उन्हाळा संपताना...

Submitted by मनवेली on 13 May, 2018 - 06:46

उन्हाळा संपता संपता पावसाची लागलेली चाहूल मनाला सुखावणारी असते आणि भिजवणारीही. ढग मोठ्या धिटाईने आकाशभर संचार करू लागलेले असतात. अवचित सुर्यालाही झाकण्याचं धाडस करू धजावतात ते. उन्हाची धग कमी होते आणि चाहूल लागते पावसाच्या पहिल्या सरीची. पावसाची वाट पाहण्याचा हा काळ, उन्हाळा संपतानाचा.

पाऊस येणार! त्याच्या येण्याचा आनंद साजरा करायला उत्सुक असतो सारा आसमंत. उन्हाने शिणलेली झाडं, शुष्कं झालेल्या मातीच्या वाटा, तापलेले डांबरी रस्ते, तहानलेले पक्षी, आणि उन्हाळ्याला कंटाळलेले आपण... साऱ्यांनाच ह्या घामेजल्या दिवसांचा कंटाळा आलेला असतो.
उन्हं संपत आलेली, वातावरण ओलं, आकाश सावळं, ढगांना घेवून येणारा वारा, मधेच येणारी वळवाच्या पावसाची सर, कधी पावसाचा हात धरून येणारया गारा. उन्हाळ्यातली रखरखीतता संपणार असते आता. रसरशीत दिसू लागणार असतो निसर्ग. पावसाळ्याची नुसती चाहूल ही किमया करते. येऊ घातलेल्या त्या किमयागार पावसाची वाट पाहणंही सुखदच. तो येणार हे माहीत असतं तेव्हां! सूर्याने आगही ओकू नये, पावसाने कोसळू ही नये, फक्त भिजवून जावं तनामनाला.. असं वाटण्याचा तो काळ.

पावसाची चाहूल लागताच, पावसाळी आठवणीही धाव घेतात मनाकडे. ढगांसारख्या दाटून येतात मनाच्या आभाळात. पावसाशी जोडलेला असतो वास मातीचा आणि नव्या वह्या-पुस्तकांचाही. सुट्टीचं संपणं, शाळेचं सुरु होणंही ह्या पावसाशीच जोडलेलं. म्हणून मातीच्या वासाबरोबर सुगंध येतो शाळेचा. दोन्ही वासात तेच नवेपण. उन्हाळ्याचं संपणं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचं ही. तेही चुटपुट लावणारं, ओलं. पावसाळ्याची चाहूलही किती ओली, पावसाळी.

वळीवाची सर येते आणि निसर्ग चिंब होवून जातो. उन लुप्त होतें आणि आभाळ गडद निळे. पाउस येण्या आधीची ती ओलसर वेळ उगाच जुन्या आठवणी जाग्या करते. लहानपण आठवतं, शाळा आठवते, पावसाची कविता आठवते, पाण्यात होड्या सोडणं आठवतं... कॉलेज मधलं ते इंद्रधानुशी जगणं आठवतं, वाफाळलेली कोफी आठवते. त्याला ती आठवते, तिला तो. दोघांना आपलं पाहिलं प्रेम आठवतं. त्याला पावसाची सर आपल्या सखीसाराखी वाटते, तिला पाऊस आपला सख्खा मित्र वाटतो.

आठवणींचं ओलसर वातावारणाशी, पावसाशी, सरत्या उन्हाळ्याशी खूप जवळचं नातं असावं, आहेच! त्यांच्यातलं सरलेपण, उन्हाळ्याच्या संपण्यासारखं; त्यांच्यातलं हळवेपण, मेघांच्या सावळेपणासारखं; आणि पाऊस तर दोन्हीकडे, तिकडे मेघाताला, इकडे डोळ्यांतला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!