तुझी 'भेट'

Submitted by अंबज्ञ on 21 May, 2018 - 22:38

.

.

हे बघ....शोना !
मला अजिबात आवडणार नाही हां तुझं असं बाकीचे करतात तसं भर रस्त्यात, चार चौघांसमोर उगीच दिखावा करत मला मिठीत घेत भेटणं.
उगीच सर्वांसमोर तुझ्या आड़दांड बाहुपाशात मला घट्ट कवेत घेणं... !

हां, तसंही तू माझं ऐकतोस कुठे म्हणा. शेवटी तुझी इच्छा असेल तसंच अगदी वागणारेस हेही मला माहितेय. पण, तरी मी सांगते ते जरा ऐक. आणि हो, माझ्या मनात आलं तसा मला भेटायला येशील तर मला नक्कीच आवडेल अन् तुलाही फार त्रास नाही होणार.

सर्वांची जेवणं आटोपली नं की मी आणि हे असे आम्ही दोघेच समोरच्या चौकापर्यन्त थोडं फिरायला जातो .... तेवढंच जरा मन मोकळं करायला मिळतं मला ह्यांच्याशी. बाकी घरी आल्यावर परत आहेच माझी व्हील चेअर आणि मी. परत येईस्तोवर आमचं पिल्लू आज्जीकडून गोष्टी ऐकत मस्त झोपलेलं असतं. छोटें आहे रे घर आमचे , त्यामुळे अगदी रात्रीच्या पोटात सगळे गाढ झोपेत असताना हळूच पाय न वाजवता ये. . .

दाराबाहेर बेलवरती बघ एक छोट्टा कप्पा दिसेल तिथे लैचची चावी ठेवलेली असेल.
हळूच दरवाजा उघड आणि हॉलच्या उजव्या हाताला माझ्या बेडरूमकडे वळ . . . . आताशा मी खोलीच्या दाराला कड़ी लावलेलीच नसते. तरीपण तू काळजी घे दार कुरकुरणार नाही याची . . . मंद निळसर बल्बच्या उजेडात निरखून पहा क्षणभर माझा चेहरा.... झालंच तर एक कटाक्ष शेजारी झोपलेल्या माझ्या पतीवर आठवणीने टाक अन् पलीकडेच असेल बघ गाढ झोपेतील माझं गोड पिल्लू. . . . .

त्यां दोघांना पाहुन लाजलास तर मग आला तसा हळूच माघारी जा .. . . पण, एकदा का तू आत आलास की परत माघारी नाही जाणार तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही पूर्ण केल्याशिवाय, हे तर मलाही पक्के माहितेय. तसं तर मी अजुनही एक नोटिस केलंय. हल्ली हल्ली खुप आवडू लागलीय नं मी तुला ! सगळं कळतं बरं मला तुझ्या मनातलं. तसं तर मीही हल्ली तुला खुप मिस करते. कधी येशील म्हणून वाट पहात उगीच खिड़कीत पहात बसते. पण ह्यांची चाहूल लागली की मात्र पुरती भांबावते.

पण आताश्या मलाही तू हवा हवासा वाटतोस फार. माझ्याशिवाय नाहीच जाणार तूही म्हणां ! तर ऐक मग, हळूच उचलून कवेत घे मला. कुणाचीही झोपमोड न करता आलास तसा पाय न वाजवता बाहेर पड. . . . .
पुन्हा दार बंद करून चावी त्या कप्प्यात ठेवायला विसरू नकोस....

बघ असा शहाण्या सारखा वागलास ना तर मग कुणाची बिशाद आहे मृत्यु वाईट असतो म्हणायची ?

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

oh... my goooooo......!!!

oh... my goooooo......!!!>>>> Happy
तेव्हाच क्लीक झाल.>>> actually तो उल्लेख टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण मग कथेला विचित्र फाटे फुटण्याची भिती होती म्हणून दोनदा खोडून परत तो उल्लेख ठेवलाच फाइनली Happy

प्रतिसादाकरिता आपले मनःपूर्वक आभार पुरंदरे शशांक आणि अंकु