बाबा नव्हताच तिथे .....

Submitted by अनाहुत on 1 June, 2018 - 03:45

स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला .... कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी .

बाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छापत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच खुर्ची पण... पण बाबा नव्हताच तिथे .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users