स्वानंदासाठी

Submitted by हरिहर. on 25 May, 2018 - 05:07

नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा. आता या तत्वात बसेल अशी लावालावी करायची म्हणजे थोडा विचार करणे आलेच. नारद चालून थकले, विचार करुन शिणले आणि शेवटी एका केळीच्या बनात थंड हवेच्या आधारे विश्रांतीसाठी थांबले. सकाळपासून हातातल्या विणेवरुन बोटे फिरली नव्हती ना मुखाने ‘हरि नाम’ ऊच्चारले होते.

थकलेल्या नारदांनी सहज आजूबाजूला पाहीले. समोरच्याच केळीच्या प्रशस्त पानावर काही लिहिले होते. नारदांनी जवळ जाऊन पाहीले. पहिली ओळ वाचली. मग दुसरी वाचली. आणि मुनीजी वाचण्यात अगदी गढून गेले. पुर्ण पान वाचूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अजुबाजूला पाहिले. दुसऱ्या पानावर ऊर्वरीत मजकुर होता. नारद वाचत होते. पान संपल्यावर दुसरे पान शोधत होते. एकामागोमाग नारदांनी सात पाने वाचली. त्यांचे भान हरपले. कोण नारायण, कोण ब्रम्हा त्यांना काही आठवेना. डोळ्यातुन अश्रू वहात होते. अंतःकरण आनंदाने भरले होते. कधी अनुभवली नव्हती अशी चित्तात शांती अनुभवीत होते.
मागून आवाज आला “काय झालं मुनीवर?”
नारदांनी मागे वळून पाहिले. समोर मारुतीराया ऊभे होते.
नारद म्हणाले “हनुमंता, अरे मी आजवर खुप जनांनी लिहिलेली ‘रामायणे’ वाचली पण मनाला अद्भुत शांती देणारे तुमचे रामायण अगदी अलौकीक आहे.” हे ऐकुन हनुमंत फक्त हसले आणि आकाशात झेपावत नाहीसे झाले.
अतःकरणातील तो अलौकीक आनंद अनुभवत नारदांनी केळीचे बन सोडले. जसजसे केळीचे बन मागे पडले तसतसा नारदांच्या अंतःकरणातला आनंद कमी होत जाऊन ‘मुळ वृत्ती’ने डोके वर काढायला सुरवात केली. विचारचक्रांना चांगलीच गती मिळाली. चेहऱ्यावर छद्मी समाधान ऊमटले आणि मनात काही ठरऊन नारदांची पावले वाल्मीकींच्या आश्रमाकडे वळली.

सकाळच्या प्रसन्नवेळी आश्रमाच्या दारात प्रत्यक्ष नारदमुनींना पाहून वाल्मीकींना आनंद झाला. पुष्पहार घालून त्यांनी नारदांचे स्वागत केले. हाताला धरुन आश्रमकुटीत घेऊन नेले. दर्भासनावर आदराने बसवले. फलाहार-दुग्धाहाराची तबके समोर ठेवली. सर्व सोपस्कार झाल्यानंतर वाल्मीकींनी विचारले “मुनीवर, सर्व लोक क्षेम आहेत ना? विष्णूलोकाची काय वार्ता?”
नारद चेहरा गंभीर करत म्हणाले “तुमचे ‘पद’ सोडून सर्वकाही कुशल आहे आचार्य.”
वाल्मीकींनी गोंधळून विचारलं “जरा विस्ताराने सांगीतलं तर काही कळेल मुनीवर.”
नारद मनातला आनंद चेहऱ्यावर न दाखवता म्हणाले “कालच पृथ्वीलोकात फिरत असताना एक रामायण वाचनात आले. आपण लिहिलेल्या रामायणापेक्षा मला ते जास्त भावले. अर्थात हे माझे मत आहे.”
वाल्मीकींनी विचारले “कुणी लिहिले आहे?”
नारदांनी सांगीतले “श्री मारुतीरायांनी लिहिले आहे.”
नारद फलाहार वगैरे घेऊन, वाल्मीकींचे आदरातिथ्य स्विकारून मार्गस्थ झाले. जाताना वाल्मीकींची मनःशांती घेऊन गेले. त्यांना अतिव दुःख झाले. वाल्मीकींनी खुप विचार केला. नारदांचे कामच आहे लावालावी करणे, त्या मुळे दुर्लक्ष करावे असे त्यांनी ठरवले. पण मन काही ऐकत नव्हते. “माझ्यापेक्षा सुंदर रामायण लिहावे, आणि तेही एका माकडाने!” वाल्मीकी प्रचंड अस्वस्थ झाले. शेवटी तेही एक लेखकच ना! नारद खोटे बोलणार नाही हे नक्की. शेवटी वाल्मीकी नारदांनी सांगीतलेल्या ‘रामायणा’च्या शोधात निघाले.

काही दिवसांच्या अथक भटकंतीनंतर वाल्मीकींना नारदांनी वर्णन केलेले केळीचे बन सापडले. त्यांनी काही वेळातच केळीची ‘ती’ सात पानेही शोधून काढली. ते रामायण वाचता वाचता वाल्मीकींची अवस्थाही नारदांसारखीच झाली. केवळ अप्रतिम. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीने परिपुर्ण. भक्तीरसपुर्ण. असामान्य शब्दयोजना. अलौकीक लेखनशैली. सगळ्याच दृष्टीने परिपुर्ण असे ते रामायण वाचताना वाल्मीकींना अश्रू अनावर झाले. आनंदाचे आणि दुःखाचेही.
मागून आवाज आला “काय झाले आचार्य? आपल्याला रामायण आवडले नाही का?”
वाल्मीकींनी मागे वळून पाहीले. समोर मारुतींना पाहुन म्हणाले “वर्णनातित आहे हे रामायण.”
हनुमंताने आश्चर्याने विचारले “मग हे डोळ्यात अश्रू कशासाठी आले आचार्य?”
वाल्मीकी ऊत्तरले “तुझे रामायण निश्चितच माझ्या रामायणापेक्षा श्रेष्ठ आहे. आजवर रामायण म्हटले की माझी आठवण यायची सगळ्यांना. पण तुझे हे रामायण वाचून आता कोणी माझे रामायण वाचनार नाही आणि माझी रामायणकार म्हणुनही कोणी आठवण काढणार नाही.”
“बस् एवढेच ना?” असे म्हणून हनुमंताने समोरील केळीची पाने तोडली व तुकडे तुकडे करुन खाऊन टाकली.
वाल्मीकी हनुमानाचा तो वेडेपणा पाहून चकीत झाले. त्यांना वाटले ‘माकड ते माकडच शेवटी’ तरीही त्यांनी न राहऊन विचारले “हनुमाना, काय केले हे तुम्ही. तुमचेच रामायण नष्ट केले? कशासाठी?”
मारुतीराया हसत म्हणाले “तुम्ही रामायण लिहिले ते जगात तुमचे नाव ‘रामायणकार वाल्मीकी’ व्हावे म्हणून. लोकांनी तुम्हाला ओळखावे, कौतूक करावे म्हणून. पण मी जे रामायण लिहिले होते ते फक्त स्वानंदासाठी. माझ्या रामायणातील एक एक शब्द, एक एक ओळ लिहिताना मला अवर्णनिय आनंद झाला. प्रत्यक्ष प्रभुरामाच्या सान्निध्य असल्याचा अनुभव आला. आता जगात फक्त तुमचेच रामायण राहिल आणि ते तुमच्याच नावाने ओळखले जाईल. ‘वाल्मीकी रामायण’ म्हणुन दोघेही अमर व्हाल.”
खजील होऊन वाल्मीकींनी आपल्या आश्रमाचा रस्ता धरला.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता? Happy

(फार गांभीर्याने घेऊ नये Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता? >>>> ज्ज्ज्ये बात !!

मस्त!!

तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. >>> पटलेच Happy

छान लेख लिहिलाय. खूपच भावला मनाला. छान लिहिता तुम्ही ! तुमचे लेख वाचायची उत्सुकता लागलेली असते. असंच लिहित रहा. Happy

तुमचे हे आणि बाकीचे सगळे "रामायणे" वाचली, आणि नारद मूनीनितकीच आवडली.. तुम्हाला नको असला तरी एक "लाईक" ठोकतेच !
Happy

लिखाण आणि तात्पर्य आवडलं. मुळात लिहितानाच केळीच्या पानावर लिहिलं, भूर्जपत्रावर नाही हेही आवडलं.
पण खरं सांगू का, 'स्वांतःसुखाय कला' ही कल्पना मला स्वतःला फारशी पटत नाही. आस्वादक लागतोच ते विद्युतमंडल पूर्ण करायला असं आपलं माझं मत.

स्वातीजी,
अगदी खरं आहे तुमचं. नुसता वाचक असुन चालत नाही तर 'आवडले' 'नाही आवडले' सांगनारा वाचक हवा असतो लेखकाला. अगदी संत कवि-साहित्यिकही अपवाद नाही याला. माझा मुद्दा होता की लेखन हे नेहमी स्वानंदासाठी करावे आणि मग तो आनंद वाचकांबरोबरही वाटून घ्यावा. पण बरेचदा असे दिसते की अनेक लेखक त्यांचे स्वतःचे मत काय आहे या पेक्षा वाचकाला काय आवडेल याचा विचार करत लिहितात किंवा लिहिनेच थांबवतात. ही आपण आपल्याच लेखनाशी केलेली प्रतारणा आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. मी बऱ्याचदा पाहिले आहे की कुणी एखादी लेखमाला लिहायला घेतो आणि वाचकांचा फारसा प्रतिसाद नसेल तर पुढील भाग लिहिने थांबवतो अथवा वाचकाला काय आवडेल याचा विचार करुन लिहितो. काही तर असेही पाहिले आहेत की जे मुद्दाम चुकिचे मुद्दे मांडत लिखाण करतात. त्यामुळे नकारात्मक का होईना, चिडुन का होईना वाचकांचे प्रतिसाद येतिल. याला काय म्हणावे? या ऊलट काही लेखक असेही पाहिले आहेत की ते फक्त स्वानंदासाठीच लिहितात आणि आपले लेखन तसेच अप्रकाशित ठेवतात. माझे एक मित्र आहेत नाशिकचे. त्यांचा नियमच होता 'दिसामाजी काहीतरी लिहावे'. एक दिवस त्याचे सर्व लेखन पाहिले आणि चकित झालो. शेवटी मिच पुढाकार घेतला आणि ते नको म्हणत असतानाही त्यांची पुस्तके प्रकाशित केली. वर्ष-दोन वर्षातच त्याची बारा पुस्तके प्रकाशित झाली. म्हणजे किती लिहून ठेवले होते त्याने याचा अंदाज येईल. आणि स्वानंदासाठी लिहिले की लेखन जास्त सच्चे आणि वाचनीय होते असं मला वाटते. तर असो. प्रतिसाद जरा लांबलाच.
आणि स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद! (वरिल लेखावर मलाही कॉमेंटस् हव्याच आहेत की.)

प्रतिसादाबद्दल सर्वांचेच खुप आभार. Happy
[मला वाटले की एकुन लेखाचा मुद्दा लक्षात घेता कुणी प्रतिसादच देणार नाहीत की काय. Happy ]

व्हाट्सअपवर अश्या अर्थाची हनुमंत लिखित रामयणाची कथा खुप पूर्वी वाचनात आलेली. पण त्यातील नेमके मुद्दे अधोरेखित करून छान विषय मांडलाय तुम्ही.
लिखाण आवडले Happy

सुंदर बोधकथा !

मला फार पूर्वी जेष्ट साहित्यिक जयवंत दळवीनी यांचा याच अर्थाचा लिहिलेला लेख आठवला .

कविवर्य सुरेश भट देखील म्हणायचे आवड म्हणून लिहा, टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेले चिरकाल टिकेलच असे नाही .

कविवर्य मर्ढेकरांच्या मते कवितेच असणं अर्थापेक्षा महत्वाच ...

छान लिहिलंय! स्वानंदासाठी हे आपल्या सर्वच कृतींच्या बाबतीत लागू पडते. गाणे, स्वयंपाक, चित्रकला, वादन.. यादी वाढवता येईल.

मला वाटल की आता मारुती म्हणतोय की तुम्हाला कुणी सांगितले की मी ते लिहिले आहे म्हणून.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता? >> कान्ये वेस्ट भावोजी तेच म्हणतात पण किमी वहिनी ऐक्क्क्क्त नाही.

नेहेमीप्रमाणे उत्तम शब्दांकन !

मला यात एक महत्वाचा मुद्दा दिसतो. पहा पटतय का ...

वाल्मिकींनी रामायण आधी लिहिले आणि तसे ते नंतर घडले असे म्हणायला वाव आहे (कारण खरे तर "वाल्मिकी रामायण" हे एक काव्य आहे आणि आपला असा विश्वास आहे की हे खरेच घडूनही गेलेले आहे) त्यामुळे या "रामायणा" च्या घडण्याचे निर्माते - नियंत्रक म्हणून त्यांचे महत्व वेगळे आहे.
मारुती रायाचे रामायण हे आधी त्याने स्वतः आधी जगलेले आहे आणि मग ते केलेले भक्तीचे अभिव्यक्तीरूप प्रकटन आहे ! त्यामुळे त्याला रामभक्तीचा अम्रुतस्पर्ष झाल्याने ते जास्ती मधूर आहे ! खरे तर प्रभू राम एका अर्थाने वाल्मिकींमुळेच मारुतीरायाच्या आयुष्यात आले ! त्यामुळे त्याला वाल्मिकींचे मोठेपण चांगले ठाऊक आहे ... म्हणून त्याचे हे रामायण वैयक्तीक मानून विसर्जीत केले!

दोघांचे उद्देश ; लेखनामागची भूमिका हे अगदी वेगळे आहेत ! त्यामुळे कोणते श्रेष्ठ हा मुद्दाच रहात नाही.

प्रतिसादाचा हेतू कुणालाही challenge करणे हा नसून या कथेकडे वेगळ्या द्रुष्टीकोनातून पहणे इतकाच घ्यावा!

आणि हो ....
वाल्मिकींनी रामायण टाळ्या मिळवण्यासाठी लिहिले असे म्हणताय कि काय !!!

आज पुन्हा वाचले...
प्रतिसाद आणि लेख...
पुन्हा तितकेच आवडले जेवढे आधी...

Pages