त्याने हसून आपल्या सहकार्याकडे ते कागद दिले. थोडा वेळ वाचण्याचा प्रयत्न करून त्याने ते कागद फणींद्राकडे परत दिले. युगांतरमधल्या बहुतेक सर्वांनाच देवनागरी, इंग्रजी अक्षरे आणि बंगाली बोर्णोमाला परिचित होती. ही लिपि मात्र वेगळीच कोणतीतरी होती. ती दक्षिण भारतीयही वाटत नव्हती. फणींद्राने स्मित करून उत्तर दिले.
"ही दक्षिण भारतीयही नाही आणि ही गुजराथी किंवा गुरुमुखी पण नाही. मला नाही वाटत की युगांतरमध्ये इतर कोणालाही ही लिपि वाचता येत असेल."
"मग फणीदा ही कुठली लिपि आहे? आणि तुम्हाला ही कशी वाचता येते?"
"हाहाहाहा, मला कशी वाचता येते विचारतोस? बरं आधी तर हे जाण की ही एक भारतीय लिपि आहे. ही वाचण्याकरिता एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर माहित असावे लागते."
"आणि तो कोणता?"
"जंगलचा राजा कोण? वाघ की सिंह?"
तो गोंधळला. फणीदांनी हा प्रश्न का विचारला? आणि या प्रश्नाचे इथे काय प्रयोजन?
"अं सिंह?"
फणींद्राच्या डोळ्यातली काजळी अधिकच गडद झाली. जणू कागदावरची शाई फिस्कटल्याप्रमाणे त्याच्या पांढर्या शुभ्र बुबुळांवर काळोखाचे तवंग पसरले.
"जर तू अंदाज बांधत असशील तर ठीक! अन्यथा तुझ्यासाठी या कागदातील मजकूर निरर्थक ठरेल. असो, तू इथे का आलास?"
"मी एवढेच सांगायला आलो होतो की सर्व व्यवस्था झाली आहे. उद्या पहाटे तुम्हाला शहरातून आम्ही सुखरुप बाहेर काढू." तो घाम पुसत म्हणाला.
दार लावून घेता घेता फणींद्र स्वतःशीच पुटपुटला. काय विलक्षण लिपि आहे ही! जर तुम्ही व्याघ्रपंथाचे असाल तर या अक्षरांचे उच्चारण वेगळ्याप्रकारे केले जाते आणि जर तुम्ही सिंहपंथीय असाल तर उच्चारण वेगळे होते. जंगलचा राजा कोण याचे उत्तर तुमच्या डोक्यात पक्के असल्याखेरीज तुम्ही ही लिपि कधीच वाचू शकत नाही. पुण्यात गाठ पडलेल्या त्या तरुणासोबत जी स्त्री होती तिच्या खांद्यावर निशाणाखेरीज सिंहपंथीय असल्याच्या खुणा होत्या. त्यांना माझ्याकडे हे हस्तलिखित आहे याची कल्पना असेल?
~*~*~*~*~*~
डेव्हिड एल्साची वाटच पाहत होता. एल्साकडे आज अनेक महत्त्वाच्या बातम्या होत्या. हेन्रींच्या कचेरीत तिला कामाला लावण्याची कल्पना डेव्हिडच्या डोक्यातून आली होती. जर्मनीतल्या संदेशांची दळवळण कशी होते हे कोडे अजूनही हेन्रींना उलगडले नव्हते आणि त्यांच्या नाकाखाली ही देवाणघेवाण होत होती.
"हेर पॅपींना आधी युरोपातल्या बातम्या ऐकायच्या आहेत."
"ओके. युरोपात आपल्याला एक अनपेक्षित मित्र मिळण्याची शक्यता आहे."
"कोण?"
"इटली. इटालियननांनी त्रिपोलीवर दावा सांगायला सुरुवात केली आहे."
"हेर डेव्हिड ते शहर तर ऑटोमन तुर्कांच्या ताब्यात आहे. याने आपला काय फायदा?"
"यात आपलाच फायदा आहे." एल्सा डेव्हिडच्या पोपटावाल्या आवाजाकडे दुर्लक्ष करत म्हणाली. "तुर्क मूळचे आशियाई असले तरी त्यांचा युरोपाशी जुना संबंध आहे. अजूनही बाल्कन प्रदेशात त्यांचे वर्चस्व आहे. या प्रदेशात रस घेणार्या सत्तांमध्ये रशियाचाही समावेश होतो जो ब्रिटन आणि फ्रान्सचा मित्र आहे."
"हेर डेव्हिड, १९०५ मध्येही मोरोक्कोवरून झालेल्या वादात रशियनांनी फ्रेंचांची बाजू घेतली होती."
"जर रशियननांनी यावेळेस आपल्याला विरोध केला तर आपण इटलीचे उदाहरण पुढे करू शकतो. संधीसाधू इटली उत्तर आफ्रिकेतले दुसरे महत्त्वाचे शहर गिळंकृत करेल पण आपल्याला अधिक संपन्न मोरोक्कोवर हक्क सांगायचा परवाना मिळेल. आणि क्रेमलिन तुर्कांची शक्ती कमी होत असेल तर निश्चितपणे गप्प तरी बसेल."
"हेर डेव्हिड याचा अर्थ फक्त ब्रिटीशांवर दबाव आणला आणि त्यांनी फ्रेंचांना पाठिंबा देणे बंद केले कि आपला मार्ग मोकळा होईल."
एल्सा यावर क्षीण हसली. डेव्हिड आनंदात असल्यामुळे त्याला ते लक्षात आले नाही. एल्साने त्याला पूर्ण परिस्थिती सांगितली नव्हती. या सर्वांत एक मेख अशी होती की ब्रिटनने केलेल्या तुफान विरोधामुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. जर्मनी आणि प्रशियन साम्राज्य आत्ता वेळेसोबत शर्यत लावून बसले होते. यातर अर्थव्यवस्था कोसळण्याच्या आत हा तिढा सुटेल किंवा संपूर्ण प्रशिया आर्थिक संकटात सापडेल. अँग्लो-फ्रेंचांना होत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे सामान्य जनता जरी युद्धाला अनुकूल असली तरी बर्लिनमधल्या मुत्सद्द्यांना त्याच्या दूरगामी परिणामांची कल्पना होती. म्हणूनच डेव्हिडच्या गटाचे प्रतिनिधी वगळता बव्हंशी कीदरलेनच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना यश मिळावे अशी प्रार्थना करत होते.
"एवढंच?" डेव्हिडच्या प्रश्नाने एल्सा भानावर आली. "हेर पॅपींनी विचारले की आणखी काही बातम्या आहेत का?"
"हो. एक चिंताजनक बातमी आहे. आज जोसेफने सर हेन्रींशी संपर्क साधला. मला त्यांचे संपूर्ण संभाषण नाही कळू शकले पण थोडक्यात सांगायचे झाले तर जोसेफ फणींद्रला अटक करणार आहे"
"जोसेफ भलताच विनोदी दिसतो हेर डेव्हिड. फणींद्रला आधी शोधून तर काढ मग अटक करण्याच्या गोष्टी कर."
"मी तेच सांगायचा प्रयत्न करते आहे. फणींद्र कलकत्त्यातून कधी व कोणत्या मार्गाने बाहेर पडतो आहे याची बित्तंबातमी जोसेफकडे आहे. जोसेफ आता त्या ठराविक वेळी सापळा लावून बसणार आणि फणींद्रला पकडणार. आपली योजना फसली डेव्हिड. आता इथून निसटायचा विचार करायला हवा."
हे ऐकून डेव्हिड मंदसा हसला. एल्साला ती बारीक हास्याची लकेरही अस्वस्थ करून गेली. बर्लिनमधल्या तिच्या वरिष्ठांना तिने जोसेफच्या फोनची कल्पना देणारी तार आधीच पाठवली होती. ती वाचल्यानंतर ते कीदरलेनच्या संधी प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार अशी तिची खात्री होती. आणि मग या धाडसी योजनेची काहीच आवश्यकता उरणार नाही. पण डेव्हिडला अर्थातच हे पटण्यासारखे नव्हते.
"ओह एल्सा! फणींद्रला तू अजून ओळखलेले दिसत नाहीस. मी पैजेवर सांगतो की फणींद्र जोसेफच्या हाती लागणार नाही. तो कलकत्त्यातून निसटणार हे निश्चित! माझी मुंबईतून निघायची सोय सुद्धा झाली आहे. त्यामुळे फणींद्रला आवश्यक ते हत्यारही मी त्याच्यापर्यंत पोचवेन. यात खोडा फक्त बर्लिनमधले ढुढ्ढाचार्य घालू शकतात. त्याकरिता त्यांना इथे काय घडते आहे हे कळले पाहिजे. आता तूच सांग, असं झालेले चालेल का?"
एल्साने विजेच्या चपळाईने आपले पिस्तुल डेव्हिडवर रोखले. तिचा नेम फारसा अचूक नव्हता पण या अंतरावरून चूक होण्याची शक्यता शून्य होती. डेव्हिडने हलकेच जागेवरून उठला. अत्यंत संथपणे, आपले हात एल्साला दिसतील असे धरून तो तिच्याजवळ आला. एल्सासाठी वातावरण जणू भारले गेले होते. ती तशीच स्तब्ध राहिली. डेव्हिडने पिस्तुलाची नळी स्वतःच्या कपाळाच्या मध्यभागी टेकवली. काळ जणू दोघांसाठी काही क्षण तिथेच थिजला.
.......................
"ठो ... "
~*~*~*~*~*~
रश्मीने दिव्याची ज्योत थोडी वाढवली. तेल तापायला ठेवून ती डेझर्टची तयारी करू लागली. इंदूरात अगदी सुरुवातीला सर्कस बघून झाल्यानंतर ख्रिसला संध्याकाळी एका इंग्रज अधिकार्याच्या घरी चहापानाचे आमंत्रण होते. हा अधिकारी पूर्वी इंडोचायना व सिंगापूरमध्ये राहून आला होता. त्याचा आचारी मेकाँग नदीकाठच्या एका गावातून आलेला होता आणि त्याने ही कृति रश्मीला शिकवली.
तिने प्रथम मोड आणलेले मूग एका वाटीत घेतले. एका भांड्यात बारीक वाटलेल्या तांदळाचे आंबवलेले पीठ तयारच होते. मूग मधात बुडवून आणि मग वरून तांदळाचा पातळ थर देऊन तिने तापलेल्या तेलात तळायला सोडले. मध व तांदळाच्या पीठाने वाटीचा आकार कायम राहिला. हलकेच पलटून बाहेरचा थर खरपूस झाल्यावर तिने ते मफिन्स बाहेर काढले. एक तुकडा तोडून पाहिला. खूप गोड नाही पण तरीही खुसखुशीत असे ते मंग बीन केक्स तयार होते. ख्रिसच्या डेझर्टची सोय झाली होती. तिची प्रगती पाहिल्यानंतर ख्रिसचे मत पडले की तिच्यात मुळातच कलिनरी टॅलेंट होते, परिस्थितीवशात त्याला वाव मात्र मिळत नव्हता. ट्रे हातात घेऊन तिने ख्रिसच्या खोलीत प्रवेश केला.
ख्रिस टेबलाजवळ खुर्ची घेऊन बसला होता. त्याला डुलकी लागली होती. त्याला बहुधा दु:स्वप्न पडले असावे कारण त्याच्या चेहर्यावर मनातली खळबळ स्पष्ट दिसत होती. रश्मीने हातातला ट्रे बाजूला ठेवला आणि ख्रिसला उठवले.
"अॅलेक्सी?"
"नाही, रश्मी. अॅलेक्सी आता या जगात नाही, सर."
ख्रिसच्या चेहर्यावर क्षणभरच अवकळा पसरली. असे क्षण आता रश्मीच्या नजरेतून निसटत नसत. प्रयत्नपूर्वक बुजवलेल्या भेगा अन्यथा अदृश्य होत्या.
"रश्मी, ओह्ह मिडनाईट स्नॅक्स घेऊन आली आहेस. दीज मफिन्स लूक डेलिशिअस. हे मंग बीन केक्स आहेत ना?"
"हो." ती जरा घुटमळली. मग हिय्या करून तिने विचारले "सर. अॅलेक्सीकडे तुम्ही कोणत्या गुन्ह्याची माफी मागत होतात?"
ख्रिस चमकला. "मी अॅलेक्सीकडे माफी मागत होतो?"
"हो. तुम्हाला झोपेत बडबडायची सवय आहे. ती पूर्वीपासून होती का ते मला ठाऊक नाही. पण तुम्ही झोपेत अॅलेक्सीच्या नावाचा एकच धोशा लावत असता. अॅलेक्सी तुमचा वॅलेट होता ते मला माहित आहे. तो आता या जगात नाही हेही मला ठाऊक आहे. त्याचा असा कोणता गुन्हा तुम्ही केला होता ते मात्र मला माहित नाही."
"रश्मी; खरं म्हणजे तुला याविषयी सांगावं का नाही याबाबत मी दुविधेत पडलो आहे. पण एक म्हणजे तुझा या गोष्टींशी अपरोक्ष संबंध आहे आणि दुसरे म्हणजे तुला अर्धवट घटनाक्रम माहिती पडल्याने दोघांचेही नुकसानच आहे. जर आपल्या दोघांना एकमेकांची हे रहस्य सोडवायला मदत करायची असेल तर एवढा विश्वास मला तुझ्यावर ठेवावाच लागेल. ठीक आहे. पण मला वचन दे की हे आणखी तिसर्या कोणाला सांगणार नाहीस. जोसेफ आणि सर मॅक्सवेल, ज्यांना तू अजून भेटली नाही आहेस पण तुला ते कोण आहेत याची कल्पना आहे, ते वगळता हा घटनाक्रम आता फक्त तुला माहिती असेल."
रश्मीने वचन दिल्यानंतर ख्रिसने अगदी थोडक्यात सर्व घटना विशद केल्या. बर्थोल्टचा खून, फणींद्र हा मुख्य संशयित, आणि त्याचा सर्कशीशी आलेला संबंध! फणींद्रसोबत जंगलात घडलेल्या चकमकीत अॅलेक्सीचा दुर्दैवी मृत्यु आणि त्याला वाचवण्यात स्वतःला आलेले अपयशही ख्रिसने खेदाने नमूद केले. चतुराईने त्याने याचा राजे पंचम जॉर्ज यांच्यापर्यंत पोचणारा संबंध मात्र सांगितला नाही. सुदैवाने रश्मी आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयात पूर्णतया अज्ञानी असल्याने तिने कोणतेही अवघड प्रश्न विचारले नाहीत. तिच्या चेहर्यावर काहीसा अविश्वास मात्र अजूनही दिसत होता. ख्रिस एकीकडे ते भाव वाचून काहीसा चिंतेत पडला. हिला या कहाणीतले गाळलेले दुवे, मोरोक्कन क्रायसिस आणि पर्यायाने जर्मनांनी भारतीय क्रांतिकारकांशी बांधलेले संधान समजले की काय? हिचा युगांतरशी काही संबंध असू शकेल? हिचे ब्रिटिश साम्राज्याविषयी मत कळायलाच हवे. अंधारात बाण मारून काही फायदा नाही. हिला थेट प्रश्न तर विचारू शकत नाही, हिच्या प्रतिक्रियेवरून जर काही अंदाज बांधता आला तर आला. ख्रिसच्या विचारांची मालिका त्याचे बोलून होताच रश्मीने दिलेल्या प्रतिक्रियेने तोडली.
"मी असं तर नाही म्हणणार की मी तुमचे दु:ख समजू शकते. डोळ्यादेखत अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यु होण्याचा योग माझ्या शत्रूच्याही नशीबात नसू दे. अशावेळी फणींद्र भलेही भारतीय क्रांतिकारक असला तरी मी त्याची बाजू घेणार नाही. तुम्ही माझ्याबद्दल त्याप्रकारचा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. मी बरीच वर्षे लोकांना ठकवून पोट भरले असले तरी माणसाचा जीव कधीच घेतला नाही आणि फणींद्रसारख्या लोकांना माझी सहानुभूति मिळणे कठीण आहे. पण मला आता वेगळेच प्रश्न पडले आहेत."
"ते कोणते?" ख्रिस अजूनही तिच्याबद्दल साशंकच होता. काही भारतीय मवाळ गटाच्या विचारसरणीचे असले तरी तोंडी आश्वासनावर तो कधीच विश्वास ठेवणार नव्हता.
"तुम्ही म्हणालात अॅलेक्सीचा मृत्यु पुण्यात झाला. पण तुमच्या बोलण्यात पुण्याचा उल्लेख येतच नाही."
"काय?" ख्रिस बुचकळ्यात पडला. क्षणभरच, क्षणभरच तो गोंधळला. आणि त्याच्या सुप्त आठवणींमध्ये दडवलेली ती कटू आठवण पुन्हा ताजी झाली.
"त्यात मी अॅलेक्सी किंवा माझ्या वडिलांचा उल्लेख करतो का?"
"हो. डार्टमूरचाही मधून मधून उल्लेख येतो."
ख्रिसचा चेहरा कठोर झाला. आठवणींच्या त्या कप्प्यात शिरकाव होण्याइतकी रश्मी अजून विश्वासपात्र झाली नव्हती. सर मॅक्सवेल आणि अॅलेक्सी या दोनच व्यक्ती अशा होत्या ज्यांच्यासोबत तो त्या दुर्दैवी घटनांबद्दल बोलू शकायचा. अनवधानानेच का होईना पण रश्मीला त्याच्याविषयी माहिती झाली होती.
"रश्मी. आय अॅम सॉरी बट यू कॅन नॉट कंटिन्यू अॅज माय मेड. मी तुला कोणतेही स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. अर्थात मी इतका निष्ठूरही नाही की तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकेन. आपला मुक्काम जोवर इंदूरमध्ये असेल तोवर तू माझी मेड राहशील. आपल्याला जर सर्कसमधल्या रहस्यावरून पडदा काढता आला तर तुला तुझ्या भूतकाळाचीही उत्तरे मिळतील. आणि घाबरू नकोस, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. पण .. "
ख्रिस अडखळला. रश्मीच्या चेहर्यावर आश्चर्य आणि संताप असे मिश्र भाव उमटले होते. तिला यात लपवण्यासारखे काय आहे हे समजत नव्हते. अॅलेक्सीबाबत जे घडले ते दुर्दैवी होते आणि कदाचित तसेच काही त्याच्या वडलांसोबतही घडले असावे. पण म्हणून अशी अतिरेकी प्रतिक्रिया देण्याचे काहीच कारण नव्हते. निदान तिच्या लेखी तरी नव्हते.
"ओके सर. नाही, ख्रिस! जर मी तुझी विश्वासपात्र नोकर बनू शकत नसेन तर आपण दोघे फक्त रहस्यभेद करायला एकत्र आलेली जोडगोळी आहोत. आणि माझ्यालेखी जोडगोळीत दोघेही समान स्तरावर आहोत. बाकी तुला जर माझ्यापासून काही गोष्टी लपवायच्या असतील तर तो तुझा प्रश्न आहे. शुभरात्री ख्रिस!"
खोलीचा दरवाजा दाणकन आदळला. ख्रिसने ओंजळीत आपला चेहरा लपवला. एक मिनिटही झाले नसावे आणि खाडदिशी दरवाजा पुन्हा उघडला.
"एक गोष्ट राहिलीच! तू सांगितलेल्या गोष्टीनुसार या सगळ्याची सुरुवात बर्थोल्टच्या खुनापासून झाली. बरोबर?" ख्रिसने गोंधळून मान डोलाविली.
"आणि बर्थोल्टचे शेवटचे शब्द फ्री... फ्री.. असे होते?"
"हो. पण त्याचा इथे काय संबंध?"
"संबंध आहे. डार्टमूर कुठे आहे, तिथे काय झाले मला नाही माहित. पण तू सांगितलेली गोष्ट आणि तुझी झोपेतली बडबड यात अॅलेक्सी सोडून आणखी एक धागा समान आहे. हा शब्द. फ्री...! इतकेच नव्हे जसे बर्थोल्ट कोणता तरी शब्द पूर्ण करू पाहत होता तसाच तू ही फ्री पासून सुरू होणारा कोणता तरी शब्द पूर्ण करू पाहतोस. या सर्वांमध्ये काहीतरी हरवतंय ख्रिस. यासाठी तुझ्या त्या आठवणी महत्त्वाच्या आहेत."
रश्मी गेल्यानंतर ख्रिस विचारात गुंगला होता. प्रयत्नपूर्वक विस्मरणात गेलेल्या त्या कटू प्रसंगात आणि "फ्री..." मध्ये काही एक समान धागा होता. तो शोधायचा म्हणजे जखमेवरची खपली उकलणे भाग होते. अडचण इतकीच होती की दशकाभरापूर्वीचे तपशील आठवण्याइतकी ख्रिसची स्मरणशक्ती तीव्र नव्हती.
~*~*~*~*~*~
सर मॅक्सवेल जोसेफशी संपर्क झाल्यानंतर आपल्या कचेरीत एकटेच विचारमग्न होते. आज त्यांच्या हातात चहाचा कप नव्हता तर तंबाखूने भरलेला पाईप होता. त्यांच्यातला व्हिक्टोरियन एटिकेट्सच्या विरोधात जाणारी ही एकच सवय त्यांच्यात होती. अन्यथा कोणताही जंटलमन हा त्याच्या सार्वजनिक कचेरीत अगदी एकांतातही धूम्रपान करू धजावला नसता. पीटरसन कंपनीच्या ब्रायर लाकडापासून बनवलेल्या पाईपमध्ये त्यांनी पुन्हा ओरिएंटल व्हर्जिनिया जातीच्या पानांची पूड भरली व पुन्हा पाईप शिलगावला. फणींद्रचे सूत्र हाती आल्यासारखे दिसत होते पण अजूनही जर्मनीहून आलेला तो धोकादायक इसम, डेव्हिड, त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. जोसेफला फणींद्रला पकडण्यात यश येईल अशी प्रार्थना मनोमन तेही करत होते पण त्यांनाही हे ठाऊक होते की युगांतरच्या कार्यकर्त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरपकड करूनही जो मनुष्य सापडला नव्हता तो सहजासहजी शरणागती पत्करणार नाही. जो मनुष्य पुण्यातल्या कडेकोट बंदोबस्तातून रातोरात निसटून कलकत्त्यापर्यंत पोचू शकतो, त्याला त्याच्याच घरच्या मैदानावर कमी लेखण्यासारखी दुसरी चूक नसेल. जोसेफला त्यांनी हे सर्व तीन-तीनदा निक्षून बजावले. जोसेफने योजनेचा जो आराखडा सांगितला त्यावरून तरी फणींद्राला काही चमत्कारच करून दाखवावा लागेल असे दिसत होते. जर डेव्हिडचाही पत्ता लागला तर त्यांना पुन्हा त्यांच्या लाडक्या अर्ल ग्रेचा मनापासून आस्वाद घेता येणार होता. नेमक्या अशा वेळी ख्रिस इंदूरात जाऊन बसला होता. ख्रिस आत्ता हाताशी असता तर डेव्हिडचा शोध घेणे कठीण गेले नसते. पण ख्रिसला त्या सर्कशीत अधिक रस होता. ख्रिसच्या वागण्यात त्याच्या वडलांची, सर चार्ल्सची झलक होती. सर चार्ल्स .....
*****
सर चार्ल्स काल्डवेल यांचा जन्म १८४९ मध्ये डार्टमूरच्या काल्डवेल मॅनोर येथे झाला. त्यांचे वडील कधी नव्हे ते तिथे उपस्थित होते. काल्डवेल घराणे तेव्हा फारसे गाजलेले नव्हते. चार्ल्स यांचे वडील रॉजर काल्डवेल हे कधी काळी जहाजावर खलाशी म्हणून काम करायचे. खलाशाचे आयुष्य जगता जगता ते कधीतरी इस्ट इंडिया कंपनीच्या युद्धनौकांवर काम करू लागले. लवकरच त्यांनी अंगच्या गुणांवर एका जहाजाचा फर्स्ट मेट अर्थात उपकप्तान होईपर्यंत मजल मारली. १८३९ मध्ये चिंग राजवंशीयांसोबत कंपनीचे खटके उडाले. याच वर्षी अफू युद्धाचा भडका उडाला आणि त्याची परिणीती ब्रिटिशांचे चीनवर व्यापारिक वर्चस्व प्रस्थापित होण्यात झाली. या युद्धाचा भाग असलेल्या कँटन (चिनी: गुआंगझो) बंदरामधल्या आरमारी लढायांमध्ये रॉजर यांनी पराक्रम गाजवला. एका लढाईत तर कप्तान जखमी झाल्यावर त्यांनी नौकेचे नेतृत्व करून विजयश्री संपादन केली. लवकरच त्यांची कप्तानपदी बढती झाली आणि काल्डवेल घराणे नावारुपास आले. रॉजर तुलनेने अल्पायुषी असल्याने चार्ल्सवर लहान वयातच घराण्याची मिळकत सांभाळण्याची जबाबदारी आली. इतर सरदार घराण्यांमध्ये आधीच वेगळे पडत असलेल्या काल्डवेल्सना त्यांचा प्रमुख तरूण असल्याचा फटका बसू शकत होता. पण दिवाणी बाबी चार्ल्स यांच्या आईने चोख सांभाळल्या आणि पुरत्या वीस वर्षांच्याही नसलेल्या चार्ल्सने १८६८ मध्ये युद्धभूमिवर प्रथम पाऊल ठेवले. अॅबेसिनियापासून सुरु झालेला त्याचा प्रवास १८८५ मध्ये अखेर सिक्कीम मध्ये संपुष्टात आला. एक पाय कायमचा गमावल्यानंतर त्याने अखेर डार्टमूरमध्ये परतून उरलेले जीवन व्यतीत केले.
हेन्रींना या पार्श्वभूमिची कल्पना होती. किंबहुना त्यामुळेच चार्ल्सचा स्वभाव चिडचिडा असावा अशी त्यांची धारणा होती. चार्ल्स यांचा शेवटही दुर्दैवी होता. १८९९ मध्ये त्यांच्या पन्नाशी गाठल्यानंतर काही दिवसातच काल्डवेल मॅनोरला आगीच्या ज्वाळांनी वेढले. ही आग कशी लागली याचे कोडे कोणालाही उलगडले नाही. त्यातून फक्त दोन व्यक्ती वाचल्या - एकोणीस वर्षीय ख्रिस काल्डवेल आणि त्याचा वॅलेट अॅलेक्सी बिंगहॅम! हेन्रींना कायम या योगायोगाचे विलक्षण आश्चर्य वाटे की काल्डवेल घराण्याची धुरा खांद्यावर घेताना चार्ल्स आणि ख्रिस हे दोघेही जवळपास समान वयाचे होते. ख्रिसने चार्ल्सप्रमाणेच आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अॅलेक्सीच्या मदतीने लंडनमध्ये डार्टमूरकरांची पत वाढवली. चार्ल्स रणांगणावरचे तरबेज खेळाडू होते तर ख्रिस बुद्धिबळाची खेकटी नाचवण्यात निष्णात सिद्ध झाला. एक कोडे त्यांना कधीच उलगडले नाही की ख्रिसने त्या अपघाताची चौकशी म्हणावी तितकी कसून केली नाही, निदान त्यांच्या मते तरी. सर चार्ल्स आगीपासून वाचण्याच्या नादात सर्वात वरच्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळले हा निष्कर्ष त्यांनी मान्य केला होता. किमान चार्ल्सना तात्काळ मृत्यु आल्याने त्यांचा अखेरचा प्रवास सुकर झाला यातच हेन्रींना समाधान होते. त्याच्या या बुद्धिकौशल्यावर खुश होऊनच त्यांनी १९०९ मध्ये जेव्हा एस एस बीचे इंडिया शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी आवर्जून ख्रिसचा आपल्या वर्तुळात समावेश केला.
******
पण आत्ता ख्रिसने त्याच्या वडलांप्रमाणे हेकेखोरपणा न करता बॉम्बे मध्ये परत येणे अत्यावश्यक होते. त्याला अधिक नाराज न करता हे कसे करता येईल हाही विचार हेन्रींच्या डोक्यात पिंगा घालत होता. दारावर टकटक अशा आवाजाने त्यांची तंद्री भंगली. त्यांनी खिडकीचे तावदान उघडून आतला धूर थोडा कमी होईल अशी व्यवस्था केली व बाहेरील व्यक्तीस आत येण्याची परवानगी दिली. तो बॉम्बेच्या पोलिसखात्यातून आला होता. त्याने अगदी थोडक्यात आपल्या येण्याचे कारण सांगितले आणि हेन्रींच्या हातातला पाईप गळून पडला.
........
........
त्यांच्या सेक्रेटरी एल्साचे शव बॉम्बे पोलिसांना सापडले होते.
~*~*~*~*~*~
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66324
कथा छान वेग घेते आहे. मस्तच!
कथा छान वेग घेते आहे. मस्तच!
एक्स्ट्रा फीचर
एक्स्ट्रा फीचर
या भागात रश्मी बनवते ते मंग बीन केक्स हे मेकाँग खोर्यातले एक पक्वान्न आहे. लाओ, व्हिएतनाम व आजूबाजूच्या देशात ते आवडीने खाल्ले जातात. आपापल्या आवडीनुसार चवीसाठी एखादा गोड पदार्थ (मध किंवा पाक) किंवा नुसतेच तिखट-मीठ घातले जाते. गोष्टीतली पाककृति प्रमाणबद्ध नसली तरी वर्किंग रेसिपी आहे. ते असे दिसतात (लुआंग प्रबांग व्हर्जन) - https://youtu.be/41jPlL9pUAw?t=2m44s