फ्री...? : भाग ९

Submitted by पायस on 1 June, 2018 - 10:07

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66296

ऑगस्ट १९११
कलकत्ता, ब्रिटिश इंडिया
सिआल्ढा रेल्वे लाईनजवळ एक अज्ञात ठिकाण

त्या बैठकीस मोजून पाचजण उपस्थित होते. यातल्या प्रत्येकाच्या अटकेसाठी ब्रिटिश सरकार जंगजंग पछाडत होते. १९०८ नंतर झालेल्या कारवायांमुळे आम बंगाल्याला यातील काहीजणांची तरी नावे ठाऊक होती. यात एक विरोधाभास असा कि यांच्यात सर्वात कमी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या मागे कलकत्ता पोलिस हात धुवून लागले होते. फणींद्रनाथ दत्तला याची पूर्ण कल्पना होती आणि त्यामुळे त्याला लवकरात लवकर कलकत्ता सोडायचे होते. पण त्याच्यासाठी दिल्ली खूप दूर होती आणि तिथे पोचण्यासाठी ब्रिटिश अडथळ्यांची शर्यत पूर्ण करायची होती. यासाठी या उर्वरित चार जणांची मदत आवश्यक होती.
मनोमन त्याला माहित होते कि या चौघांपैकी एकाचेही त्याच्याबद्दल पूर्णतः अनुकूल मत नव्हते. त्यांचा मुख्य आक्षेप होता कि फणींद्रच्या क्रांतिकारी कारवाया गरजेपेक्षा जास्त भडक स्वरुपाच्या असतात, हिंसक असतात. फणींद्रचा या सर्वांमागचा हेतु त्याच्या आंतरिक हिंसक प्रवृत्तीला वाट करून देणे हा असतो, देशहित वगैरे दुय्यम मुद्दे असतात. अशा व्यक्तीला क्रांतिकारक म्हणायला ते किमान दोन वेळा विचार करणे स्वाभाविक होते. तरीही त्यांना फणींद्रवर विश्वास ठेवणे भाग होते कारण फणींद्रसारखा जीवावर उदार झालेला तरुण मिळणे वाटते तेवढे सोपे नव्हते. देशप्रेमाने भारलेले तरुण अनेक मिळू शकत असले तरी बिनदिक्कत बंदूकीचा चाप ओढणारा तरुण मिळणे तितके सोपे नव्हते. फणींद्रला याची पूर्ण कल्पना होती आणि त्यात काही अंशी तथ्य असल्याचेही त्याला मान्य होते. त्यामुळे तो त्यांच्या वैयक्तिक मतांविषयी काहीसा बेफिकीर होता.
"फणी तुझी योजना सांगण्यापूर्वी युगांतरला काय अपेक्षित आहे हे पुन्हा एकदा डोक्यात साठव. आपले प्राथमिक लक्ष्य आहे बंगालची फाळणी ब्रिटिश सरकारला रद्द करायला भाग पाडणे. निदर्शनांच्या जोडीने जे काही रट्टे द्यायला लागतात त्यांपैकीच हा एक आहे. याने आपल्या अंतिम लक्ष्याकडे, स्वातंत्र्य प्राप्तिच्या दिशेने, एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल. त्यामुळे तुझ्याकडे गोर्‍यांचे लक्ष वेधले जाईल अशी कुठलीही कृति करू नकोस."
फणींद्रच्या चेहर्‍यावर कंटाळल्याचे भाव होते. त्याला समजावणार्‍या व्यक्तीचा पावित्रा 'मी माझे काम केले आहे' अशा प्रकारचा होता. त्या सर्वांना ठाऊक होते कि या सल्ल्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाण्याची शक्यता खूप जास्त होती. फणींद्रने हे औपचारिक सल्ले ऐकून घेतल्यावर बोलायला सुरुवात केली.
"पंचम जॉर्ज डिसेंबरमध्ये हिंदुस्थानात येईल. दिल्लीत तो ७ डिसेंबरच्या आसपास पोचेल. डेव्हिडने दिलेल्या माहितीनुसार १२ डिसेंबरला प्रत्यक्ष दरबार असणार आहे. हार्डिंग्जच्या मनात आहे कि पूर्वीच्या मुघल दरबारांच्या धर्तीवर हा दरबार भरवला जावा. जणू आता हिंदुस्थानचे सार्वभौम सम्राट, शहेनशाह कोण हे एकदाच कायमचे ठसवायचा इरादा आहे. त्या प्रथेला अनुसरून लाल किल्ल्याच्या सज्जातून ते दोघे जनतेला दर्शन देतील. त्यानंतर दरबार भरेल. तिथेही आम जनतेला एका ठराविक अंतरावरून हे सर्व बघायला वाव असेल. या काळात जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी काम फत्ते करेन."
"ठीक आहे. तुला आमच्याकडून काय काय मदत लागणार आहे?"
"मला इथून दिल्लीपर्यंत पोचायला तुमची मदत लागेल. मी रेल्वेने प्रवास करू शकत नाही. सर्व स्टेशन्सवर त्यांनी कडक पाळत ठेवली असणार. त्यांना मी कलकत्त्यात आहे हेही ठाऊक आहे. त्यामुळे इथून निसटण्याचाही मोठाच प्रश्न आहे. तसेच माझी वाटेत राहायची खायची सोय होईल अशी काही घरे, त्यातल्या रहिवाशांची नावे, पत्ते इ. माहिती देखील मला हवी आहे."
"त्याची व्यवस्था होईल. तुझ्याजवळ असलेल्या पिस्तुलाखेरीज आणखी दोन पिस्तुले आणि पुरेशा गोळ्यांची सुद्धा सोय झाली आहे. गरज पडलीच तर आणखी दारुगोळा व हत्यारे तुला वाटेत मिळत राहतील."
"अं त्याची गरज पडणार नाही. माझा एक थांबा अलाहाबादला होईल. तिथे मला ठराविक वेळेस हजर असणे भाग आहे. त्याशिवाय ही योजना पूर्ण होऊ शकत नाही."
"हो आम्हाला कल्पना आहे. त्याचीही सोय केलेली आहे. तुला दुर्गापूजेच्या काळात बाहेर काढणे सोयीचे जाईल, त्याची कारणे स्वाभाविक आहेत. किंबहुना दुर्गापूजेच्या अखेरच्या दिवसात जेव्हा प्रचंड गर्दीत शोधाशोध करून थकलेल्या पोलिसांना अचानक चकित करून गुंगारा देता येईल. तुला इथूनच एखाद्या गाडीत चढवून प्रथम बंगालमधून बाहेर काढावे लागेल. मग तिथून बिहारमार्गे पुढचा प्रवास होईल. येत्या आठवड्याभरात योजनेचा आराखडा पक्का होईल आणि मग पुढची सूत्रे आम्ही तुझ्या हातात देऊ."
ते पाचही जण आपापल्या वाटेने मार्गस्थ झाले. अजूनही त्या चौघांच्या मनात फणींद्रने सांगितलेल्या बारकाव्यांबद्द्ल शंका होत्याच. डेव्हिड व फणींद्रला ज्या संधीची अपेक्षा आहे, ती संधी येईल? आणि ती संधी आलीच तरी त्याला आवश्यक असलेली वस्तु ऐन क्षणी काम करेल?

~*~*~*~*~*~

सप्टेंबर १९११

आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घटना डेव्हिडच्या दृष्टीने फारशा सुखावह नव्हत्या. मोरोक्कोपासून ब्रिटिशांचा जिब्राल्टरचा नाविक तळ बराच जवळ होता. पँथरच्या आगमनानंतर ब्रिटिशांनी युद्धाची पूर्वतयारी म्हणून युद्धनौका मोरोक्कोच्या आखातात सज्ज ठेवल्या. तसेच जिब्राल्टरला सर्वकाळ युद्ध चालू आहे असे गृहीत धरून तयारीत राहण्याचे आदेश दिले. फ्रान्सनेही आपल्या मोरोक्कोतील सेनेला वेळ पडल्यास आक्रमक पावले उचलण्याची परवानगी दिली. जर्मन आघाडीत दोन गट होते. डेव्हिडचे समर्थन असलेला गट युद्धाची मागणी करत असला तरी दुसर्‍या बाजूच्या जर्मन मुत्सद्द्यांना या मागच्या मूळ उद्देशाचा विसर पडला नव्हता - जर्मनीचे आफ्रिकेतील आर्थिक हितसंबंध! या गटाला युद्ध पुकारले गेलेच तर ते फ्रान्सकडून पुकारलेले हवे होते. फ्रेंचांची प्रतिमा मलीन करण्यामागे जर्मनीचा फायदा अधिक होता. फ्रान्स व इंग्लंड १९०५ मध्ये एकमेकांमधले पूर्ववैमनस्य विसरून एकत्र आले होते. त्यांचा तिसरा मित्र मात्र तुलनेने नवीन होता. १९०८ मध्ये रशियाच्या प्रवेशाने मित्र राष्ट्रांचे त्रिकूट पूर्ण झाले होते. जर अँग्लो-फ्रेंच युतीमध्ये जरासुद्धा कमकुवतपणा दिसला तर रशियन मुत्सद्दी किमान या मैत्रीचा फेरविचार करण्याची शक्यता होती.
एरवी जर्मनीने हे प्रकरण ढकलगाडी करत रेटले असते पण जर्मनीला अपेक्षित नसलेली एक घटना घडली जी औद्योगिक साम्राज्य म्हणून उभरत असलेल्या राष्ट्रासाठी घातक होती. जर्मन बाजार एका दिवसात ३० टक्क्याने कोसळला. अफवांवर विश्वास ठेवायचा तर या घटनेमागे फ्रेंच अर्थखाते होते. कारण काहीही असो, जर्मनी अर्थसंकटात सापडली हे सत्य होते. अशा वेळी युद्ध पुकारणे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होते. डेव्हिडच्या गटाच्या मताची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाणार होती. तर कीदरलेन-गॅम्बोन जोडीच्या वाटाघाटींना दोन्ही पक्षांनी अधिक गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. इंदूरसाठी निघण्याआधीच डेव्हिडला कळले कि त्याच्या योजनेला सुरुंग लावला गेला होता. त्याला सबुरीने घेण्याचा सल्ला मिळाला होता. आता तो काय तोंड घेऊन इंदूरला जाणार होता?
"आख् डू लीऽबर हिमेल!" डेव्हिडला या लोकांना खाऊ का गिळू असं झालं. थोडा वेळाने त्याचा राग काहीसा ओसरला. आता जर कोणी त्याला पाहिले असते तर तो स्वतःशीच बडबडताना दिसला असता.
"हेर पॅपी, तुमचा काय सल्ला आहे?"
"कठीण समयी कठोर पावले उचलावी लागतात. जर बर्लिनला गुडघ्यातून विचार करायचा असेल तर बर्लिनने तो खुशाल करावा. आपण आपल्या योजनेपासून थोडेसुद्धा हटायचे नाही. यात एक अडथळा एल्साचा आहे. एल्साला इथून जाऊ देता कामा नये. तिला अजूनही काही गोष्टी ठाऊक नाहीत. याचा फायदा घ्या हेर डेव्हिड. आपल्या हालचालींची बित्तंबातमी बर्लिनपर्यंत पोचण्याचे एकमेव सूत्र एल्सा आहे."
डेव्हिडने पॅपीच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला हे ठाऊक नव्हते कि एल्साने त्याची बडबड ऐकली होती. बर्लिनमधल्या एल्साच्या वरिष्ठांना डेव्हिड कसा वागेल याची कल्पना असल्याने त्यांनी एल्साला आधीच आदेश देऊन ठेवले होते. अशी वेळ आलीच तर डेव्हिडवर नजर ठेवून त्याला कोणतेही वेडे साहस करण्यापासून रोखणे. एल्साचे पिस्तूल आजपासून लोडेड असणार होते.

~*~*~*~*~*~

डार्टमूरचा भूगोल मोठा चमत्कारिक आहे. एकीकडे गवताची कुरणे व त्या कुरणांवर वाढलेली 'डार्टमूर पोनीज' तर त्यांच्या मध्येच टेंगळांसारखी उगवलेली टेकाडे व त्यांची माळराने. सततच्या पावसाने असलेले विचित्र धुरकट, दमट हवामान व माजलेल्या दलदली आणि या सर्वांना एकत्र जोडणारा एक प्रदेश डार्टमूर! अशा चमत्कारिक प्रदेशाचे नाव जर भुतेखेते, आख्यायिका, दंतकथांशी जोडले गेले नसते तरच नवल! नुसतेच धड असलेला घोडेस्वार (हेडलेस हॉर्समॅन), राक्षसी कुत्रा, सैतानी पिक्सीज् अशा कित्येक गोष्टी डार्टमूरमध्ये प्रसिद्ध होत्या. मात्र सध्या ख्रिसचे लक्ष वेगळ्याच ठिकाणी केंद्रित होते. थोड्याच अंतरावर चार्ल्स उंचवट्यावरची मोक्याची जागा बघून तयारीत होते. खाली असलेल्या ओढ्यापाशी एखादा ससा यायची ते वाट बघत होते. तसे आजच्या मेजवानीसाठी पुरेशी शिकार मिळाली होती पण सूर्यास्ताला अजून थोडा वेळ होता आणि या वेळात चार्ल्सच्या अंगातील शिकारी गप्प बसणे शक्य नव्हते. पण ख्रिसचे लक्ष त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या घोड्याकडे ख्रिस एकटक बघत होता. मोठं उमदं जनावर! स्क्विडच्या शाईसारखा काळा रंग, तजेलदार कांती, हाडापेराने मजबूत, वार्‍याशी स्पर्धा करणारा वेग आणि कपाळावर सर्पाकृती पांढरी खूण होती. त्याचे नाव चार्ल्सनी व्हाईटस्नेक ठेवले होते. ख्रिसने आपल्या हातातील स्ट्रँड मासिकात डोके घातले. आर्थरने केलेल्या वर्णनानुसार व्हाईटस्नेक आणि सिल्व्हर ब्लेझ बर्‍यापैकी सारखे दिसत असावेत. ख्रिसच्या विचारांचा वारू आता चौखुर उधळला होता. सिल्व्हर ब्लेझ लिहिताना आर्थरही असाच डार्टमूरच्या एखाद्या टेकडीवर बसला असेल का? त्याने कधी सिल्व्हर ब्लेझच्या लेखकाला पाहिले नव्हते पण आपल्या वडलांसारखा नक्कीच दिसत नसला पाहिजे. अचानक त्याला आपला कान जळत असल्यासारखे वाटले. चार्ल्स रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी झाडलेली गोळी सशाच्या पायाला चाटून गेली होती. जर शिकार जखमी होऊन निसटली तर त्याच्यामागे शिकारी कुत्रे सोडायची जबाबदारी घेतलेला ख्रिस मात्र स्वप्नरंजन करत झाडाखाली बसला होता. चार्ल्सने वाहलेली शिव्यांची लाखोली ख्रिसला ऐकू येत होती पण ती त्याच्या डोक्यात नोंदली जात नव्हती. तो वेड्यासारखा त्यांच्याकडे बघतच राहिला. त्यांनी तो स्ट्रँडचा अंक उचलला आणि टराटरा फाडला.
"यू डिमविट!! अशी अक्कल पाजळणार असशील तर गुप्तहेर कसा होणार तू? "
...........
गुप्तहेर कसा होणार तू?
..........
गुप्तहेर???
..........
मी डार्टमूर मध्ये का अडकलो आहे?
.........
अ‍ॅलेक्सी? कुठे आहेस तू?
.........
यंग मास्टर ख्रिस, प्रिसाईजली याच्यामुळेच मास्टर चार्ल्सच्या मते यू आर अ फ्री......"
........
........
........

ख्रिस दचकून जागा झाला. पहाटेचे चार वाजले होते. ओह गॉड, दीज नाईटमेअर्स!! ख्रिस पडल्या पडल्या विचार करत होता, त्या आठवणी आत्ताच का?

~*~*~*~*~*~

पुण्यातल्या घडामोडीनंतर ओल्गा आणि उमा एकमेकींवर अधिक विश्वास तर सर्कशीतल्या इतरांवर अधिक अविश्वास ठेवू लागल्या होत्या. ओल्गा उमापेक्षा लहान चणीची असली तरी अधिक धाडसी होती. ती सर्कशीत अधिक काळ राहिली देखील होती. त्यामुळे तिला सर्कशीतल्या लोकांची अधिक माहिती होती. म्हणून वेळ पडल्यास उमाला सावध करायची जबाबदारी तिची असणार होती. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. भविष्याची कल्पना ना ओल्गाला होती, ना उमाला!

इंदूरमधल्या खेळांना चांगला प्रतिसाद मिळत होता. या सगळ्यात एक गोष्ट तिकिट खिडकीवर बसणार्‍या छोटूच्या लक्षात आली होती. मलिकाच्या ते लक्षात आले होते कि नव्हते याची त्याला कल्पना नव्हती. सहसा अशा गोष्टी छोटूने तडक मलिकाच्या नजरेस आणून दिल्या असत्या पण आता छोटू शब्दशः छोटू राहिला नव्हता. छोटूचे आई वडील कोण होते, तो कुठून आला होता हे त्यालाच काय मलिकालाही ठाऊक नव्हते. मलिकाने सांगितल्यानुसार तो त्यांना माळव्यातून प्रवास करता करता एका भटक्यांच्या काफिल्यासोबत सापडला होता. त्या काफिल्याच्या म्होरक्यानुसार तो त्यांना एका पडक्या वस्तीत सापडला होता. आता ते भटके तिथे काय करत होते, छोटूचे आई वडील त्याला तिथे एकट्याला का सोडून गेले हे प्रश्न अनुत्तरित होते. छोटूला त्याची पर्वा नव्हती. त्याला एकच खंत सतावे की त्याचा वाढदिवस त्याला माहित नव्हता. शहरांतून फिरल्यानंतर त्याला वाढदिवस ही संकल्पना समजू लागली होती. वाढदिवसाला त्याच्या वयाच्या मुलांचे होणारे लाड पाहिल्यावर आपलाही एक वाढदिवस असावा अशी इच्छा असणे साहजिक होते.

छोटूचे वय दहा वगैरे असावे. किशोरवयीन चौकस बुद्धिप्रमाणे त्यालाही अनेक प्रश्न पडत. पण मलिकाच्या सान्निध्यात राहून तो आपले तोंड बंद ठेवायला शिकला होता. आता मात्र एक बदल घडला होता. उमाच्या रुपाने त्याला एक ताई लाभली होती. त्या मिशा असल्या तरी उमा जेमतेम एकोणीस-वीस वर्षांची होती. या वयाची ओल्गा पूर्वीही सर्कसमध्ये असली तरी ओल्गासोबत असलेला भाषिक अडसर उमाबरोबर नव्हता. त्यामुळे उमासोबत छोटू मनमोकळेपणे बोलत असे. वाढत्या वयानुसार येणारी बंडखोरी म्हणा किंवा उमाशी वाढलेली जवळीक म्हणा पण छोटूने आपले निरीक्षण उमाला आणि पर्यायाने ओल्गाला सांगायचे ठरवले. त्यानुसार रात्री तो ओल्गा आणि उमाच्या तंबूत आला.

"ये छोटू, आम्ही तुझीच वाट बघत होतो." उमाने छोटूला आपल्या बिछान्यावर बसायला जागा दिली. ओल्गाने बाहेर कोणी नाही ना याचा कानोसा घेतला. रातकिडे, नागराजच्या सापांचे फूत्कार आणि अधून मधून संग्रामचे झोपेतले सौम्य गुरकावणे वगळता आता कसलाही आवाज येत नव्हता. तिने सर्व ठीक असल्याचा इशारा केला आणि छोटू बोलू लागला.
"ताई मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुम्हा दोघींसाठी थट्टेचा विषय असू शकतो. कदाचित मी जे काही सांगत आहे त्यावरून मी उगाचच किरकोळ गोष्टींवर खूप विचार करत आहे असे वाटू शकेल. मला मलिकाकडून अशा प्रकारच्या उत्तरांची सवय आहे पण या खेपेस काहीतरी निराळे आहे."
"छोटू तुला जे काही सांगायचे आहे ते पहिल्यापासून आणि अगदी व्यवस्थित सांग."
छोटूने क्षणभर शब्दांची जुळवाजुळव केली आणि तो बोलू लागला.
"मी नेहमीच तिकिट खिडकीवर बसलेला असतो. अनेकदा माझ्यासोबत मलिका किंवा भद्रपैकी कोणी एक असते पण हल्ली हल्ली ते मला एकट्यालाही हे सर्व सांभाळू देतात. हे काम मी स्वतःहून मागून घेतलेले नाही पण कोणीतरी करायलाच हवे असे ते काम असल्याने मलिकाने मला हे काम करायला सांगितले. अगदी खरं सांगू? मला या कामाचा प्रचंड कंटाळा आहे. तासन् तास नुसते बसून राहणे मला फारसे पटत नाही. मग काहीतरी चाळा म्हणून मी दर शोला किती लोक आले याचा हिशोब मांडू लागलो. त्यातले किती पुरुष होते, किती स्त्रिया होत्या, लहान मुले किती असे आकडे मांडून मी वेळ घालवू लागलो. हे करता करता मला हेही लक्षात येऊ लागले की काहीजण शोला एकापेक्षा अधिक वेळा येतात."
"छोटू एक मिनिट .. हे अपेक्षितच आहे ना? मुद्दामून सर्व खेळ एकाच शोला दाखवत नसल्याने लोक अनेकदा सर्कशीत यावेत हा हेतु साध्य होतो." ओल्गा छोटूला थांबवत म्हणाली.
"ओल्गाताई ते मलाही समजते. पण एका दिवशी आपण २-३ शो करतो. ते सर्व शो तर अगदी सारखे असतात. थोडक्यात दिवसाला एकच शो बघणे पुरेसे आहे."
उमा आणि ओल्गाने मान डोलाविली. सर्कसच्या तिकिटाचे दर इतकेही स्वस्त नव्हते की कोणा शौकिनाने रोज रोज तेच तेच खेळ तीन-तीनदा पाहावेत. तर श्रीमंतवर्गाने वेळ घालवावा इतकीही ही सर्कस दर्जेदार नव्हती.
"पण गंमत अशी आहे की आपल्या प्रत्येक मुक्कामात एकजण असा असतोच जो प्रत्येक शो बघतो."
"काय?" उमा अस्फुट ओरडलीच. सावध असलेल्या ओल्गाने तिच्या तोंडावर आपला हात दाबला. धक्का तर तिलाही बसलाच होता. सुदैवाने कोणी जागे व्हावे एवढा काही मोठा आवाज झाला नव्हता.
"हो. दरवेळी कोणीतरी एकजण असतो जो प्रत्येक शो बघतो. दरवेळी तो एक तरूणच असतो. हे मी मलिकाच्या नजरेस आणल्यावर तिने ते थट्टेवारी नेले. तसेच मला सौम्य शब्दांत हे कोणाला न सांगण्यास बजावले."

आता उमा आणि ओल्गा काहीशा गोंधळात पडल्या. तसे बघावे तर छोटू म्हणाला तशी ही अगदीच किरकोळ बाब वाटत होती. पण मग मलिकाने ही बाब गुप्त राखण्याचा प्रयत्न का करावा? छोटूकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती.
"तर या मुक्कामात अजब गोष्ट अशी की यावेळी एकापेक्षा अधिकजण प्रत्येक शो बघायला येत आहेत. नेहमीप्रमाणे एक तरूण आहेच. त्याबरोबर एक जोडगोळी आहे. ही जोडगोळी खूप विचित्र आहे. कोणी गोरा साहेब आणि एक भारतीय तरूणी आहेत. गोर्‍याची नजर तिकिट काढताना सतत भिरभिरत असते. तिकिट काढल्यानंतरही तो आसपासच घुटमळत असतो. शक्यतो तो मलिका नसतानाच तिकिट काढतो. मलिका असेल तर तो हॅट ओढून घेतो आणि ती तरूणी तिकिटाचे पैसे चुकते करते."
छोटूचे बोलणे ऐकून घेतल्यावर ओल्गा आणि उमा विचारात पडल्या. त्याला त्याच्या तंबूत पोचवून ओल्गा परत आली.
"तुला काय वाटते ओल्गा? या जोडगोळीचा हेतु काय असावा? निश्चितच त्यांना सर्कस बघण्याखेरीज काहीतरी इतर हेतु साध्य करायचा आहे. पण काय?"
"माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत उमा. पण त्या जोडीकडे आपल्या काही प्रश्नांची उत्तरे असू शकतात. आत्ता आपण फार काही करू शकत नाही. त्यामुळे झोपणेच इष्ट! शुभरात्री उमा"
"शुभरात्री ओल्गा"

***

ओल्गा आणि उमा निद्रादेवतेच्या राज्यात प्रवेश करून काही मिनिटेच झाली असतील आणि सर्कशीत आणखी एक प्रसंग घडला ज्याची बहुतांश सदस्यांच्या लेखी नोंद झालीच नाही. मिट्ट काळोखात लाल साडी नेसलेली ती स्त्री एकटीच चालत होती. ती साडी फारशी भरजरी नसली तरी तिचे कापड अतिशय तलम होते. त्यावर काळ्या रंगाच्या धाग्याने चित्रविचित्र आकृत्या रेखाटल्या होत्या. रश्मीने जर या स्त्रीला पाहिले असते तर तिची भीतिने बोबडी वळाली असती कारण त्या आकृत्यांमध्ये एक आकृती त्या निशाणाची होती. ती स्त्री रुद्रच्या तंबूच्या दिशेने चालत होती. हवेत काहीसा गारवा असल्याने रुद्र बहुधा तंबूच्या आत झोपला होता. संग्राम मात्र बाहेरच पहुडला होता. ती दहा कदमांवर येताच संग्रामने आपली मान उंचावून तिच्याच्या नजरेस नजर दिली. त्याच्या हलक्या गुरगुरण्याला आता एकप्रकारचा तिखटपणा आला होता. तिने हलकेच दोन तीन पावले संग्रामच्या दिशेने टाकली आणि संग्राम चारही पायांवर उभा राहिला. हे बघताच ती काळोखात दिसेनाशी झाली. संग्राम थोड्या अधिक तीव्रतेने गुरकावला. भद्र हा आवाज ऐकून धावतच संग्रामपाशी आला. संग्रामला आवरण्याचे धाडस मात्र त्याच्यात नव्हते. त्याने एक आवंढा गिळला. हलकेच एक एक पाऊल तो मागे सरू लागला. संग्रामही एक एक पाऊल पुढे सरकू लागला.
"संग्राम थांब!" रुद्रची साद ऐकून संग्राम मागे फिरला. आपल्या पूर्वीच्या जागी जाऊन तो डाव्या कुशीवर लवंडला. भद्रने कपाळावरचे घामाचे थेंब हातानेच पुसले. मग तो रुद्रजवळ जाऊन कुजबुजला
"नेहमीचंच होतं ना?"
"हो. नेहमी जे होतं तेच होतं"

~*~*~*~*~*~

ऑगस्ट महिना संपत आला होता. अजूनही फणींद्रचा पत्ता लावण्यात जोसेफला यश आले नव्हते. फणींद्र कलकत्त्याच आहे आणि बाहेर निसटू शकलेला नाही हेही अगदी छातीठोकपणे सांगता येत नव्हते. निरुपायाने त्याने ख्रिसशी संपर्क साधला होता. ख्रिसने पाठवलेल्या तारेनुसार आज त्याला एका माणसाशी संपर्क साधायचा होता. संपूर्ण कलकत्ता म्हणे या माणसाला तोंडपाठ होते. ख्रिसच्या तारेतील सूचनांनुसार तो पार्क रस्त्यावरील दफनभूमित आला होता. फारशी वर्दळ नसल्याने दिवसा सुद्धा ती जागा अंगावर येत होती. चालताना मधूनच वाळलेली पाने तुडवली जाऊन त्यांचा दबकासा आवाज येत होता. वारा अजिबात नसल्याने झाडेही स्तब्ध उभी होती. त्या झाडांच्या मध्ये बघ्यांसारखे उभे असलेले हेडस्टोन्स आपल्या घरात आलेल्या आगंतुकाचे निरीक्षण करत होते. जोसेफनेही उगाचच मग आपला कोट सारखा केला न केला. ख्रिसने त्याला सर एलिजा हॉपक्राफ्ट (मयत १७८१) ही कबर शोधायला सांगितले होते. वरकरणी ती साधीशीच कबर होती. एक टवटवीत लाल गुलाब तेवढा तिथे ठेवलेला होता. अतिशय बारीक अक्षरांत त्यावर पुढील ओळी कोरल्या होत्या

" सर एलिजा हॉपक्राफ्ट
अ मोस्ट काईंड पर्सन हू ऑल्वेज कॅरीड मेसेजेस फॉरवर्ड
ऑक्टोबर १७२० - एप्रिल १७८१"

ख्रिसने लिहिल्याप्रमाणे खरेच तिचा हेडस्टोन ढिला होता. हलकेच ढकलल्यावर त्याच्या खाली एक छोटीशी पेटी ठेवता येईल एवढी खोलगट जागा होती. त्याने आपल्या खिशातून एक लिफाफा काढून त्या दगडाखाली सरकवला आणि तो दगड सारखा केला. परत जायला वळाला तर तिथे एक गिड्डासा कोणी उभा होता. त्याच्या शरीराची ठेवण अतिशय अनैसर्गिक भासत होती. पाठीला चांगलेच कुबड होते. त्याने तोडक्या मोडक्या इंग्रजीत विचारले?
"हू यू? धिस प्लेस पब्लिक प्लेस, व्हाट यू डूईंग हिअर"
हा दफनभूमिचा चौकीदार असावा. जोसेफने त्याला आपले आयडी कार्ड दाखवून परिस्थिती समजावून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या निर्बुद्धाचा एकच हेका होता. या वेळी एका कबरीपाशी एक अनोळखी माणूस काय करत आहे? एक चौकीदार म्हणून त्याचा हे जाणून घेण्याचा आणि वेळ पडल्यास जोसेफविरुद्ध तक्रार करण्याचा त्याचा हक्क आहे. तेवढ्यात कोणी एक तरुण तिथे धावत आला. त्याने अस्खलित इंग्रजीत संभाषण सुरू केले
"मे आय हेल्प यू सर?"
"थँक गुडनेस, येस प्लीज. देअर इज अ सिंपल मिसअंडरस्टँडिंग बट धिस फेलो जस्ट डझ्न्ट वॉन्ट टू लिसन टू मी!"
"ओह्ह. अलाऊ मी टू हँडल हिम सर. ए तुमी! तुमी सरके बिरक्तो करछो केना?"
या पुढचे बंगाली जोसेफच्या आकलनाच्या पलीकडचे होते. बराच वेळ तुमी आमी केल्यावर तो कुबडा चौकीदार नमला आणि पापणी लवायच्या आत दिसेनासा झाला.
"थँक यू. तुमची बरीच मदत झाली."
"मेन्शन नॉट सर. ए ए सर तुमी.. एक सेकंड... हे बिकाशबाबू म्हणत होते की तुम्ही या हेडस्टोनसोबत काहीतरी करत होतात. नक्की काय सर? भोद्रो लोकेर ए रकम काज करेना.. जेंटलमेन डोन्ट डू सच थिंग्ज!"
जोसेफचा आता खरंच नाईलाज झाला. याला काय थाप मारावी या विचारात असतानाच त्याच्या लक्षात आले की तो तरूण स्वतःचा तळवा खाजवत आहे. सूचक नजरेने पाहिल्यानंतर जोसेफ समजायचे ते समजला. हातात पैसे टेकवताच तो तरूण मंदसा हसला. काही विचार करून जोसेफने त्याला अजून काही पैसे देऊन या कबरीवर लक्ष ठेवायला सांगितले. अखेर हा गुप्त मदतनीस कोण हे कळले तर पाहिजे. तसेच लिफाफ्याची उत्तर घ्यायला परत कोण येणार? त्या तरूणाचा सलाम स्वीकारून जोसेफ आपल्यासाठी थांबलेल्या बग्गीत बसला. नो वंडर या लोकांच्या चळवळींना यश येत नाही!

*****

ऑगस्टचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना जोसेफला अपेक्षित उत्तर मिळाले. बागबाजारातील दासांच्या मिठाईच्या दुकानाजवळ तो अज्ञात इसम त्याला भेटणार होता. ख्रिसने हा माणूस कुठून पैदा केला होता ते त्याने ख्रिसला पाठवलेल्या तारेत विचारले. आलेल्या उत्तरावरून तो माणूसच ख्रिसला शोधत आला असल्याचे कळले. यामुळे जोसेफला या मनुष्याविषयी अतीव कुतुहल निर्माण झाले होते.
दिलेल्या वेळेला तो भेटीच्या ठिकाणी पोहोचला. नुसतेच उभे राहायचे तर त्यापेक्षा त्याने रसगुल्ले विकत घेतले. इंग्लिश बेटांवर पुडिंग्जची रेलचेल असली तरी चीझ वापरून केलेल्या मिठाया त्यांच्या समुद्रापारच्या फ्रेंच शेजार्‍यांची खासियत होती. नाही म्हणायला रसगुल्ल्यांचा मुख्य घटक असलेला छेना म्हणजे एक प्रकारचे चीझच! त्यामुळे त्याला फ्रेंच डेझर्ट्सची आठवण झाल्याखेरीज राहिली नाही. इतक्यात त्याच्या समोरच्या बाकड्यावरच्या इसमाने त्याचे लक्ष वेधून घेतले. तो कटहल संदेश खात होता. जोसेफला तो आपल्याकडे टक लावून बघत असल्याचे जाणवले. आपली प्लेट बाजूला ठेवून तो जोसेफशेजारी पडलेले वर्तमानपत्र उचलण्याच्या बहाणा करून कुजबुजला
"संदेश मिळाला. काय माहिती हवी आहे?"

***

हातात वाफाळत्या चहाने भरलेले कुल्हड घेऊन दोघे आत्ता कोपर्‍यावर उभे होते. जोसेफने थोडा गबाळा वेष मुद्दामच केला होता. तरीही एखाद दोघे त्यांच्याकडे वळून वळून बघतच होते. त्या माणसानेही साधाच पण इंग्लिश पद्धतीचा पेहराव केला होता. बघणार्‍या वाटले असते की कोणी अंगबंग एका मध्यम वर्गीय इंग्लिश गृहस्थाशी गप्पा मारत आहे.
जोसेफला आता त्याला निरखून बघता आले. त्याची चण बंगाल्यांच्या मानानेही लहानच होती. अंदाजे पाच फूट उंचीचा, काहीसे चपटे डोके असलेला पण फुगीर जबड्याचा, तिशीतला असा तो होता. रंग काहीसा गव्हाळ असला तरी जोसेफच्या सराईत नजरेने हा मेकअपचा प्रताप असल्याचे ताडले. केसांची झुलपे वाढलेली होती पण तेलाचा वापर करून ते नीट चापून चोपून बसवलेले होते. व्यवस्थित डावीकडे भांग पाडलेला होता. चेहर्‍यावर एकप्रकारचा मख्ख भाव होता. जोसेफने विषय काढला
"तुला माहित असेलच की संपूर्ण कलकत्ता पोलिसखाते कोणाच्या शोधात आहे."
"फणींद्रनाथ दत्त!"
"मग त्याचा पत्ताही ठाऊक असेलच"
त्याने शांतपणे चहाचा एक घुटका घेतला.
"नाही."
"हे बघ फणींद्र सापडणे फार महत्त्वाचे आहे. आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. तुला त्याचा पत्ता ठाऊक नाही, ओके. त्याचा नाहीतर त्याच्यावर लक्ष ठेवणारे युगांतरचे लोक, त्याच्या संपर्कात असणारे लोक, त्याची नेहमीची यायची जायची ठिकाणे.... काहीतरी माहित असेलच. असे काहीतरी जे इथल्या पोलिसखात्यालाही ठाऊक नाही." जोसेफ त्याचा थंड नकार पाहून काहीसा उतावीळपणे म्हणाला.
त्याने शांतपणे चहाचा आणखी एक घोट घशाखाली ढकलला. त्याच्या उजव्या हातावर एक पांढरा चट्टा जोसेफला दिसला. त्याने आता कंटाळलेल्या नजरेने जोसेफकडे पाहिले. त्याला वरपासून खालपर्यंत न्याहळले. मग तो एक एक शब्द मोजून मापून बोलला.
"ख्रिसने तुझ्याबद्दल कधी काही सांगितले नाही. त्याचा कोणी मित्र असा उतावीळ असेल असे वाटले नव्हते. असो, फणींद्रविषयी सर्वात महत्त्वाची बाब ही कि तो कलकत्त्यातून निसटू बघत आहे. तुमचे लोक प्रत्येक प्रवाशावर बारीक लक्ष ठेवून असल्याने ते काम तितके सोपे नाही. आता पहिली गोष्ट अशी की फणींद्र अजूनही कलकत्त्यातच आहे.
"गुड!"
"वेल बॅड न्यूज इज युगांतरने त्याला खूप व्यवस्थित लपवले आहे. त्याला शोधण्यासाठी संपूर्ण शहर पिंजून काढावे लागेल. नव्या व्हॉईसरॉयचे नरमाईचे धोरण बघता किमान उघड उघड तरी इतक्या आक्रमक हालचाली करता येणार नाहीत. अगदी समजा तुम्ही ते करू जरी शकलात तरी हे लक्षात घे की बंगालची फाळणी रद्द होण्याचे गाजर दिसत असल्याने बंगाल काहीसा शांत आहे. केवळ एक मनुष्य पकडण्यासाठी पायाखालच्या निखार्‍यावर फुंकर घालत फिरणे तुम्हाला परवडणार नाही. बॉटम लाईन इज तो जोवर लपून बसला आहे तोवर तरी तुम्हाला त्याला शोधता येणार नाही."
"मग त्याला पकडण्याचा काहीच मार्ग नाही का?"
"त्याला पकडण्यासाठी एकच उपाय आहे. तो त्याच्या अज्ञात आश्रयस्थानातून बाहेर पडायची वाट बघणे."
"पण तो असं का करेल? जर त्याला ठाऊक आहे की त्याला पकडण्यासाठी सर्वजण दबा धरून बसले आहेत तर तो त्याचे रक्षक कडे बाजूला करून मैदानात येईल?"
"त्याला कधी ना कधीतरी यावंच लागणार आहे. त्याशिवाय तो कलकत्त्यातून बाहेर कसा पडेल?"
"सो यू मीन जेव्हा तो निसटायच्या बेतात असेल तेव्हा .."
"येस! तेव्हा तुम्ही सापळा लावून तयार असाल. तेव्हा तुम्हाला त्याला पकडायची संधी मिळेल."

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66313

Group content visibility: 
Use group defaults

ग्रेट!!!!!

आता वाट पाहायची उद्याची.