ड्रेसकोडची बहुरंगी भानगड

Submitted by नीधप on 21 May, 2018 - 02:24

२० मे २०१८ च्या आपला महानगरमध्ये आलेला माझा लेख
32819578_10155618540357151_1482563285411692544_n.jpg
----------------------------------------------------
“आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून मैत्रिणीच्या लग्नात घालण्यासाठी खास फाडलेल्या जीन्स खरेदी केल्यात.”
“ऍडमिशन झाली. रोज कॉलजमध्ये जायला खास बनारसी साड्या घेतल्यात.”
“कॉन्फरन्समध्ये भाषण आहे. मेंदीवालीला बोलवायला हवं. दोन्ही हात आणि पायभरून मेंदी काढून घेणारे मी. ”

काहीतरी गफलत वाटतेय ना? चुकीच्या ठिकाणी चुकीचे काहीतरी चाललंय. मैत्रिणीच्या लग्नात फाटक्या जीन्स घालायला, कॉलेजमध्ये रोज बनारसी साडी नेसायला आणि कॉन्फरन्समध्ये मेंदी लावून जायला बंदी नसते. तसं गेलं तर तिथून हाकलून देणार नसतं. पण तरीही हे चुकीचं वाटतं. या तिन्ही ठिकाणी कशा प्रकारचे कपडे घालायचे याचे काही नियम आपण पाळतोच. ते नियम समाजाने पाळावेत अशी समाज म्हणून अपेक्षाही असते.

या नियमांनाच आपण ड्रेस कोड म्हणतो. कधी हे लिखित असतात तर कधी अलिखित. वेगवेगळे मुद्दे धरून हे नियम बनवलेले असतात. मग ते शक्यतो पाळले जातात आणि कधी कधी तोडलेही जातात. आता नियम तोडणे हे चूकच. त्यामुळे ड्रेस कोड पाळलाच पाहिजे अशी अपेक्षा असते.

हे इतकं साधं, सोपं, सरळ, एकरेषीय असतं तर काय हवं होतं? पण तसं होत नाही. कान महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या उंच टाचांच्या चपला हातात घेऊन एखादी क्रिस्टन स्टुअर्ट रेड कार्पेटचा ड्रेस कोड मुद्दामून तोडते. तर एकीकडे न्यायमूर्ती मॅडम तरुण वकील मुलींना अमुक प्रकारचे कपडे घालू नका असा ड्रेसकोडमध्ये नसलेला उपदेश करतात. या दोन्ही घटना नुसत्या कपड्यांशी संबंधित नसतात तर ही दोन्हीही महत्वाची सामाजिक विधाने असतात. यातूनच चर्चा सुरू होते.

माणसाचे कपडे ही दृश्य संवादाची भाषा असते. एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या ठराविक ठिकाणी जे काही मत तयार होते ते त्या व्यक्तीने कपडे काय आणि कसे घातलेत, केस कसे राखलेत, दागिने वगैरे काय आहेत वा नाहीयेत इत्यादी सगळ्या जामानिम्यावरून. मग अशा वेळेला ठराविक ठिकाणी एखाद्याबद्दल काय मत व्हायला हवे याबद्दल अपेक्षा तयार होतात. या अपेक्षांना धरून नियम बनवलेले असतात.

दोन वर्षांपूर्वी कान चित्रपट महोत्सवामध्ये महत्वाच्या इव्हेण्टला काही महिलांना उंच टाचांचे शूज घातले नाहीत म्हणून प्रवेश दिला गेला नाही. खरंतर चित्रपट महोत्सवाला असा लिखित ड्रेस कोड नाही पण जगभरात चित्रपट, फॅशन, नाटक या गोष्टींशी संबंधित सोहळे, महोत्सव वगैरे बघितले तर अश्या सर्व प्रतिष्ठित ठिकाणी बहुतेक सर्व स्त्रिया या उंच टाचांच्या शूजमधेच दिसतात. स्त्रियांसाठी उंच टाचांचे शूज हा अलिखित ड्रेस कोडच आहे. उंच टाचांचे शूज म्हणजे सौंदर्य, कमनीयता, तारूण्य या सगळ्याचे एक प्रतीक असल्यासारखे. सौंदर्य, कमनीयता, तारूण्य याशिवायच्या स्त्री अश्या ठिकाणी निषिद्धच असे प्रवेश न द्यायचा निर्णय घेणाऱ्यांचे म्हणणे असावे. या म्हणण्याला विरोध म्हणून तिने यावर्षी रेड कार्पेटवर अनवाणीच जाणे पसंत केले. ती यावर्षीच्या ज्युरीमधे होतीच त्यात तिचे हॉलिवूडमधले स्थान बघता तिला अर्थातच कुणी अडवले नाही आणि तिचा विरोधही नोंदवला गेला. महोत्सवाच्या आयोजकांकडून असा नियम नाही हे वदवून घेण्यासाठी ही कृती महत्वाची ठरली.

स्त्रीचे शरीर, आकार यांना नियमांमधे बसवून वस्तूकरण करण्याला आजवर जो विरोध झालेला आहे तो असाच वेगवेगळे ड्रेस कोडस तोडूनच झालेला आहे. मग ते स्त्रीवादी चळवळीच्या सुरूवातीच्या काळातले ब्रा-ज्वलन असो किंवा १८४० च्या दरम्यान अमेलिया ब्लूमरने तयार केलेला ब्लूमर कॉश्च्युम असो.

हे झाले वस्तुकरणाबद्दल. पण जेव्हा न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा स्त्री वकिलांना व्यवसायाला योग्य असे आणि सभ्य जामानिमा असावा असा उपदेश करतात त्यात वस्तूकरण नसूनही त्याबद्दल चर्चा होतेच.

बघायला गेलं तर हा उपदेश अगदी योग्य आहे. भारतीय बार कौन्सिलने स्त्रिया व पुरुषांसाठी ड्रेस कोड ठरवून दिलेला आहे त्यात व्यवसायाला योग्य आणि सभ्य असे शब्द येत नाहीत. पण अर्थातच ते अध्यहृत आहेत. पण जेव्हा न्यायमूर्ती मॅडम पलाझोसारखी कपड्यांची नावे घेऊन बोलतात तेव्हा प्रश्न पडतातच. बार कौन्सिलने दिलेल्या ड्रेस कोडमध्ये पलाझो येत नाहीत. पण त्यांना लांब स्कर्ट चालतो. साडी चालते. सलवार आणि कुडता चालतो. ओढणीसकट की शिवाय हे स्त्रियांनी स्वतः ठरवायचे आहे.

लांब स्कर्ट म्हणजे नक्की किती लांब? गुडघ्यापर्यंत? गुडघ्याखाली? की घोट्यापर्यंत? पांढरी साडी म्हणजे हिंदी सिनेमातल्या विधवा मॉं सारखी? की पांढऱ्या साडीत पावसात भिजणारी हिरवीण दाखवतात तिच्यासारखी? सलवार-कुडता वापरताना कुडत्याची लांबी किती? तो अंगाबरोबर असायला हवा की घट्ट की ढगळ? त्याचा गळा किती खोल हवा? ओढणी घेतली तर कशी घ्यायची? या सगळ्या प्रश्नांना लिखित उत्तरे बार कौन्सिलच्या ड्रेस कोडमध्ये नाहीत. आपण घालू त्या कपड्यात सभ्यतेचे, प्रतिष्ठेचे किती वळसे आहेत हे जिच्या तिच्या तारतम्यावर आधारित आहे. या तारतम्याचे काय करायचे? तारतम्याचे नियम लिहिता येत नाहीत आणि तारतम्य कुठे विकतही मिळत नाही.

पलाझोबद्दल बोलायचे तर जरा सलवार कुडता चालू शकतो तर पलाझो कुडता का चालू शकत नाही हे अनाकलनीय आहे. बारा कौन्सिलने नियम केले तेव्हा पलाझो अस्तित्वात नसतील पण आता आहेत. पलाझो - कुर्ता हे पुरेसे व्यावसायिक, सभ्य व प्रतिष्ठित दिसू शकतेच. तर मग ते चालणार नाही असे का? थोडक्यात हे नियम आता कालबाह्य झालेत आणि आजच्या काळाप्रमाणे ते बदलायला हवेत.

म्हणजे पेहरावाच्या बाबतीत सभ्य, व्यावसायिक, प्रतिष्ठित हे कालानुरूप बदलू शकतं. आज जे असभ्य मानलं जातं ते उद्या सभ्य होउ शकतंच. तर मग सभ्य, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित या संकल्पनाच गडबडलेल्या आहेत का? की पूर्णपणे तारतम्यावरच अवलंबून आहेत? आणि त्यावर अवलंबून असतील तर ड्रेस कोड हवा कशाला?

सभ्य, प्रतिष्ठित वगैरे विशेषणे मुळातच माणसांची प्रतवारी ठरवणारी आहेत. जिथे जिथे व्यावसायिक ड्रेस कोड असतो आणि त्या ड्रेस कोडचा मूळ उद्देश सभ्य, प्रतिष्ठित, व्यावसायिक वगैरे दिसावे असा असतो. तिथे तिथे माणसांची प्रतवारी एवढीच माणसाची ओळख बनते. हे योग्य आहे की अयोग्य? व्यावसायिक स्तरावर जिथे वैयक्तिक तपशिलांना दूर सारून काम केले जाण्याची गरज आहे तिथे म्हणजे कोर्टात, सरकारी ऑफिसात, कंपनीत कदाचित हे योग्य असावे.

पण ही ड्रेस कोडची चौकट अतिशय संकुचित आहे. यापलीकडे सभ्यता, प्रतिष्ठितपणा अस्तित्वात नाही असे नाही. या ठराविक चौकटीच्या बाहेरचे काही वापरले गेले तर त्या व्यक्तीला असभ्यतेचे लेबल लावले जाणे, त्या व्यक्तीची व्यावसायिक क्षमता पुरेशी नाही असे अंदाज बांधणे हे बालिश आणि अमानुष आहे. परत या चौकटी नुसत्याच काळाबरोबर नाही तर व्यवसायानुसारही बदलत जातात. पण या नियमांच्या चौकटीमुळे माणसे एकमेकांवर शिक्के मारायला मोकळी होतात.

मग ड्रेस कोड असूच नयेत का? कुणीही कसेही घालावेत कपडे? कारण कपड्यांवरून माणसाचा अंदाज बांधू नये म्हणतात. तर नाही असे होऊ शकत नाही. शेवटी कपडे हे दृश्य संवादाचे एक साधन आहे. कपड्यांना बघून समोरच्या माणसाबद्दल आडाखे बांधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. आजवर बघितलेल्या माणसांच्यावर आधारित हे आडाखे बांधणे प्रत्येकाच्या नकळत होतच असते. होतच राहणार. नियमांचे तपशील बदलतील पण अलिखित का होईना नियम असणारच. माणूस आणि माणुसकी या नियमांच्यापेक्षा मोठी आहे ही जाणीव ठेवण्यात आपले माणूसपण आहे. नाही का?

- नीरजा पटवर्धन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

योग्य मुद्दे मांडलेत. माझा ड्रेसकोडला विरोध नाही पण ड्रेसकोडच्या अट्टाहासाला मात्र नक्कीच विरोध आहे.

अनेक पैलू आणि बाजू असलेला हा विषय आहे, तितकाच संवेदनशीलही. थोडक्या शब्दात मुख्य मुद्दे छान कव्हर केले आहेस. मस्त.
मला वाटतं, ही वृत्तपत्रमालिका आहे, बरोबर ना?

थोडक्या शब्दात मुख्य मुद्दे छान कव्हर केले आहेस. मस्त.<<
थँक्स पूनम. आयत्यावेळेला लिहून द्यायची रिक्वेस्ट आली त्यामुळे अजून काही मुद्दे कव्हर करता आले नाहीत. पण चर्चा व्हावी म्हणून इतपत तरी ठिके!

मला वाटतं, ही वृत्तपत्रमालिका आहे, बरोबर ना?<<
नाही अगं हा त्या मालिकेतला लेख नाहीये.
लेखमालिका/ सदर लोकमतच्या सखी पुरवणीमधे चालू आहे. कापडाचोपडाच्या गोष्टी या नावाने
तिथे वेशभूषेच्या इतिहासावर जास्त फोकस आहे.

लेखात बरेच मुद्दे आहेत पण त्यात नाविन्य नाही आणि शेवटी या मंथनाचा निष्कर्ष काय?

{{{ पण ही ड्रेस कोडची चौकट अतिशय संकुचित आहे. यापलीकडे सभ्यता, प्रतिष्ठितपणा अस्तित्वात नाही असे नाही. }}}

{{{ मग ड्रेस कोड असूच नयेत का? }}}

अधांतरीच ठेवलाय हा प्रश्न.

ड्रेस कोड ची चौकट अतिशय सैल आहे हे खरे,
मागे एका मठामध्ये " वयानुसार फ्रॉक किंवा साडी नेसलेल्या स्त्रियांनाच प्रवेश दिला जाईल " अशी पाटी पहिली होती.
इतर ठिकाणी सोज्वळ गणला गेलेला पंजाबी ड्रेस यांच्या ड्रेस कोड मध्य एबासात नव्हता, "सुश्मिता सेन इन मै हुं ना" style ची साडी कदाचित "ती साडी आहे ना ?" या एका निकषावर चालली असती Happy

काही ऑफिस मध्ये सुद्धा हा अतिरेक जाणवतो, एका कम्पनी मध्ये फक्त प्लेन फॉर्मल shirts अलाउड होते , प्लेन म्हणजे एकदम प्लेन, उभ्या रेषा, सेल्फ design, चेक्स , सगळे बाद, मग काही लोकांनी ठरवून भडक रंगाचे प्लेन शर्टस चालून HR वाल्यांना जेरीस आणले होते

अधांतरीच ठेवलाय हा प्रश्न.<<

मी एका चर्चेला आणलेत प्रश्न. मुद्दा तारतम्याचा आहे हे ही स्पष्ट केलंय. रेडिमेड उत्तरं नाहीयेत यासाठी.

छान आहे लेख.
ड्रेस कोड हा प्रकार विचीत्र आहे खरा.
काही वर्षापूर्वी आमच्या इथे ऑफिसात होता. त्यात मुलींना स्लिव्हलेस ड्रेस्/फॉर्म फिटिंग टिशर्ट अलाऊड नव्हते. पण पारदर्शक नेट स्लिव्हस्/फॉर्म फिटिंग पंजाबी ड्रेस/ सलवार कुर्ता चालायचा.
मग हे नियम ठरवणारा माणूस नोकरी सोडून गेला आणि लोकांनी सगळं गुंडाळून ठेवलं.

मागे एका मठामध्ये " वयानुसार फ्रॉक किंवा साडी नेसलेल्या स्त्रियांनाच प्रवेश दिला जाईल " अशी पाटी पहिली होती.
इतर ठिकाणी सोज्वळ गणला गेलेला पंजाबी ड्रेस यांच्या ड्रेस कोड मध्य एबासात नव्हता,>>>
एका दाक्षिणात्य मंदिरात ही हा प्रकार पाहिला .
मुलीनी पायजमा , पँट , सलवार घातलेली चालत नाही . पण जीन्स बदलून कमरेला पंचा किन्वा टॉवेल गुन्डाळलेला चालतो . मग भले तो माय्क्रो-स्क्रर्ट सारखा दिसत असला तरी चालेल.

पद्मनाभ मंदिरात जीन्स वरुन ५० रु भाड्याचा पंचा गुंडाळलेला चालतो.(यात '५० रु भाडे' हाही मुख्य मोटिव्ह असावा)
मला वाटते या सगळ्यात कॉमन डिनॉमिनेटर 'हिप्स आणि माण्ड्यांचा अकार न दिसणे' असा काहीतरी असावा. (आता कोणी रंगीला किंवा मै हूं ना मधल्यासारख्या टाईट फिट साड्या नेसून आलं तर चालतं का हा प्रश्न आहेच Happy )

मुख्य मुद्दा तोच आहे, की ड्रेस कोड ची चौकट अतिशय सैल असते, जर प्रत्येक गोष्ट नियमात नोंदवायची म्हंटले तर "ड्रेस कोड " हा एक नियमच 50 पानि पुस्तिकेत बसवावा लागेल.

एका क्लब मध्ये संध्याकाळी बॅडमिंटन खेळून एक गृहस्थ शॉर्टस वरती परमिट रूम मध्ये शिरत होता, त्याला शॉर्टस नॉट अलौड सांगून बाहेर काढले,
दुसऱ्यादिवशी तो वेष्टि (पांढरी सोनेरी बॉर्डरवाली लुंगी) लावून आला, नॅशनल ड्रेस म्हणून टेचात आत गेला आणि लुंगी दुमडून शॉर्टस पेक्षा वर करून बसला Lol

म्हणजे पेहरावाच्या बाबतीत सभ्य, व्यावसायिक, प्रतिष्ठित हे कालानुरूप बदलू शकतं. आज जे असभ्य मानलं जातं ते उद्या सभ्य होउ शकतंच. तर मग सभ्य, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित या संकल्पनाच गडबडलेल्या आहेत का? की पूर्णपणे तारतम्यावरच अवलंबून आहेत? आणि त्यावर अवलंबून असतील तर ड्रेस कोड हवा कशाला?---ड्रेस कोड ला अनुमोदन व विरोध नाही पण जेव्हा तुम्ही एखादया डॉक्टर कडे गेलात आणि तो हॉस्पिटलमध्ये बरमुडा आणि स्लीवलेस टीशर्ट मध्ये असला तर मला नाही वाटत की लोक त्याच्या कडून उपचार करून घेतील , काही पदे व्यवसाय यांच्या साठी ड्रेस कोड आवश्यक आहे , उदा. पोलीस , मिलिटरी , वैमानिक असे अनेक ह्या गोष्टी तारतम्याने ठरवल्या तर काय गोंधळ होऊ शकतो कल्पना करा

छान आहे लेख.

वरच्या प्रतिसादावरुन आठविले. माझ्या मुलाला पहिल्यांदा डेंटिस्टकडे घेऊन गेले होते. दार उघडून एक तरुण आत आला. टिशर्ट-जीन्स मधे. त्याला बघून वाटले तिथला मदतनीस असेल. पण त्याने डॉ म्हणून ओळख करुन दिली. पुढे मस्त गाणी गात मुलाच्या दातांची तपासणी आणि क्लिनिंग केले. माझा मुलगाही कधी नव्हे तो आरडाओरडा न करता शांत राहिला. तेव्हापासून तो आमचा फेव्हरेट डेंटिस्ट आहे Happy

साऊथ इंडियन देवळात पुरुषांनी शॉर्ट्स घालू नये हे मान्य करताना आतमधे त्या लुंगीवर उघडाबंब असलेला पुजारी कसा चालतो, हे मला (ड्रेस)कोडंच आहे. Wink

काही पदे व्यवसाय यांच्या साठी ड्रेस कोड आवश्यक आहे , उदा. पोलीस , मिलिटरी , वैमानिक असे अनेक ह्या गोष्टी तारतम्याने ठरवल्या तर काय गोंधळ होऊ शकतो कल्पना करा <<<
ड्रेस कोड आणि युनिफॉर्म यामधे तुमचा गोंधळ होतोय का? पोलीस, मिलिटरी, वैमानिक यांना युनिफॉर्म असतो. ज्यामधे प्रत्येक गोष्टीचे नियम लिखित स्वरूपात असतात. पांढरा ड्रेस इतक्या ढोबळ प्रकारे वर्णन नसते.
उदाहरणार्थ कोट असेल तर कोटाची लांबी कुठपर्यंत, लेपलची रूंदी किती असे सगळे तपशील लिहिलेले असतात.
हे तपशील जनरली १०-१२ वर्षात अपडेट केले जातात.
आणि नोकरी स्वीकारताना या गोष्टी बंधनकारक आहेत हे त्यांना माहितीही असते.

युनिफॉर्म हा एक ड्रेस कोडच आहे हे खरे. पण तो खूपच स्ट्रक्चर्ड आणि स्पेसिफिक आहे. वरच्या चर्चेमधे युनिफॉर्म येऊ शकत नाहीत.

<<< पण ही ड्रेस कोडची चौकट अतिशय संकुचित आहे. >>>
खाजगी जागेत, खाजगी कंपनीत काय वाट्टेल तो ड्रेस कोड ठेवायला हरकत नसावी.
बर्‍याच ठिकाणी “No Shirt, No Shoes, No Service” किंवा “We reserve the right to refuse service to anyone.” बघितले आहे.

ड्रेस कोड हा एक सटल डिस्क्रिमीनेशन चा प्रकार आहे. व भरल्या पोटीचा उद्योग. गरीबाला काय अंग झाकायला कपडे असले तरी ग्रेट. एका साडीवर जग णार्‍या स्त्रिया असतात. अंत्रवस्त्रे नस्लेली मुले रस्त्यावर व्हल्नरेबली फिरत राहतात. सूट बूट त्याग करून धोती व उपरणे अंगीकारणा रे एक व्यक्तिमत्व होते. हा खरा भारतीय ड्रेस कोड. नाहीतर दहालाखाचा सूट घालणारे पण असतात. इट सेज अ लॉट अबाउट वन्स पर्सनल कॅरेक्टर विदाउट मेकिंग अ नॉइज.
ड्रेस कोड मुळे जे नको आहेत त्यांना दूर राखायला तोंड उघडावे लागत नाही.
कि टी पार्टीत चढाओढीने महाग व " इंपोर्टेड ड्रेसेस / साड्या " नेसून ये णार्‍या उच्चभ्रू स्त्रिया,
साउथ बाँबेतली लिनन शर्ट व शॉर्ट्स, लेदरच्या १०००० रुच्या व महाग पण दिसायला साध्या लेदर फ्लिप फ्लॉप
घालणा री टीनेज मुले. कान महो त्सवाचे ब्रीफ नेहमी चुकवणा र्‍या आपल्या तिसर्‍या जगीय बॉली वुडी अभिनेत्री
मेट गालातील एक से एक ड्रेस या वर्शीचे थीम पण जबरी होते. तर तिथे आपली दीपिका लाल भडक स्कार्लेट वुमन सारखा ड्रेस घालून गेली बिचारी. प्रियांका चे ड्रेसिंग मात्र परफेक्ट जमून गेले तिथे.

नुकता झालेला राज विवाह. त्यातील एक किटी स्पेनसर नावा च्या स्त्रीचे ड्रेसिग बघा. परफेक्ट व ड्रेस कोड ला अतिशय धरून केलेले ड्रेसिन्ग. लग्नातल्या तसेच अ‍ॅ स्कॉट वगैरे ठिकाणच्या समर ड्रेस मधील मडमा व त्यांची कॉपी करणार्या आपल्या महा लक्ष्मीच्या रेसकोर्स वरील स्त्रिया. -- ह्यात एक कलोनिअल हँग ओव्हर पण आहे. साहेब श्रेष्ठ म्हणून त्याची कॉपी करणारे देशी साहेब मडमा पण जनते पेक्षा सुपर उबर. असा संदेश कपड्यातून जातो.

अशी व अजून खूप उदाहरणे आहेत. मला आव्डते ड्रेस कोड फॉलो करायला पण आम्ही मेलं अश्या ठिकाणी जातच नाही. काम व घरकाम. पण कधीतरी मी अमाल क्लूनी सार्खे शनेल ड्रेस व हॅट घालून येणारे कामावर.