अन्नपुर्णा आणि अण्णा-२ (वसंत शिंदे)

Submitted by शाली on 20 May, 2018 - 22:28

आता ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ असं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीच ‘रविवार’ चढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात. पुस्तके, मासीके, कलर ट्युब, कॅन्व्हास, रद्दी, लिहायचे कागद, खेळायचे पत्ते, बुद्धीबळाचा पट, प्यादी. काही विचारू नका. एकदा कॉलेजच्याच कामासाठी दोन दिवस मुंबईला जावं लागले होते. मी आणि मित्र गेलो. दिवसभर काम करुन रात्री हॉटेलच्या खोलीवर आलो. दमलो होतो. पण झोप लागता लागेना. जागा बदलामुळे असेल असं वाटलं. सकाळी डोळे चोळतच कामावर गेलो. रात्री पुन्हा दमुन-भागून खोलीवर आलो. पुन्हा तोच प्रकार. झोप काही येइना. मित्राच्या अचानक काहीतरी लक्षात आलं. तो उठला आणि त्याने चादरी जमीनीवर फेकल्या. बॅग्ज अस्ताव्यस्त केल्या, पाण्याचे ग्लास इकडे तिकडे टाकले. खोलीत मनसोक्त पसारा केला. मग मात्र एकदम घरी असल्यासारखं वाटलं आणि झोपही शांत लागली. लग्नानंतर माझी ही सवय बदलायला बायकोला फार संयमी प्रयत्न करावे लागले. तर ते असो.

रविवार होता. घाई नव्हतीच. सगळ्या कामांची गोगलगाय झाली होती. दुपारपर्यंत कसं बसं आवरुन अन्नपुर्णावर हजर झालो. या आठ दिवसात अन्नपुर्णा म्हणजे दुसरं घरच झालं होतं माझं. “यमुताई” अशी हाक मारतच मी बुट काढले आणि आत येवून माझ्या खुर्चीवर कुणी बसलं नाही ना हे पाहून घेतलं. ही एक काय सवय लागलीय कॉलेजच्या दिवसापासून समजत नाही. एका विशिष्ट खुर्चीवर बसुनच जेवायचं. सगळा टेबल मोकळा असला आणि त्या खुर्चीवर कुणी बसलं असेल तर त्याचं होईपर्यंत थांबायचं. पण तिथेच बसुन जेवायचं. मी खुर्ची ओढून बसलो. रविवार असल्याने मेस रिकामीच होती. जेवताना काही चाळायला हवं म्हणून मी पुस्तकांच्या कपाटाकडे वळलो तर तिथे ठेवलेल्या वेताच्या खुर्चीवर तब्बेतीने किरकोळ पण भारदस्त व्यक्ती बसलेली. पायघोळ धोतर, मलमलची शुभ्र बंडी, करड्या रंगाचं जॅकेट, डोक्यावर फरची टोपी आणि हातात शिसवी काठी. कुठल्या तरी जुन्या मराठी चित्रपटातील पाटील मळ्यात जायच्या ऐवजी चुकून ईकडे आले की काय असं वाटावं असा सगळा जामानिमा. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत होतं की यांना कुठेतरी पाहिलय. खुप जवळून ओळख आहे आपली. पण काही लक्षात येईना. कुतुहलाने मी परत मागे फिरलो आणि खुर्चीवर येवून बसलो. त्यांना याची दखलच नसावी. खुर्चीच्या पाठीवर त्यांनी मान टेकवली होती. दोन पायांच्या मध्ये ऊभी धरलेली काठी हाताने फिरवणं चाललं होतं. इतक्यात यमुताई बाहेर आल्या. त्यांचं त्या व्यक्तीकडे लक्ष जाताच त्या आत पाहून जरा जोरात म्हणाल्या “बाई, अण्णा आलेत हो” आणि त्यांनी मला वाढायला घेतले. तोवर काकूही बाहेर आल्या. त्यांच्या हातात पाण्याचं तांब्या-फुलपात्र होतं. ते त्यांनी समोरच्याच सेंटर टेबलवर ठेवलं. काकूंनी स्वतः पाणी आणले म्हणजे मानूस मोठा असणार याचा अंदाज आला.
काकूंनी विचारलं “कसा झाला कार्यक्रम अण्णा? आणि घरी जावून आलात की सरळ ईकडेच आलात?”
त्यांनी डोळे ऊघडून काकूंकडे पाहीलं आणि तोंडभरुन हसत म्हणाले “ऊत्तम”
काय गोड हसला म्हातारा म्हणून सांगू! मी तर एकदम खुश झालो त्यांच्यावर. त्यांनी तांब्यातलं सगळं पाणी संपवलं. गळ्यातल्या ऊपरण्यासारख्या लांब पांढऱ्या कापडाने मिशा पुसल्या आणि म्हणाले “नाही, सरळ ईकडेच आलो. बाबू गेलाय सामान घेऊन घरी. मीही अंघोळ करुन येतो. मग घेतो या यमूचा आणि तिच्या चपात्यांचा समाचार. कसं?” ते ऊठले आणि बंगल्याच्या मागील दाराकडे काठी टेकवत निघालेही. तोवर यमुताईंनी वाढलं होतं. मी जेवताना विचारलं “कोण आहेत हे काकू?” काकू म्हणाल्या “तू ओळखलं नाही? कमाल आहे! अरे हे अण्णा. वसंतराव शिंदे” पहिल्यांदा माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. माझा चेहरा पाहून काकू म्हणाल्या “मीच वेंधळी, तुझी ओळखही करुन नाही दिली. अरे चित्रपटात काम करतात ते वसंत शिंदे. जेवण झाल्यावर थांब जरा. ते येतीलच थोड्या वेळात.” मी आश्चर्यचकीत झालो. वसंत शिंदे म्हणजे माझा आवडता कलाकार. त्यांचा पडद्यावरचा वावर ईतका सहज असे, बोलणं ईतकं विनोदी आणि मिश्कील असे की आम्ही चक्क शिट्ट्या वाजवायचो. पण प्रत्यक्ष त्यांना पाहील्यावर मात्र ओळखलं नाही. जेवण झाल्यावर मी तिथेच टेबलवर पडलेले पाण्याचे चार थेंब बोटाने एकमेकांना जोडत वेळ काढायला सुरवात केली. तोवर अण्णा आलेच. डोक्यावर रेशमी पांढरे केस, बनशर्ट आणि पायजमा. शांतपणे खुर्ची ओढून बसले. समोरचं ऊलटे ताट सरळ करुन समोर घेतले. चौपात्रातुन चटणी, लोणचं व्यवस्थीत वाढून घेतलं. यमुताईंनी फक्त चपाती वाढली. ती घेऊन वाटीमध्ये अगदी बारीक चुरली. आणि माझ्याकडे पाहून म्हणाले “नमस्कार! जेवण व्हायचय का आपलं?” मी म्हणालो “आत्ताच झालं तुम्ही यायच्या अगोदर” आवाज ऐकून काकू बाहेर आल्या. त्यांनी स्वतःच्या हाताने भाजी वाढली. वाटीत आमटी वाढली. आणि माझी ओळख करुन दिली. मग अण्णांनी कोण, कुठले, आडनाव काय वगैरे सगळं विचारुन घेतलं. शांतपणे जेवण ऊरकलं आणि “ऊद्या भेटूच” म्हणत गेलेही. ही अण्णांची आणि माझी पहिली औपचारीक ओळख.

मग अण्णांविषयी बरीच माहीती मिळाली. त्यांचा अन्नपुर्णा शेजारीच बंगला होता. तिथे ते एकटेच रहात. मुलांबरोबर त्यांचे सुर काही जुळले नाही. जेवायला ते रोज अन्नपुर्णावरच येत. मराठी चित्रपट, नाटक पुर्ण बदललेलं. तो बदल काही त्यांना मानवेना. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलेलं. वाचन, जुने मित्र हाच त्यांचा विरंगुळा. आमच्या मेस मध्ये मुले कमी होती. आणि जी होती ती मेडीकलची. त्यांना अवातंर वाचन, कला, कलाकार, मौज-मस्ती दुरुनही माहीत नसे. असले तरी वेळ नसे. सुरवातीला अण्णांनी त्यांच्याबरोबर मैत्री करायचा प्रयत्न केलाही. पण ते तेवढ्यावरच राहीलं. मग अण्णा मेसमध्ये येत, जेवत, थोडा वेळ बसत आणि घरी जात. पण दोन-चार भेटीत अण्णांची अन माझी जी तार जुळली की विचारू नका.

माझी जेवताना अडचन व्हायची ती ईतर मुलांमुळे. चपातीला पोळी म्हणायचं, वाढा ऐवजी घाला म्हणायचं, चपाती वरणात बुडवून तिन बोटांनी खायची, आमटीच्या वाटीत पाचही बोटे बुडवून ती थोडी थोडी भातावर घेवून खानं हे काही मला जमेना. आणि त्यांच्या समोर चपाती मस्त चुरुन भरपुर आमटी घेवून कुस्करली की त्यांच्या तोंडावर “कुठून आलाय हा कोणास ठावूक!” असा भाव येई. त्यामुळे मी बरेचदा त्यांचं आटोपलं की जेवायला बसे. पण अण्णा आले आणि चित्र बदललं. अण्णांची आणि माझी जेवायची पद्धत एकच. तेही चपाती चुरुन छान काला करुन चवीने जेवत. हळूहळू लक्षात आलं की गप्पांचे विषयही सारखेच. एकदा जेवताना पुलंचं पुस्तक वाचत होतो. अण्णा आल्यामुळे पुस्तक बाजुला ठेवलं आणि त्यांच्यासमोर ताट सरकवलं. त्यांनी विचारलं “काय वाचतोय रे?” मी सांगीतलं. हसुन म्हणाले “तुला या भाईची एक गम्मत सांगतो. काय झालं, भाईने नाटक करायची टुम काढली.” अशी सुरवात करुन त्यांनी ‘तुका म्हणे आता’ या पुलंच्या फक्त तिनच प्रयोग झालेल्या नाटकाच्या आठवणी सांगीतल्या. अशा वेळी जेवताना खरकटा हात वाळून जायचा. मग काकू ओरडायच्या. ओशाळल्यासारखं करत आम्ही जेवायला सुरवात करायचो.

दादा कोंडकेंचा पिक्चर लागला की कोणता लागला आहे हे न पहाता आम्ही दुपारच्या शोला प्रभातला हजर. पोटभर हसुन संध्याकाळी पोट भरायला अन्नपुर्णा. आता माझ्याबरोबर अजुन दोन मित्रांनीही मेस सुरु केली होती. अण्णांना कधी ऊशीर झाला तर आम्ही आणि आम्हाला ऊशीर झाला की अण्णा वाट पहात थांबायचे जेवणासाठी. आता आताशी मेडीकललाही आमच्या गोंधळाचा अंदाज आणि कंटाळा आल्याने ते लवकर जेवण ऊरकून आम्हाला टेबल (रान) मोकळं करुन देत. मग दुपारी पाहीलेल्या अण्णांच्या विनोदी भागाची ऊजळणी व्हायची. त्या एका ओळीच्या विनोदामागे शुटींगच्या वेळी झालेला मोठा विनोद अण्णा रंगवून सांगत. आणि मग जो साताच्या वर मजले हास्यस्फोट व्हायचा की सांगायची सोय नाही. अशा वेळी काकूही बाहेर येवून म्हणत “अण्णा, मलाही कळूद्या तुमचा नविन चुटकूला” सांगण्यासारखा असेल तर आमच्यापैकी कुणीतर सांगे. नसेल तर अण्णा मिश्किल हसुन म्हणत “सेन्सॉर आहे” आणि अण्णांचे बरेच विनोद हे सेन्सॉरच असत. ते ईथेही सांगायची सोय नाही.
अण्णांना ‘पुण्यभुषण पुरस्कार’ जाहीर झाला. आम्हाला पत्ताही नाही. चार दिवस बोलणी चालली होती. कार्यक्रम कसा, कुठे, केंव्हा करायचा याचा. अण्णा अशा बाबतीत अगदी ऊदासिन असायचे. ठरल्याप्रमाणे बालगंधर्वला कार्यक्रम पार पडला. अण्णा निर्विकारपणे गेले, हार-तुरे, पुरस्कार वगैरे स्विकारलं, दोन औपचारीक शब्द बोलून अन्नपुर्णावरच आले. जेवायला वेळ होता पण आम्ही ऊगाचंच तासभर अगोदर येवून सोफ्यावर बसुन वेळ घालवत होतो. ईतक्यात बाबू आला. हातात मानचिन्ह, मोठा हार, गुच्छ वगैरे सेंटर-टेबलवर ठेवून निघून गेला. थोड्या वेळाने पोर्चसमोरच रिक्षातुन अण्णा ऊतरले. आत आले आणि नेहमी सारख्या आमच्या गप्पा सुरू झाल्या.
मी सन्मानचिन्ह पाहून विचारलं “अण्णा, कुणा मुर्खाला पुरस्कृत केलय पुणेकरांनी आज?”
अण्णा हसुन नाटकातला संवाद म्हणावा तसे म्हणाले “तो मुर्ख तुझ्यासमोरच बसलाय बेटा.”
मी जिभ चावली. सावरुन घेत म्हणालो “काय अण्णा, सांगायचं नाही का? आम्ही आलो असतो कार्यक्रमाला” अण्णा म्हणाले “अरे काय सांगायचं? साधी चहा बिस्किटे देखील नव्हती. मग काय ऊपयोग तुम्हाला सांगून.” असे अण्णा. मग आम्ही एकदम मागनी केली. “अण्णा, ते काही असो. तुम्हाला पुरस्कार मिळालाय म्हणजे आता पार्टी हवी म्हणजे हवी.” अण्णांनी बराच टाळायचा प्रयत्न केला. कारणे सांगीतली. पण आम्ही काही सोडत नाही म्हटल्यावर काकूही म्हणाल्या “अण्णा, मुलं ईतकी आग्रह करतायेत तर द्या की पार्टी. आपण गेस्ट हाऊसला सांगू हवं तर.” शेवटी अण्णा तयार झाले. खिशातुन पाकीट काढत काही पैसे माझ्या हातात देत म्हणाले “मार्केटयार्डमधून छानशी हापुसची पेटी घेवून ये ऊद्या.” दुसऱ्या दिवशी मस्त आमरस-पुऱ्या असा जंगी बेत जमवून आणला यमुताईंनी. संध्याकाळी छान पंगत बसली. ताटं सजली होती. आम्ही अण्णांनाही सजवलं होतं. फरची टोपी, कोट वगैरे. मग अण्णा त्यांच्या जागेवर बसले. शेजारी मी. मी म्हणालो “अण्णा, कार्यक्रम घरगुती असला तरी ऊत्सवमुर्तींनी काहीतरी बोलल्याशिवाय काही शोभा नाही पंगतीला.”
अण्णा हसले, ऊभे राहीले आणि म्हणाले “धन्यवाद! आज तुम्ही माझा रस काढलात” आणि पुढचं वाक्य हसण्याच्या कल्लोळात हरवून गेलं.

Anna.jpg

(खरे तर अण्णांच्या खुप मजेदार आठवणी आहेत. यथावकाश लिहिनच. फोटो आंतरजालावरुन. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.... Happy

शीर्षकात कै. वसंतरावांचा उल्लेख केल्यास वाचकांच्या चटकन लक्षात येईल..... असे माझे मत.... Happy

मस्त झालेत दोन्ही भाग. आणखी आठवणी लिहा.

यु आर लकी, असे लोक रोजच्या जेवणाखाण्याच्या ओळखीतले होते. >>> +१

पुन्हा वाचले. आज लॉगईन केले होते म्हणून प्रतिक्रिया देत आहे. एक नंबर. पुढचे भाग का घेत नाही मनावर आप्पा? लिही की पुढचे भाग. बालगंधर्वचे चित्रांचे प्रदर्शन, शिवनेरी कितीतरी आहे लिहण्यासारखे.

good.

कसल्या मस्त आठवणी आहेत!!
यु आर लकी, असे लोक रोजच्या जेवणाखाण्याच्या ओळखीतले होते. + 1

वसंत शिंदे जुन्या काळातील अभिनेते होते एवढंच माहीत होत मला, जास्त काही माहिती नाही. त्यांच्या बद्दल बरच काही वाचायला मिळेल .
छान ओघवता लेख आहे.

जी होती ती मेडीकलची. त्यांना अवातंर वाचन, कला, कलाकार, मौज-मस्ती दुरुनही माहीत नसे. असले तरी वेळ नसे
>> शाली जी मला हे पटले नाही. उलट सगळ्यात जास्त उमदी
मंडळी , वेगवेगळ्या कलांमध्ये रस घेणारी लोकं मेडिकल चीच असतात आणि पुण्यातील तर असणारच.

Pages