कारणे

Submitted by निशिकांत on 29 May, 2018 - 04:21

रेशमी नात्यात लपली काचण्याची कारणे
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?

चांदण्या रात्रीत हाती हात असताना तुझा
शेकडो दिसली मला मी हरवण्याची कारणे

गीत गुणगुणतो कधी तर ताल मी धरतो कधी
तूच तर दिधली मला झंकारण्याची कारणे

व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो अता
दर्पणी तू शोध माझ्या बहकण्याची कारणे

आज मज रडणे रडाया एकही खांदा नसे
कोण पुसतो? आज अश्रू गाळण्याची कारणे

धर्म, जाती, पंथ नाना, घासती सांधे किती?
हरवली कोठे दुव्यांना सांधणारी कारणे?

काम झटपट व्हावयाला लाच द्यावी लागते
अन्यथा देतात कामे टाळण्याची कारणे

षंढ सारे वाकती का आज अन्यायापुढे ?
का निखारेही विसरले पेटण्याची कारणे?

का हवी कारण मिमांसा व्यर्थ तुज "निशिकांत"रे?
हास-या पुसती कळ्या का उमलण्याची कारणे ?

निशिकांत देशपांडे मो.नं.-- ९८९०७ ९९०२३
E mail ;- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

षंढ सारे वाकती का आज अन्यायापुढे ?
का निखारेही विसरले पेटण्याची कारणे?

वाह!!

वा!