बुटामध्ये तुझ्या मी घातलेले पाय माझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 May, 2018 - 03:44

तुझ्या खिडकीतले झाले जरी बोन्साय माझे
तसे होवूनही होणार होते काय माझे ?

नको पाहूस स्वप्ने व्यर्थ तू उद्यापनाची
तुझे वाचून नाही व्हायचे अध्याय माझे

मुघलशाही म्हणू की इंग्रजांची राजवट ही ?
गुन्हे अक्षम्य ज्यांचेे तेच करती न्याय माझे

जशी दटवायचे तपकीर बाबा ओढताना
तसे त्रासून संबोधायचे ते... माय माझे !

तुला देते सही, घे जीवना तू फारकत घे
कशाला सोसतोे आहेस हे अन्याय माझे ?

विनाकारण अशी नाही बदलली चाल माझी
बुटामध्ये तुझ्या मी घातलेले पाय माझे

दुरावे राखतो आहेस मृत्यो, दे मिठी दे !
तुझ्यावाचून हे झाले जिणे असहाय माझे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच!
नको पाहूस स्वप्ने व्यर्थ तू उद्यापनाची
तुझे वाचून नाही व्हायचे अध्याय माझे

वा वा!
सगळेच शेर भारी.

<<< दुरावे राखतो आहेस मृत्यो, दे मिठी दे !
तुझ्यावाचून हे झाले जिणे असहाय माझे >>>
छान, पण इतके निराशावादी लिहू नका हो नेहमी.
रावसाहेबांची कलाकृती जास्त आवडली मात्र... Rofl

वाह !