प्यादा

Submitted by द्वादशांगुला on 12 May, 2018 - 18:30

जगात दोन डोळ्यांनी जे दिसत असतं, त्याही पलिकडे बरंचसं लपलं असतं; आणि जे घडत असतं, त्याचे छुपे पैलू नि कंगोरे अज्ञातच असतात.
प्यादा. याच मुद्द्याभोवती फिरणारी कथा. जिला भय, रहस्याचे आयाम देण्याचा प्रयत्न मी केला आहे. आपणांस ही कथा आवडेल, अशी मी आशा करते. Happy

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

"काय कटकटए !
ओह्....प्लीज उघड बॅग..... फाॅर गाॅड्स सेक आणि हा बाॅक्स ....... निघ की.. हेल विथ यू.!"

असं पुटपुटत नुकताच ऑफिस वरून आलेला राज नव्या रूममध्ये शिफ्ट करायचं सामान नीट बांधून ठेवत होता. आधीच बाॅसने मुद्दाम जास्त वेळ थांबवून त्याच्या वैतागाच्या वणव्यात तेल ओतायचं काम केलं होतं. 'मग! वैताग नाहीतर काय...' जिथं भाड्यानं राहत होता तिथल्या मालकांनी त्याला आयत्यावरच खोलीचा ताबा सोडायला सांगितलं होतं. कारण काय तर म्हणे आतापासून खोली फक्त फॅमिलींनाच देणार... एक तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून नुकतंच कंपनीने अर्जंट प्रोजेक्ट त्याला दिल्याने तशी वेळेची अफाट कमतरता होती. अभावितपणे बसस्टॅडवर गाठ झालेल्या मि. कामत यांनी पाहून दिली होती.

'आपण वाच्यताही केलेली नसताना याला आपली नड कशी जाणवली देव जाणो!' हाच विचार राज करत होता. चेहर्‍यावरूनच काहीशा गूढ, आतल्या गाठीच्या वाटणार्‍या, पन्नाशीच्या त्या एजंटने त्याला ही रूम आयत्यावर बघून दिली. उद्या तो ती रूम बघायला जाणार होता. कशीही असली तरी अर्थातच त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. खरंतर त्याने रूम बघायच्या आधीच शिफ्टिंग केलं असतं. आतापुरतं तरी डोक्यावर छप्पर असलं म्हणजे झालं. नंतर हवी तर दुसरी रूम आरामात बघता येईल. पण कामतला आपली जास्तच अडचण असल्याचं जाणवू नये आणि हे जाणवून त्याने जास्तीचे पैसे उकळू नयेत म्हणून तो उद्या तिथं रूम बघायला चालला होता. मग लगेच त्याच दिवशी शिफ्टींग करणार होता. पण कामत हा काही प्रोफेशनल एजंटही वाटत नव्हता.
'जाऊ दे.... उगाच फुकटचा विचार करायला वेळ कोणाला आहे! आपलं काम झालं ना...' अशा विचारात त्याने मतमतांतरांचं जळमट झटकलं नि कपाळीचा घाम पुसत सामान ठेवण्यासाठी जुन्या खोक्यांमधली जळमटं साफ करायच्या तयारीला लागला.

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

' अडला हरी...'अशा अविर्भावात राज कामतसोबत २५ तारखेला ही रूम गाठत होता. कामतने इतक्यात रिक्षावाल्याशी बोलताना चार टिचक्या वाजवल्या, याने मात्र दुर्लक्ष केलं. जरा आडबाजूलाच होती रूम. नेमकी जाताना रिक्षाही बंद पडली. दुसरं वाहनही दिसे ना. फार त्रागा केला त्याने. पण आश्चर्य म्हणजे कामतच्या चेहर्‍यावर चिंतेचा लवलेशही नव्हता. नेहमीप्रमाणे मख्ख, भावनाशून्य, जणू मेंदूच काढून ठेवलाय, असा. रागच आला होता त्याला याचा, पण कसाबसा भावनांवर काबू मिळवला . मग पायपीट करतच कशीबशी त्या रूमची बिल्डिंग गाठावी लागली. आजूबाजूला मोजक्याच इमारती होत्या. घरं होती. मात्र फार फार जुनं कन्सट्रक्शन होतं या बिल्डिंगचं. पूर्वीचा लालसर रंग नीट लक्ष देऊनच लक्षात येत होता. जागोजागी चिराही पडल्या होत्या. उत्साह, चैतन्य नावालाही नव्हतं. राहतही नसावं जास्त कोणी. अगदी कंपाउंडमध्ये साधी झाडंही नव्हती. का कोण जाणे,पण फार निरुत्साही, शक्ती गळाल्यासारखं, संमोहन अवस्थेत असल्यासारखं, कोणीतरी आपल्यावर काबू ठेऊन आहे, असं त्याला वाटू लागलं. जसंजसं बिल्डिंगच्या अजून जवळ तो जात होता, तसतसं त्याला वाटत होतं, की जणू आपण इथे एकाकी पडलोय. आपल्याला परतताच येणार नाही आता. काळ सोकावला होता जणू.

राजच्या सुप्त मनाला असं जाणवत होतं की आपण वेगळ्याच जगात प्रवेश करत आहोत, वेगळ्याच मितीत, स्थल, वेळ, काळाची बंधनं पुसट होताएत, आपलं शरीर हलकं होतंय, अस्तित्वहीन होतंय, नव्हे आपल्या शरीरावर दुसर्‍याच कोण्या शक्तीचा ताबा आहे, तीच आपल्याला खेचतेय जवळ, तिच्या क्रूर विळख्यात........ इतक्यात मिट्ट काळोख पडला दिवसाढवळ्या! अंधार आपली अदृश्य लांबलचक बोटं त्याच्या डोळ्यात खुपसत होता. अमावास्येच्या रात्रीपेक्षाही घट्ट , दाट, भीषण अंधार, जग कवटाळू पाहणारा. क्रूरतेची झालर ओढून घेतलेला. एवढा काळोख की घुबडालाही दिसलं नसतं.... दिसायला
प्रकाश परावर्तित करणारा पृष्ठभाग तर समोर हवा ना..पण त्या जागेत प्रकाश खेचून घेणारं काहीतरी होतं हे खरं. या अचानक बदललेल्या वातावरणाने फारच अस्वस्थ वाटू लागलं. खूपच भीती वाटत होती. अंगाला कापरं सुटलं होतं. आपल्यासोबत काय घडतंय, याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ, साशंक होता तो. आता पुढे काय घडणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. आपण इथं का आलो याचाच राहून राहून पश्चात्ताप होत होता.

तेवढ्यात गार वार्‍याची झुळुक येऊन गेली नि अख्खं अंग शहारलं. आपण मागे मनालीला ट्रेकसाठी गेलो होतो तेव्हासारखाच गार वारा. पण अचानक. काही क्षणांपुरता. पण या वार्‍यात काहीतरी गूढ होतं. मेंदू गोठवणारं होतं. क्रूर, भीषण होतं. जणू हा वारा आपले दोन्ही हात पसरवून आपल्या प्राणांनाच सोबत घेऊन जायला आलेला. इतक्यात उग्र दर्प सुटला उकिरड्यापेक्षाही भयानक.... सगळीकडे. अन् ही हादरवून टाकणारी स्मशानशांतता. अभावितपणे तो नाकावर धरायला खिशात रूमाल चाचपडू लागला. 'काहीतरी शोधताना कसं मन पूर्णतः त्यातच गुंतलं जातं. तीच वेळ असते अदृश्य क्रूर शक्तींच्या चवताळलेल्या, रक्तासाठी आसुसलेल्या, कालसर्पासारख्या लपलपणार्‍या, लांब जिभांनी आपल्यावर घाला घालण्याची नि आपल्याला त्यांच्या अवाढव्य उदरातील लाखो बंदिस्त जिवांमधलंच एक बनवण्याची.' तो दचकला, चमकला. कोण बोलत होतं हे ..... कोणाचा भीषण आवाज होता तो कानात गुंजी घालणारा... ?

तो कामत होता.........त्याचा आवाजात प्रचंड अवहलना होती...त्याचा आवाज अवचितपणे क्रूर , अमानवी झाला होता. युगायुगांची मानवी रक्ताची तहान होती त्यात. त्यानं चमकून त्याच्याकडे पाहीलं. या मिट्ट काळोखात फक्त तो दिसत होता त्याला .!! आपल्याला काहीतरी दिसतंय ,याचा अर्थ आपण आंधळे झालेलो नाहीत, हे उमजून किती हायसं वाटलं होतं त्याला!पण हे सुख काही सेकंदापुरतंच होतं. त्याच्याकडे बघून आपादमस्तक हादरला तो..... तो कामत पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण क्रूरता
होती. चेहर्यावर कटू, क्रौर्याचं पाणी चढवलेलं विकट हास्य.

आणि बापरे....... डोळ्यात बुब्बुळंच नव्हती
त्याला... वरवर कोर्या भासणार्या त्या डोळ्यांत
शतकानुशतकांची आतुरता , भीषणता सामावली होती.
बापरे......... इतक्यात काही उमजायच्या आत तो कामत भीषण हसू लागला. ते गडगडाटी हास्य... आभाळ भेदणारं... सारं जग हादरवणारं. भल्याभल्याला हादरवून टाकणारं. अपशकूनी....! थोडीफार सकारात्मकता, आपण या दुष्टचक्रातून सुखरूप बाहेर पडू, असा वाटणारा दिलासा , नेहमीच्या रोजच्या आयुष्यात येण्याची ओढ, इच्छा‍‍- आकांक्षा जी काही थोडीफार उरली होती, तिचा क्षणार्धात चुराडा झाला होता... धीर खचला होता. ढासळला होता. आपला यःकश्चित जीव कधीही उसळत्या
पाण्यासारखा या शरीराच्या पिंजर्‍यातून बाहेर पडेल अशी भीती वाटत होती त्याला....... इतकं विखारी, छद्मी नजर नि हास्य होतं त्याचं....

इतक्यात अचानक काही कळायच्या आत अभावितपणे तो ओढला गेला.... त्या इमारतीत.
ती रक्ताळलेली आस लागलेली भयावह इमारत.... ती
हलत होती..... तिच्यामधून विकट हास्याचे....भीषण
हास्याचे फुत्कार बाहेर पडत होते.. तो त्या इमारतीच्या
मुख्यदारातून आत ओढले जात होता. कितीही शक्ती
पणाला लावली ,तरी त्याची त्या दुष्टशक्तीच्या तावडीतून सुटका होत नव्हती...लाखो निष्पाप जिवांचं रक्त पिऊन, लाखोंच्या मांसांला स्वाहा केलेलं, कित्येकांची हाडं करकर करत चावून बलदंड झालेलं करोडो हत्तींचं बळ होतं त्यात जणू. तो अभावितपणे एका खोलीत गेला... नव्हे नेलं गेलं त्याला... तिकडे तो गेला नि दार बंद झालंच. दारासाठी चाचपडू लागला, पण दारच सापडेना. खोलीत तुफानापूर्वीची शांतता होती.
तो हताश होता.. गलितगात्र होता.. इतक्यात काहीसं पांढरं, तीन- चार फुटांचं काहीतरी गूढ दिसायला लागलं... डोळे भुरकट झालेत? पुन्हा पुन्हा डोळे चोळून बघितलं.. तरी काही स्पष्ट होत नव्हतं... इतक्यात तो त्यात ओढला गेला... अचानक.....

ते भयंकर न संपणारं कारागृहच होतं जणू... करोडो हताश जीव गंजलेल्या साखळ्यांनी बांधलेले. सुटकेसाठी वर्षानुवर्षे वाट पाहणारे.. आनंदासाठी तडफणारे... काही भयानक जखमी..काही पुसट धुक्यासारखे दिसणारे... काही तर चक्क सापळे.. मानवी कवट्या जिकडेतिकडे पडलेल्या... शिसारी आली तेव्हा...आवाज येतायेत कसलेसे. तो आवाज हळुहळू वाढला. युगायुगांची आस होती त्यात. हाडं कराकरा चावण्याचे, मांसाचे लचके तोडण्याचे आवाज.. वर्षानुवर्षे साखळ्यांत अडकून पडलेल्या बंदिस्त जिवांचं रोदन ऐकू येत होतं. त्यांनी सुटकेची धडपड करताना आपटलेल्या साखळ्यांचे आवाजही. क्रूर हास्य... कान फाटून जातील इतका मोठा साखळ्यांचा, ओरडण्याचा, रडण्याचा, हाका मारण्याचा आवाज. असह्य होतंय हे सारं आता. ते आपल्याला बोलवत आहेत..... त्यांच्यातलं एक बनून जायला ... साखळ्या बडवायला ... जीव कोमजलेल्या फुलासारखा गळून पडतोय............. नाहीssssssssss........!!!!!!!!!

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

राजने चेहर्‍यावर आलेला घाम डोळे मिटूनच उलट्या हाताने पुसला. 'क्काय.....? साखळ्यांचा आवाज ...?' त्याने झटकन डोळे उघडले. त्याचे हात जाड लोखंडी साखळीने बांधलेले होते. त्याचा कर्णकर्कश आवाज त्याच्या मेंदूपर्यंत झिणझिण्या आणत होता. त्याने हात पाय हलवायचा निरर्थक प्रयत्न केला. 'अरे देवा!! पायही बांधले आहेत आपले! आता काय करायचं!!' त्याने बांधलेल्या हातांवर आपलं डोकं आपटलं. निदान आपली मान भिंतीला जखडवली नाहीय, या विचाराने त्याला त्याही परिस्थितीत हसू आलं. त्याने काहीतरी आठवल्यासारखा आजूबाजूचा अंदाज घेतला. एक जुनाट, लहानशी खोली होती ती. भिंतींच्या कोपर्‍यांना शेवाळ जमलेली. बाजूला एका काळपट लाकडी स्टुलवर पाण्याचा मातीचा माठ आणि एक पिचलेला स्टिलचा ग्लास ठेवलेला. समोर एक तसाच काळपट लाकडी बाक होता. त्यावर एक राखाडी रंगाचे कांबळे निष्काळजीपणाने ठेवलेले होते. आता थोडा अंदाज येऊ लागलेला त्याला. समोरचे जाड सळ्यांनी बनलेला दरवाजा सर्व सांगतच होता. निदान आपण त्या स्वप्नातल्यासारखे त्या भयाण जागेत बांधलेले नाही, या विचाराने त्याला थोडे हायसे वाटले. आता पाहिलं ते स्वप्न की सत्य याबद्दलच मुळात त्याच्या मनात शंका होती. कारण एवढी लहानातली लहान स्वप्नातली नोंद जागेपणी आठवणं शक्यच नव्हतं. पण आपण इथे कसे आलो, हे त्याला कळत नव्हतं.

राज या विचारात असतानाच कसलासा मोठा खुट्ट आवाज झाला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं, दोन उग्र चेहर्‍याचे पोलिस काॅन्सटेबल दरवाज्याचं कुलूप त्यांच्याकडील चावीच्या जुडग्यातील एका चावीने उघडत होते. म्हणजे तो पोलिस कोठडीत होता तर. राजच्या चेहर्‍यावर कुतूहल होतं, हे नक्की काय चाललंय म्हणून. आयुष्यात एवढे आश्चर्याचे धक्के त्याने कधीच पचवले नव्हते. तो इथे कधी, कसा, केव्हा आला, हे त्याला काहीच आठवत नव्हतं. भरतीनंतर वाळूतल्या सर्व खूणा पुसून जाव्यात, वा मुसळधार पावसानंतर मातीतले निशाण मिटून जावेत, असं काहीसं झालं होतं त्याला. आपण कामतबरोबर रूम बघायला जात होतो, हे त्याला नक्की आठवत होतं, बस्स. आणि ते भयानक स्वप्न, जे नेमकं स्वप्न होतं की सत्य याबद्दलच मुळी त्याच्या मनाची द्विधा परिस्थिती होती. पण ते त्याला लख्ख आठवत होतं हे मात्र खरं.

एक पोलिस खास खर्जातल्या मोठ्या आवाजात त्याच्यावर डाफरला, "ए, चल. आज तुझी कोर्टाची तारीख आहे! "
यावर तो सुकलेल्या गळ्याने नि तेवढ्याच आश्चर्याने म्हणाला, " कोर्ट? मी काय गुन्हा केलाय? मला इथं का बांधून ठेवलंय? "
यावर दुसरा पोलिस तुच्छतेने हसत म्हणाला, " हायला आता याला उत्तर द्या! साल्या, तीन-तीन खून करतोस नि वर तुकारामांचा भोळा भाव चेहर्‍यावर आणून आम्हालाच वर तोंड करून विचारतोस की मी काय केलंय? तू काही वाचणार नाहीस. चार दिवसांत तुझं भयानक रूप बघूनच बेड्या घातल्यात तुला कोठडीतपण, समजलास? पोकळ बांबूने फटके दिले की पोपटासारखा बोलशील तू नालायका!" असं म्हणून त्या पोलिसाने त्याची गचोंडी धरली. दुसर्‍या पोलिसाने त्या पोलिसाला आवरलं. त्याची साखळीतून मुक्तता केली नि त्याला बगलेत धरून दोघांनी त्याला पोलिस जीपमध्ये बसवलं. यथावकाश ती जीप कोर्टात पोहोचली. राजला मात्र अजूनही यावर विश्वास बसत नव्हता.

कडेकोट बंदोबस्तात त्याला पोलिसांनी जीपमधून उतरवलं आणि आत नेलं. आजुबाजूच्या सर्वांच्याच नजरा त्याच्याकडेच वळल्या होत्या. त्या नजरा राजला बोचत होत्या. त्याला आरोपी म्हणून उभं करण्यात आलं. त्याचे ओठ कोरडे पडले होते. घसा सुकला होता. थंडीतही त्याला घाम फुटला होता. तो भेदरून इकडेतिकडे पाहत होता. आपल्यासोबत हे काय होतंय, हेच त्याला कळत नव्हतं. घडतंय ते खरं की खोटं हे समजून घेण्यासाठी तो स्वतःला चिमटे काढून बघत होता. पण चिमटा काढलेल्या जागी येणारी प्रत्येक कळ त्याला अजूनच खोल निराशेच्या गर्तेत ढकलत होती. थोड्यावेळाने कोर्टाचे सुरूवातीचे सर्व सोपस्कार पार पडले. फिर्यादी पक्षाच्या वकिलाने सर्वप्रथम मि. कामत यांना बोलावले. कामत बोलू लागले.

" नमस्कार. मी विश्वनाथ कामत. इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्यादिवशी बसस्टॉपवर मी हे महोदय - राज देशमाने यांना एकट्यालाच 'रूम हवीय', असं बडबडताना पाहिलं. मला वाटलं असेल चिंतेत माणूस, म्हणून माझी ओळख दिली नि एका रूमबद्दल सांगितलं. तसा जरा विक्षिप्तच वाटलेला माणूस, पण 'असतो एकेकाचा स्वभाव' म्हणून सोडून दिलं. २५ तारखेला यांना मी रूम दाखवायला घेऊन गेलो. तेव्हा अचानक हे माझ्याकडे विक्षिप्त नजरेने भूत पाहिल्यासारखं बघू लागले. चालती रिक्षा अर्ध्या रस्त्यातच थांबवून चालू लागले. अखेर कसेतरी त्या बिल्डिंगपर्यंत पोहोचलो. तर यांनी थोड्या घाबरलेल्या, बिथरलेल्या नजरेने सगळीकडे बघायला सुरूवात केली. थोडे दूर असलेल्या शिंदे या तिथल्या रहिवासी गृहस्थाने नवीन व्यक्ती बघून यांना हाक मारली. तर अचानक माझ्याकडे बघून हे मोठ्याने किंचाळले आणि दहा पावलं लांब असलेल्या शिंदेंच्या अंगावर ते चाल करून गेले. शिंदे कैचीने कुंडीतल्या झाडांची छाटणी करत होते. यांनी ती हिसकावून घेऊन मोठ्याने किंचाळत त्यांच्या अंगात खुपसली, खूप वेळा. मी थिजून तसाच बघत राहिलो होतो. शिंदेंना वाचवायला धावून आलेल्या त्यांच्या दोन मुलांना यांनी त्याच कैचीने निघृणतेने मारलं. अन् तेच चक्कर येऊन पडले. या फॅमिलीला मी बिझनेसमुळे ओळखतो. मग मी पोलिसांना फोन लावला, थोड्या वेळात ते पोलिस आले. " एकंदर कामतांच्या चेहर्‍यावर भीती दिसत होती, तर त्याच्या- राजच्या चेहर्‍यावर आश्चर्य. आपण असं केलेलं त्याला अजिबात आठवत नव्हतं.

मग अनेक साक्षीपुरावे झाले. ही घटना घडताना प्रत्यक्ष पाहिलेल्यांचं बोलणं एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळत होतं. बिल्डिंगची सीसीटीव्ही फुटेजही राजच्या विरोधात पुरावे देत होती. त्याच्यासाठी नेमलेल्या सरकारी वकिलाकडे त्याच्या बचावासाठी शब्दच नव्हते. राजला अद्याप असा प्रसंग घडल्याचं काही आठवत नव्हतं. एवढा वेळ गप्प असलेला तो आता बोलू लागला. त्याने आठवत असलेला तो भयंकर प्रसंग कोर्टाला सांगितला. न्यायाधीशसाहेबांच्या चेहर्‍यावर कुतूहलमिश्रित आणि कोणा बावळटाकडे बघितल्यासारखे भाव होते. कोर्टाचं आतापर्यंतचं गंभीर वातावरण काही क्षण निवळलं होतं. यावर हजरजबाबीपणा दाखवत फिर्यादी पक्षाचा वकील म्हणाला, " मिलाॅर्ड, यावरून हे तरी सिद्ध होते की हा कोर्टाला फसवण्याची बिनबुडाची चाल खेळत आहे; अन्यथा तो वेडा तरी आहे. मला तरी दुसराच पर्याय योग्य वाटतो कारण मृत इसमांचा याच्याशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. आणि याचे हल्ले अचानक कारणाविना केलेले आणि बिनचलाखीचे आहेत. तरी याची मानसिक चाचणी करावी, असं अपील मी कोर्टाकडे करतो. " हे जजसाहेबांनाही पटलं. यानंतर कोर्टातर्फे सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली आणि राजची मानसिक चाचणी करण्यास सांगण्यात आले.

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

राजची अवस्था वाईट झाली होती. त्याची नोकरी तर गेली होतीच. वर पोलिसांचं टाॅर्चर, हा आरोप यानं त्याचा मेंदू बंद झाला होता. आपण वेडे आहोत का, या शंकेनं त्याच्यावर खरंच वेड लागायची पाळी आली होती. 'एवढे सगळे लोक त्यातही अनोळखी माणसं तर खोटं बोलूच शकत नव्हती. आपली नि त्यांची साधी ओळखही नसताना उगाच का खोटं बोलतील ते? आणि तो कामतही का म्हणून वाकड्यात शिरेल माझ्या? आपण चुकीचे आहोत, खोटे आहोत, आपल्याला वेड लागलंय', हीच स्वतःची प्रतिमा त्याने बनवून घेतली होती. त्याच्या ढासळत्या आत्मविश्वासाने त्याच्यातल्या त्यालाच मुळी हिरावून घेतलं होतं. तो हळुहळू वेडेपणाकडे झुकत चालला होता. त्याच्या भोवतीच्या वातावरणाने त्याला वेडं केलं होतं. ऐन तारूण्यात बरबाद झालेलं करियर, आयुष्य त्याला आपल्या डोळ्यांनी पाहवत नव्हतं. यामुळे ठार वेडा झाला होता तो. तो आता आपल्या अंगावरचा शर्ट फाडून घ्यायचा. स्वतःचे केस उपटायचा. लहर आली की बडबडत सुटायचा. मोठ्याने ओरडायचा. समोरच्या भिंतीवर डोकं आपटायचा. अचानक किंचाळत सुटायचा. अंगात वारं भरलंं, की पाच - पाचजणांना त्याला आवरणंही कठीण व्हायचं. कधी दोन-दोन दिवस खायचा नाही, तर कधी राक्षसासारखा बकाबका दोन्ही हातांनी ते बेचव जेवण पोटातल्या आगीत घालूनही त्याची भूक शमायची नाही. तसं जवळचं कोणी नव्हतंच. आई-बाबा केव्हाच सोडून गेलेले, त्यानंतर नातलगांनी हात झटकलेले. धीर द्यायलाही कोणी नव्हतं.

मध्ये दोन-तीन आठवडे गेले. पुढची कोर्टाची तारीख येईपर्यंत राजची अवस्था पूर्णपणे बिघडली होती. त्याला परत कोर्टात नेलं, तेव्हा त्याच्या वेडसरपणाचं, आक्रमकपणाचं प्रात्यक्षिक खुद्द न्यायाधीशसाहेबांनीही बघितलं. परत आपल्याला इथं आणलेलं पाहून खूपच चवताळला होता तो. दोन दिवसांत सर्व सोपस्कार पार पाडून राजची रवानगी जिल्हा मानसिक रूग्णालयात करण्यात आली. त्याची अवस्था आणखीनच बिघडत चालली होती. एकलकोंडेपणामुळे तो मानसिक रूग्ण झाल्याचे निकष तेथील तज्ञ डाॅक्टरांनी काढले. काही दिवसांनी त्याच्यावर तिथेही उपचार करणं कठीण झालं, नि त्याची पाठवण ठाणे मेंटल हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली. मात्र त्याच्यासोबत एकाच कंपनीत काम करणारे कलीग्ज खूपच आश्चर्यचकीत होते. खुद्द कंपनीच्या बाॅसलाही आश्चर्य वाटलं होतं. सर्वांत मिसळून राहणारा, सांगितलेलं काम अचूकतेने पार पाडणारा राज असा कसा असू शकतो, याचं. कोणाला वाटलंही नव्हतं की याच्या साध्या मुखवट्यामागे असा भीषण चेहरा लपलेला असू शकेल. या रगाड्यात त्याच्या आयुष्याचं मात्र पार वाटोळं झालं होतं.

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

मध्यरात्री 2:30 ला एका टुमदार एकट्या बंगल्यात फोन खणाणला. वोडकाचा एक मोठा घुटका घेऊन घसा जाळत दोन क्षण कडवट तोंड करून कामतने तो फोन उचलला. आलेला फोन 'त्याचा' होता. कामत शक्य तितक्या इमानदार आवाजात म्हणाला,
" अहो साहेब, तुमचा फोन...आज वेगळ्या नंबरवरून केलात फोन. बोला साहेब, काय आज्ञा आहे?"

पलिकडून घोगरा, गूढ आवाज आला," काय कसं काय? पैसै मिळाल्यावर विसरलास का मला?"

"अहो नाही हो साहेब.... तुम्हीच तर माझं नशीब पालटवलंत.
पण एवढ्या रात्री माझी आठवण का काढलीत साहेब?"

पलिकडला 'तो' कुत्सित हसत म्हणाला, " वफादार कुत्र्याची आठवण राखणीसाठी रात्रीच काढायची असते.
कुठे पचकलास नाही ना?"

कामत घाईघाईने म्हणाला, " नाही हो साहेब, मी कुठेच नाही बोललो काही. साहेब, पण तुमच्या खतरनाक मेंदूचं कौतुक करावं तितकं थोडंच.... काय प्लॅन आखला राव तुम्ही. मानलं तुम्हाला!"

पलीकडील 'तो' तितक्याच गूढ मात्र खोट्या खूशीत म्हणाला, " हा हा हा. कौतुक ऐकायला आवडतं मला! अजून बोल."

आपलं बोलणं त्याला आवडलं या विचाराने आणखीन खूश होऊन कामत बोलू लागला, "आणि साहेब, तुमच्या प्लॅनमध्ये कुठेही तुम्ही कोणालाच शंकेला जागा सोडली नाहीत. या सर्वाचे कर्ते तुम्हीच असलात, तरी तुमचं नावही कुठेच आलं नाही. सर्वात आधी तुम्ही दहा महिन्यांपूर्वी मला भेटलात. माझ्यासारखा विश्वास न तोडणारा आणि नको तिथं तोंड कधीच न उघडणारा माणूस तुम्ही कसा निवडलात, तुम्हालाच माहीत. तुमच्या म्हणण्यानुसार मी इस्टेट एजंटचा परवाना घेतला. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नंतर काही महिने या क्षेत्रात रूळलो. मग एके दिवशी तुम्ही मला राजच्या खोलीमालकांकडे पाठवलंत. त्या पैसेखाऊला जादाचे तुम्हीच दिलेले पैसे देऊन राजला खोलीतून काढायला सांगून एका दुसर्‍या फॅमिलीला तिथं रहायला पाठवलं. मग राजला बसस्टॉपवर भेटून या रूमचं सांगितलं, तुमच्याच सांगण्यावरून. तो काही 'रूम हवीय' असं बडबडतच नव्हता. पण तुम्ही सांगितलंत म्हणून कोर्टात मी तशी जुबानी दिली."

पलिकडला 'तो' आणखी खोट्या अविर्भावात नाटकीपणाने म्हणाला, " हं... मग? तुला तर सगळंच आठवतंय!"

यावर कामत भोळा भाव आणून म्हणाला, " मग काय साहेब, तुमचा प्लॅनच एवढा जबरी होता की अगदी इत्यंभूत आठवतंय सगळं! आणि हां तर मी कुठं होतो... मी कोर्टात तशी जुबानी दिली, तुमच्याच सांगण्यावरून. तर मी त्या दिवशी म्हणजे २५ तारखेला त्या राजला मी ती रूम दाखवायला घेऊन गेलो. पण मी त्या आधी त्याला तुमच्या सांगण्यावरून कुठे घेऊन गेलो हे फक्त तुम्हाला नि मलाच माहीत आहे. अगदी त्या राजलाही नाही माहीत. तर हाच दिवस होता मूळ गोष्ट उरकण्याचा. तुमच्या प्लॅननुसार मी त्याला माझ्या घरी नेलं. मी हाडाचा नि मूळ पेशाचा मोहिनीविद्यातज्ञ म्हणजेच हिप्नोटिस्ट आहे, हे जाणूनच तर तुम्ही मला हे काम सोपवलं होतंत. मी त्याला घरी नेलं. शांतपणे हाॅलमधल्या एका खुर्चीत बसायला सांगितलं. अतिशय बारीक, आल्हाददायक संगीत मागे सुरू होतंच. त्यानेच त्याच्या मनाची चलबिचल शून्यावर आली. मग मी हळुवार, सावकाश आवाजात त्याच्याशी बोलायला सुरूवात केली. थोड्याच वेळात तो पूर्णपणे ट्रान्समध्ये, एक प्रकारच्या समाधी अवस्थेत आला. तो तंद्रीत असतानाच त्याचं लक्ष माझ्याजवळच्या काचेच्या लोलकाकडे खेचून त्याला माझ्या वश केलं. मग त्याला मी तुम्ही व्हीएफएक्स ने बनवलेला तो भयानक व्हिडिओ दाखवला. अर्थात त्याला जे स्वप्न पडलेलं वाटत होतं, ती त्या व्हिडिओची कमाल होती. त्या व्हिडिओमुळे त्याला ती रिक्षा बंद पडलेली वाटली, तिथून खरा सुरू झाला तो व्हिडिओ. व्हिडिओ पण मस्तच बनवलेला होता. ती लक्झरी, गजबजलेली इमारत त्या राजला मोडकळीस आलेली वाटली असणार. त्याला पुन्हा तिथं नेलं तरी ओळखणार नाही तो.
हां, मग संमोहनतंत्राने ठरावीक खूण केल्यावर त्याच्या मेंदूला ते स्वप्न घडतंय असं वाटणार होतं, मात्र घडणार होते हे खूनच, अशी तजवीज मी केली. अर्थात ती खूण होती चार टिचक्यांची. त्याला खून करायच्या माणसांचे फोटो दाखवले. मात्र तो राज संमोहनामुळे त्यांना ओळखणार नाहीच आता. मग पुढे जे ठरवलं होतं, तेच घडलं. तुम्ही वेळ अगदी मस्त शोधून काढलीत. ती तीनही माणसं आसपास असतानाची. मग जेव्हा काम पार पडलं, तेव्हा मी परत टिचक्या वाजवून त्याच्यावरचं संमोहन काढून टाकलं. आता मी त्याला माझ्या घरी नेल्याचं आणि प्रसंग घडल्यानंतरच्या काही दिवसांचं आठवू नये, अशीही सूचना दिली त्याला. पण तुमच्या मेंदूला दाद द्यायला हवी हं.
साहेब, पण मला एक प्रश्न पडलाय, त्या शिंदेंशी आणि त्यांच्या दोन मुलांशी तुमचं काय वैर होतं हो? नाही म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नका, मला आपला उगाच पडलेला प्रश्न."

यावर तो पलिकडचा माणूस गूढ हसत म्हणाला, " अरे, तूच तर सगळं नीट पार पाडलंस. तुला सांगायला नको. तर ऐक, तो शिंदे माझा सख्खा मोठा काका. आणि त्यांची मुलं माझे भाऊ. फार पूर्वी जेव्हा आमची कंपनी डब्यात गेली होती, तेव्हा याच काकाने पूर्ण कंपनी त्याच्या नावावर केली, नि शून्य किंमतीचे काही शेयर्स आणि भलंमोठं कर्ज माझ्या बाबांच्या. कारण काय, तर माझे बाबा लहान, त्यांच्या डोक्याला कंपनीची घडी परत नीट बसवायचा ताप नको. माझे बाबा भोळे, त्यांनी ऐकलं. मात्र या नीचाने धोक्याने कंपनी परस्पर विकून पैसे गडप केले. सख्ख्या भावाने केलेला विश्वासघात त्यांना सहन झाला नाही, नि ते ह्रदयविकाराच्या झटक्याने वारले. त्यानंतर मी बाबांच्या इच्छेखातर कष्टाने तेव्हाचं वैभव परत मिळवलं खरं, पण ही तेव्हापासूनची सूडाची भावना मला जगू देत नव्हती. मग मी हा प्लॅन केला. पूर्णपणे अनोळखी माणसाला यात गोवायचं ठरवलं. आणि तुलाही शोधून काढलं, दृश्य स्वरूपात हाताळणीसाठी."

यावर कामत म्हणाला, " फारच वाईट झालं हो... पण चांगला काटा काढलात त्याचा! आता त्याची प्राॅपर्टीही तुमची होईल.
हां आता आठवलं, साहेब, त्या राजला संमोहित केल्यानंतरची प्रक्रिया खरंच अवघड होती. घडणार एक होतं, दाखवायचं एक होतं. आधी तुमच्याशी यावर चर्चा करत असताना एका ठिकाणी मलाही गडबडल्यासारखं झालं होतं. तेव्हा तुम्हीच मला नीट समजावून सांगितलं होतंत. तुम्हालाही ही विद्या येते का?"

यावर पलिकडून तो खुनशी हसत म्हणाला," अठराव्या वर्षापासून याचाच तर अभ्यास केलाय मी! या विद्येत मी तुझा बाप आहे, समजलास. कधीकाळी स्वतःहून त्या नालायकाला अन् त्याच्या पोरांना मारायचं, या हेतूने शिकलो होतो रे. पण नंतर हे माझ्यावर उलटू नये, म्हणून मी तुझा वापर एक शुल्लक प्यादा म्हणून केला. तूही एक प्यादा आहेस नि तो राजही एक प्यादा होता. त्यामुळे मी कायम गुप्ततेत राहून घडवून आणलं हे सगळं. पण माझ्या या प्लॅनबद्दल फक्त मला नि तुलाच माहीत आहे. मला यापुढे कोणताच धोका पत्करायचा नाहीय. आता यापुढे एक जादू होईल बघ, मीच आधीपासून ठरवून आणलेली! हं ऐक-
'बुद्धिबळातली प्यादी समजतात स्वतःला राजा नि लढतात शक्तिनिशी. पण शेवटी त्यांना स्वतःचा जीव गमावून खर्‍या राजालाच वाचवायचं असतं!' "

हे ऐकून एकाएकी कामतच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले, त्याच्या चेहर्‍यावर क्रूर भाव अवतरले. त्याने हातातला फोन आदळला. आसपास राक्षसी नजरेने पाहू लागला. त्याला इतक्यात फळांच्या बाजूला पडलेली सुरी दिसली. त्याच्या चेहर्‍यावर क्रूर, विकट हास्य अवतरलं. त्याने वर्षानुवर्षांची आतुरता असल्यासारखी एका झटक्यात ही सुरी हातात घेतली. तिच्या धारदार पातीकडे तो न्याहाळू लागला. आणि एकाएकी त्याने ते धारदार सुरीचे लकाकते पाते आपल्या गळ्यावरून जोरात फिरवले आणि तो खाली पडला. पलिकडला तो क्रूर हसत होता, आपली योजना पूर्णपणे पार पडल्यामुळे. राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.

दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.
" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. "

□□□□□□□□समाप्त□□□□□□□□

Group content visibility: 
Use group defaults

मी पहिला !
खिळवून ठेवणारी मांडणी. आवडली कथा Happy

काही नसत्या शंका पुन्हा पुन्हा डोकं वर काढतायेत.. Wink

पुढील कथेची वाट बघतोय ! Happy

खूपच डेंजरस लिहीलयस जुई... सुरूवातीला टीप टाक :- कमजोर हृदयवाले इसे आजिबात ना पढे....किंवा पढे तो अपनी जवाबदारी पे पढे...
नाहीतर एखादा जाईल ना ढगात....
एक्सलंट लिहीलयस....

आवडली..
दिवसेंदिवस तुमचं लेखन डिटेलिंग मध्ये होतंय, आणि डेंजरसही Wink

Apratim.....
Pan yat bichara raj nahak fasala .....

आनंददादा , सिद्धी, लोहपुरूष जी, रोश जी धन्यवाद! Happy

काही नसत्या शंका पुन्हा पुन्हा डोकं वर काढतायेत.. Wink>>>>>>> कथेबद्दल असतील तर मला ऐकायला आवडतील. Happy

दिवसेंदिवस तुमचं लेखन डिटेलिंग मध्ये होतंय, आणि डेंजरसही >>>> धन्स Happy

खूपच डेंजरस लिहीलयस जुई... सुरूवातीला टीप टाक :- कमजोर हृदयवाले इसे आजिबात ना पढे....किंवा पढे तो अपनी जवाबदारी पे पढे...
नाहीतर एखादा जाईल ना ढगात....
एक्सलंट लिहीलयस....>>>>> Rofl एवढं डेंजर लिहिलंय मी?

Pan yat bichara raj nahak fasala ....>>>> हम्म !

बुद्धिबळातली प्यादी समजतात स्वतःला राजा नि लढतात शक्तिनिशी. पण शेवटी त्यांना स्वतःचा जीव गमावून खर्‍या राजालाच वाचवायचं असतं!
>>> वाह द्वादशांगुला वाह !!!

अर्थात ☺️
एक सांगू का - मला वाटतं कथा या एन्ड वर संपली पाहिजे होती - राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.

शेवटच्या परिच्छेदाची गरज नाहीय असे माझं मत -
दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.
" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. "

एक सांगू का - मला वाटतं कथा या एन्ड वर संपली पाहिजे होती - राजाने आपल्या बचावासाठी आपलाच एक प्यादा मारला होता.

शेवटच्या परिच्छेदाची गरज नाहीय असे माझं मत -
दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये खालील मथळ्यासह बातमी होती.
" आपल्याच घरात विश्वनाथ कामत यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्या असल्याचा पोलिसांचा संशय. ">>>>> मलाही खरंतर असं वाटलेलं! सूचनेबद्दल धन्स हं! मनापासून वाचता तुम्ही ! Happy

तुम्ही सुचवलंत ते अगदी योग्य वाटतंय. मी शेवटचं वाक्य लिहिलं होतं कारण मला त्यातून या कामतच्या मर्डरची केस खूनी न पकडता कशी बंद झाली हे दाखवायचं होतं. आत्महत्येच्या नावाने ती केस संपवून अज्ञात असलेला मात्र हे सगळं चालवणारा कर्ता कसा अलगद सुटला, हे दाखवण्याच्या नादात असा शेवट केला. मलाही आधीच्याच वाक्यावर थांबवावं असं वाटत होतं.

छान लिहिली आहे कथा!!
संमोहनामुळे एवढे सगळे शक्य होईल हे खरे वाटत नाही. पण कथा म्हणून छान आहे.

मस्त जमलीये कथा.
मधेमधे राज्ला जे काही दिसत होतं ते भारंभार स्वल्पविराम घालुन लिहिलेलं वाचताना मला कंटाळा आलेला पण नेटाने शेवटापर्यंत वाचली आणि आवडली. Happy

धन्यवाद अॅमी जी, सस्मितजी Happy

मधेमधे राज्ला जे काही दिसत होतं ते भारंभार स्वल्पविराम घालुन लिहिलेलं वाचताना मला कंटाळा आलेला >>>>> हो ! नकळत ती वाक्य जास्तच मोठी झालीयेत. Happy

जबरदस्त स्टोरी
शेवटपर्यन्त खिळवुन ठेवते
एकदम हॉलीवुड पिक्चर स्टाईल Happy